Wednesday, October 21, 2026

समांतर विश्वांच्या संकल्पनेची नाविन्यपूर्ण मांडणी : Awake

सॅन फ्रॅन्सिस्कोच्या जवळच समुद्रात एक Alcatraz नावाचं बेट असून त्या बेटावर त्याच नावाचा एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा असलेला तुरुंग आहे. पुस्तकं, कादंबऱ्या अशा विविध रूपांमध्ये या तुरूंगावर अनेक प्रकारच्या साहित्याची निर्मिती तर झालीच आहे पण अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका यांनाही या तुरुंगाने विषय पुरवला आहे. २०१२ साली याच Alcatraz तुरुंगावर अजून एका नवीन मालिकेची निर्मिती करण्यात आली होती. पण यात विषय नेहमीपेक्षा थोडासा वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात आला होता. ही मालिका थोडी सायफाय पद्धतीने मांडण्यात आली होती. साठीच्या दशकात Alcatraz तुरुंगातील काही कैद्यांनी केलेलं पलायन, त्यांचं गायब होणं आणि थेट २०१० सालात प्रकट होणं असा अतिशय उत्कंठावर्धक विषय होता. दर एपिसोडनंतर रहस्य अधिकाधिक गहिरं होत जात होतं पण उत्तरं काही मिळत नव्हती. होता होता एकूण १३ पैकी माझे ११ एपिसोड्स संपले पण रहस्याची उकल होण्याचं कुठलंही चिन्ह दिसत नव्हतं. अखेरच्या दोन एपिसोड्स मधे गुंतागुंत अजूनच वाढवून ठेवून पहिला सिझन अचानकच संपून गेला. आता दुसऱ्या सिझनची वाट बघत चरफडत राहण्याखेरीज इतर कुठलाही उपाय नव्हता.

दुसरा सिझन कधी येतोय हे पाहण्यासाठी नेटवर शोधाशोध केली असता मला प्रचंड धक्काच बसला. या मालिकेतली गुंतागुंत अमेरिकन प्रेक्षकांना आवडली नसल्याने तिला अतिशय कमी TRP रेटिंग मिळालं होतं आणि त्यामुळे निर्मात्यांनी पहिल्या सिझन नंतरच मालिका गुंडाळून टाकण्याचा निर्णय घेतला होता. या मालिकेत न कळण्यासारखं काय होतं असा विचार करत अशी उत्तम मालिका बंद पाडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अमेरिकन प्रेक्षकांना मी मनोमन यथेच्छ शिव्या घातल्या (आम्ही मनातच म्हणायचे : इति पुलं). मात्र दुसऱ्या सीझनविषयी शोधाशोध करत असतानाच माझं अचानक एका लेखाकडे लक्ष गेलं. त्या लेखात अशाच प्रकारे अर्धवट बंद करण्यात आलेल्या परंतु उत्तम विषय असलेल्या मालिकांची यादीच दिली होती. या लेखात पहिल्याच स्थानावर असलेल्या Awake नावाच्या मालिकेने माझं लक्ष वेधून घेतलं.

 


मालिकेचा गोषवारा वाचत असताना हे प्रकरण काहीतरी वेगळंच असल्याचं मला जाणवत होतं. त्यामुळे Awake बघायचं नक्की करण्यात आलं. Awake मालिका बंद पडण्याचं कारण तर अजूनच धक्कादायक आणि तितकंच हास्यास्पदही होतं. त्या लेखात असं म्हंटलं होतं की ही मालिका अमेरिकन प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेली असल्याने ती बंद करण्यात आली होती. त्यामुळे त्यात एवढं अवघड काय असेल याची उत्सुकता आणि बंदी घातलेल्या कलाकृती आवर्जून बघण्याची/वाचण्याची नैसर्गिक उर्मी यामुळे Awake ताबडतोब बघायला घेतली आणि आजच्या काळात ज्याला बिंजवॉच म्हंटलं गेलं असतं अशा राक्षसी वेगाने अक्षरशः संपवूनही टाकली. कारण दुसरा इलाजच नव्हता. १३ भागांच्या या मालिकेतला प्रत्येक भाग हा आधीच्या भागापेक्षा अधिकाधिक गूढ आणि चक्रावून टाकणारा असा होता.


मालिकेचा विषय मालिकेच्या शीर्षकात सांगितल्याप्रमाणेच आहे. लॉस अँजलीस पोलीस खात्यात काम करत असलेला मायकल ब्रिटन (जेसन आयझक्स : याला बघून संजय दत्तची आठवण येते) हा डिटेक्टिव्ह दुहेरी आयुष्य जगत असतो. एका आयुष्यात तो स्वतःच्या पत्नीसोबत राहत असतो तर दुसऱ्या आयुष्यात आपल्या मुलासोबत. पण हे वेगळं राहणं नेहमीसारखं नसतं. ही एका अर्थाने दोन समांतर विश्व असतात. त्यापेकी एकात मायकलच्या मुलाचा मृत्यू झालेला असतो तर दुसऱ्यात त्याच्या पत्नीचा. मालिकेच्या सुरुवातीलाच एक जीवघेणा अपघात दाखवला जातो ज्याच्या परिणामवश मायकल ही अशी दोन आयुष्यं जगायला लागतो.

 

दोन्ही विश्वं ठळकपणे वेगळी ओळखता यावीत यासाठी प्रत्येक विश्व हे एका पूर्णतः निराळ्या रंगच्छटेत दाखवण्यात आलेलं आहे. मायकलचा मुलगा जिवंत असलेलं विश्व हे श्वेत, निळसर, शीतल रंगांचा वापर करून तर पत्नी जिवंत असलेलं विश्व हे पिवळा, सोनेरी अशा गडद आणि उष्ण रंगांचा वापर करून चितारण्यात आलेलं आहे. दोन्ही विश्वांमध्ये अपघातानंतर मायकलचे मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार चालू असतात. त्यात समोर बसलेल्या मानसोपचारतज्ज्ञाला मायकल आपले अनुभव, अपघात, दुसरं विश्व या साऱ्यांचं इत्यंभूत वर्णन करून सांगत असतो मात्र त्याच वेळी तो मानसोपचारतज्ज्ञ आपण बसलोय हेच विश्व कसं खरं आहे आणि मायकल दुसरं विश्व म्हणून ज्याचा अनुभव घेतोय ते निव्वळ स्वप्न कसं आहे हे ठामपणे सांगत असतो. त्यावर हसून मायकल फक्त एवढंच म्हणत असतो, "तो दुसरा shrink (डॉक्टर) पण exactly हेच म्हणतोय"

गंमत म्हणजे दोन्ही विश्वातले मानसोपचारतज्ज्ञ या वेगळ्या व्यक्ती आहेत. मात्र बाकीची अनेक पात्रं दोन्ही विश्वांमध्ये अस्तित्वात आहेत. मायकल दोन्ही विश्वांमध्ये विनासायासपाने ये-जा करत असल्याने केवळ त्यालाच दोन्ही विश्वातील माहिती असते, ज्ञान असतं आणि एका विश्वातल्या  घटना, गोष्टी त्याला दुसऱ्या विश्वातही ज्ञात असतात. या जगावेगळ्या शक्तीचा वापर करून तो अनेकानेक अवघड केसेस बाकीच्या डिटेक्टिव्जना, त्याच्या पार्टनरला आणि त्याच्या बॉसला ही चक्रावून टाकणाऱ्या पद्धतीने सोडवत असतो. अपघातानंतर मायकल बदलला आहे, वेगळा वागतोय हे सर्वांना जाणवत असतं पण नक्की काय बदललं आहे हे कोणालाच कळत नसतं.

आणि त्यानंतर साधारण १०-११ व्या भागापासून मुख्य अपघात, ती घटना, त्याची कारणमीमांसा, प्रत्यक्ष अपघातापूर्वीच्या आणि नंतरच्या घटना अशा गुंगवून टाकणाऱ्या थरारक प्रसंगांची मालिकाच अतिशय धक्कादायक आणि वेगवान पद्धतीने प्रेक्षकांसमोर उलगडत जाते. मालिका एवढी प्रचंड वेगवान आहे की दोन्ही विश्वांत जागा असणारा मायकल हा मनुष्यप्राण्याला अत्यावश्यक असणारी झोप कधी घेतो? की घेतच नाही? आणि झोप घेतच नसेल तर झोपेशिवायही एवढा ताजातवाना, दक्ष कसा राहतो, सुस्पष्टपणे विचार कसा करू शकतो असे मूलभूत प्रश्न प्रेक्षकांना पडतच नाहीत आणि पडले तरी सायफाय मालिका असल्याने प्रत्येक गोष्टीला पटेलसं स्पष्टीकरण मिळेलच असंही नाही असं म्हणून प्रेक्षक स्वतःचं समाधान करून घेतो.

एक महत्वाचा फरक म्हणजे Alcatraz किंवा अन्य मालिका ज्याप्रमाणे abruptly संपवण्यात आल्याने प्रेक्षकांच्या मनात आपली फसगत झाल्याची भावना होते तसं काही Awake संपताना वाटत नाही. याचं कारण म्हणजे ही मालिका पहिल्या सीझननंतर संपवण्यात येणार असून काहीही झालं तरी याचा दुसरा सिझन येणार नाही याची कल्पना या मालिकेच्या निर्मात्यांना सुरुवातीच्या काही एपिसोड्सनंतर देण्यात आली असावी असं वाटतं. कारण अखेरच्या ४-५ भागांमध्ये मालिका आपला ट्रॅक बदलून अजूनच वेगवान होते. प्रसंगी किंचित supernatural घटनांचा आधार घेऊन प्रेक्षकांना साधारण पटेलसा शेवट देण्याचा प्रयत्न करते. अनेकांना हा शेवट पटणार नाही किंवा एवढ्या गुंतागुंतीनंतर फारच सुलभीकरण केल्यासारखंही वाटू शकेल. मी पहिल्यांदा बघितली तेव्हा मला शेवट खूपच आवडला होता. मात्र आता कित्येक वर्षांनी पुन्हा बघताना मात्र हा सुलभीकरणाचा विचार मनाला चाटून गेला. But in any case, मालिका अतिशय रंजक पद्धतीने, सगळ्या अपूर्ण कोड्यांची यथायोग्य उत्तरं प्रेक्षकांना मिळतील आणि त्यांना फसवल्यासारखं वाटणार नाही याची काळजी घेऊनच अखेरच्या काही भागांची आणि विशेषतः शेवटच्या भागाची मांडणी केली आहे हे नक्कीच जाणवतं. आणि त्याबरोबरच हेही जाणवत राहतं की ही मालिका पहिल्या सीझननंतर अकस्मात बंद पडण्याऐवजी हिचे जर अजून काही सीझन्स प्रदर्शित होऊ शकले असते तर निर्मात्यांनी हा विषय, अन्य शक्यता या सर्वांचा उहापोह करून अजून कल्पकतेने या विषयाची मांडणी केली असती हे नक्कीच.

अर्थात शेवटचा प्रसंग तर या संपूर्ण प्रकरणावरच प्रश्नचिन्ह उमटवणारा ठरू शकतो. पण तरीही एखादा वेगळाच विषय घेऊन तो अतिशय निराळ्या पद्धतीने मांडणे, निरनिराळ्या कंगोऱ्यांचा विचार करून विषय अधिकाधिक रंजकपणे कसा दाखवता येईल याचा सखोल विचार करणे, त्यासाठी रिसर्च करणे, कष्ट घेणे या महत्वाच्या आणि अत्यावश्यक गुणांसाठी मात्र अमेरिकन टीव्हीच्या मालिकाकर्त्यांना साष्टांग दंडवत!

डिटेक्टिव्ह म्हंटलं की तो केसेस सोडवत राहणार, जोडीला त्याचा दुःखद आणि झाकोळलेला भूतकाळ असणार, पोलीस डिपार्टमेंटमधलं टिपिकल राजकारण या साऱ्या टिपिकल गोष्टी बघायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं बघायचं असं 'जागेपणाने' ठरवत असाल तर मायकल ब्रिटनच्या दुहेरी विश्वाचा आवर्जून अनुभव घ्या.

टीप : कुठल्याही OTT/चॅनल/टेलिग्रामवर उपलब्ध नाही. फक्त HeOTT (टोरंट) वर उपलब्ध.

No comments:

Post a Comment