सहसा लोकांना दुय्यम, ट्रॅशी, दर्जाहीन, सी ग्रेड, अत्यंत सामान्य कुवतीचे वाटणारे चित्रपट सहसा मलाही अगदी तसेच वाटतात. परंतु कधी कधी काही चित्रपट याला अपवादही ठरतात. याबाबतीत प्रामुख्याने आठवणारे दोन चित्रपट आहेत. यातल्या पहिल्या चित्रपटाविषयी नंतर कधीतरी लिहिता येईल. या यादीतला दुसरा चित्रपट हा आजच्या लेखाचा विषय आहे. तो चित्रपट म्हणजे रोहित जुगराज चौहान दिग्दर्शित, मोहित अहलावत आणि प्रियांका/निशा कोठारी अभिनित (!), रामू कॅम्पचा, आयएमडीबी वर जेमतेम ३.८ मूल्यांकन असलेला (IMDB च्या बिनडोक मूल्यांकनांवर विश्वास न ठेवण्याचं हे अजून एक प्रबळ कारण), एक दुर्दैवी आणि दुर्लक्षित, शैलीदार मारधाडपट (शैलीदार मारधाडपट हे फारच डाऊनमार्केट वाटत असेल तर स्टायलिश अॅक्शनपट म्हणू शकतो) 'जेम्स'.
एकेक मारधाडीचा प्रसंग हा २००५ च्या मानाने अतिशय वेगवान, कल्पक, शैलीदार, काही वेळा अविश्वसनीय तर काही वेळा अगदी चमत्कृतीपूर्ण आहेत.
चित्रपटातला पहिला प्रसंग ट्रेनमधल्या हाणामारीचा आहे. आपला नायक म्हणजे जेम्स अर्थात मोहित अहलावत ट्रेनने गोव्याहून मुंबईला येत असतो. रामू त्याच्या चिरपरिचित शैलीतला एक विचित्र कॅमेरा अँगल वापरून पडद्याच्या एका वरच्या कोपऱ्यातून नायकाच्या चेहऱ्याच्या थोड्याशा भागावर फोकस करण्याचा प्रयत्न करतो जो निष्फळ ठरतो कारण मध्ये एक बाटली ठेवलेली असते जिच्यावर कॅमेरा ऑटो फोकस होतो. असो. दरम्यान अचानक ट्रेनमध्ये घुसलेले ४-५ गुंड लोक जेम्सच्या समोरच्या सीटवर बसलेल्या नवविवाहित जोडप्यातल्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यावर एखाद्या लहान मुलाला अगदी प्रेमाने समजावून सांगावं त्या पद्धतीने एका कोपऱ्यातून आवाज येतो.
"मत करना, मार पडेगी"
त्यानंतर टोळीप्रमुखालाच एका गुद्द्यात (मराठीतला ‘पंच’) गारद करण्यात येतं आणि आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी उरलेल्या पोरांटोरांना पुन्हा एकदा समजावणीच्या स्वरात समजावून सांगितलं जातं,
"तुम्हारी भलाई के लिये कह रहा हूं, जाओ यहां से"
ते अर्थातच ऐकत नाहीत आणि त्यामुळे एकेकाला अक्षरशः एकेका फायटीत शब्दशः लोळवलं जातं. आता हा अगदी साधा सोपा मारामारीचा प्रसंग आहे. पण २००० च्या पहिल्या दशकात आपल्या कारकिर्दीच्या अगदी उच्चतम स्थानी असलेला रामू हा प्रसंग अतिशय कल्पक पद्धतीने चित्रित करतो.
या संपूर्ण प्रसंगादरम्यान रामूने अक्षरशः थरकाप उडवणारं, ताण वाढवत नेणाऱ्या बीट्सचा वापर करण्यात आलेलं पार्श्वसंगीत वापरलं आहे! नायकाचा प्रभाव अधोरेखित करण्यासाठी हा मारधाडीचा संपूर्ण प्रसंग स्लो मोशनमध्ये चित्रित करण्यात आलेला आहे. आणि एक अतिशय छोटासा पण प्रभावी तपशील म्हणजे रंगीत आणि कृष्णधवल चित्रीकरणाची खुबीदार सरमिसळ. जेव्हा गुंडाला गुद्दा मारला जातो त्यावेळी तो प्रसंग रंगीत पद्धतीने चित्रित करण्यात आलेला आहे. मात्र वर्मी घाव बसल्यानंतर यातला प्रत्येक गुंड ज्यावेळी जमिनीवर कोसळतो त्यावेळी तोच प्रसंग पडद्यावर कृष्णधवल पद्धतीत दिसतो. कृष्णधवल चित्रीकरण हे सहसा भूतकाळ किंवा फ्लॅशबॅक दाखवण्यासाठी वापरण्यात येतं हा सर्वमान्य नियम आहे. रामू फक्त चित्रीकरणाचा रंग बदलून ते गुंड भूतकाळात जमा झाले हे अतिशय subtly सांगून टाकतो. (अर्थात हे रामूने या हेतूने केलंही नसेल पण रिपीट मोडवर चित्रपट बघताना हे असले काही ज्ञानकण मेंदूत जमा होत जातात.)
चित्रपटात झाकीर हुसेन आणि अजून एक कोणीतरी (!) असे दोन प्रमुख खलनायक आहेत ज्यातला झाकीर हुसेन अर्थातच मुख्य खलनायक आहे. त्यानंतर गॉडफादरमधल्या लुका ब्रासीला मारण्याच्या हॉटेल मधल्या प्रसंगाची भ्रष्ट नक्कल म्हणून एक प्रसंग उप-खलनायकाचं क्रौर्य अधोरेखित करण्यासाठी दाखवला जातो. त्याचा खुनशी आणि विक्षिप्त स्वभाव दाखवण्यासाठी अजूनही एक-दोन प्रसंग चित्रपटाच्या सुरुवातीला येऊन जातात. प्रमुख खलनायक असलेल्या झाकीर हुसेनच्या क्रौर्याचे प्रसंगही सुरुवातीलाच पडद्यावर दिसतात. यातला झाकीर हुसेन तरी थंड खुनशी नजर, दगडी चेहरा यामुळे थंड रक्ताचा खलनायक वाटतो. पण दुसऱ्या क्रमांकाचा खलनायक मात्र खलनायकही वाटत नाही की झाकीर हुसेनचा भाऊही वाटत नाही.
सत्या, हेराफेरी आणि अशाच अनेक चित्रपटांमध्ये दुर्दैवाने ज्याला भावाच्या/मित्राच्या अशा दुय्यम भूमिकांवर समाधान मानावं लागलं असा स्नेहल दाबी हा अतिशय गुणी कलाकार याही चित्रपटात नायकाच्या मित्राच्या दुय्यम भूमिकेतच आहे. मात्र त्याच्या वाट्याला आलेले दोन-चार प्रसंगदेखील त्याने नेहमीप्रमाणेच अतिशय जीव ओतून साकारले आहेत. त्याच्यावर हल्ला करण्यापूर्वी त्याच्या घरात घुसून निव्वळ दहशत माजवण्यासाठी त्याच्याशी उंदीर-मांजराचा खेळ खेळणारी, अतिशय अनप्रेडिक्टबल अशी शांती नारायणच्या (झाकीर हुसेन) गुंडांची टोळी आणि स्वतः शांती नारायण यांनी त्याच्या घरात हैदोस घालण्याचा जो भयानक प्रसंग पडद्यावर दाखवण्यात आला आहे तो अक्षरशः अंगावर येतो!
सुरुवातीच्या एका प्रसंगात जेम्स आणि निशाशी (नायिका!) क्षुल्लक कारणावरून वादावादी झालेले शांती नारायणचे गुंड आता हात धुवून जेम्सच्या मागे लागलेले असतात आणि जेम्स जीममध्ये वजन उचलण्याचा व्यायाम करत असताना त्याच्यावर हल्ला करतात. हा प्रसंग देखील हाणामारीचा रामूचा एक सिग्नेचर प्रसंग म्हणावा इतका कल्पक जमला आहे. स्लो मोशन, गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्नही करण्याच्या आधीच जेम्स प्रेक्षकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही इतक्या वेगवान प्रकारे तो हल्ला परतवून लावतो आणि अजून एका लढाईत गुंडांविरुद्ध विजय मिळवतो.
इथपर्यंतचे सर्व प्रसंग हे छोटेखानी आहेत, लगेच संपणारे आहेत. मात्र त्यानंतर अक्षरशः लागोपाठ आदळणारे हाणामारीचे तीन प्रसंग अतिशय लांबलचक आहेत. त्या तिन्ही प्रसंगांमध्ये स्टोरीटेलिंग, छायाचित्रण, संवाद, टायमिंग आणि एडिटिंग या सगळ्या सगळ्यावर रामूच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतल्याचं ते प्रसंग पाहताना पूर्ण वेळ जाणवत राहतं.
पहिल्या प्रसंगात जेम्सला अडकवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये शांती नारायण आणि एक प्रमुख इन्स्पेक्टर एक भयानक कारस्थान रचतात. या प्रसंगात सर्वात पहिल्यांदा जेम्स आणि शांती नारायण एकमेकांसमोर येतात. त्यावेळी त्यांच्यात झालेलं छोटंसं संवादयुद्ध अतिशय उत्तम आहे. त्यानंतर जेम्सने केलेली तुफान हाणामारी आणि सुरुवातीला आत्मविश्वासाने जेम्सवर हल्ला करणारा तो इन्स्पेक्टर त्या प्रसंगाच्या अखेरीस मात्र हतबल होऊन जाऊन शांती नारायणच्या समोर एका विचित्र अवस्थेत उभा राहण्याचा १८० अंशातला बदल रामूने ज्या कल्पकतेने आणि शून्य संवादाच्या साहाय्याने दाखवला आहे त्याला खरंच तोड नाही!
दुसऱ्या प्रसंगादरम्यान, नायिकेच्या घराखाली उभा राहून, शांती नारायणाला फोन करून अगदी बेफिकिरीने (जेम्सला संपवण्याचं) "काम हो गया" असं सांगणाऱ्या एका गुंडाच्या अंगावर जेम्सने अगदी त्याच क्षणी वरच्या मजल्यावरून अगदी सहजरित्या खाली फेकून दिलेला एक गुंड आदळण्याचा आणि त्यानंतर त्या गुंडाची "काम हो गया" मधली बेफिकिरी लुप्त पावून "और आदमी भेजो" अशी गयावया केली जाण्याचा प्रसंग अप्रतिम जमला आहे.
या प्रसंगादरम्यान अक्षरशः यंत्रवत हातपाय हलवत एकेका गुंडाचा समाचार घेणारा जेम्सही, गोळीबार, हल्ले या साऱ्यामुळे भेदरलेली नायिका पाहून क्षणभर विरघळतो आणि तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतो.
या मालिकेतला तिसरा प्रसंग म्हणजे यानंतर रामूच्या कल्पकतेला लवून दाद द्यावी असा, प्रेक्षकांचा रक्तदाब क्षणोक्षणी वाढवत नेणारा मारधाडीचा एक लांबलचक प्रसंग. हा प्रसंग मुंबईतल्या अत्यंत रहदारीच्या अशा महामार्गावर घडतो. पंधरा-वीस गुंड, त्यांच्या तीन-चार गाड्या विरुद्ध जिवाच्या आकांताने रस्त्यावरून धावणारे जेम्स आणि निशा असा हा विषम सामना उत्तरोत्तर प्रचंड रंगत जातो. चाकू, तलवारी अशा अनेकानेक आयुधांनी सुसज्ज असलेल्या खलनायकांविरुद्ध जेम्स रस्त्याने अव्याहत वाहणाऱ्या गाड्यांचाच शस्त्र म्हणून वापर करतो आणि एकेका खलनायकाला क्षणार्धात लोळवत जातो. हा अविश्वसनीय वाटावा असा प्रसंग बघताना क्षणोक्षणी असह्य ताण निर्माण तर होत जातोच पण तो उत्तरोत्तर वेगाने वाढतही जातो.
प्रत्येक मारधाडीच्या प्रसंगातली जेम्सची समोरच्याला कच्चा खाऊन टाकणारी भेदक नजर, भावनाविहीन चेहरा, एका गुद्द्यात (पुन्हा एकदा मराठीतला 'पंच') समोरच्याला रक्त ओकायला लावून गारद करण्याची हातोटी आणि चपळ हालचाली ही स्वभाववैशिष्ट्यं वारंवार जाणवत राहतात.
या प्रसंगानंतर सुदैवाने जीव वाचवून पळून गेलेले जेम्स आणि निशा मुंबई उपनगरातल्या एका चर्चमध्ये निवारा शोधतात. काही तासांनी पोलिसांना आणि शांती नारायणला त्यांचा ठावठिकाणा कळतोच आणि त्यानंतर चर्च आणि आजूबाजूच्या परिसरात घडून येणाऱ्या एका अप्रतिम अशा हाणामारीच्या प्रसंगाचा अनुभव घेण्याची अखेरची संधी प्रेक्षकांना मिळते.
अखेरची यासाठी की “या प्रसंगानंतर रामूचं बजेट किंवा त्याचं या चित्रपटातलं स्वारस्य संपलं, तो युनिट पॅकअप करून कंटाळून निघून गेला आणि कुठल्या तरी धेडगुजरी टीमवर हे अर्धवट उरलेलं प्रोजेक्ट पूर्ण करण्याची वेळ आली” असं वाटावं इतक्या गलिच्छ, दळभद्री, टुकार, भिकार पद्धतीने पुढचा चित्रपट मार्गक्रमणा करत जातो ज्याबद्दल एक अक्षरही लिहिण्याएवढा वेळ-शक्ती-इच्छा मजपाशी नाही.
तस्मात् कल्पक, वेगवान, चमत्कृतीपूर्ण अशा हाणामारीच्या प्रसंगांसाठी मी आत्तापर्यंत सहजपणे सुमारे वीसेकवेळा बघितलेला हा चित्रपट माझ्यासाठी साधारण मध्यावर संपतो. फक्त पहिल्यांदा चित्रपटगृहात हा चित्रपट बघताना पूर्ण चित्रपट पाहण्याचे भोग नशिबी लिहिले होते. मात्र त्यानंतर दरवेळी बघताना मध्यानंतर हा चित्रपट मी बंद करतो आणि किमान कुठल्यातरी समांतर विश्वात तरी या चित्रपटाच्या पूर्वार्धाला न्याय मिळेल असा त्याच तोडीचा उत्तरार्ध त्याच्या नशिबी यावा अशी मनोमन प्रार्थना करत राहतो.
तर जेम्स हा काही अर्थातच शोले, सत्या, घायल, दिलवाले दुल्हनिया..., कल हो ना हो सारखा सुपर, अल्ट्रा, मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट नाही. पण बॉलिवीडमधल्या मारधाडपटांच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या गलिच्छ, भिक्कार, कॉपी-पेस्टपटांपेक्षा लक्षावधी पटींनी उत्तम action sequences असणारा हा दुर्लक्षित आणि म्हणूनच दुर्दैवी मारधाडपट बरोब्बर २१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (१६ सप्टेंबर २००५) प्रदर्शित झाला होता हे बाकी कोणी जाऊद्या पण दस्तुरखुद्द रामूच्याही लक्षात नसेल याची मला खात्रीच आहे.
तस्मात् विलक्षण वेगवान आणि वेगळ्या प्रकारच्या मारधाडपटांचे चाहते असणाऱ्या काही निवडक, दुर्मिळ चाहत्यांना हा आजचा लेख समर्पित.
ताक : हा चित्रपट युट्युबवर हिंदीत आहे पण मुळीच बघू नका. कारण चित्रपटाचा आत्मा असलेल्या मारधाडीच्या लांबलचक प्रसंगांना तिथे निर्दय आणि बिनडोकपणे कात्री लावण्यात आली आहे. याच चित्रपटाचं तेलगू भाषेत डब केलेलं वर्जनही युट्युबवर उपलब्ध आहे. चित्तथरारक मारधाड अनुभवण्यासाठी हा पर्याय उत्तम असला तरी तिथे इंग्रजीत subs उपलब्ध नसल्याने काही अप्रतिम जमून आलेले संवाद कळणार नाहीत. पण तरीही तेलगू वर्जनच बघा कारण त्यात निदान हाणामारीच्या प्रसंगांमध्ये कुठलीही बिनडोक काटछाट करण्यात आलेली नाही. (अर्थात कोणीही हा चित्रपट बघणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे तरीही....)
--हेरंब ओक


No comments:
Post a Comment