Thursday, March 24, 2022

अन्याय आणि हतबलतेची विस्मृतीत गेलेली कथा : काश्मीर फाईल्स

"इसे exodus नही genocide कहिए।"

(exodus :
एखाद्या समूहाचं पलायन/स्थलांतर, genocide : वंशविच्छेद)

'काश्मीर फाईल्स' सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच हा संवाद पहिल्यांदा कानावर येतो. ज्यात एक प्रकारचा क्रोध, घृणा ओतप्रोत भरलेली आहे असा हा संवाद त्यानंतर वेळोवेळी आपल्याला ऐकवला जातो. सुरुवातीला प्रेक्षकाला कदाचित प्रश्न पडू शकतो की नक्की काय आहे हे exodus आणि genocide आणि genocide च्या ऐवजी exodus वापरल्याने असा काय फरक पडणार आहे? चित्रपटाच्या सुरुवातीला पडलेला हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं हृदय पिळवटून टाकणारं वेदनादायक उत्तर यातला प्रवास म्हणजे 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट.

१९९०-९२
, २०१६ आणि सद्यकाळ अशा तीन कालरेषांवर (टाईमलाईन्स) हा चित्रपट घडतो आणि अरेखीय (नॉन-लिनिअर) पद्धतीने आपल्यापुढे सादर केला जातो. सचिन तेंडुलकर सारख्या भारताच्या लाडक्या सुपुत्राला इंडियन डॉग म्हणून हिणवून शिवीगाळ केली जाण्याचा प्रसंग हा चित्रपटाच्या सुरुवातीला बसणारा एक हलका अर्थात सॉफ्ट धक्का. त्यानंतर चित्रपटभर येऊ घातलेल्या अमानुष प्रसंगांच्या मालिकेसाठी प्रेक्षकाच्या मनाची बैठक तयार करण्यासाठी योजलेला एक छोटासा प्रसंग म्हणून याकडे पाहिलं जाऊ शकतं.

इस्लामी अत्याचार
, पाकिस्तान पुरस्कृत धर्मांध अतिरेकी यांना काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रसृष्टीत पडोसी मुल्क अशा गोंडस नावाने संबोधण्याची पद्धत होती. अर्थात अलीकडच्या काही वर्षांत आलेल्या चित्रपटांमध्ये ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी ती पूर्णतः मोडली जाईल असा प्रयत्न न करता सावधपणे पाऊल टाकण्याकडेच चित्रकर्त्यांचा कल असतो. 'काश्मीर फाईल्स' या सगळ्या सावध चौकटी मोडून, तोडून, विस्कटून, उखडून टाकून दूर भिरकावून देतो. चित्रपटात सावध मांडणी (किंवा subtlty) किंचितही आढळणार नाही. काश्मीर मधील इस्लामी अत्याचार, त्यातला पाकिस्तानचा हात, राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा ही आणि अशी काळी सत्य हा चित्रपट कोणाचीही भीडभाड न बाळगता उच्चरवाने आपल्यासमोर मांडतो. यातला हिंसाचार, क्रौर्य, सत्य हे इतकं हिडीस आणि क्रूर आहे की प्रेक्षकाला काही प्रसंगी वाटू शकतं की हे असे सगळे भयंकर प्रकार खरोखर घडले असतील का? आणि त्या सर्वांना एकाच छोट्याशा वाक्यात निरुत्तर करणारा संवाद आपल्या कानावर येऊन आदळतो. "कश्मीर का सच इतना सच है की वो झूठ लग सकता है"!!

विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या टीमने सुमारे ४ वर्षं अथक परिश्रम घेऊन, संशोधन करून, सरकारी कागदपत्रं, सरकारी अर्काईव्हज मधले व्हिडीओ बघून, हजारो काश्मीर विस्थापित आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून चित्रपटाची मांडणी केली. यातले असंख्य अनुभव, त्यातलं भीषण क्रौर्य, अगणित अत्याचार, सामूहिक बलात्कार, सामूहिक हत्याकांडं, मुंडकी उडवणे, अवयव छाटणे यांसारख्या अत्यंत अमानुष घटनांनी भरलेले आहेत की ते चित्रपटात जसेच्या तसे दाखवणं हे शक्यच नसलं तरीही अगदीच subtle राहून त्यांची सौम्य मांडणी करणं हे ही सर्वस्वी अशक्य होतं. आणि त्यामुळेच या चित्रपटातील घटना आणि प्रामुख्याने संवाद हे अतिशय टोकदार आहेत. सद्यस्थितीला थेट भिडणारे आहेत. तत्कालीन निष्क्रिय राजकारणी आणि तथाकथित चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमं यांच्या दुतोंडीपणावर आसूड ओढणारे आहेत.

१९४६ मध्ये बंगालमध्ये ज्याप्रमाणे जिन्ना आणि सुऱ्हावर्दी यांनी मिळून
'डायरेक्ट अ‍ॅक्शन डे' घोषित करून मुस्लिमांद्वारे हिंदूंचं नृशंस हत्याकांड घडवून आणलं अगदी त्याच प्रकारे काश्मीरच्या खोऱ्यात तेथील मुस्लिम आणि पाक पुरस्कृत अतिरेकी यांच्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध रीतीने १९-२०-२१ जानेवारी १९९० या तीन दिवसांत हिंदूंचा समूळ वंशविच्छेद केला गेला. १८ जानेवारीला तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला आणि राज्यपाल जगमोहन यांची नियुक्ती होऊन ते तिथे पोहोचेपर्यंत सुमारे ३ दिवस राज्य निर्नायकी अवस्थेत होतं. १५ मिनिटं पोलीस हटवा आणि मग हिंदूंची अवस्था बघा अशा खुल्या धमक्या देणाऱ्या धर्मांधांच्या हातात ७२ तास एखाद राज्य मिळाल्यावर त्यांनी तेथील हिंदूंची काय अवस्था केली असेल याचा आपण विचारही करू शकत नाही.

"
रलीव (इस्लाम स्वीकारा), गलीव (मरा) या चलीव (पळून जा)" किंवा "अल सफा बट्टे दफा" (पंडितांनो काश्मीर सोडून जा) किंवा "काश्मीर बनेगा पाकिस्तान, पंडित औरतों के साथ पर पंडितोंके बगैर", "पंडितो, काश्मीर छोडो, लेकिन अपनी औरते छोड जाओ", "नारा ए तबलीग अल्ला हू अकबर" यांसारख्या महाभयंकर क्रूर, लाजिरवाण्या आणि हल्लेखोरांचा उद्देश पुरेसा स्पष्ट करणाऱ्या घोषणा जशाच्या तशा दाखवल्या आहेत. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे अनेक प्रसंगांमध्ये या घोषणा लहान मुलांच्या तोंडी आलेल्या आहेत. साधारण याच अर्थाच्या घोषणा जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी दाखवताना चित्रकर्त्यांनी योग्य तो मुद्दा प्रेक्षकांच्या मनावर ठसेल याची पूर्ण खबरदारी घेतली आहे. काळ बदलला, व्यक्ती बदलल्या, परिस्थिती बदलली तरीही काश्मिरातली परिस्थिती, काश्मीरला भारतापासून मुक्ती देण्याची मागणी करणारी देशद्रोही मानसिकता ही आहे तशीच आहे हे सद्यस्थितीतील "तुकडे गॅंग" च्या घोषणा आणि १९९० मधल्या काश्मिरी अतिरेक्यांच्या घोषणा यांच्यातल्या साम्याद्वारे अधोरेखित होतं

(
जेएनयु) विद्यापीठाच्या भिंतींवर लेनिन, कार्ल मार्क्स यांची ठायीठायी दिसणारी चित्रं त्यांची वैचारिक दिशा स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे भाईचारा, सच्चा मुसलमान वगैरे तुणतुणी न वाजवता आपल्याच मित्र आणि शेजारी बांधवांना पकडून देणारे काश्मिरी मुसलमान आणि त्यांना फूस लावणारे पाकिस्तानी मुसलमान हे ही जसे आहेत तसे थेट दाखवले जातात. काश्मीर मधील परिस्थिती चिघळत असतानाही ती आवरण्यासाठी काहीही न करणारे फारूक अब्दुल्लासारखे निर्लज्ज मुख्यमंत्री तसेच रेफ्युजी कॅम्पमधील भयंकर परिस्थिती पाहूनही तिकडे दुर्लक्ष करणारे मंत्री दिसतात आणि इस्लामी अतिरेक्यांना पाहून गर्भगळीत झालेले पोलीसही दाखवले जातात.

यातली अनेक पात्रं ही प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भेटीला येतात. २०-२५ पंडितांना निव्वळ हिंदू असल्याने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे असल्याने ठार मारलं याची ऑन स्क्रीन जाहीर कबुली देणारा बिट्टा कराटे आणि अनेक पंडितांच्या हत्याकांडात सहभागी असणारा, सातत्याने स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारा आणि तरीही भारताच्या तत्कालीन पंतप्रधांकडून भेटीचं आमंत्रण दिलं जाणारा आणि अनेक मीडिया हाऊसेसद्वारा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केला गेलेला देशद्रोही आणि इस्लामी अतिरेकी यासिन मलिक या दोन (आणि इतरही अनेक) अतिरेक्यांचं प्रातिनिधिक पात्र असलेला फारूक मलिक बिट्टा हा चिन्मय मांडलेकर यांनी अप्रतिम रंगवला आहे. अरुंधती रॉय, बरखा दत्त आणि अशा अनेक तथाकथित महिला विचारवंतांची प्रातिनिधिक भूमिका अर्थात प्रोफेसर राधिका मेननचं पात्र पल्लवी जोशी यांनी जिवंत केलं आहे. भयभीत काश्मिरी जनता, असहाय प्रशासन, नाकर्तं पोलीस खातं हे अनुक्रमे पुष्कर पंडित यांच्या भूमिकेत अनुपम खेर, आय ए एस ऑफिसर ब्रह्मदत्त अर्थात मिथुन चक्रवर्ती आणि डीजीपी अर्थात पुनीत इस्सर यांनी उत्कृष्टरित्या रेखाटल्या आहेत.

या सगळ्या ज्येष्ठांच्या मांदियाळीत तुलनेने नवीन आणि तरुण चेहरा असलेल्या दर्शन कुमार याने गोंधळलेला युवक ते विचारांची दिशा स्पष्ट झालेला तरुण कृष्णा पंडित उत्तम साकारला आहे. अर्थात त्याची
भूमिका ही स्टोरीबॅक्ड आहे. त्याला पडद्यावर वावरण्यासाठी मिळालेला वेळ, चित्रपटाच्या अखेरीस येणारं स्वगत कम भाषण हे चित्रपटाचं एक महत्वाचं बलस्थान आहे. काश्मीरचा प्राचीन इतिहास, तेथील विद्वान, त्यांचे निरनिराळ्या क्षेत्रातील असंख्य शोध, तेथील शैक्षणिक प्रगती, ज्ञानदान करणारी कैक विद्यापीठं, हजारो ग्रंथ आणि या सर्वांवर इस्लामी धर्मांध माथेफिरुंच्या टोळ्यांनी केलेली अगणित अमानुष आक्रमणं या साऱ्यासाऱ्याचा लेखाजोखा चित्रपटाच्या अखेरीस आपल्या भेटीस येतो.या चित्रपटातील एक अतिशय महत्वाचं अंग म्हणजे छायाचित्रण. लॉंग शॉटद्वारे दाखवले जाणारे बर्फाच्छादित पार्श्वभूमीवरील अंधार
, स्फोट, मशिदींमधील घोषणा, हल्ले, खून आणि थोड्याच वेळात जणू काही झालंच नाही असा थंडगार प्रेताप्रमाणे पुन्हा दिसणारा बर्फाचा पांढरा रंग हा आपले राजकारणी आणि भारतातील उर्वरित राज्यांचा काश्मीर समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन याविषयी भाष्य करून जातो. त्याचप्रमाणे ट्रकमध्ये काश्मीरमधून पळून जात असताना पडद्यावर काळवंडलेलं आणि त्याचबरोबर झाडाच्या शेंड्यांनी झाकलेलं आकाश दिसतं आणि मुक्त आकाश अर्थात भयरहित भविष्य हे या काश्मिरी पंडितांसाठी किती अप्राप्य आहे, दिवास्वप्न आहे हे अधोरेखित केलं जातं. त्याचप्रमाणे पुष्करनाथ पंडित यांची भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांच्या महादेवाप्रमाणे निळ्या रंगात रंगवलेल्या परंतु अत्यंत भयभीत आणि दयनीय अवस्थेतल्या चेहऱ्याच्या क्लोजअपला चित्रपटाच्या पोस्टरवर आणि प्रमोशन्स/ट्रेलर्स मध्ये आवर्जून स्थान देणे ही देखील एक अतिशय विचारपूर्वक घेतलेली भूमिका आहे. आपला सनातन धर्म आणि देवदेवतांवर ओढवलेलं एक महासंकट या स्वरूपात प्रेक्षक चटकन त्या समस्येशी जोडले जातात.

चित्रपटात ठायीठायी पेरलेली काश्मिरी लोकगीतं ही चित्रपटाची भूमिका आणि  काश्मीरी पंडितांची असहाय उद्विग्नता मांडण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. पुष्कर पंडितांच्या तोंडी येणारी त्याचप्रमाणे अनेकदा बॅकग्राऊंडला ऐकू येणारी काश्मीरी लोकगीतं ही काश्मिरी विस्थापितांची काश्मिरातल्या आपल्या स्वतःच्या घरी परतण्याची अतीव इच्छा परंतु ते शक्य नसल्याने येणारी अगतिकता
, हतबलता मांडून प्रेक्षकांना अक्षरशः घायाळ करतात.

वर म्हंटल्याप्रमाणे चित्रपटाची मांडणी थेट आहे. धोरणी किंवा ताकाला जाऊन भांडं लपवणारी नाही. ही मांडणी जागोजागी भेटणाऱ्या संवादांमधूनही दिसते. यात "चौथा स्तंभ अर्थात पत्रकारितेला राजकारण्यांची रखेल म्हंटलं जातं"
, शेख अब्दुल्लाच्या सरड्याप्रमाणे रंग बदलण्याच्या प्रवृत्तीवर आणि बदलत्या भौगोलिक स्थानानुसार (दिल्ली, जम्मू, काश्मीर) कम्युनिस्ट, कम्युनलिस्ट, नॅशनलिस्ट आणि सेक्युलरिस्ट अशी विविध रूपं साकारण्यावर ताशेरे ओढले जातात. प्रोफेसर राधिका मेनन आणि वैचारिक गोंधळ असणारा विद्यार्थी कृष्णा यांच्यातले अनेक संवाद तर कमाल जमून आले आहेत. काश्मिरींवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारासंदर्भात निषेध व्यक्त करताना कृष्णा त्याला पिळवणूक म्हणतो तर प्रोफेसर राधिका मेनन त्याला निर्लज्जपणे समजावते की "अरे ही पिळवणूक नाही, हे राजकारण आहे". त्याचबरोबर प्रोफेसर राधिकाच्या "सत्ता त्यांची असली तरी (इको) सिस्टम आपली आहे", "आपल्याला उपाय द्यायचेच नाहीयेत, आपल्याला फक्त 'आशा' दाखवायची आहे की उपाय आहेत" यासारख्या धूर्त संवादांतून काश्मीर प्रश्न भडकवत ठेवू इच्छिणाऱ्या देशद्रोही विचारांचं शहरी नक्षलींच्या विचारांशी असणारं साम्य चतुराईने अधोरेखित केलं जातं.

काश्मीरमध्ये पंडितांवर झालेलय कैक हल्ल्यांचे आणि हत्याकांडाचे उल्लेख चित्रपटात येतात. पण त्यांचा उल्लेख इतक्या कमी वेळेपुरता होतो की त्याबद्दल अजून माहिती दाखवली जायला हवी होती असं आपल्याला वाटून जातं. अर्थात सुमारे तेराव्या शतकापासून होणारी माथेफिरू इस्लामी आक्रमणं अडीच तीन तासांत दाखवणं काम नक्कीच अवघड आहे. (अशा वेळी मनात सहज विचार डोकावून जातो की काश्मीर फाईल्सवर सिरीज यायला हवी ज्यात चित्रपटात वेळेअभावी दाखवायचे राहून गेलेले अनेक प्रसंग तपशीलवार मांडता येतील.). चित्रपटात दाखवताना प्रत्यक्षात घडलेल्या अनेक प्रसंगांमधील काही निवडक प्रसंग आणि पात्रं यांचं एकत्रीकरण करून ते आपल्यासमोर मांडले आहेत. चित्रपटात
'बट्टा मझार' (ब्राह्मणांची स्मशानभूमी) या सुमारे चौदाव्या शतकात झालेल्या पंडितांच्या नृशंस हत्याकांडाचा धावत उल्लेख येतो. सिकंदर बुतशिकन या अत्याचारी इस्लामी राज्यकर्त्याने काश्मीरमधील सुमारे लाखभर पंडितांसमोर दोनच पर्याय ठेवले एक म्हणजे जानवी तोडा (धर्म बदला) अथवा मृत्याला सामोरे जा. सर्व पंडित धैर्याने मृत्याला सामोरे गेले. त्यांना डाल लेक मध्ये बुडवून मारण्यात आलं आणि या घटनेनंतर त्यांच्या तोडलेल्या जानव्यांचा ढीग करण्यात आला ज्याचं वजन सुमारे सदतीस किलो भरलं. चित्रपटाच्या अखेरीस अगदी अलीकडे म्हणजे २००३ मध्ये झालेला नदीमार्ग हत्याकांडाचा प्रसंग तपशीलवार येतोच आणि त्याचबरोबर काश्मीरमधील गरीब शालेय शिक्षिका गिरीजा टिक्कूवर ओढवलेले नृशंस अत्याचारही दाखवले जातात. अर्थात प्रत्यक्षात झालेले अत्याचार, हिंसाचार, बलात्कार, हत्याकांड यांची अमानुषता इतकी भयंकर आहे की ते जसेच्या तसे दाखवले असते तर चित्रपटावर उथळ आणि बटबटीतपणाचे शिक्के लागले असते. त्यामुळे थेट प्रसंग दाखवण्याचा मोह टाळून ते किंचित सौम्य करून दाखवण्याचा दिग्दर्शकाचा निर्णय अतिशय योग्यच म्हंटला पाहिजे.

चित्रपटाच्या पूर्वार्धात अनेकदा येणारा "इसे
exodus नही genocide कहिए" हा संवाद उत्तरार्धात जवळपास नाहीसा होतो. पण तो तसा संवाद का असतो, त्याचा अर्थ काय हे सुरुवातीला स्पष्टपणे समजावून सांगितलं जात नाही. पण आता शेवटाकडे त्या संवादाची गरज अर्थातच उरलेली नसते आणि तो समजावून सांगण्याचीही. कारण उरला असतो तो फक्त दाटल्या गळ्यांनी, भरल्या डोळ्यांनी आणि दाबल्या हुंदक्यांनी व्यापलेला अवकाश!


-हेरंब ओक