Friday, September 7, 2012

जिद्द-संयम-धैर्य-लढा-संघर्ष : कन्व्हिक्शन

हिलरी स्वॅन्क निर्विवादपणे एक अतिशय गुणी अभिनेत्री आहे. मुख्य म्हणजे मादक, सुंदर, देखणी, आकर्षक, झिरो फिगर अशा हिरोईनकडून अपेक्षित केल्या जाणाऱ्या टिपिकल गुणवैशिष्ट्यांपासून बऱ्यापैकी लांब आहे. अशा अभिनेत्रीला जेव्हा दोन ऑस्कर पुरस्कार मिळतात ('बॉईज डोन्ट क्राय' आणि 'मिलियन डॉलर बेबी') ते निश्चितपणे फक्त आणि फक्त तिच्या अफाट अभिनयक्षमतेसाठी मिळालेले असतात. अशाच अप्रतिम अभिनयसामर्थ्याची चुणूक हिलरी दाखवते ती 'कन्व्हिक्शन' मधली बेटी अॅन वॉटर्स साकारताना.

आपल्या भावाला, केनी वॉटर्सला (सॅम रॉकवेल), निरपराध सिद्ध करण्यासाठी बहिणीने अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करून, लॉ कॉलेजला प्रवेश घेऊन, वकील बनून, बार एक्झाम पास करून, आपल्या भावाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करून जिद्दीने लढा देणे ही कल्पनाच किती विलक्षण आहे आणि जेव्हा ही सत्यकथा आहे हे कळतं तेव्हा तर आपला क्षणभर विश्वासच बसत नाही. आपोआपच तिच्याबद्दलच आदर दुणावतो ! संपूर्ण चित्रपटभर आपल्याला दर्शन होत राहतं ते तिच्या जिद्दीचं, संयमाचं, धैर्याचं आणि भावावर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी आणि तो निरपराध असल्याच्या ठाम विश्वासापोटी दिलेल्या एका असामान्य अशा लढ्याचं, संघर्षाचं !! हे असं काही दिवस, काही महिने चालू नसतं. हा लढा तिने दिलेला आहे तो तब्बल अठरा वर्षं... न थकता, न दमता, हार न पत्करता.

बेटी आणि  केनी
हिलरी आणि सॅम

केनी वॉटर्सला त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी आजीवन कारावासाची (आणि तोही परोल शिवाय) शिक्षा झालेली असते. एकूण एक पुरावे विरोधात असतात, एक मैत्रीण सोडली तर कोणाचीही साथ नसते. अशा परिस्थितीत कोणीही कंटाळून जाऊन, शरणागती पत्करेल. पण बेटी हे एक अजब रसायन असतं. लॉ कॉलेजमध्ये एका अभ्यासाला दिलेल्या केसमुळे तिला डीएनए टेस्टची माहिती होते आणि आपल्या भावाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिला आशेचा एक किरण दिसतो. ती 'इनोसन्स प्रोजेक्ट' या फक्त डीएनए टेस्ट्सच्या आधारे निरपराधांच्या केसवर काम करणाऱ्या संस्थेकडे मदतीची याचना करते. अचानक तिला (आणि आपल्यालाही) वाटतं की चला... टेस्ट होईल, तो निर्दोष आहे हे सिद्ध होईल आणि कैदेतून सुटेल. पण हे सगळं एवढं सरळपणे होणार नसतं. डीएनए टेस्टसाठी आवश्यक असणारे पुरावेच उपलब्ध नसतात कारण मॅसॅच्युसट्स राज्याच्या कायद्याप्रमाणे दहा वर्षांनी पुरावे नष्ट केले गेलेले असतात. आणि त्यानंतर हे संकट छोटंसं वाटेल अशा अनोख्या संकटांची मालिका पुढचा दीड तास आपण अनुभवतो आणि अखेरीस तिचा लढा पाहून हतबुद्ध होऊन तिला खणखणीत सलाम ठोकतो !

वयात येणारी मुलं, घटस्फोट, मुलांना न देता येणारा वेळ, सुरुवातीला कॉलेजमध्ये अपेक्षित प्रगती न साधता आल्याने काढून टाकण्याची मिळालेली धमकी, पूर्णतः प्रतिकूल परिस्थिती अशी इतर संकटंही चित्रपटभर (म्हणजेच जवळपास तिच्या निम्म्या आयुष्यभर) तिला साथसोबत करतात ! हे सगळं बघताना इथे एरीन ब्रॉकोवीचची प्रकर्षाने आठवण येते. अन्यायाला वाचा फोडून निरपराध व्यक्तीचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मनापासून लढणाऱ्या स्त्रीयांच्या वाट्याला येणारी संकटं एवढी टिपिकल कशी असू शकतात ?

चित्रपटातली एक मोठी चूक म्हणजे रंगभूषेची उणीव. अठरा वर्षं सरताना आणि सरल्यावरही पहिल्या फ्रेममध्ये दिसलेली बेटी अखेरच्या फ्रेममध्येही जवळपास तशीच दिसते. तिचं वय वाढलेलं वाटत नाही, चेहरा सुरकुतत नाही की केस पिकत नाहीत. तिची दोन्ही मुलंही इतक्या वर्षांच्या प्रवासात विशेष बदलत नाहीत की जवळची मैत्रीणही आहे तशीच दिसत राहते. नाही म्हणायला केनी वॉटर्सचा मेकअप बऱ्यापैकी चांगला आहे आणि अठरा वर्षांचा प्रवास त्याच्या चेहऱ्यावरून थोडाफार तरी जाणवतो. पण हा थोडासा दोष सोडला तर चित्रपट ज्या असीम धैर्याचा आणि चिकाटीने दिलेल्या लढ्याचा अनुभव देतो त्यापायी इतर सगळं निश्चितपणे विसरता येण्यासारखं !!

तळटीप : 'इनोसन्स प्रोजेक्ट' च्या वेबसाईटवर या  दुव्यावर केनी वॉटर्सच्या केससंबंधी अधिक माहिती मिळेल.