Sunday, July 8, 2018

नॉट सो सेक्रड गेम्स !नुकताच एक फार अर्थपूर्ण शेर वाचनात आला.

छप के बिकते थे जो अखबार..
इन दिनों वो बिक के छपा करते है !

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला वेळोवेळी देशोदेशींच्या राजकारणी, उद्योगपती, माफिया, विरोधी पक्ष, करमणूक जगत इत्यादींनी आपली बटीक म्हणून वापरल्याची असंख्य उदाहरणं आहेत. चौथ्या स्तंभाचा उपयोग करून जनमताचा कल चाचपणे, जनमत बदलणे किंवा हवे त्या दिशेला जनमताचा रेटा वळवणे, खोट्या कथा पसरवणे, असत्य/अर्धसत्य/अल्पसत्य बातम्या पेरणे,  खोटे सर्वे घेऊन त्यांचे निकाल छापणे, विशिष्ठ जात-धर्माबद्दलच्याच बातम्या छापणे किंवा दाबणे, किंवा फक्त मथळे वाचून मते बनवणाऱ्या 'अभिजनां' ना लक्ष्य करून खोडसाळ मथळा छापून, पुढे प्रश्नचिन्ह देऊन प्रत्यक्ष बातमीत मात्र वेगळेच तपशील देणे असे असंख्य प्रकार नियमितपणे होताना आढळतात. कालांतराने लोकांची वर्तमानपत्र वाचण्याची कमी होत चाललेली किंवा मोडलेली सवय लक्षात घेता या खोडसाळ शक्तींनी आपले लक्ष वृत्तपत्र किंवा मिडिया यांपुरतंच मर्यादित न ठेवता अन्य लोकप्रिय माध्यमाच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला देशाच्या दुर्दैवाने प्रमाणाबाहेर यश लाभू लागलं. आणि ते माध्यम म्हणजे, वेल.. नो प्राईजेस फॉर गेसिंग, चित्रपट माध्यम. अर्थात चित्रपट माध्यमाला एक विशिष्ठ अजेंडा डोळ्यासमोर ठेवून किंवा प्रसाराचं (Propaganda) माध्यम म्हणून वापरण्याचा प्रयोग या माध्यमाच्या जन्मापासून चालत आला आहे असं म्हंटलं तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरू नये. परंतु गेल्या काही वर्षांत मात्र याचा वापर फारच वाढल्याचं, चित्रपट/राजकारण/देशांतर्गत परिस्थिती/निवडणुका यांच्याबद्दल नियमित अपडेटेड असणाऱ्या आणि कुठलेही पूर्वग्रह न बाळगता, सारासार विचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या अगदी सहज लक्षात येऊ शकतं. आणि यासाठी कुठली उदाहरणंही द्यावी लागतील असंही मला वाटत नाही.


अर्थात हे सगळं प्रकर्षाने आठवण्याचं आणि एवढं लाउड थिंकिंग करण्याचं कारण म्हणजे नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली विक्रम चंद्र यांच्या २००६ साली प्रकाशित झालेल्या 'सेक्रड गेम्स' या कादंबरीवर आधारित त्याच नावाची सिरीज. सर्वसाधारणपणे प्रॉपगॅंडा चित्रपट/मालिकांमध्ये आढळणारा अलिखित नियम इथेही कटाक्षाने पाळला गेलेला आहे. म्हणजे दर्शनी भागाची मांडणी, कथावस्तू ही एका सामान्य दरिद्री मराठी ब्राह्मण कुटुंबातल्या मुलाचा दरिद्री बालपण ते मुंबईचा अनधिकृत सर्वेसर्वा होण्याचा प्रवास या रुपात आपल्या समोर येते. पण त्याचवेळी पार्श्वभूमीवर हिडन अजेंडा राबवला जात असतो. सुरुवात होते ती प्रत्येक एपिसोडच्या संस्कृत किंवा संस्कृतोद्भव शीर्षकापासून. शीर्षक संस्कृत परंतु घडणारे प्रसंग मात्र अगदी विपरीत किंवा विकृत अर्थाने मांडलेले. सुरुवातीच्या काही मिनिटांतच "भगवानको लं* फर्क पडता है" सारखा प्रक्षोभक संवाद प्रमुख पात्राच्या तोंडी घालून मालिका निर्माते मालिकेची दिशा आणि हेतू स्पष्टपणे मांडण्यात कुठलीही आडकाठी करत नाहीत. पण बॉलीवूड मध्ये 'प्रसिद्ध' असणाऱ्या तथाकथित प्रस्थापितांविरुद्ध लिहिणाऱ्या/बोलणाऱ्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या नामांकित दिग्दर्शकद्वयीची ही मालिका असल्याने आपण त्या घटनेकडे दुर्लक्ष करून मालिका पुढे पाहायला लागतो. पण हळूहळू शीर्षकगीतात दिसणाऱ्या देवीदेवता, प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला येणारी श्रीयंत्र सदृष चिन्हं अशा खुणा आपल्याला उठून दिसू लागतात. त्यामुळे निर्मात्यांच्या हेतूबद्दल नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्या मनात उभं राहतं. त्यानंतर वारंवार दिसत राहतात ते रामायणाचे उल्लेख, रामानंद सागर यांच्या रामायणाचे प्रसंग, रामलीलेचे प्रसंग, किंवा उद्घाटन, लग्न काहीही असो पण ते अट्टहासाने रामायणाच्या प्रसंगांच्याच पार्श्वभूमीवर घडवण्याचा दिग्दर्शकद्वयीचा आग्रह आणि तसं पाहता रूढार्थाने त्याचा कुठेही कनेक्ट नसताना !! किंवा ब्राम्हण बापाची वेश्या/बाहेरख्याली पत्नी, प्रमुख भाग जिथे कथा प्रत्यक्षात उलगडत जाते तो एरिया म्हणजे 'गोपालमठ' (धारावी?), गन्स लपवण्यात आलेल्या विशालकाय गोडाऊनचं नाव 'वेद' असणे हे तपशीलही हेतुपुरस्सरपणे लादल्यासारखे वाटतात. आणि सगळ्यात शेवटी दाखवला जातो तो मुंबईवर होऊ घातलेल्या हल्ल्याचा प्रमुख मास्टरमाईंड हा अन्य कोणी नसून एक तथाकथित मोठा हिंदू संत असणं !! अर्थात हा प्रसंग आणि क्वांटिको, पीके, सिंघम-२, काला इत्यादींमधले प्रसंग यांच्यामधला एक 'समान दुवा' सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे नियमित अपडेटेड असणाऱ्या प्रेक्षकांच्या चटकन लक्षात येतोच.

ही दिग्दर्शकद्वयी सत्यपरिस्थितीचं चित्रण मांडण्याबद्दल आणि रेखीव पटकथेबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. परंतु दुर्दैवाने त्या दोन्ही विभागांतही गोंधळ किंवा तडजोडी आढळतात. आपल्या रखेलीवर आपल्यासमोर पैसे उधळले म्हणून होऊ घातलेल्या हिंदू डॉनवर गोळ्यांचा वर्षाव करणारा आणि दुबईपर्यंत कनेक्शन्स असणारा मुसलमान डॉन त्याच हिंदू डॉनने काही दिवसांतच तिला सरळसरळ पळवून नेल्यावर मात्र काहीही न करता शांत बसून राहतो. बाबरी मशीद पतनाची दृश्यं तपशीलवार दाखवून मात्र त्याचा सूड म्हणून घडवल्या गेलेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा अगदी अगदी नगण्य उल्लेख. किंवा मग गणपतीला खरवसाचा नैवेद्य दाखवण्यासारखा निव्वळ हास्यास्पद प्रसंग. किंवा सुरुवातीला नायकाला मदत करणाऱ्या डॉनने एकाएकी सगळी रहस्य अर्धवट ठेवून कोडी घालून केलेली आत्महत्या हा तर निव्वळ मूर्खपणा वाटतो. त्या मूर्खपणाची तुलना फक्त डॅन ब्राऊनच्या 'ओरिजीन' मध्ये प्रमुख पात्राने आत्महत्या करून शेकडो कोडी घालून ठेवून २४ तास ताणून ठेवलेल्या बिनडोक पळापळीशीच होऊ शकते. किंवा मग गायतोंडे नावाच्या प्रमुख पात्राच्या तोंडी एकही धडका मराठी संवाद नसणे, किंवा परुळेकर (कादंबरीत याचं नाव पारूळकर आहे) नावाच्या प्रमुख पात्राच्या तोंडी आलेलं तोडकंमोडकं मराठी. गंमत म्हणजे काही लोक त्याला परुळेकर म्हणतात, काही पारुलकर तर काही परूलकर !!

खरं पाहायला गेलं तर ही एका साध्या भाईची गँगवॉर टाईप कथा आहे. साधा गरिबीतून वर येणारा गुंड एक एक टप्पे पार करत करत मुंबईच्या काळ्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट बनायची स्वप्नं पाहता पाहता हळूहळू एक दिवस खरंच तिथे पोचतो आणि या प्रवासाचं चित्रण म्हणजे ही कथा. आणि ही चावून चोथा झालेली कथाही आपण अन्य ठिकाणी पाहिलेल्या हजारो कथांप्रमाणेच आहे. पावलोपावली आढळणाऱ्या क्लिशेंनी अक्षरशः भरलेली. गरिबीतलं बालपण, स्थानिक भाईचं बोट धरून एक दिवस त्याच्याच खांद्यावर पाय ठेवून वर चढणारा कथानायक भाई, राजकारणी, पोलीस, बॉलीवूड या सगळयांना हवं तसं वळवणारा भाई, मग एक दिवस त्याचाही वाईट काळ येणे आणि मग विनाशाच्या दिशेने चालू होणारा प्रवास, आणि या सगळ्यात त्याच्या मागे हात धुवून लागलेला अंडर-परफॉर्मिंग इन्स्पेक्टर, त्याचा गडद भूतकाळ, त्याचं सहकारी आणि वरिष्ठांमध्ये नावडतं असणं हे सगळं सगळं आपण पाहिलेलं आहे. पण मग तरीही या वेबसिरीजला मिळणाऱ्या एवढ्या रेटिंगचं कारण काय? एक कारण कदाचित असं असेल की मूळ कादंबरी वाचलेल्यांना त्याची सिरीज मांडणी कशी असेल हे बघण्याची असलेली उत्सुकता (मी कादंबरी वाचलेली नाहीये.) किंवा दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे अशा भाईछापच काय पण अन्य कुठल्याही हिंदी चित्रपट/मालिकेत न दिसलेले सेक्स, वासना, संभोग, नग्नता, विकृतपणा, क्षणोक्षणी येणाऱ्या शिव्या, व्यसनं आणि वेबसिरीज असल्याने सेन्सॉरबोर्ड आपलं 'घनता' वाकडं करू शकत नसल्याचा निर्मात्यांचा उन्माद या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण !!

अर्थात काही गोष्टी वेगळ्या आहेत आणि खरोखर चांगल्याही आहेत. म्हणजे ठराविक काळानंतर येणारे देशाच्या राजकारणातले महत्वाचे प्रसंग, प्रमुख पात्राच्या तोंडून राजकारणी लोकांवर केली गेलेली टीका यांची मांडणी चांगली आहे. उदा थोडं तपशीलवार मांडलेलं शाहबानो प्रकरण आणि राजीव गांधी, रथयात्रा आणि धर्माचा उन्माद वगैरे गोष्टी थेट दाखवल्या आहेत. अप्रतिम दिग्दर्शन आणि छायाचित्रण यांचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे सैफ (लोकल पोलीस) आणि राधिका आपटे (रॉ) यांच्यात शेवटच्या काही मिनिटांत घडणारा हॉटेलमधला प्रसंग. काही कारणांमुळे त्यांच्यात (व्यावसायिक) गैरसमज झालेले असतात. त्यानंतर समेटासाठीची ही बैठक असते. सुरुवातीला दोघेही जरा गुश्श्यात असल्याने लॉंगशॉट घेऊन दोघांच्यामध्ये पिलर दाखवला आहे. सुरुवातीची भडास काढून झाल्यावर दोघेही एकेक पाउल पुढे टाकून समेट करायला तयार होतात आणि अचानक कॅमेरा हॉटेलच्या आतून दाखवला जातो, दोघेही एकाच फ्रेममध्ये असतात आणि आधीचा पिलर दोघांच्या मागे झाकला गेलेला असतो. असे काही भन्नाट प्रसंग आहेत. राधिका आणि सैफ या दोघांनीही सिरीजमधलं आपापलं स्थान ओळखून त्याला न्याय मिळेल अशा प्रकारे केलेला अभिनय ही जमेची बाजू. पण सगळ्यात जबरदस्त वावर आहे तो जितेंद्र जोशीचा. प्रसंगानुरूप बदलणारी संवादफेक, आवाज, हावभाव आणि बिनधास्त वावर या सगळ्यामुळे तो एकदम सच्चा कॉन्स्टेबल वाटतो.

दुर्दैवाने चांगल्या किंवा मला आवडलेल्या/पटलेल्या गोष्टींची यादी आणि खटकलेल्या गोष्टींची यादी यांच्या लांबीची कुठेच तुलना होऊ शकत नाही. अर्थात म्हणून कोणी ही मालिका बघू नये का? किंवा मालिकेवर बंदी आणावी का? तर नाही आणि नाही. तसं अजिबात नाही. मी तर म्हणेन प्रत्येकाने आवर्जून बघावी. पण बघाल ते समजून उमजून बघा. नीट अर्थ समजून घेऊन बघा. बी यॉर ओन जज. तसंच बंदी वगैरेचा तर संबंधही नाही. मी व्यक्तिशः कुठल्याही बंदीच्या विरुद्धच आहे. पण म्हणून असत्य पुढे रेटणं हे कितपत योग्य आहे हे पाहणं आणि शीर्षकातलं 'पावित्र्य' कंटेंटमध्ये कितपत राखलं जातं हेही पाहणं हा शेवटी ज्याच्या त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीचा प्रश्न आहे !!

तळटीप : विक्रमादित्य मोटवानीने या मालिकेवर काम करायला *२०१४* पासून सुरुवात केली हा नक्कीच योगायोग नसावा!!

Sunday, June 3, 2018

श्रोडिंगरच्या मांजराचा थरारक खेळ : कोहरन्स


सायन्स फिक्शन अर्थात साय-फाय हा हॉलीवूडचा निर्विवादपणे अत्यंत लाडका चित्रप्रकार (जॉनर) आहे. त्यात प्रामुख्याने परग्रहावरची जीवसृष्टी, त्यांनी पृथ्वी- त्यातही अमेरिका- त्यात पुन्हा न्यूयॉर्क – आणि त्यात विशेषत्वाने टाईम स्क्वेअरवर केलेले हल्ले आणि अखिल मानवजातीने – अर्थात न्यूयॉर्कवासियांनी शौर्याने आणि धैर्याने त्याला तोंड देऊन (प्रसंगी एखाद्या किंवा डझनभर सुपरहिरोंच्या मदतीने) संपादित केलेले विजय हा नक्कीच त्याचा एक उप-चित्रप्रकार म्हणून गणला जाऊ शकतो. अर्थात या चाकोरीबद्धतेत न अडकणारे वेगळी मांडणी करणारे कॉन्टॅक्ट, सेफ्टी नॉट गॅरंटेड, मून, अरायवल, अनायलेशन सारखे अनेक उत्कृष्ट साय-फाय चित्रपटही निर्माण झाले. एलियन्सच्या खालोखाल दुसरा लाडका प्रकार म्हणजे टाईम-ट्रॅवल ज्याच्यावरच्या चित्रपटांची यादी लिहायला बसलो तर दिवसचे दिवस पुरायचे नाहीत.

पण यासारख्या कुठल्याही घासून गुळगुळीत न झालेल्या वैज्ञानिक संकल्पनांवरही काही निवडक चित्रपट बनले आहेत. अशी एक लाडकी वैज्ञानिक संकल्पना म्हणजे ‘श्रोडिंगर्स कॅट’ आणि ही कल्पना फुलवून, त्याला अजून कल्पनाशक्तीची जोड देऊन, अनेक शक्याताशक्यतांचा विचार करून फुलवत नेलेली कथा आणि प्रसंगी भयावह वाटणारे निष्कर्ष काढणारा चित्रपट म्हणजे ‘कोहरन्स’. ‘श्रोडिंगर्स कॅट’ चे उल्लेख असणारे, संदर्भ देणारे पर्सन ऑफ इंटरेस्ट, बिग बँग थिअरी, द प्रेस्टीज, अ सिरीयस मॅन सारखे अनेक चित्रपट, सिरीज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ‘श्रोडिंगर्स कॅट’ला सर्वस्वी वाहिलेला, ती संकल्पना फुलवून वेगळ्या धाटणीचा प्रयोग मांडणारा कोहरन्स हा एकमेवच.


क्वांटम फिजिक्समधल्या क्वांटम सुपरपोझिशन या संकल्पनेला वैचारिक पातळीवर आव्हान देण्यासाठी एर्विन श्रोडिंगर नावाच्या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने केलेला एक वैचारिक प्रयोग म्हणजे श्रोडिंगरची मांजर अर्थात ‘श्रोडिंगर्स कॅट’. प्रयोग अगदी सोपा करून सांगायचा तर स्टीलच्या एका बंद खोक्यात एक किरणोत्सर्गी पदार्थ, त्या किरणोत्सर्गामुळे (कदाचित) फुटू शकेल अशी विषाने भरलेली कुपी आणि एक मांजर ठेवली आहे. क्वांटम सुपरपोझिशन संकल्पना गृहीत धरली असता ती मांजर एकाच वेळी जिवंत आणि मृत असू शकते !! हा झाला त्या ‘श्रोडिंगर्स कॅट’ संकल्पनेचा गाभा. पण या छोट्याश्या (भासणाऱ्या) कल्पनेशी खेळत, त्यात नवीन पैलू जोडत, वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करत, विविध शक्यता मांडत, या साऱ्याला एक मानवी नात्यांचा दृष्टीकोन देत दिग्दर्शक जेम्स वार्ड बिर्कीटने जो एक अफलातून प्रयोग रचला आहे त्याला खरंच तोड नाही.


मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप गेटटुगेदर पार्टीसाठी त्यांच्यातल्याच एका कुटुंबाच्या घरी जमतो. सुरुवातीला लक्षातही येणार नाही अशा छोट्या छोट्या घडत जातात पण त्यांचे परिणाम दूरगामी होणार असतात हे त्या पात्रांबरोबर आपल्याही लक्षात यायला लागतं. ‘श्रोडिंगर्स कॅट’ हा विचार मध्यवर्ती ठेवून ‘डोअर टू नोव्हेअर’ चा शिताफीने वापर करत ती सगळी पात्र हळूहळू आपल्या डोळ्यासमोरच ‘कॅट’ बनत जातानाचा एक अशक्य खेळ दिग्दर्शकाने खेळला आहे. काहीतरी गडबड आहे हे सगळ्यांनाच जाणवत असतं आणि जो तो आपापल्या परीने त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. निरनिराळ्या रंगांचे लाईट्स, फोटोज, आकडे, पुस्तक अशा समोरच दिसणाऱ्या साध्या गोष्टींचा वापर करत सगळेजण जराशी गडबडगोंधळ झालेली परिस्थिती आवाक्यात आणायचा प्रयत्न करत असतात. पण याच सगळ्या गोष्टींचा, पात्रांचा संथ गतीने गुंता होत होत परिस्थिती हाताबाहेर जायला लागते. या सगळ्या गुंत्यात पुन्हा लोकांची पूर्वायुष्यं, नातेसंबंधातले गैरसमज या पैलूंमुळे अजूनच बिकट अवस्था होत जाते. सुरुवातीला किंचित गुंतलेल्या, विचित्र वाटणाऱ्या घटना शेवटाकडे जाताजाता एवढ्या भयंकर स्वरूप धारण करतात की ‘श्रोडिंगर्स कॅट’ हा वैचारिक प्रयोग जर चुकून खरंच सत्यात उतरवला गेला आणि खरंचं बिनसला तर कुठल्या अवघड परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागेल या कल्पनेनेही आपण थरारतो.

कोहरन्स म्हणजे सुसंगतपणा जी सुरुवातीची काही मिनिटं सोडली तर चुकुनही कुठेच दिसत नाही. त्यामुळे या कल्पकपणे निवडलेल्या विरोधाभासी शीर्षकाबद्दल आपल्याला चित्रनिर्मात्यांचं नक्कीच विशेष कौतुक वाटून जातं. अर्थात त्यामुळे चित्रपटात घडणाऱ्या घटना, संवाद इत्यादींकडे आपल्याला अगदी बारकाईने लक्ष द्यावं लागतं. ज्याप्रमाणे ‘द प्रेस्टीज’ च्या टॅगलाईनमध्ये नोलन आपल्याला विचारतो “आर यु वॉचिंग क्लोजली?” अगदी तसंच. महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक लो बजेट साय-फाय आहे. बरेच कलाकार ओळखीचे नाहीत, काही प्रसंगी संवाद ओवरलॅपिंग आहेत, संवाद म्हणणाऱ्या पात्राकडे कॅमेरा असेलच असं नाही असे बरेच मुद्दे आहेत. पार्टीत जमलेल्या ग्रुपच्या तोंडी गप्पा मारताना अनेक तपशील येऊन जातात. त्यातले किती महत्वाचे, किती कथेला पुढे घेऊन जाणारे, किती उगाचंच आलेले असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो. अर्थात चित्रपटाचं हे स्वरूप जाणूनबुजून अंगिकारलेलं आहे हे निश्चितच.

एलियन्सचे हल्ले, त्याविरुद्ध पृथ्वीवासीयांनी आणि सुपरहिरोंनी दिलेले लढे किंवा परकीय जीवसृष्टी, टाईम-ट्रॅवल या सगळ्याचा कंटाळा आला असेल आणि ‘क्लोजली वॉचिंग’ करण्याची तयारी असेल तर या कोहरन्स रुपी विरोधाभासाचा आस्वाद आवर्जून घ्यायलाच हवा.

Monday, May 21, 2018

मानापमानाचा ज्वालामुखी : द इन्सल्ट


परभाषिक चित्रपट बघत असताना सबटायटल्स वाचता वाचता चित्रपट पाहण्याची कला एकदा अवगत झाली की त्यासारखं सुख नाही. अर्थात अनेकांना हे असलं सबटायटल्स वाचत चित्रपट पाहायला आवडत नाही. परंतु निव्वळ या कारणामुळे जागतिक चित्रपटांच्या विशाल खजिन्याला मुकणं नक्कीच योग्य नाही. कारण सब्स वाचत वाचत चित्रपट पहायची सवय कालांतराने होतेच. अर्थात ही फक्त पहिली पायरी झाली. दुसरी पायरी किंचित अवघड आहे. म्हणजे ज्यासाठी चित्रपट पाहण्याआधी मुद्दाम परिश्रम घ्यावे लागतील अशी. आपण ज्या देशीचा, ज्या भाषेतला चित्रपट पाहणार आहोत त्या देशातील चालीरीती, सण उत्सव, रीतीरिवाज, लोकसंख्या, धर्म, लोकांच्या आवडीनिवडी, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती करून घेणे ही प्रेक्षक म्हणून एक उत्तम आणि तितकीच आवश्यक सवय आहे. ही माहिती करून घेतलेली असली की, "अरेच्चा हे काय दाखवतायत?" किंवा "छे, असं कधी होतं का कुठे?" सारखे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. अर्थात आपले बॉलीवूडी मस्सालेदार चित्रपट बघतानाही हे प्रश्न क्षणोक्षणी पडतातच परंतु वरच्या यादीतल्या सगळ्या गोष्टींचा आपण कित्तीही अभ्यास केला तरी त्याची समाधानकारक उत्तरं कधीच मिळूच शकत नाहीत.

पण अर्थातच हा नियम आशयघन परभाषिक चित्रपटांना लागू होत नाही. वरील बाबींचा निदान थोडा तरी अभ्यास करून चित्रपट बघायला बसलो तर चित्रपट तुलनेने सहजरीत्या कळायला आपल्याला मदत होते. मग तो पॅन'ज लॅबरीन्थ (स्पॅनिश) असो की अंडर द शॅडो किंवा अ सेपरेशन (दोन्ही इराणी) असो की द ब्रदरहूड ऑफ वॉर किंवा जॉईन्ट सेक्युरिटी एरीया (दोन्ही कोरियन) असो.


लॅबनॉनबद्दल आपल्याला काय माहीत आहे असा प्रश्न आपण स्वतःला विचारला असता तो एक देश आहे यापलीकडे किंवा फार तर बेरूत/बेरूट ही त्याची राजधानी आहे यापलीकडे इतर काही विशेष माहिती असण्याची शक्यता फार थोडी असते. पण एवढ्या तुटपुंज्या माहितीच्या आधारावर आपण २०१७ साली प्रदर्शित झालेला आणि ऑस्कर मध्ये सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट म्हणून नामनिर्देशित झालेला 'द इन्सल्ट' हा लॅबनीज चित्रपट बघायला बसलो तर कदाचित "एवढा का पराचा कावळा करतायत हे लोक?" असा प्रश्न खचितच पडू शकतो. पण लॅबनॉनचे सीरिया, इस्रायल आणि सायप्रस यासारखे शेजारी आहेत, सुमारे साठ लाख लोक असलेल्या या देशाची लोकसंख्या अनेक पंथीय मुस्लिम आणि कित्येक पंथीय ख्रिश्चन लोकांमध्ये विभागली गेलेली असून तिथे काही लाख सीरियन आणि पॅलेस्टीनी निर्वासितही आहेत, अजून अवाक करणारी माहिती म्हणजे धार्मिक अशांतता/अस्थिरतेच्या भीतीने १९३२ पासून तिथे अधिकृत जनगणनाच झालेली नाही किंवा एरिअल शेरॉन कोण आणि पॅलेस्टीनी नागरिकांच्या त्याच्याबद्दल काय भावना आहेत? यांसारखी काही मूलभूत माहिती आपल्याला असली (जी अर्थातच चित्रपट पाहताना मध्ये मध्ये विकीही करता येते) की पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या साध्या सोप्या (भासणाऱ्या) घटनांमागे दडलेले भयावह संदर्भ लक्षात यायला मदत होते. चित्रपटातल्या पात्रांच्या राग/लोभ, मानापमानाशी आपण एकरूप होऊ शकतो. आणि अचानकच चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या गेलेल्या सुचनेचा (डिस्क्लेमर) अर्थ आपल्याला उलगडला गेल्यासारखं वाटायला लागतं. ती सूचना अशी.

“द व्ह्यूज अँड ओपिनियन्स एक्स्प्रेस्ड इन धिस फिल्म आर दोज ऑफ द ऑथर्स अँड द डायरेक्टर अँड डू नॉट रिफ्लेक्ट द ऑफिशियल पॉलिसी ऑर पोझिशन ऑफ द लॅबनीज गव्हर्नमेंट” 


रस्त्यावर अतिशय क्षुल्लक कारणावरून झालेलं भांडण, त्यातून उद्भवलेले मानापमान आणि परिस्थिती भलत्याच दिशेने जात जात शेवटी तिला भयानक हिंसक रूप मिळून ओढवलेला राष्ट्रीय आणीबाणीचा प्रसंग आणि थेट राष्ट्राध्यक्षांना करावा लागलेला हस्तक्षेप असा कथेचा अवाका आहे. अर्थातच हे वाचल्यावर रस्त्यावर झालेल्या भांडणाचं रुपांतर राष्ट्रीय पातळीवरच्या दंगलीत होणं कसं शक्य आहे हा प्रश्न साहजिकच पडू शकतो. परंतु भांडण झालेल्या दोन व्यक्ती, त्यांच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पातळीतील तफावत या सगळ्याची सांगड आपण चित्रपटाआधी संग्रहित केलेल्या माहितीशी घातली की जे पडद्यावर घडतंय ते सहज पटू लागतं किंबहुना ते घडू नये असंही आपल्याला मनोमन वाटायला लागतं. कधी कधी इतका अतिरेक होतो की दोन्ही व्यक्ती झालं गेलं सगळं विसरून जायला तयार होतात किंवा समोरच्याच्या बाजूनेही बोलायला लागतात पण तोवर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली असते की त्यांची अशी तडजोड होणं हे त्यांच्या वकिलांना त्यांच्यातल्या राजकारणामुळे आणि अन्य गुंतागुंतीमुळे मान्य होणं शक्यच नसतं. दोन्ही व्यक्तींच्या अपेक्षा छोट्याच असतात परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. भूतकाळ उकरून काढले जातात, चिखलफेक केली जाते आणि प्रकरण चिघळत ठेवलं जातं. अखेरीस एका टप्प्यावर येऊन चित्रपट संपतो तेव्हा दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जातात. 

चित्रपटातले काही भेदक आणि जागतिक आणि लॅबनीज परिस्थितीवर थेट भाष्य करणारे संवाद ऐकल्यावर चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवला गेलेला डिस्क्लेमर कसा आवश्यक होता हे आपल्याला नक्कीच पटतं.

  • “युअर ऑनर, वुई लिव इन द मिडल इस्ट. द वर्ड "ऑफेन्सीव" वॉज बॉर्न हिअर !!”
  • “नो वन हॅज अ मोनोपॉली ऑन सफरिंग”
  • “देअर इज द युएन, द एनजीओज, द ह्युमॅनीटेरीअन ऑर्गनायझेशन्स, द लेफ्ट्स, द लिबरल्स. दे ऑल रूट फॉर (सपोर्ट) पॅलेस्टॅनियन्स. अँड डोंट फर्गेट, दे हेट अस. इट्स ट्रेंडी टू डिफेंड दोज पीपल.” 

हा चित्रपट पाहताना अनेकदा ‘वाईल्ड टेल्स’ ची आठवण होते. वाईल्ड टेल्स मध्ये परस्परांशी संबंध नसलेल्या परंतु मूळ गाभा एकच असलेल्या सहा लघुकथा आहेत. त्यातलीच एखादी लघुकथा घेऊन, इम्प्रोवाईज करून, फुलवून हा चित्रपट बनवला आहे असंही कधी कधी वाटून जातं. अर्थात वाईल्ड टेल्स मध्ये सगळा भर सुडावर आहे तर इथे तोच भर मानापमानावर आहे.

प्रमुख भूमिकेत असलेल्या अदेल करम आणि कामेल अल बाशा या दोन कलाकारांनी आपापल्या सामाजिक भूमिका आणि धार्मिक श्रद्धा उत्तमरीत्या वठवल्या आहेत. चित्रपट संपत आला तरी कोण चूक आहे आणि कोण बरोबर किंवा या एवढ्या सगळ्या व्यापात मूळ चूक कोणाची होती या प्रश्नाचं अचूक उत्तर कितीही प्रयत्न केला तरी आपण देऊ शकत नाही आणि याचं सगळं श्रेय झिआद दुइरीच्या अप्रतिम दिग्दर्शनाला आहे. हे सगळं का घडलं, कोणी घडवलं, टाळता आलं असतं का, याची जवाबदारी कोणाच्या माथी, हे पुन्हा होणं टाळता येईल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे असलं काही आपल्या देशात असंतोषाने धुमसणाऱ्या संवेदनशील विभागांत/शहरात घडलं तर परिणाम किती भयानक होतील अशा शेकडो प्रश्नाचं मोहोळ आपल्या मनात उठवून चित्रपट संपतो. पण पडद्यावरच. आपल्या डोक्यात तो संपायला काही काळ नक्कीच जायला लागणार असतो !

Thursday, September 24, 2015

विटनेस इट - "मॅड मॅक्स : फ्युरी रोड"

"देअर इज अ हाय ग्राउंड जस्ट बियॉंड 'दॅट थिंग'...."
.
.
"ही मिन्स 'द ट्री' !! "

चित्रपटाच्या साधारण मध्यावर येणारा हा संवाद. इतर वेळी कदाचित ग्लोबल वॉर्मिंगवरचा एखादा चांगला विनोद म्हणून सहज आवडून जाऊ शकेल असा. परंतु या चित्रपटात तो जेव्हा येतो तेव्हा अक्षरशः काटा येतो अंगावर. आणि तेही त्यापूर्वी जवळपास तासभर रखरखीत भूप्रदेश, विस्तीर्ण वाळवंट, शुष्क डोंगर इत्यादी सगळं अगदी जवळून बघितलेलं असूनही. शीर्षकातच सांगितल्याप्रमाणे हा एक रोड मुव्ही आहे. पण आपला नेहमीचा टिपिकल रोड मुव्ही नव्हे. 'फ्युरी' या शब्दाचा खराखुरा अर्थ अगदी जवळून समजावून सांगणारा रोड मुव्ही. एका लांबच लांब खडतर प्रवासाचं दर्शन घडवणारा. हा प्रवास, हा रस्ता अनंत अडचणींनी भरलेला आहे. सतत कोणीतरी कोणाच्या तरी मागावर, पाळतीवर आहे. असंख्य जीवघेणे हल्ले, त्यातून वाचण्यासाठीची धडपड, प्रतिहल्ले, गोंधळ, हलकल्लोळ, आगी, धुळीची वादळं या सगळ्यांनी भरलेला असा हा प्रवास आणि या संपूर्ण प्रवासभर डोळे दिपवणारे आणि वासलेला आ बंदही करण्याची उसंत न देणारे एकापेक्षा एक भयंकर असे अ‍ॅक्शन सीन्स. परंतु या चित्रपटाला निव्वळ अ‍ॅक्शन चित्रपटांच्या गटात टाकणं हा त्याच्यावर मोठा अन्याय ठरेल. पण त्याविषयी नंतर बोलू. 


अत्यंत कुशलतेने आणि जिवंत वाटतील असे चित्रित केलेले मारधाडीचे प्रसंग हा या चित्रपटाचा प्राण आहे. मला वाटतं या पूर्वी कुठल्याही चित्रपटातले मारधाडीचे प्रसंग बघून डोळे दिपलेत किंवा अगदी अविश्वसनीय प्रकार वाटलाय असं फक्त मेट्रीक्सच्या वेळी झालं होतं. (आणि अर्थात
'द रेड रीडीम्प्शन' च्या वेळी. पण 'रेड रीडीम्प्शन' ची जातकुळी अर्थातच वेगळी आहे आणि त्याची  मेट्रीक्स किंवा फ्युरी रोडच्या अ‍ॅक्शन प्रसंगांशी तुलनाच होऊ शकत नाही. रेड त्याच्यातल्या वेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्शनमुळे लक्षात राहिला होता परंतु त्यात ही भव्यदिव्यता नव्हती. असो.) 


चित्रपट नजीकच्या भविष्यात घडतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी उघडीबोडकी झालेली आहे. दूरदूरपर्यंत जिथवर नजर जाईल तिथवर फक्त वाळवंट
, उंचच उंच बोडके डोंगर, तुटलेले कडे असा सगळा रखरखाट पसरलेला आहे. झाडं नाहीत, अतिशय कमी पाणी आणि तेही सहज उपलब्ध नाही अशी परिस्थिती. सगळीकडे यंत्रांचं साम्राज्य. मोठमोठ्या गाड्या, मॉन्स्टर ट्रक्स, ट्रेलर्स, टँकर्स, वेगळ्या प्रकारचे रणगाडे, निरनिराळ्या प्रकारची युद्धाला उपयोगी पडतील अशी वाहनं सगळीकडे दिसतात. पण या यंत्रांमध्ये 'टर्मिनेटर' किंवा 'ट्रान्स्फफॉर्मर्स' प्रमाणे सफाईदारपणा नाही. तर सगळा रखरखीतपणा. सगळं कसं रॉ, अनफिनिश्ड, अनपॉलीश्ड, गंजत चाललेलं, तात्पुरतं अशा स्वरूपाचं. तर या अशा एकापेक्षा एक अजस्र अशा वाहनांनी एकमेकांचा तोंडात बोटं घालायला लावेल अशा रीतीने केलेला पाठलाग, लढाया, हल्ले म्हणजे 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'.

महत्वाचं म्हणजे हे सगळे अ‍ॅक्शन सीन्स, गाड्या, आगी, वाळवंट, मारधाड करणारी माणसं इत्यादी बरंचसं खरंखुरं आहे. पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत १४-१६ तास सतत वाळवंटात चित्रीकरण केलं गेलेलं आहे. या दृष्टीने दिग्दर्शक जॉर्ज मिलरने एका मुलाखतीदरम्यान केलेलं भाष्य पुरेसं बोलकं आहे. 


दिग्दर्शक जॉर्ज मिलर
"
इट वॉज द वर्स्ट पार्ट ऑफ मेकिंग धिस मुव्ही. वुई वेअर डुईंग इट ओल्ड स्कूल. रीअल कार्स, रीअल पीपल, रीअल डेझर्ट अँड १३० डेज   इट वॉज अ बिग स्टंट डे एव्हरी डे. इट वॉज अ मिलिटरी एक्ससाईज."परंतु वर आधीच म्हंटल्याप्रमाणे 'फ्युरी रोड' हा निव्वळ अ‍ॅक्शनपट नव्हे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीकोन आहेत.  आपण अनेक वेळा वाचलंय/ऐकलंय की तिसरं महायुद्ध झालंच तर ते पाण्यासाठी होईल. हे जर का खरं असेल आणि पाण्यावरून खरंच जर युद्धं व्हायला लागली तर ती कशी असतील याचं जिवंत उदाहरण म्हणजे चित्रपटातला पहिला प्रसंग. भांडवलदारी प्रवृत्तीमुळे पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीचंही रॅशनिंग 
आणि तेही एका स्वघोषित देव/अलौकिक-पुरुष/ मसीहा भासवणाऱ्या परंतु प्रत्यक्षातल्या एका हुकुमशाहाच्या मर्जीवर अवलंबून. आणि त्याचा "पाण्याचं व्यसन लागू देऊ नका. ते तुमचा सर्वनाश करेल" असा 'प्रेमळ' हुकुम ऐकल्यावर "पाव मिळत नसेल तर केक खा" म्हणणारी फ्रेंच राणी किंवा "भारतीयांच्या सुसंपन्नतेमुळे जगात अन्नाधान्याचीची टंचाई भासते आहे" असा जावईशोध लावणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 


चित्रपटात जागोजागी इस्लामी दहशतवाद (पण अर्थात चित्रपटात कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही)
, जिहाद, धर्म बुडाल्याच्या खोट्या आरोळ्या, पद्धतशीर वशीकरण, सतत चुकीची माहिती पेरून केलं गेलेलं ब्रेनवॉशिंग, सेक्स स्लेव्स, आपलीच प्रजा वाढवण्यासाठीचे सततचे प्रयत्न, अन्य लोकांकडे केवळ गुलाम किंवा "युनिव्हर्सल ब्लडसोर्स" एवढ्याच संकुचित नजरेने बघणं,  युद्धात मरताना खरोखर लढतानाच मेलाय आणि पाठ दाखवून पळून जाताना नव्हे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जिहादीला मरताना कोणीतरी साक्ष असण्याचं बंधन ("विटनेस मी"),  धर्मयुद्धात (इथे टोळीयुद्धात) मरण पावण्यास एका पायावर तयार असलेले आणि मेल्यावर पवित्र अशा 'वल्हाला' ला (उर्फ जन्नत?) जायला मिळणार या एकाच कल्पनेने पछाडलेले बेभान तरुण अशा अनेकानेक गोष्टी सध्या घडत असलेल्या इसीस आणि तत्सम अतिरेकी गटांची क्षणार्धात आठवण करून देतात. या अतिरेकी गटांना भडकवणारे, मुखवट्यांआड लपून राहून अशा टोळ्यांचं नेतृत्व करणारे टोळीप्रमुखही आहेतच. अर्थात म्हंटलं तर ते जिहादींचं प्रतिनिधित्व करतात किंवा दुसऱ्या अर्थाने अमेरिकेसारख्या भांडवलखोर देशाचं हिडीस रूप सामोरं आणतात. पण समोर घडणाऱ्या वेगवान घटना, प्रचंड वेगाने केले गेलेले जीवघेणे पाठलाग, हल्ले या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काहींना हे सद्यस्थितीचं प्रतीकात्मक दर्शन जाणवणारही नाही. ज्यांना जाणवणार नाही अशांसाठी हा एक सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शनपट आहे आणि उरलेल्यांसाठी एक अप्रतिम सामाजिक अँगल असलेला मारधाडपट आहे. आपल्याला चित्रपटातलं काय आवडलं हे ज्याने त्याने स्वतः ठरवायचं आणि स्वतः "विटनेस" करायचं !

Tuesday, June 23, 2015

लव इज ब्लाईन्ड...... अँड सो इज द रिव्हेंज : "वाईल्ड टेल्स"

सूड !! विविध मानवी स्वभाववैशिष्ठ्यांमधील एक महत्वपूर्ण घटक. सूड घेणाऱ्याच्या दृष्टीकोनातून बघितलं तर अत्यावश्यक भावनाच. किंवा खरं तर एक गरज. आता हे योग्य की अयोग्य हा वादाचा विषय होऊ शकतो परंतु तो आपला आत्ताचा विषय नाही. तर ही सुडाची भावना सुप्तपणे जवळपास प्रत्येकाच्याच मनात नांदत असते. बऱ्याचदा ती मारून टाकली जाते. पण क्वचित काही वेळा ती उफाळून बाहेर येते आणि दोन्ही पक्षांचा सर्वनाश करून टाकते. एवढ्या ताकदीचा विषय जगभरातल्या चित्रकर्त्यांना मोहून न टाकेल तरच नवल. "रिव्हेंज इज अ डिश बेस्ट सर्व्हड कोल्ड" पासून ते "कहके लेंगे" पर्यंतचे अनेकानेक सूडपट हे त्याचंच उदाहरण. तर अशाच सूड भावनेला सर्वस्वीपणे वाहिलेला डेमियन झिफ्रन या अर्जेंटिन लेखक-दिग्दर्शकाचा चित्रपट म्हणजे 'वाईल्ड टेल्स'. मी यापूर्वी काही मोजकेच अर्जेंटिन चित्रपट बघितले आहेत. 'नाईन क्वीन्स', 'द ऑरा', 'क्रॉनिकल ऑफ अॅन एस्केप' हे ठळकपणे आठवणारे. 'नाईन क्वीन्स' वरून आपला 'ब्लफ मास्टर' उचललाय. खरं तर तीन चतुर्थांशच. कारण ब्लफ मास्टरचा शेवट म्हणजे डेव्हिड फिन्चरच्या 'द गेम' ची सहीसही नक्कल. असो. मुद्दा हा की अर्जेंटिन चित्रपट चांगलेच खिळवून ठेवणारे असतात असा माझा पूर्वानुभव आणि त्यामुळे 'वाईल्ड टेल्स' कडून अपेक्षा वाढलेल्या.

'वाईल्ड टेल्स' इतर सुडकथांपेक्षा थोडा वेगळा आहे. हे त्याच्या नावावरून आणि चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या नामनिर्देशावरूनच (क्रेडिट्स) लक्षात येतं. क्रेडिट्समध्ये पार्श्वभूमीला विविध हिंस्र प्राण्यांचे स्टिल्स दाखवलेले आहेत.  त्याचा संदर्भ आपण नंतर पाहू. एकमेकांशी रूढार्थाने काहीही संबंध नसलेल्या परंतु ज्यांचा गाभा फक्त आणि फक्त सूडच आहे अशा सहा वेगवेगळ्या लघुकथांचा संग्रह म्हणजे 'वाईल्ड टेल्स'.  यात सुडाचे विविध प्रकार आपल्या समोर मांडले जातात. सूड, त्यांची प्रक्रिया, गरज, कारणमीमांसा, सूड घेण्याची पध्दत, तीव्रता, प्रतिक्रिया, परिणाम अशा अनेक पैलूंना स्पर्श केला जातो. वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक पार्श्वभूमीच्या लोकांची सुडाची भावना जितकी एकसारख्याच तीव्रतेची असू तितकाच त्यांच्या सूड घेण्याच्या पद्धतीत/प्रक्रियेत किती मोठा फरक असू शकतो हे पाहून थक्क व्हायला होतं. काही सूड अतिशय विचारपूर्वक, पूर्ण नियोजन करून, प्रसंगी अमाप पैसा आणि कैक महिन्यांचा/वर्षांचा कालावधी खर्च करून घेतलेले तर काही अत्यंत उत्स्फूर्त, क्षणार्धात घडणारे, काहीही विचार न करता घेतले गेलेले. काहींमध्ये सुडापायी अनेक लोकांचा जीव एखाद्या छोट्याश्या कृतीने घेतला जातो तर इतर काही प्रसंगी ज्याच्यावर सूड उगवायचा त्याच्याबरोबरच इतरही अनेक निष्पाप जीवांचा नाहक बळी जाईल हे माहीत असूनही त्याचा जराही विचार न करता थंडपणे घेतला जातो. प्रेक्षक म्हणून तटस्थपणे पाहताना काही सूड अतिशय योग्य, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे वाटतात तर काही मात्र टोकाच्या द्वेषातून उद्भवलेले अनाठायी खटाटोप भासतात !!

अजून एक महत्वाचं म्हणजे यापैकी प्रत्येक सूड हा वेगळ्या भावनेतून आलेला.  प्रत्येक सूडाला कुठे ना कुठे थोडाफार मानवी स्वभावातल्या षडरिपुंपैकी एका किंवा अधिक रिपुशी जोडणारा. कथांची संख्या सहा असण्याचं कदाचित ते ही एक कारण असू शकेल !!  यातली प्रत्येक कथा ही अतिशय चटपटीत, कमी वेळात घडणारी आणि कमी वेळात संपणारी आहे.  अनेकदा माणूस असा जनावरासारखा हिंसक वागू शकतो का असा प्रश्न पडतो. परंतु रोजच्या वृत्तपत्रातल्या मोबाईल रिंगटोनवरून खून, पाचशे रुपयांवरून हल्ला, एकतर्फी प्रेमप्रकरणातून हल्ला असल्या शेकडोंनी बातम्या वाचल्या की या वाईल्ड टेल्सच्या सूडकथा विश्वासार्ह वाटून जातात ! अशा जनावरांसारख्या हिंस्र वागणुकीचा संदर्भ म्हणून सुरुवातीला जंगली प्राण्यांचे फोटो पार्श्वभूमीला दाखवले असावेत असं आपल्याला चित्रपट चालू असताना वाटतं आणि अचानक त्यातला विरोधाभासही खाडकन जाणवतो. कारण एक तर जनावरं माणसांएवढी हिंसक होत नाहीत आणि झाली तरी एक तर भूक भागवण्यासाठी किंवा मग स्वसंरक्षणार्थ. त्यांचा हिंसकपणा हा कधीही सुडापोटी आलेला नसतो. कारण त्या बिचाऱ्यांना सूड ही भावना तरी ज्ञात असते का? (अर्थात आपल्या नागराज/नागीणींचे बदले हा त्याला अपवाद :P ) थोडक्यात जगाच्या पाठीवर निव्वळ सुडापोटी हिंसक होणारा मानवप्राणी हा एकमेवच !!!

या सहा कथांमध्ये मला विशेष आवडलेली कथा म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची. रस्त्यावरच्या क्षुल्लक वादावादीमुळे कुठच्याकुठे जाऊन पोचलेली. (सुडाच्या दृष्टीने) सर्वसमावेशक, प्रातिनिधिक आणि तितकीच अविश्वसनीय !! तसंच चौथ्या कथेत रिकार्दो दारीन या अप्रतिम अर्जेंटिन कलाकाराचा परफॉर्मन्स विशेष उल्लेखाण्याजोगा. रिकार्दो दारीन 'नाईन क्वीन्स' आणि 'द ऑरा' मुळे खास लक्षात राहिला होता. तसाच या चौथ्या (पार्किंगच्या) कथेतही एक्स्प्लोझिव्ह एक्स्पर्टच्या छोट्याश्या भूमिकेत तो प्रचंड आवडून जातो आणि दारीनचे अजून चित्रपट शोधून काढून ते बघून टाकण्याची खुणगाठ आपण मनोमन बांधून टाकतो.

यातला प्रत्येक सूड हा जवळपास वेडेपणा आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने तर अगदी अनावश्यक, अनाठायी वगैरे असा आहे. परंतु सूड घेणाऱ्याच्या नजरेतून पाहता तो योग्यच आहे. किंबहुना सुडाने पेटलेल्या व्यक्तीसाठी तो जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. ऑक्सिजनसमान आहे. त्याच्या जगण्याचं एकमेव कारण आहे. थोड्याफार प्रमाणात हेच सगळे नियम प्रेमाला आणि प्रेमवीरांनाही लागू होतात. थोडक्यात काय तर लव इज ब्लाईन्ड...... अँड सो इज द रिव्हेंज !!!

Monday, April 20, 2015

थंड, ढिम्म, निर्जीव, रखरखीत.... कोर्ट !!!!


दुकानदार दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे किंमत वाढवून ठेवून त्यावर ३०-४०-५०% डिस्काउंट देणारे आणि दुसरे म्हणजे वस्तूची किंमत एकदाच सरळ सांगून टाकून भावात कमीजास्त न करणारे. साधारणतः गिऱ्हाईकांचा ओढा स्वाभाविकपणे पहिल्या प्रकारच्या दुकानदारांकडे असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुकानदाराचा माल चांगला असला तरी थेट किंमत सांगून टाकून ती कमी होणार नसल्याने त्याची विक्री कमी होऊ शकते. किंवा बऱ्याचदा लोक दुसऱ्या प्रकारच्या दुकानात जाऊन पहिल्या प्रकारच्या दुकानातल्याप्रमाणे डिस्काऊंटची अपेक्षा ठेवतात आणि अखेरीस अपेक्षाभंग झाल्याने निराश होऊन बाहेर पडतात.  कोर्ट दुसऱ्या प्रकारच्या दुकानदारांसारखा आहे. अर्थात इथे तुलना आहे ती थेट किंमत सांगण्याच्या पद्धतीवर (निराश न होऊन बाहेर पडणं सर्वस्वी गिऱ्हाईकावर अवलंबून आहे). चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट नावातचा सरळ सांगून टाकतो की हा कोर्टाविषयीचा चित्रपट आहे. परंतु त्यात आपण अन्य कोर्टरूम ड्रामांमध्ये पाहिल्याप्रमाणे चकचकीत संवाद, झगमगीत वकील, खणखणीत पार्श्वसंगीत (उर्फ डिस्काउंटस) या सगळ्याचा पूर्णतः अभाव आहे. हा चित्रपट कोर्ट जसं खरं असतं तसं मांडतो. त्याला देवत्व बहाल करत नाही.

चित्रपटात दोन्ही बाजूंचे वकील, आरोपी, न्यायाधीश अशी नेहमीची पात्र आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं पात्र एकच. स्वतः कोर्ट. थंड, ढिम्म, रखरखीत, निर्जीव कोर्ट. त्याला कोणाची तमा नाही. कोर्टाला केंद्रस्थानी ठेवून इतर सगळी पात्र आणि (चिमुटभर जीव असलेली) कथा त्याभोवती फिरते. मुंबईतला एक सफाई कामगार गटार साफ करताना मरण पावतो आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एका ज्येष्ठ बंडखोर लोकशाहीरावर येतो आणि त्याच्यावर खटला भरला जातो अशी एका ओळीत सांगता येईल अशी कथा. पण त्याची मांडणी, सादरीकरणाची पद्धत ही खऱ्या कोर्टाला आणि अर्थात एकूणच न्यायव्यवस्थेला आत्मपरीक्षणास प्रवृत्त करेल अशी आहे ! 'कोर्ट' आपली न्यायव्यवस्था, त्यातले वकील, न्यायाधीश, पोलीस यंत्रणा तसंच या सर्वांची निष्क्रियता, बेफिकिरी आणि वस्तुस्थितीपासून करोडो योजनं दूर आपल्या स्वतःच्याच विश्वात वावरणारी सिस्टम या सगळ्यांवर घणाघाती हल्ले चढवतो. पण महत्वाचं म्हणजे कुठलाही अभिनिवेश न धारण करता. चित्रपटातल्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या फ्रेममधून न्यायव्यवस्थेला उघडं पाडलं जातं परंतु कुठलाही आव न आणता. बघा आम्ही कशी तुम्हाला तुमची जागा दाखवून देतोय असली पोकळ बडबड न करता. कुठलीही चमक धमक न करता. फक्त कोर्टातली सद्य आणि सत्यपरिस्थिती दाखवत !!

यातले वकील "ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन" असं ओरडत नाहीत, न्यायाधीश दणादण हातोडा आपटत "ऑर्डर ऑर्डर" म्हणत नाहीत, डोळ्याला पट्टी बांधून तराजू तोलणारी न्यायदेवता नाही, कोणाला गीता\कुराणाची शपथ घ्यायला लागत नाही, न्यायाधीशांच्या उच्चासानाला लाल पडदे नाहीत, खाडखाड बूट वाजवत येणारे इन्स्पेक्टर्स नाहीत, शेवटच्या क्षणी एखादा रहस्यपूर्ण साक्षीदार उपस्थित होत नाही, सटासट संवादफेक नाही. कर्णकर्कश आणि संवादांनाच गिळून टाकणारं पार्श्वसंगीत नाही, टेबलाखालून किंवा अर्धवट उघड्या दरवाजातून असे चमत्कृतीपूर्ण कॅमेरा अँगल्स नाहीत, उगाचच टायरचे, चिखलाचे, उकळत्या दुधाचे किंवा फोडणी देतानाचे विक्षिप्त क्लोजअप्स नाहीत..... !!! यात आहे ते फक्त कोर्ट. गूढ, खिन्न, काळवंडलेलं, गढूळलेलं, साकळलेलं कोर्ट. शिकार गिळून निवांत पसरलेल्या एखाद्या अजगरासारखं कोर्ट. त्या कोर्टाला आजूबाजूच्या घटनांची, परिस्थितीची ना जाण असते ना भान. आणि जेव्हा जेव्हा हे भान आणून देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ते अजगर डोळे किलकिलं केल्या न केल्यासारखं करून शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या नियम-कायद्यांवर बोट ठेवून पुन्हा निद्रिस्त होऊन जातं. आणि हा निद्रिस्तपणा, ही बेफिकिरी भावना दुखावल्याचे आरोप ठेवून खटला चालवण्यापासून ते अशीलाने घातलेले कपडे कोर्टाच्या नियमांत बसत नाहीत म्हणून त्याच्या, त्याच्या वकिलाच्या वेळेची आणि एकूणच न्यायदानात होणाऱ्या विलंबाची पर्वा न करता अशीलाला परत पाठवण्यापासून ते थेट एखाद्या निरपराध आजारी व्यक्तीला कोर्टाच्या महिनाभर सुट्टीपायी तुरुंगात डांबून ठेवून "पाव मिळत नसेल तर केक खा" असं सांगण्याप्रमाणे "आम्हाला सुट्टी आहे, तुम्ही वरच्या कोर्टात अपील करा" असं निगरगट्टपणे सांगण्यापर्यंत पसरलेली आहे.


या चित्रपटात क्लोजअप्स जवळपास नाहीतच. आहेत ते सगळे लॉंगशॉट्स. फ्रेममध्ये पूर्ण कोर्ट, समोर बसलेले लोक, इतर खटल्यातले आरोपी, पोलीस, प्रवेशद्वार हे सगळं थोड्याफार फरकाने प्रत्येक दृश्यात येतंच. बोलणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा उगाचंच संपूर्ण फ्रेम व्यापत नाही. बाजू मांडणारे वकील पण जवळपास दर वेळी साईडअँगलनेच दिसतात. याची दोन कारणं  असावीत. एक म्हणजे 'कोर्टा' मधून ग्लॅमर हा भाग काढून घेऊन ते जसं आहे तसं नीरस प्रकारे दाखवणं आणि दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे वर म्हंटल्याप्रमाणे यातलं प्रमुख पात्र फक्त आणि फक्त कोर्टच आहे हे अधोरेखित करणं !

ग्लॅमर काढून घेण्याचा अजून एक प्रयत्न म्हणजे वकील, न्यायाधीश सुपरमॅन नाहीत, तुमच्याआमच्यासारखेच मातीचे पाय असलेले सामान्य मानव आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचं थोडंफार कौटुंबिक आयुष्य, अपेक्षा, चर्चा, रोजचं आयुष्य, राहणीमान दाखवलं आहे. थोडक्यात कोर्टाला/न्यायव्यवस्थेला देवत्व बहाल न करता ते सर्वसामान्यांप्रमाणेच असून (किंबहुना) त्यांनी त्यांचं न्यायदानाचं काम पोकळ नियमांआड न लपता विनाविलंब करणं हेच एकमेव लक्ष्य ठेवायला हवं. हे एवढं सगळं 'कोर्ट' सांगतो पण कुठली आवाज न करता. नॉट इन सो मेनी वर्ड्स. रादर नो वर्ड्स !!

दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे
चित्रपटाचा शेवटून दुसरा प्रसंग हा या चित्रपटाला दोन शेवट आहेत असं वाटावं इतका संथ लयीत घडतो आणि हळूहळू संपतो. दोन तास आपण जे बघितलं त्याचा चित्रपटाच्या एकूण प्रवृत्तीला शोभेलशा पद्धतीने कमीत कमी शब्दांत शेवट होतो. त्यानंतर घडणारा अ‍ॅक्च्युअल शेवटचा प्रसंग म्हणजे फलश्रुती म्हणावी असा आहे. निद्रिस्त न्यायव्यवस्था, कायद्यातील पळवाटांचा फायदा घेणारे समाजकंटक आणि नाहक भरडली जाणारी निरपराध सामान्य जनता !! शेवटच्या दीड मिनिटांत संपूर्ण चित्रपटाचा गाभा मांडला जातो आणि धाडकन चित्रपट संपतो. आपल्याला तशाच (नैराश्याने) भारलेल्या अवस्थेत सोडून. ही भारलेली अवस्था अनुभवणं अतिशय आवश्यक आहे. एका अप्रतिम अनुभवासाठी !! मात्र जाताना हे लक्षात ठेवून जायचं की आपण 'दुसऱ्या' दुकानात चाललोय पहिल्या नाही !

Wednesday, February 6, 2013

सोराया मानुचेरी

'द स्टोनिंग ऑफ सोराया एम' हे चित्रपटाचं नाव. त्यातलं 'स्टोनिंग' हे आत्ता इथे लिहितानाही माझे हात थरथरत होते. म्हणून शीर्षकात लिहिताना तेवढं वगळून लिहिलं. आपली लिहिता वाचतानाही ही अवस्था होते त्या बिचाऱ्या सोरायाने कसं भोगलं असेल !!

“Don't act like the hypocrite, who thinks he can conceal his wiles while loudly quoting the Koran.”

--Hafez, 14th Century Iranian Poet 

अशा झणझणीत अंजनाने चित्रपटाची सुरुवात होते. पुढे काय बघायला लागणार आहे याची खरं तर चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच थोडीफार कल्पना असते. आणि इतक्या उघडपणे शीर्षकात ते मांडल्याने ते तसं लपवून ठेवण्याचा किंवा चित्रपटाच्या शेवटी रहस्यभेद करण्याचा चित्रकर्त्यांचा हेतू नक्कीच नाही. तर ते कशा पद्धतीने घडलं, कायदे कसे वाकवले, वळवले गेले, शरिया कायद्याचा दुरुपयोग, इराणमध्ये महिलांच्या रोजच्या जगण्याची दुर्दशा, इस्लाम आणि न्यायाच्या नावाखाली त्यांच्यावर केले जाणारे अन्याय, अत्याचार आणि कवडीमोल आयुष्याची फरपट हे सगळं दाखवणं हा मुख्य उद्देश आहे.चित्रपटाच्या सुरुवातीला एका फ्रेंच-इराणी पत्रकाराची गाडी इराणमधल्या एका गावात बंद पडते आणि योगायोगाने त्याची भेट एका स्त्रीशी होते. तिच्याकडून त्याला तिच्या भाचीवर झालेल्या अत्याचाराची आणि स्टोनिंगची अर्थात दगडांनी ठेचून मारलं गेल्याविषयीची माहिती मिळते अशी चित्रपटाची रूपरेषा. वर म्हंटल्याप्रमाणे यात काहीही रहस्य नाही. पण ते कसं घडतं किंबहुना घडवलं जातं ते पाहणं हा एक अत्यंत क्लेशदायक, भयकारी अनुभव आहे !

चित्रपटात फ्लॅशबॅक, गाणी, निसर्गदृश्य (एक-दोन अपवाद वगळता) वगैरे नेटके प्रकार काहीही नाहीत. सरळमार्गी एका लयीत कथा उलगडत जाते आणि प्रसंगागणिक आपल्या छातीवरचं दडपण वाढत जातं ! काही प्रसंग फार फार अप्रतिम दाखवले आहेत. सोराया आणि तिच्या दोन मुलींचा हिरवळीवरचा एक प्रसंग आहे ज्यात त्यांचं नातं, निरागसपणा फार छान उलगडून दाखवला आहे. आणि तेवढाच भयानक असा दुसरा एक प्रसंग आहे. तो म्हणजे प्रत्यक्ष स्टोनिंगपूर्वी लहान लहान मुलं छोटे दगड गोळा करून ते एकावर एक वाजवून त्यांचा आवाज करतात तो प्रसंग ! तो आवाज सहन होत नाही. त्या मुलांकडे बघवत नाही. चित्रपट बंद करावासा वातो. पळून जावसं वाटतं !

बाहेरख्याली नवऱ्याच्या थेरांना दाद दिली नाही म्हणून एका निष्पाप जीवाचा, दोन मुलं आणि दोन मुलींच्या आईचा अत्यंत अमानुषपणे जीव घेतला जातो. गावचा सरपंच (मेयर) आणि प्रमुख मौलवी नवऱ्याला सामील ! खोट्या साक्षी देऊन निकाल दिला जातो. सोरायाला व्यभिचारी ठरवलं जातं. व्यभिचारासाठी इराणमध्ये शिक्षा एकच... स्टोनिंग !!!!! आणि तीही फक्त स्त्रीला.. स्त्रीबरोबर तथाकथित व्यभिचार करणारा पुरुष हा स्वतः स्टोनिंग मध्ये सहभागी होऊ शकतो ! स्टोनिंगमध्ये तिच्या व आणि हे सगळं का तर सोरायाच्या नवऱ्याला दुसऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलीशी लग्न करता यावं आणि घटस्फोट दिल्यावर पोटगी द्यावी लागू नये म्हणून !!!  मुलीची मावशी मावशी हा सगळा प्रकार टाळण्यासाठी जंग जंग पछाडते पण तिला कोणीच दाद देत नाही. आणि कळस म्हणून की काय तर तिची दोन मुलं आणि स्वतः वडीलही स्टोनिंग मध्ये सहभागी होतात. प्रत्यक्ष स्टोनिंगचा प्रसंग तर अत्यंत अत्यंत अत्यंत हृदयद्रावक आहे. "'मरणाची' भीती वाटत नाही पण 'मरण्याची' भीती वाटते.... अशा प्रकारे मरण्याची, यातनांची भीती वाटते" म्हणणारी, "मी रडणार नाही" असं म्हणणारी परंतु शेवटी वेदना असह्य झाल्याने स्वतःला आवरू न शकणारी सोराया डोळ्यापुढून हलत नाही. आणि यातला प्रत्येक प्रसंग (अर्थात काही प्रसंग वगळता) प्रत्यक्षात घडलेला आहे ही जाणीव शेवटपर्यंत आपला पाठ सोडत नाही. चित्रपट संपल्यावरही !!

फ्रेडन साहेबजम (Freidoune Sahebjam) या फ्रेंच-इराणी पत्रकाराच्या सत्यघटनेवर आधारित असलेल्या त्याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला हा चित्रपट. त्याने या पुस्तकाखेरीजही इराणमध्ये होणारी मानवी हक्कांची पायमल्ली, स्त्रियांना मिळणारी नीचतम वागणुक, तिथले अमानुष कायदे इत्यादींविरुद्ध बराच आवाज उठवला. या पुस्तकाच्या निमित्ताने इराणमधला अमानुषपणा पाश्चिमात्य जगासमोर आला. अर्थात समोर येणाऱ्या अशा एखाद्या प्रसंगागणिक कित्येक कधीच सामोरे न येणारे, दडपले जाणारे प्रसंग असतील !

मला कल्पना आहे हा लेख जरा विस्कळीत झाला आहे परंतु इतका भीषण अनुभव घेतल्यावर काही सुचणं तसंही अशक्य आहे ! आणि अशा कित्येक सोराया आजही असलं भयानक जीवन जगत असतील या कल्पेनेने तर... !!