Monday, March 27, 2023

कार्निव्हल ऑफ गनफाईट अर्थात बंदूकयुद्धांचं महासंमेलन : जॉन विक


'जॉन विक चॅप्टर ४' सुरु होतो तो वाळवंटातल्या एका घोडेस्वारांच्या पाठलागाच्या प्रसंगाने ज्याची मुळं तिसऱ्या भागात आहेत. त्यानंतर आपण जपान मधल्या ओसाका इथल्या ओसाका कॉन्टिनेन्टल या हॉटेल मध्ये येऊन पोचतो. न्यू यॉर्क शहरातलं कॉन्टिनेन्टल हॉटेल, तिथलं गूढ काळोखी वातावरण, उंच खिडक्या आणि झरोके, त्यातून पडणारे सूर्यकिरणांचे कवडसे या सगळ्याचे संदर्भ आणि अर्थ पहिल्या तीन भागांत पुरेशा तपशिलाने येऊन गेलेले आहेत. चौथा धडा एका अर्थाने स्वतंत्र असला तरी पहिल्या तीन भागांचे वेळोवेळी येणारे संदर्भ पाहता तो पहिल्या तीन भागांचा काहीसा विस्तारित भाग (extension) आहे असंही म्हणता येईल. थोडक्यात पहिले तीन भाग न बघता थेट चौथा धडा बघायला गेल्यास पदरी निराशा पडू शकते. 

जॉन विक हा गुन्हेगारी विश्वातला एके काळी आख्यायिका (legend) बनून गेलेला, जगभरातल्या माफिया विश्वात भययुक्त आदराने नाव घेतला जाणारा पण आता बायकोच्या निधनानंतर निवृत्त झालेला एक लढवय्या आहे. अर्थात पहिल्या भागातलय सुरुवातीच्या क्षुल्लक बोलाचाली आणि त्यानंतर घडणाऱ्या गंभीर परिणामांमुळे चवताळून जाऊन सूडाच्या अग्नीने पेटून उठलेला जॉन विक बघताना त्याची ही पूर्वाश्रमीची थोरवी प्रेक्षकांना माहितच नसते. एकेक प्रसंग जसजसे घडत जातात आणि कथा पुढे पुढे सरकत जाते तसतसं जॉन विक हा काय प्रकार आहे हे आपल्या लक्षात यायला लागतं. पहिला भाग तुलनेने खऱ्या विश्वाशी संलग्न (कनेक्टेड) आहे. दुसरा आणि त्यानंतरचे सगळे भाग काही तुरळक अपवाद वगळता या आपल्या खऱ्या विश्वाबाहेर एखाद्या समांतर विश्वात किंवा 'जॉन विक युनिव्हर्स' मध्ये घडतात असं वाटावं एवढे अविश्वसनीय आहेत. 

तसं पाहायला गेल्यास जॉन विकचं व्यक्तिमत्व अतिशय सामान्य आहे. तो जॅक रीचर किंवा रॅम्बोप्रमाणे अंगापिंडाने मजबूत नाही, ब्रूस ली किंवा जॅकी चॅन प्रमाणे मार्शल आर्टस् किंवा तत्सम युद्धप्रकारात त्याने प्राविण्य मिळवलं आहे असंही नाही किंवा जॉन मॅक्लेन (Die Hard) किंवा डर्टी हॅरीप्रमाणे तो चमकदार आणि उठावदार संवादांच्या फैरीही झाडत नाही. तो फारच कमी बोलतो किंवा प्रसंगी बोलतही नाही. ज्याप्रमाणे सचिनवर झालेल्या शाब्दिक हल्ल्यांना तो त्याच्या बॅटने प्रत्युत्तर देत असे तद्वतच जॉन विक आपल्यावरील हल्ल्यांना न बोलता सामोरा जातो. फरक इतकाच की इथे शाब्दिक हल्ले नसून प्रत्यक्षातले जीवघेणे हल्ले असतात. आता इतकी नकारघंटा वाजवल्यावर जॉन विकमध्ये एवढं विशेष काय आहे की ज्याच्या चित्रपटाचे ४ भाग निघावेत आणि त्याच्याबद्दल एवढं लिहिलं जावं असा प्रश्न कोणालाही पडू शकेल. 

जॉन विकचे तीन महत्वाचे गुण म्हणजे तो प्रामुख्याने बंदुकांनी केल्या जाणाऱ्या युद्धाचा सम्राट आहे. गनफाईट्स मधलं प्राविण्य हे त्याच्या पात्राचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बंदूक नसेल तर अन्य कुठल्याही वस्तूचा वापर तितक्याच शिताफीने हत्यार किंवा आयुध म्हणून वापरण्याचं त्याचं वादातीत असं कौशल्य. तिसऱ्या भागातल्या वाचनालयात घडणाऱ्या एका हाणामारीच्या प्रसंगात तो एका जाडजूड पुस्तकाचा वापर हत्यार म्हणून करतो हे आपल्याला आठवत असेलच. आणि तिसरा गुण म्हणजे जगण्याची किंवा टिकून राहण्याची (survival) तीव्र इच्छाशक्ती आणि जोडीला मिळणारी नशीबाची तितकीच महत्वाची असलेली साथ! अर्थात कुठलीही वस्तू शस्त्र म्हणून वापरण्याची जॉन विकची तयारी असली तरी बंदुकांएवढा कम्फर्टेबल तो कुठल्याही शस्त्रासोबत नाही हे ही तितकंच खरं. चॅप्टर ४ मध्ये नानच्याकु वापरतानाच्या त्याच्या कमालीच्या संथ हालचाली बघून ते जाणवतंच. 

पहिल्या भागाचा काहीसा अपवाद वगळता यातल्या एकही भागाला कथा अशी नाहीच. जॉन विक स्वतः फार कमी बोलतो आणि इतर वेळ हात, पाय आणि बंदुका चालवत असतो. एका हाणामारीच्या प्रसंगानंतर दुसरा, मग तिसरा, त्यानंतर चौथा आणि अशा अनेक प्रसंगांची रांग अशा स्वरूपात चित्रपट पुढे सरकतो. पण या हाणामाऱ्या अत्यंत शैलीदार आहेत, अतिशय स्टायलिश आहेत. स्वतः जॉन विक कायम थ्री पीस सूट, टाय आणि बूट अशाच रूपात किमान ९५% वेळा वावरतो. मारामारीचे प्रसंग प्रयत्नपूर्वक आणि काळजीपूर्वक अतिशय देखणे वाटतील अशा पद्धतीने चित्रित केले आहेत. पार्श्वसंगीताच्या तालावर थिरकणाऱ्या शैलीदार नृत्याच्या हालचाली वाटाव्यात असे नितांतसुंदर आणि नयनरम्य असे हाणामारीचे प्रसंग यात आहेत. कित्येकदा या मारामाऱ्यांचा दर्जा  एखाद्या कॉम्प्युटर गेममधल्या चढत्या पातळीप्रमाणे अधिकाधिक शैलीदार तर आहेच तर अनेकदा त्या तितक्याच गुंतागुंतीच्याही आहेत. 

इतक्या शैलीदार आणि प्रमाणबद्ध मारामाऱ्या बघून 'किल बिल' मधल्या मारामाऱ्या किंवा 'किंग्जमन : द सिक्रेट सर्व्हिस' मधल्या चर्चमधल्या स्टायलिश आणि वेल-कोरिओग्राफ्ड हाणामाऱ्यांची आठवण येते. हे हाणामारी आणि पाठलागांचे प्रसंग आधीच्या भागांतही अतिशय लांबलचक आहेतच पण चॅप्टर ४ मध्ये त्यांची लांबी अधिकच आणि विशेष प्रयत्नपूर्वक वाढवल्यासारखी वाटते. चित्रपटाच्या शेवटाकडे असलेलं, पॅरिसमधल्या Arc de Triomphe च्या रस्त्यावर घडणारं, गाड्या आणि बाइक्स यांच्या सोबतीने घडणारं बंदूकयुद्ध असो किंवा अखेरीस घडणारी लांबलचक जिन्यावरची तितकीच लांबलचक गनफाईट असो, या सगळ्यात एक अतीव देखणेपणा आहे हे सतत जाणवत राहतं. 

अर्थात हे मारामाऱ्यांच्या प्रसंगांना अत्यंत देखण्या पद्धतीने करण्यात आलेलं छायाचित्रण आणि वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात आलेले कॅमेरा अँगल्स यांचंही तेवढांच महत्व आहे. चॅप्टर ४ मध्ये शेवटी एका मोठ्या घरात घडणारा शॉटगनच्या हाणामारीचा प्रसंग छपराच्या अँगलने टिपण्याचा कौशल्याला जितकी दाद देऊ तितकी कमी आहे. तो प्रसंग अशा पद्धतीने चित्रित केल्यामुळे संपूर्ण घराचा अर्थात बॅटलफिल्डचा टॉप व्ह्यू प्रेक्षकांना सतत दिसत राहतो. 

अर्थात याच नव्हे तर सगळ्याच भागांत अनेक अविश्वसनीय किंवा प्रसंगी निर्बुद्ध वाटावे असे प्रसंगही आहेतच. पण ते 'विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ' च्या अंतर्गत सोडून द्यायचे असतात हे ही प्रेक्षकांना एव्हाना ठाऊक झालेलं असतंच. 

काही चित्रपटांचे संवाद दर्जेदार असतात तर काहींची कथा-पटकथा, काहींचं संगीत जादुई असतं तर काहींचं कॅमेरावर्क. यातलं काहीही बघायला मिळणार नाही हे मान्य असेल पण या सगळ्यांना पुरून उरेल इतक्या देखण्या, सुबक, नयनरम्य, दर्जेदार, नृत्यसदृश, नेत्रसुखद हाणामाऱ्यांचे लांबलचक प्रसंग बघायची तयारी असेल त्यांनी 'जॉन विक चॅप्टर ४' आवर्जून बघा. अर्थात तत्पूर्वी आधीचे तीन भाग पाहायला मात्र विसरू नका !

तळटीप : चित्रपट अजिबात विनोदी नसला तरी सेन्सॉर बोर्डाच्या कृपेने चित्रपटात अनवधानाने एकच विनोद अनेकदा घडला आहे. अनेकदा पडद्यावर बंदुका, तलवारी, चाकू, ऑटोमॅटिक रायफल्स अशी अनेक हत्यारांची रेलचेल असण्याचे प्रसंग आहेत आणि त्याचवेळी पडद्यावरील एखादं पात्र धूम्रपान किंवा मद्यपान करताना दाखवलं आहे. आणि अशा वेळी "स्मोकिंग किल्स" अशी पाटी झळकताना बघून त्या बंदुका आणि तलवारींची कीव आल्यावाचून राहत नाही!

-हेरंब ओक