Tuesday, June 23, 2015

लव इज ब्लाईन्ड...... अँड सो इज द रिव्हेंज : "वाईल्ड टेल्स"

सूड !! विविध मानवी स्वभाववैशिष्ठ्यांमधील एक महत्वपूर्ण घटक. सूड घेणाऱ्याच्या दृष्टीकोनातून बघितलं तर अत्यावश्यक भावनाच. किंवा खरं तर एक गरज. आता हे योग्य की अयोग्य हा वादाचा विषय होऊ शकतो परंतु तो आपला आत्ताचा विषय नाही. तर ही सुडाची भावना सुप्तपणे जवळपास प्रत्येकाच्याच मनात नांदत असते. बऱ्याचदा ती मारून टाकली जाते. पण क्वचित काही वेळा ती उफाळून बाहेर येते आणि दोन्ही पक्षांचा सर्वनाश करून टाकते. एवढ्या ताकदीचा विषय जगभरातल्या चित्रकर्त्यांना मोहून न टाकेल तरच नवल. "रिव्हेंज इज अ डिश बेस्ट सर्व्हड कोल्ड" पासून ते "कहके लेंगे" पर्यंतचे अनेकानेक सूडपट हे त्याचंच उदाहरण. तर अशाच सूड भावनेला सर्वस्वीपणे वाहिलेला डेमियन झिफ्रन या अर्जेंटिन लेखक-दिग्दर्शकाचा चित्रपट म्हणजे 'वाईल्ड टेल्स'. मी यापूर्वी काही मोजकेच अर्जेंटिन चित्रपट बघितले आहेत. 'नाईन क्वीन्स', 'द ऑरा', 'क्रॉनिकल ऑफ अॅन एस्केप' हे ठळकपणे आठवणारे. 'नाईन क्वीन्स' वरून आपला 'ब्लफ मास्टर' उचललाय. खरं तर तीन चतुर्थांशच. कारण ब्लफ मास्टरचा शेवट म्हणजे डेव्हिड फिन्चरच्या 'द गेम' ची सहीसही नक्कल. असो. मुद्दा हा की अर्जेंटिन चित्रपट चांगलेच खिळवून ठेवणारे असतात असा माझा पूर्वानुभव आणि त्यामुळे 'वाईल्ड टेल्स' कडून अपेक्षा वाढलेल्या.

'वाईल्ड टेल्स' इतर सुडकथांपेक्षा थोडा वेगळा आहे. हे त्याच्या नावावरून आणि चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या नामनिर्देशावरूनच (क्रेडिट्स) लक्षात येतं. क्रेडिट्समध्ये पार्श्वभूमीला विविध हिंस्र प्राण्यांचे स्टिल्स दाखवलेले आहेत.  त्याचा संदर्भ आपण नंतर पाहू. एकमेकांशी रूढार्थाने काहीही संबंध नसलेल्या परंतु ज्यांचा गाभा फक्त आणि फक्त सूडच आहे अशा सहा वेगवेगळ्या लघुकथांचा संग्रह म्हणजे 'वाईल्ड टेल्स'.  यात सुडाचे विविध प्रकार आपल्या समोर मांडले जातात. सूड, त्यांची प्रक्रिया, गरज, कारणमीमांसा, सूड घेण्याची पध्दत, तीव्रता, प्रतिक्रिया, परिणाम अशा अनेक पैलूंना स्पर्श केला जातो. वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक पार्श्वभूमीच्या लोकांची सुडाची भावना जितकी एकसारख्याच तीव्रतेची असू तितकाच त्यांच्या सूड घेण्याच्या पद्धतीत/प्रक्रियेत किती मोठा फरक असू शकतो हे पाहून थक्क व्हायला होतं. काही सूड अतिशय विचारपूर्वक, पूर्ण नियोजन करून, प्रसंगी अमाप पैसा आणि कैक महिन्यांचा/वर्षांचा कालावधी खर्च करून घेतलेले तर काही अत्यंत उत्स्फूर्त, क्षणार्धात घडणारे, काहीही विचार न करता घेतले गेलेले. काहींमध्ये सुडापायी अनेक लोकांचा जीव एखाद्या छोट्याश्या कृतीने घेतला जातो तर इतर काही प्रसंगी ज्याच्यावर सूड उगवायचा त्याच्याबरोबरच इतरही अनेक निष्पाप जीवांचा नाहक बळी जाईल हे माहीत असूनही त्याचा जराही विचार न करता थंडपणे घेतला जातो. प्रेक्षक म्हणून तटस्थपणे पाहताना काही सूड अतिशय योग्य, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे वाटतात तर काही मात्र टोकाच्या द्वेषातून उद्भवलेले अनाठायी खटाटोप भासतात !!

अजून एक महत्वाचं म्हणजे यापैकी प्रत्येक सूड हा वेगळ्या भावनेतून आलेला.  प्रत्येक सूडाला कुठे ना कुठे थोडाफार मानवी स्वभावातल्या षडरिपुंपैकी एका किंवा अधिक रिपुशी जोडणारा. कथांची संख्या सहा असण्याचं कदाचित ते ही एक कारण असू शकेल !!  यातली प्रत्येक कथा ही अतिशय चटपटीत, कमी वेळात घडणारी आणि कमी वेळात संपणारी आहे.  अनेकदा माणूस असा जनावरासारखा हिंसक वागू शकतो का असा प्रश्न पडतो. परंतु रोजच्या वृत्तपत्रातल्या मोबाईल रिंगटोनवरून खून, पाचशे रुपयांवरून हल्ला, एकतर्फी प्रेमप्रकरणातून हल्ला असल्या शेकडोंनी बातम्या वाचल्या की या वाईल्ड टेल्सच्या सूडकथा विश्वासार्ह वाटून जातात ! अशा जनावरांसारख्या हिंस्र वागणुकीचा संदर्भ म्हणून सुरुवातीला जंगली प्राण्यांचे फोटो पार्श्वभूमीला दाखवले असावेत असं आपल्याला चित्रपट चालू असताना वाटतं आणि अचानक त्यातला विरोधाभासही खाडकन जाणवतो. कारण एक तर जनावरं माणसांएवढी हिंसक होत नाहीत आणि झाली तरी एक तर भूक भागवण्यासाठी किंवा मग स्वसंरक्षणार्थ. त्यांचा हिंसकपणा हा कधीही सुडापोटी आलेला नसतो. कारण त्या बिचाऱ्यांना सूड ही भावना तरी ज्ञात असते का? (अर्थात आपल्या नागराज/नागीणींचे बदले हा त्याला अपवाद :P ) थोडक्यात जगाच्या पाठीवर निव्वळ सुडापोटी हिंसक होणारा मानवप्राणी हा एकमेवच !!!

या सहा कथांमध्ये मला विशेष आवडलेली कथा म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची. रस्त्यावरच्या क्षुल्लक वादावादीमुळे कुठच्याकुठे जाऊन पोचलेली. (सुडाच्या दृष्टीने) सर्वसमावेशक, प्रातिनिधिक आणि तितकीच अविश्वसनीय !! तसंच चौथ्या कथेत रिकार्दो दारीन या अप्रतिम अर्जेंटिन कलाकाराचा परफॉर्मन्स विशेष उल्लेखाण्याजोगा. रिकार्दो दारीन 'नाईन क्वीन्स' आणि 'द ऑरा' मुळे खास लक्षात राहिला होता. तसाच या चौथ्या (पार्किंगच्या) कथेतही एक्स्प्लोझिव्ह एक्स्पर्टच्या छोट्याश्या भूमिकेत तो प्रचंड आवडून जातो आणि दारीनचे अजून चित्रपट शोधून काढून ते बघून टाकण्याची खुणगाठ आपण मनोमन बांधून टाकतो.

यातला प्रत्येक सूड हा जवळपास वेडेपणा आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने तर अगदी अनावश्यक, अनाठायी वगैरे असा आहे. परंतु सूड घेणाऱ्याच्या नजरेतून पाहता तो योग्यच आहे. किंबहुना सुडाने पेटलेल्या व्यक्तीसाठी तो जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. ऑक्सिजनसमान आहे. त्याच्या जगण्याचं एकमेव कारण आहे. थोड्याफार प्रमाणात हेच सगळे नियम प्रेमाला आणि प्रेमवीरांनाही लागू होतात. थोडक्यात काय तर लव इज ब्लाईन्ड...... अँड सो इज द रिव्हेंज !!!