Wednesday, August 29, 2012

न भरलेली शाळा !

हॉलीवुडमध्ये किंवा एकूणच जागतिक चित्रपटसृष्टीत निर्माण होणारे चित्रपट हे सहसा एखाद्या कथा, कादंबरी, लघुकथा, दीर्घकथा, चरित्र/आत्मचरित्रपर पुस्तक वगैरे वगैरे अशा एखाद्या गोष्टीवर आधारित असतात. अगदी नियम असल्याप्रमाणे नेहमीच असं असतं असं नाही पण अनेक (यशस्वी/अयशस्वी दोन्ही) चित्रपटांच्या बाबतीत हे खरं आहे. कदाचित विपुल दर्जेदार साहित्य निर्मिती हे त्यामागचं एक महत्वाचं कारण असेल. पण नुसती दर्जेदार कथा/संकल्पना असून नक्कीच भागत नाही तर त्या कल्पनेला प्रेक्षकांना आवडण्यायोग्य रुपात पडद्यावर सादर करणं हे ही तेवढंच महत्वाचं असतं. नाहीतर चांगल्या संकल्पनेचा विचका होण्याची शक्यता असते. परंतु कल्पक किंवा/आणि अनुभवी दिग्दर्शक आणि पटकथालेखक हे त्या कल्पनेवर अफाट मेहनत घेऊन ती वाया जाणार नाही याची योग्य काळजी घेतात.

हे सगळं यशस्वीपणे जमून येण्यासाठी काही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. पहिला मुद्दा म्हणजे दीर्घकथा/कादंबरीत आढळणारी आणि त्या माध्यमाला आवश्यक असणारी अनेक पात्रं, प्रसंग, प्रसंगांची लांबी, संवाद इत्यादी चित्रपट माध्यमात रुपांतरीत करताना वगळावे लागतात (उदा डॅन ब्राउनचं एंजल्स अँड डेमन्स) तर एखाद्या लघुकथेचं पडदा माध्यमात रुपांतर करताना याच सगळ्या गोष्टी आवश्यक त्या प्रमाणात वाढवाव्या लागतात (उदा 'ममेंटो' ज्यावर आधारित आहे ती जोनाथन नोलन ची लघुकथा) तरच ती लघुकथा चित्रपट माध्यमाला शोभेशी बनू शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कधीकधी कादंबरीचा अवाका इतका मोठा असतो की प्रसंग, पात्रं इ. वगळूनही लांबी खूप अधिक होण्याची शक्यता असते. कधीकधी चित्रपटात कथेच्या दृष्टीने बरेच प्रसंग दाखवणं आवश्यक असतं, किंवा चित्रपटात दाखवल्या गेलेल्या काळाचा अवाका फार विस्तृत असतो आणि त्यामुळे बरेचसे प्रसंग वगळून किंवा त्यात काटछाट करून चालत नाही अशावेळी मग पर्याय म्हणून निवेदकाची मदत घ्यावी लागते (उदा फॉरेस्ट गंप, बिग फिश). बरेच प्रसंग, संवाद, "कोणाला काय वाटलं" किंवा "कुठलं पात्र कोणाला काय म्हणालं" हे तपशीलवार दाखवण्याऐवजी निवेदकाच्या चार ओळीत दाखवून भागतं.



या सगळ्याच्या तुलनेत मराठी (आणि हिंदीतही) तयार होणारे फार कमी चित्रपट हे एखाद्या पुस्तकावर/कथेवर आधारित असतात. उदा. सिंहासन, निशाणी डावा अंगठा, श्वास आणि सगळ्यांत ताजं उदाहरण म्हणजे डॉ. मिलिंद बोकील यांच्या शाळा कादंबरीवर सुजय डहाके दिग्दर्शित त्याच नावाचा चित्रपट. पण दुर्दैवाने इतक्या उत्तम पुस्तकावर आधारित असलेला हा चित्रपट अनेक आघाड्यांवर साफ फसतो. याच्या काही महत्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे पुस्तकात असलेला प्रत्येक प्रसंग, पात्र चित्रपटात जसंच्या तसं दाखवण्याचा दिग्दर्शकाचा अट्टहास !! या नादात बरेच प्रसंग अगदी छोटे छोटे आणि तुटक वाटतात किंवा काही पात्रांचं संपूर्ण चित्रपटभर मिळून जेमतेम दहा मिनिटं दर्शन होतं. कारण दिग्दर्शक निवेदकाची मदत घेत नाही की प्रसंगांची, पात्रांची, संवादांची संख्या आणि लांबीही (आवश्यक तिथे) कमी करत नाही.

चित्रपट फसण्याला कारणीभूत ठरणारा अजूनही एक महत्वाचा मुद्दा आहे. शाळा कादंबरी वरवर पाहता एका पौगंडावस्थेतल्या मुलाचं शाळेतलं प्रेमप्रकरण आणि आणीबाणी या दोनच गोष्टींभोवतो गुंफलेली आहे.त्यामुळे जवळपास प्रत्येक प्रसंगात एकतर प्रेमकथा किंवा मग आणीबाणी या दोन गोष्टींचे उल्लेख अगदी ठसठशीतपणे येतात. पण प्रत्यक्षात मात्र लेखकाने प्रेमकथेच्या आड लपून चुकीच्या सामाजिक रुढी, प्रथा, राजकारण, लिंगभेद, जातीभेद इत्यादींवर केलेले छुपे पण खणखणीत प्रहार पुस्तकाचं आवश्यक ते 'रीडिंग बिटविन द लाईन्स' न केल्याने दिग्दर्शक पडद्यावर दाखवतच नाही. चित्रपटात फक्त प्रेम आणि आणीबाणी हे दोनच मुद्दे ठळकपणे दिसतात पण बाकीच्या समस्यांचा गंधही नसतो याचं कारण म्हणजे तेवढेच दोन मुद्दे कादंबरीतही ठळकपणे येतात. बाकीच्या समस्यांवर लेखक कादंबरीतल्या मुकुंद जोशी या प्रमुख पात्राच्या आत्मकथनातून, स्वगतातून अनेक वेळा भाष्य करतो ज्याकडे दिग्दर्शक आणि पटकथाकार या दोघांचंही अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे पुस्तकात येणारा अथर्वशीर्ष पठणाबद्दलचा आणि त्या अनुषंगाने दैववादी वृत्तीवर आणि छुप्या जातीवादावर केलेला प्रहार त्यांना दिसतच नाही. बेंद्रे बाई आणि मांजरेकर सर यांच्यातल्या वेळोवेळी केलेल्या तुलनेच्या अनुषंगाने समाजाचा स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्याद्वारे लिंगभेदावर ओढलेला कोरडा त्यांना ऐकूच येत नाही. निव्वळ परीक्षार्थी तयार करायला मदत करणाऱ्या आपल्या यांत्रिक शिक्षणपद्धतीवर केलेली टीका त्यांना जाणवतच नाही.

खरं तर या तीन मुद्द्यांत 'शाळा' चित्रपटाचं परीक्षण पूर्ण व्हायला हवं. पण ज्या प्रेमकथेवर चित्रपटाने संपूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यातल्या काही महत्वाच्या प्रसंगांचाही कसा पूर्णपणे बोजवारा उडालेला हे थोडक्यात सांगतो. जोशी प्रेमपत्र लिहुन शिरोडकरला देवळात भेटायला बोलावतो हा प्रसंग बोकीलांनी विलक्षण हळुवारपणे चितारलेला आहे. म्हणजे पहिल्या प्रेमपत्रातली हुरहूर, नायिकेला काय वाटेल, ती काय म्हणेल याची भीती, ती रागावणार तर नाही ना किंवा इतरांना सांगणार तर नाही ना याची काळजी, चिठ्ठी मिळाल्यावर ती काय करेल यातली अनिश्चितता असे पहिल्या प्रेमपत्रातले सगळे कंगोरे त्या प्रसंगात आहेत. आणि जसजसा प्रसंग उलगडत जातो तसंतसं आपलंही टेन्शन वाढत जातं. शेवटी काय होईल काय होईल अशा विचारात असतानाच देवळात लवकर जाऊन लपून बसून शिरोडकरची वाट बघत बसलेल्या मुकुंदाला अचानक देवळात शिरणाऱ्या शिरोडकरचं दर्शन होतं आणि त्याच्याबरोबरच आपलाही जीव भांड्यात पडतो. आपणही सुखावून जातो.

अन्य प्रसंग कादंबरीत दाखवल्याप्रमाणे जसेच्या तसे घेण्याच्या नादात असलेल्या डहाकेने हा एक प्रसंग कादंबरीतल्याप्रमाणे जसाच्या तसा घेतला असता तर काय बहार आली असती. पण नेमका हाच प्रसंग अगदी उलट्या क्रमाने दाखवून दिग्दर्शकाने त्यातली जानच काढून घेतली आहे. म्हणजे शिरोडकरला प्रेमपत्र दिल्यानंतरच्या अगदी लगेचच्या प्रसंगात आपल्याला थेट दिसते ती देवळात प्रवेश करणारी शिरोडकर.. पण मग दरम्यानची हुरहूर, अनिश्चितता, छातीतली धडधड, ओळखीचं कोणी भेटणार तर नाही ना याची भीती, देवळात लवकर जाऊन लपून वाट पाहणं इत्यादी सगळ्याचं काय झालं??? कारण चित्रपटात हे टप्पे दुर्दैवाने येतच नाहीत :(

कादंबरीतले सगळे प्रसंग चित्रपटात दाखवण्याच्या अट्टहासापायी अजून एक महत्वाचं नुकसान होतं ते म्हणजे जोशी, शिरोडकर आणि सुऱ्या ही पात्रं वगळता बाकीची पात्रं धड उभीच राहत नाहीत. कारण त्यांच्या व्यक्तिरेखा दाखवण्याइतका वेळच शिल्लक नसतो. त्यामुळे फावड्याची गरिबी, त्याचं क्रीडानैपुण्य, चित्र्याची हुशारी, घरातल्या भांडणांमुळे आणि इतर विचित्र अनुभवांमुळे त्याचं मुद्दाम घराबाहेर वेळ घालवत राहणं, बेंद्रेबाई आणि मांजरेकर सर यांच्यातली सततची तुलना यातल्या एकाही मुद्द्याला साधा स्पर्शही केला जात नाही.

पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदातलं मुकुंदाचं स्वगत अतिशय रखरखीत आहे. सगळी स्वप्नं उध्वस्त झाली आहेत, मित्र दुरावलेत, आवडणारी मुलगी दुरावली आहे अशा नैराश्याने भरलेल्या वातावरणात ते स्वगत सुरु होतं आणि समोर आ वासून उभ्या असलेल्या दहावीच्या वर्षाच्या उल्लेखाने अतिशय परिणामकारकरीत्या संपतं. याउलट संपूर्ण चित्रपटभर मात्र एकही वाक्य स्वगतात किंवा निवेदकाच्या मदतीने आलेलं नसताना शेवटच्या प्रसंगात अचानक खडकांवर बसलेल्या मुकुंदाला पुस्तकातलं तेच स्वगत सुरु करताना पाहून त्याच्याबद्दल वाईट वाटायच्या ऐवजी उलट तो प्रसंग (दुर्दैवाने) विनोदी वाटतो

आवर्जून उल्लेख करण्याजोग्या गोष्टी म्हणजे सगळ्याच बालकलाकारांचा सहज वावर, त्यांच्या चेहऱ्यांवरचे फ्रेश लुक्स आणि प्रसन्न छायाचित्रण. पण दुर्दैवाने पटकथा आणि दिग्दर्शनातल्या अक्षम्य चुकांमुळे या चांगल्या गोष्टींचा म्हणावा तसा प्रभावच पडत नाही. थोडक्यात पुस्तकातून आपल्या मनात 'भरलेली' शाळा पडद्यावर मात्र भरतच नाही !!!

टीप : सदर परीक्षण 'सकाळ' च्या दिनांक २१ नोव्हेंबरच्या कोल्हापूर पुरवणीत छापून आलं होतं.

Tuesday, August 21, 2012

हुकूमशाहीची ला(थ)ट !!.... द वेव्ह..

एक शिक्षक. अतिशय हुशार, हरहुन्नरी, विद्यार्थीप्रिय... हुकुमशाही या विषयावर मुलांना आठवड्याभराचं प्रोजेक्ट करायला देतो. तो स्वतःही त्यात पूर्णपणे सहभागी होणार असतो. हुकुमशाही चांगली की वाईट? फायदे काय अशा चर्चेने सुरुवात होते. दोन्ही बाजूची मतं येतात. हळूहळू फायदे जास्त जाणवायला लागतात. एकता, शक्ती, अभिमान, शिस्त, संघटनेची ताकद, सगळे समान पातळीवर, उच्चनीच भेदभावाला नसलेला थारा अशी अनेक गुणवैशिष्ठ्य निघतात. विद्यार्थ्यांन आकर्षण वाटायला लागतं, हुकुमशाही आपलीशी वाटायला लागते. रोजच्या तासाला हे हुकुमशाहीचे पुरस्कर्ते एकेक पाऊल पुढे टाकायला लागतात. एकच गणवेश, उभं राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, शिक्षकांना बोलावण्याची पद्धत, संघटनेचं नाव, लोगो, एकमेकांना अभिवादन करायची पद्धत सगळं सगळं ठरून जातं.



एकीकडे या सगळ्याला एक सुक्ष्मसा विरोधही व्हायला लागतो. "इफ यु आर नॉट विथ अस, यु आर विथ देम" हा हुकुमशाहीचा ठरलेला नियम वापरून विरोधकांना अलग पाडलं जातं, अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत मजल जाते. हळूहळू त्या वर्गाबाहेरही या ग्रुपचं नाव पसरतं. शेजारच्या वर्गातली काही मुलं या वर्गात प्रवेश घेतात, अनेक मुलं धडपडत असतात. बघताबघता ग्रुपचं नाव हायस्कूलच्या बाहेर पसरतं, ग्रुपचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवली जाते. वागण्याला ताळतंत्र राहत नाही, मुलं हाताबाहेर जातात... आणि अचानक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी........ !!!!!

म्हटलं तर प्रतिकात्मक म्हटलं तर थेट पद्धतीने हुकुमशाहीवर भाष्य करणारा 'द वेव्ह' हा जर्मन चित्रपट. हिटलरच्या हुकुमशाहीचा काळा भूतकाळ सदैव पाठीवर बाळगणाऱ्या जर्मनीतल्या एका शाळेतलं वातावरण दाखवल्याने अधिकच वास्तव वाटू शकणारा. 'द वेव्ह' या हुकुमशाही ग्रुपची निर्मिती होत असतानाचे जे सुरुवातीचे प्रसंग आहेत ते हुकुमशाहीचा जन्म कसा होतो (होत असावा) यावर अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाष्य करतात. ग्रुपचं नाव ठरवताना द बेस, द पॅक्ट, द राईझन अशी ग्रुपचं आणि पर्यायाने हुकूमशाहीचं उदात्तीकरण करणारी नावं सुचवली जातात तो प्रसंग, किंवा ग्रुपचा गणवेश न पाळणाऱ्याला एकटं पाडण्याचा प्रसंग, अभिवादन करायला नकार दिल्यावर मिळणारी वागणूक दाखवणारा प्रसंग असे अनेक छोटे छोटे प्रसंग हुकूमशाही मानसिकता आणि तिच्या परिणामांवर खणखणीत प्रहार करतात. विचार करायला प्रवृत्त करतात.

सर्वात कहर म्हणजे हे हुकुमशाहीचे प्रयोग आणि त्याचे परिणाम डोळ्यासमोर दिसत असतानाही शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून त्याला आडकाठी किंवा विरोध होण्याऐवजी त्यांच्या दिखाऊ फायद्यांकडे बघून उलट त्या शिक्षकाचं कौतुकच केलं जातं. हुकुमशाहीचा वणवा एकदा पसरला की त्यामुळे होणाऱ्या तात्पुरत्या फायद्यांमुळे तिच्या दुष्परिणामांकडे थेट डोळेझाक करण्याच्या उच्चपदस्थियांच्या प्रवृत्तीकडे निर्देश करणारा अप्रतिम प्रसंग.. पण सर्वात बोलका आणि परिणामकारक प्रसंग म्हणजे चित्रपटाचा अखेरचा प्रसंग. त्यातल्या घडामोडी, त्या शिक्षकाचं भाषण, कबुलीजबाब, विचार हे सगळं सगळं फार अप्रतिमरीत्या दाखवलेलं आहे. सुरुवातीला खेळ म्हणून सुरु केलेल्या या प्रकारात अजाणतेपणी आपण स्वतःही कसे गुंतत गेलो हे तो शिक्षक सांगतो, मुलांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो हे सगळेच प्रसंग दिग्दर्शक डेनिस गान्सेलने अत्यंत परिणामकारकरीत्या उभे केले आहेत.

थोडक्यात लोकशाहीचा निषेध करणाऱ्या आणि हुकूमशाहीचे गोडवे गाणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून पहावी अशी ही हुकुमशाहीची ला(थ)ट काहीही झालं तरी न चुकवण्यासारखी आहे. आवर्जून पहाच.. !!

Sunday, August 12, 2012

टाईमक्राईम्स : (कुठल्याही मार्गाने) अस्तित्व टिकवण्याची धडपड !!


हा टाईम-मशीनचा चित्रपट आहे पण टिपिकल साय-फाय नाही. यात स्पेशल इफेक्ट्स नाहीत, अंतराळयानं नाहीत, उघडझाप करणारे दिवे असलेलं भव्यदिव्य टाईम-मशीन नाही. पात्रंही मोजून चार (किंवा पाच किंवा सहा). किंबहुना टाईममशीनच्या चमकदार करामती दाखवणं, चमत्कार दाखवून प्रेक्षकांचे डोळे दिपवणं हा उद्देशच नाही मुळी. माणसाच्या अस्तित्वाची धडपड दाखवणे हा खरा उद्देश. त्या ही पुढे जाऊन म्हणायचं तर काही क्षणांच्या अंतराने एका सामान्य माणसाचं रुपांतर किती अमानवी पशूत होऊ शकतं, तो किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे दाखवणं. पण कदाचित त्याक्षणी तरी आपल्याला तो करत असतो ते योग्यच वाटतं. कदाचित योग्य असेलही. कारण ती त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. अर्थात हे योग्य आहे की अयोग्य हे थेटपणे मांडणं दिग्दर्शक टाळतो. ते तो प्रेक्षकांवर सोपवतो.



चित्रपटाची कथा अतिशय छोटीशी आहे. पण आहे तेवढीच कथा वेगवेगळया कोनातून मांडणं, एका क्षणी योग्य वाटणारी घटना दुसऱ्याच क्षणी भयंकर वाटायला लावणं ही खरी दिग्दर्शकीय करामत आहे आणि त्यात दिग्दर्शक नाको विगालोंडो प्रचंड यशस्वी ठरतो. एका माणसाला त्याच्या घरासमोर काही अंतरावर काही संशयास्पद दिसतं म्हणून तो तिकडे जायला लागतो, तिकडे पोचून आजुबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करत असतानाच त्याच्यावर हल्ला होतो. हल्ला कोण करतं कळत नाही पण तो माणूस स्वतःचा जीव वाचवून तिकडून पळून जातो. शेजारच्या घरातला एक माणूस त्याला लपायला मदत करतो. तो त्याला एका मोठ्या कंटेनरमध्ये लपवतो. काही वेळाने कंटेनर उघडतो आणि एकेक घटना उलगडत जातात. त्याच्यासमोरचं जग बदललेलं असतं (जे त्याला ताबडतोब कळत नाही). हळूहळू गुंतागुंत उलगडत जाते. किंबहुना उलगडते आहे असं वाटायला लागतं. पण प्रत्यक्षात गुंतागुंत वाढत चाललेली असते.

एकाच व्यक्तीची एकापेक्षा अधिक रूपं (की व्यक्तिमत्वं), त्या प्रत्येकाचं एकमेकांपासून जीव वाचवत पळणं, एका व्यक्तीला काय घडतंय याची काही कल्पना नसणं, दुसऱ्याला पुसटशी असणं, आणि सगळं ठाऊक असल्याने परिस्थिती तिसऱ्याच्या पूर्णतः ताब्यात असणं हे सगळं दिग्दर्शकाने जबरदस्त दाखवलंय. हाती 'माहिती'रूपी शक्ती असल्याने आणि त्यामुळे इतरांना आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडणं किती सहज शक्य असतं हे आणि एखादी शक्ती चुकीच्या किंवा बेजवाबदार हाती पडल्यास कसा विनाश होऊ शकतो, किती जीव धोक्यात येऊ शकतात किंवा प्रत्यक्ष जाऊ शकतात हे दोन महत्वाचे मुद्दे तर मांडले आहेतच पण 'बळी तो कान पिळी' या नात्याने ताकदवान व्यक्ती (किंवा देश) आपलं अस्तित्व जपण्यासाठी इतर निष्पाप जीव (प्रसंगी आपल्या जवळचे) कसे बिनदिक्कतपणे डावावर लावू शकते ही स्वार्थी प्रवृत्तीही अधोरेखित केली आहे.

वर म्हंटल्याप्रमाणे टाईममशीन हे फक्त नावापुरतं आहे मूळ उद्देश माणसाची प्रसंगागणिक बदलणारी मानसिकता दाखवणं आणि खरं-खोटं, चूक-बरोबर, योग्य-अयोग्य यातल्या सीमारेषा किती पुसट असू शकतात हे मांडणं हाच या चित्रपटाचा प्रमुख उद्देश आहे. थोडक्यात काळावर स्वामित्व गाजवणारं टाईम-मशीन हाती येवो की इतर कुठलं सगळी सुखं पुरवणारं मशीन येवो, ते माणसाच्या मन नावाच्या मशीनपुढे सामर्थ्यहीनच !!

# नुकताच या अस्तित्वाच्या धडपडीविषयी आणि अमर्याद शक्ती हाती आल्यावर त्याचा दुरुपयोग करण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करणारा 'मून' ही नुकताच बघितला. त्याविषयीही लवकरच लिहीन.

Tuesday, August 7, 2012

शब्देविण संवादु : ल' सामुराई

अघळपघळ, बटबटीत, चपखल, शार्प अशा अनेक प्रकारच्या संवादांनी नटलेले चित्रपट आपण नेहमी बघतो. किंबहुना संवाद हा चित्रपटाच्या यशस्वितेसाठीचा अविभाज्य घटक मानला जातो. परंतु फ्रेंच दिग्दर्शक जॉं पेर मेल्विलला हे तितकसं मान्य नसावं. किंवा निदान त्याच्या ' ल' सामुराई ' या चित्रपटापुरतं तरी नक्कीच. म्हणजे हा काही मुकपट आहे असं नव्हे. संवाद आहेतच. पण अगदी अगदी तोलून-मोजून-मापून वापरल्यासारखे.आणि तेही जिथे अगदी अगदी अत्यावश्यक आहेत तेवढ्याच प्रसंगांत आणि तेही अगदी कमीत कमी शब्दांत संपणारे (अपवाद एक-दोन प्रसंग).

ही कहाणी आहे एका अतिशय चलाख, चतुर अशा काँन्ट्रॅक्ट किलरची. काम (गुन्हा) करण्याची त्याची स्वतःची अशी एक ठरलेली, आखून घेतलेली, बिनचुक अशी प्रक्रिया आहे. पाठलाग, हत्यार, खून कसा आणि कुठे करायचा, गुन्ह्यानंतर वाहनाचा पुरावा नष्ट कुठे करायचा वगैरे सगळ्याची त्याची एक ठरलेली पद्धत आहे. पण एवढं सगळं नीटनेटकं प्लानिंग असूनही एका प्रसंगात काहीतरी बिनसतं आणि पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागतो. असो. तर कथेचा जीव त्यामानाने अगदीच छोटा आहे. यात कथेला विशेष महत्व नाहीये की वर म्हटल्याप्रमाणे संवादांना. सगळा भर आहे तो फक्त आणि फक्त सादरीकरणावर. त्यापुढे कथा, पटकथा, संवाद, संगीत सगळं दुय्यम आहे.

अगदी छोट्यातल्या छोट्या हालचालीला, अगदी सामान्य घटनेला, प्रतिक्रियेला कॅमेरा टिपत राहतो आणि आपल्यापुढे मांडत राहतो. आणि त्या फ्रेमचा काही क्षणांनी आपल्याला लागणारा अर्थ पाहून आपण दिग्दर्शकाला आणि कॅमेरामनच्या कौशल्याला मनोमन सलाम करतो. अगदी महत्वाच्या प्रसंगांमध्ये घराचा पडदा, पिंजऱ्यातला पक्षी, त्याची हालचाल, आवाजातला बदल इत्यादी अगदी छोट्या छोट्या आणि बिनमहत्वाच्या गोष्टींचा अत्यंत कौशल्याने वापर केला आहे. तसंच पाठलाग, घराची झडती, नायकाला बंदी बनवणे, ओळख परेड असे अनेक शब्दबंबाळ होऊ शकणारे किंबहुना डायलॉगबाजीसाठी आदर्श म्हणून बघितले जाणारे प्रसंग या चित्रपटात कमीतकमी किंवा जवळपास शून्य शब्दांत चितारलेले आहेत. पण तरीही त्याची परिणामकारकता कुठेही कमी न होत नाही. उलट एकही संवाद न घडता अशा अनेक महत्वाच्या घटना एका मागोमाग एक घडत राहतात, चित्रपट वेगाने पुढे सरकत राहतो त्यामुळे उलट ही बिनसंवादांची पद्धत अधिकच परिणामकारक वाटते !



या सगळ्या शब्देविण संवादु प्रकाराला तशीच तोलामोलाची साथ दिली आहे ती अत्यंत बोलक्या डोळ्यांच्या, देखण्या, डॅशिंग आलाँ दुलो ने. त्याचं शार्प ड्रेसिंग, चॉकलेट हिरोसारखा चेहरा, भेदक नजर आणि एका व्यावसायिक गुन्हेगाराला शोभतील अशा कुशल हालचाली या सगळ्यांमुळे त्याच्या चित्रपटातल्या व्यक्तिमत्त्वाला अजूनच धार येते ! चित्रपटाचा शेवट काहीसा साधा, थोडासा अनपेक्षित आहे. पण तोपर्यंत आपण जो विलक्षण अनुभव घेतलेला असतो त्या अनुभावापुढे इतर सगळ्या गोष्टी दुय्यम असतात !!

असो.. आता थांबतो. कारण इतक्या कमी संवादांच्या चित्रपटाविषयी लिहिताना यापेक्षा अधिक शब्द वापरणं हा त्या चित्रपटाचा अपमान ठरेल ! :)

Saturday, August 4, 2012

भांडवलदारी मानसिकतेची गोष्ट ! : "एस इन द होल"

- गुवाहाटीसारख्या राजधानीच्या शहरात एका तरुणीचा हमरस्त्यावर १०-१५ माणसांकडून विनयभंग केला जातो. हे तब्बल अर्धा तास चालू असतं. त्याचं राजरोसपणे शुटींग केलं जातं. एका क्लिकसरशी त्या घटनेच्या क्लिप्स युट्यूबवर पाहायला मिळतात. आणि चार दिवसांनी कळतं हे सगळं ठरवून केलं गेलेलं होतं. एक वाहिनी, काही पत्रकार आणि हल्ला करणारे यांच्या संगनमताने हे घडवण्यात आलं होतं. पण यासाठी जिला डावावर लावलं गेलं त्या मुलीच्या आयुष्याचा, तिला बसलेल्या प्रचंड मानसिक धक्क्याचा कोणी विचारच केलेला नसतो !!

- राष्ट्रध्वजाची अवहेलना केली म्हणून एका मॉडेलची गाडी भररस्त्यात अडवून तिला मारहाण केली जाते. दोन दिवसांनी कळतं या सगळ्या प्रकारात ती मॉडेल स्वतःच सामील असते !

- अशाच प्रकारे फॅशन शो मध्ये एखाद्या मॉडेलचे कपडे भरस्टेजवर गळून पडतात किंवा एखाद्या तथाकथित नेत्याच्या तोंडाला काळं फासलं जातं.

- काय आणि किती प्रसारित करावं याचा विधिनिषेध न बाळगता सरसकट सगळ्या बातम्या टीव्हीवर दिल्याने २६ नोव्हेंबरच्या ताज हल्ल्याच्या दरम्यान अतिरेक्यांना टीव्ही वाहिन्यांची अप्रत्यक्षरित्या भरपूर मदत होते.

"खरं काय, खोटं काय, त्याचे परिणाम काय होतील, दुष्परिणाम असतील तर किती भयानक किंवा किती खोल होतील, ही बातमी देऊन आपण योग्य करतोय का, ही बातमी देण्याची खरोखरच आवश्यकता आहे का?" हे आणि असे तमाम प्रश्न खरं तर कुठलीही ब्रेकिंग किंवा अगदी नॉनब्रेकिंग न्यूज देतानाही प्रत्येक पत्रकाराने, किंवा वाहिनीच्या/वृत्तपत्राच्या संपादकाने स्वतःला विचारून पाहायला हवेत आणि त्याचं समाधानकारक उत्तर आलं तरच बातमी प्रसारित केली जावी. परंतु फार थोडे पत्रकार/संपादक एवढा खोलात जाऊन विचार करत असावेत. त्यांना बातमी विकली जाण्याशी आणि टीआरपी रेटिंग वाढण्याशी मतलब असतो मग भलेही त्याचे कितीही वाईट परिणाम होवोत किंवा भलेही एखाद्याच्या जीवावर बेतो. आणि हे आजच घडतंय असं नाही. फार पूर्वीपासून चालू आहे. आणि हे सगळं अतिशय तपशीलवार आणि अत्यंत चपखल पद्धतीने मांडतो तो ग्रेट बिली वाईल्डरचा 'एस इन द होल' हा चित्रपट !

न्यूयॉर्क, शिकागो सारख्या मोठमोठ्या शहरांत पत्रकार म्हणून काम केलेला परंतु निष्काळजी किंवा बेफिकिरीमुळे तिथून काढून टाकण्यात आलेला आणि त्यापायी अक्षरशः रस्त्यावर आलेला धूर्त चक टेटम (कर्क् डग्लस) फिरत फिरत न्यूमेक्सिकोतल्या आल्ब्कर्की शहरातल्या एका छोट्याशा स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयात येऊन थडकतो. तिथेही नोकरी मागताना नम्रपणाचा लवलेशही वागण्यात न येऊ देता आपण या छोट्याशा पेपरात स्वतःहून नोकरी करायला तयार झाल्याने त्या वृत्तपत्रावर एका प्रकारे किती थोर उपकार करत आहोत असाच आव त्याच्या वागण्यात असतो. तरीही तिथला संपादक टेटमच्या वागण्याबोलण्यातल्या बिनधास्तपणामुळे त्याला नोकरी देतो. सनसनीखेज, ब्रेकिंग न्यूजच्या शोधात असलेल्या आणि त्याद्वारे आपलं करिअर मार्गी लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या चक ला आल्बकर्की सारख्या छोट्या शहरात अर्थातच विशेष काही मिळत नाही. वर्षभर असं अळणी जीवन जगल्यावर एक दिवस चित्र पालटतं. एक छोटीशी स्थानिक स्पर्धा कव्हर करायला निघालेले टेटम आणि त्याचा सहकारी फॅन पेट्रोल भरण्यासाठी म्हणून एस्कडेरो नावाच्या एका खेड्यात थांबतात. तिथे जवळच ४०० वर्षं जुन्या अमेरिकन-इंडियन्सच्या गुहा असतात. थोड्या चौकशीनंतर त्यांना कळतं की त्या गुहांमध्ये त्या पेट्रोलपंपाचा मालक लिओ अडकलेला असतो. टेटमला यात सनसनीखेज बातमीचा वास येतो आणि तो स्थानिक पोलिसाशी भांडून त्या गुहेत उतरायला सज्ज होतो. गुहेत अडकलेल्या लिओपर्यंत तो पोचतो, त्याला धीर देतो आणि त्यानंतर लगेच त्याचे फोटोही काढतो. फोटो आणि बातमी तो आपल्या वृत्तपत्राला पाठवतो. एव्हाना त्याच्या डोक्यात एक कल्पना आकाराला यायला लागलेली असते. तो तिथल्या भ्रष्ट शेरीफशी बोलणी करून निवडणुकीत त्याला पुन्हा निवडून येता येईल एवढी ताकद या बातमीत आहे हे त्याच्या डोक्यात पक्कं ठसवतो आणि अर्थात त्याबदल्यात अन्य कुठल्याही वृत्तपत्राच्या पत्रकाराला त्या परिसरात प्रवेश करायला बंदी घालण्याची मागणी करतो. दरम्यान लिओला तपासायला आलेल्या डॉक्टरांकडून टेटमला हे कळतं की औषधं आणि इंजेक्शनच्या बळावर लिओ निदान एक आठवडा तरी नक्की राहू शकेल. त्याप्रमाणे टेटम त्याचा प्लान अजून विस्तारतो.

स्थानिक कंत्राटदाराच्या मते गुहेत शिरून, तिथले खचलेले दगड, माती वगैरे बाजूला करून १६ तासात अडकलेल्या माणसाला बाहेर काढणं शक्य असतं. अधिक प्रयत्न केले तर कदाचित १२ तासातही. परंतु ही बातमीजेवढी जास्त ताणली जाईल तेवढं संधीसाधू टेटम आणि भ्रष्ट शेरीफ या दोघांच्याही दृष्टीने फायद्याचं असतं. त्यामुळे शेरीफला हाताशी धरून कंत्राटदाराला एक वेळखाऊ उपाय वापरायला भाग पाडायचं ठरतं. तो उपाय म्हणजे टेकडीला वरून मोठं छिद्र पाडून त्यातून लिओपर्यंत पोचायचं. आपल्या सनसनीखेज बातमीच्या हव्यासापायी आणि करिअर घडवण्यासाठी आपण १२ ते १६ तासांत बाहेर काढता शक्य असलेल्या एका निष्पाप जीवाला आठवडाभर जमिनीखाली, त्या दगडामातीत, यातनांमध्ये अडकवून ठेवतोय आणि हे कदाचित त्याच्या प्राणावरही बेतू शकेल याचा विधिनिषेध ना टेटम बाळगतो ना शेरीफ. स्वतःच्या फायद्यासाठी एक जीव डावावर लावला जातो. त्या सततच्या घाव घालण्याच्या आवाजाने लिओला जीव नकोसा होतं. डोकं फुटायची पाळी येते. पण तरीही टेटम त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो आणि उलट त्याचा मित्र असल्याचा आव आणत राहतो.

बघता बघता ती ब्रेकिंग न्यूज प्रमाणाबाहेर मोठी होते. टेटम रातोरात स्टार बनतो. आता बातमीचे सगळे तपशील फक्त आणि फक्त टेटमकडे असतात आणि त्याला शेरीफची पूर्ण साथ असते. शेरीफचे फोटो स्थानिक पेपरात प्रसिद्ध करून तो या सुटकेच्या प्रयासात कशी महत्वाची मदत करत आहे हे तपशीलवारपणे लिहून शेरीफची प्रतिमा उजळ करत राहतो. एकीकडे लिओचे वडील त्याला सर्वतोपरी मदत करतात. त्याला चांगल्या रूममध्ये हलवतात, त्याच्या आणि फॅनच्या जेवण्याखाण्याची, राहण्याची सोय करतात.

दरम्यान त्या परिसराला एखाद्या जत्रेचं स्वरूप आलेलं असतं. जिथे एके काळी कुत्रंही फिरकत नसतं अशा ठिकाणी शकडो गाड्या, हजारो लोक, पाळणे, मेरी गोराउंड, पॉपकॉर्न, फुगे, आईस्क्रीम, हॉटडॉग आणि इतर खाद्यपदार्थ यांची नुसती रेलचेल उडते. लिओच्या नावाने गाणी लिहिली जातात, मोठमोठ्या आवाजात गायली जातात आणि त्या गाण्याच्या कॉपीज विकल्याही जातात !!!!!!!!

टेकडीच्या प्रवेशद्वाराशी असलेला दिवसागणिक बदलत जाणाऱ्या किंमतीचा बोर्ड. अधिकाधिक भावनाशुन्यतेच्या आणि संवेदनाहीनतेच्या दिशेने होणारा प्रवास !!


विकणारा चतुर असला की वस्तू विकली जातेच पण अर्थात त्यामुळे यात सर्वस्वी दोष केवळ विक्रेत्याचा आहे असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. कारण केवळ विक्रेताच नव्हे तर (बातमी) आंधळेपणे विकत घेणाराही (म्हणजे आपण सगळेच) तेवढाच दोषी असतो.

ज्या टेकडीतल्या गुहेमध्ये कित्येक तास लिओ अडकलेला असतो त्याच टेकडीच्या माथ्यावर शेरीफला निवडणुकीत मत देण्याविषयीची जाहिरातबाजी केली जाते. अधिकाधिक भावनाशुन्यतेच्या आणि संवेदनाहीनतेच्या दिशेने होणारा प्रवास. प्रत्येक पाउल विनाशाच्या दिशेने नेणारं. त्याची टेटमला तूर्तास कल्पना नसते इतकंच. अर्थात कल्पना नसली तरी आपण जे करतोय ते खचितच योग्य नव्हे हे त्याला नक्कीच माहीत असतं. परंतु स्वतःच्या करिअर, पैसा, प्रसिद्धी, जुने हिशोब चुकते करणे इत्यादी सगळ्यांच्या पुढे सदसद्विवेकबुद्धी अर्थातच गहाण ठेवली जाते !

एकदा सगळ्या गोष्टी मुठीत आल्यानंतर टेटम स्थानिक वृत्तपत्रातली नोकरी सोडतो. कारण त्याला त्याच्याकडची बातमी शिकागो/न्युयॉर्कमधल्या मोठ्या वृत्तपत्रांना विकायची असते, जुने हिशेब चुकते करायचे असतात, न्युयॉर्कच्या वृत्तपत्रातली जुनी नोकरी परत मिळवायची असते. अजाणतेपणीही तो एवढा खाली घसरत जातो, इतका खाली उतरतो की एका क्षणी होऊ नये तेच होतं !

चित्रपटातल्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी म्हणजे कर्क् डग्लसचा अप्रतिम अभिनय आणि संवादफेक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत धारदार संवाद. काही उदाहरणं देतो.

- Bad news sells best because good news is no news !

- Human Interest !!!You pick up the paper, you read about 84 men or 284 or a million men like in the Chinese famine.... You read it, but it doesn't stay with you... One man's different. You wanna know all about him. That's human interest.

- You know, in the army I was plenty scared, too. Only in the army, it's different. There, everybody's scared !!

चित्रपट पाहताना आपल्याला अक्षरशः अनंत मानसिक यातना होतात. खोल धुळीत खड्ड्यात अडकलेली एक असहाय व्यक्ती, त्याच्या जीवावर स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी चाललेले अश्लाघ्य प्रकार आणि हे सगळं त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना अंधारात ठेवून !! हे सारं पाहताना अक्षरशः प्रचंड घुसमटायला होतं, त्रास होतो, वेदना होतात !! कदाचित लिओ इतक्याच. पण तरीही हे थांबत नाही. बाजारीकरणाचे अजून नवीन नवीन प्रकार चालूच राहतात. आणि हे इतक्या शिगेला पोचतं की आपल्याला वाटतं की कधी संपणार हे माणुसकीवरचे घाव? कधी थांबणार हे वार ?

या चित्रपटाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा कधीच जुना होणार नाही. यात जी मानवी प्रवृत्ती दाखवली आहे ती पन्नाससाठ वर्षांपूर्वी जशी होती तशीच आजही आहे किंबहुना अनेक पटींनी बिघडलीही आहे. थोडक्यात त्यामुळे हा इतका जुना असलेला चित्रपट आजही अगदी आजचाच वाटतो याच्याबद्दल दिग्दर्शक बिली वाईल्डरच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटत राहतं आणि तितकंकच आपल्या घसरत चाललेल्या मनोवृत्तीचं वाईट वाटत राहतं. भविष्यात कधीतरी असा एक दिवस येवो की हा चित्रपट आजचा न वाटता जुना वाटो अशी भाबडी अपेक्षा बाळगत राहणं एवढंच शेवटी आपल्या हाती आहे!