दिनांक : ७ ऑक्टोबर २०२३.
वेळ : सकाळचे ६:००
स्थळ : इस्रायल मधला नोवा संगीत महोत्सव.
१७ ते २७ वयोगटातल्या इस्रायली तरुण तरुणींची झुंबड उडालेली असताना अचानक आकाशात रॉकेट्स दिसायला लागतात, फटाक्यांचे आवाज यायला लागतात. सुरुवातीला संगीत महोत्सवाचाच भाग आहे असा लोकांचा समज होतो. हळूहळू प्रकरण काहीतरी गंभीर आहे हे लक्षात आल्याने संगीत समारोह रद्द झाल्याची घोषणा आयोजकांतर्फे केली जाते. जमलेली गर्दी हळूहळू काढता पाय घ्यायला लागते. परंतु एवढ्या गाड्या अचानक रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प होऊन जाते.पोलिसांना फोन लागत नसतात, लागले तर ते उचलत नसतात. चुकून बोलणं झालं तरी प्रसंगाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही. बरेच जण पळून जाऊन जवळच असलेल्या लष्कराच्या इमारतीत जाऊन लपण्याच्या प्रयत्न करतात. तोवर लक्षात येतं की ती जागा आधीच अतिरेक्यांनी ताब्यात घेतलेली आहे. काही सुदैवी जीव तिथून पळून जातात. अनेक जण झाडामागे, फ्रिजमध्ये, रणगाड्याच्या मागे असं दिसेल तिथे लपून बसतात. अगदी जवळ आलेल्या अतिरेक्यांच्या गप्पा त्यांना ऐकू येत असतात. हमासचे अतिरेकी अक्षरशः खिदळत असतात. "मी दोन उडवले. तू किती ठोकलेस?" च्या चर्चा झडत असतात.
अनेकजण अंत जवळ आला म्हणून आपल्या नातेवाईकांना, पालकांना, पती/पत्नीला प्रियकर/प्रेयसीलला अखेरचा संदेश म्हणून व्हिडीओ रेकॉर्ड करतात, फोटो, सेल्फी काढतात. काही जण वाचतात, असंख्य जण एक तर मृत्युमुखी पडतात किंवा ओलीस धरून नेले जातात. मेलेले सुटले म्हणावं असे दुर्दैवाचे भोग ओलीसांच्या नशिबी येतात. अनन्वित अत्याचार. शारीरिक, मानसिक, लैंगिक छळाची परिसीमा केली जाते. अनेक दिवसांनी, महिन्यांनी त्यातल्या कित्येकांची प्रेतं अतिशय दुरावस्थेत सापडतात.
७ ऑक्टोबरला सकाळी साडे सहाच्या सुमारास चालू झालेला हमासच्या अतिरेक्यांचा हा नंगानाच सुमारे सहा तास अव्याहतपणे चालू असतो. दुर्घटना स्थळी दुपारी १२:३० पर्यंत पोलीस आणि दुपारी २:३० च्या सुमारास लष्कराचं आगमन होतं. तोवर नोवा संगीत महोत्सवातले सुमारे ३६४ जण आणि इस्रायलच्या अन्य भागांतले मिळून एकूण १२०० जण मृत्युमुखी पडलेले असतात तर हजारो लोक जखमी झालेले असतात. (यातून वाचलेल्या अनेकांनी ताण सहन न झाल्याने नंतर आत्महत्या केल्या.)
हा दुर्दैवी हल्ला पचवूनही मागे जिवंत राहिलेल्या काही सुदैवी नागरिकांना पोलीस हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्यांना जे दिसतं त्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. चोवीस तासांत होत्याचं नव्हतं झालेलं असतं. अनेकांनी आपले मित्र, नवरा, बायको, जीवलग गमावलेले असतात. दृष्टी जाईल तिथवर मृतदेहांचा खच पडलेला असतो. जाळलेल्या, अपघात झालेल्या, फुटलेल्या असंख्य गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असतात. गाड्यांमध्ये, गाड्यांच्या खाली, गाड्यांच्या टपावर असे सर्वत्र मृतदेह पडलेले असतात.
आणि हे सगळं सगळं, नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचलेल्या लोकांनी काढलेल्या सेल्फी, व्हिडीओ आणि खुद्द हमासच्या propaganda व्हिडीओ फुटेजच्या आणि त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओजच्या आधारे 'We will dance again' नावाच्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडलं जातं. अर्थात या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा सूड इस्रायलने हमासच्या सुमारे ४०,००० लोकांना यमसदनी पाठवून घेतला. आणि अर्थातच हे युद्ध अजूनही चालू आहे.
मात्र ही डॉक्युमेंटरी सर्वांसाठी नाही. नाजूक हृदयाच्या, रक्तपात सहन न होणाऱ्या प्रेक्षकांनी यापासून चार हात लांब राहणंच उत्तम. इस्लामच्या लेखी काफरांची किंमत काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर मात्र नक्की बघा.
--हेरंब ओक
(टोरंट वर उपलब्ध)
No comments:
Post a Comment