पण खरी गंमत मात्र पुढेच आहे. पहिला एपिसोड संपल्यावर ही कुठली केस आहे हे शोधावं म्हणून गुगल करून बघताना लक्षात आलं की डॉक्युमेंट्रीच्या स्वरूपात प्रेक्षकांच्यासमोर उभी करण्यात आलेली ही कथा कुठल्याही सत्यघटनेवर आधारित नाही. अशी कुठली घटनाच घडलेली नाही. It’s pure fiction. थोडक्यात हे मोक्युमेंट्री सदृश काहीतरी आहे हे लक्षात आल्यावर दिग्दर्शकाच्या, कथेच्या चतुर मांडणीच्या कौशल्यासमोर आपण नतमस्तक होतो.
ट्रेलरमध्ये
दाखवल्याप्रमाणेच ही मालिका अतिशय गडद आहे, काही ठिकाणी बीभत्सही आहे. ठराविक काळानंतर एकेक पात्र कथेत प्रकट होत जातं, प्रेक्षकांना त्याची
अगदी यथास्थित ओळख होईल याची खात्री पटेपर्यंत त्याची कथा दाखवली जाते. पात्राची
ओळख होते ना होते तोवर त्याच पात्राची त्याच घटनेविषयीची एक वेगळीच आवृत्ती (version) समोर येतं आणि
प्रेक्षक चक्रावून जातो. राशोमॉन पद्धतीच्या कथाकथनाच्या मांडणीनुसार प्रत्येक
पात्र एकाच घटनेविषयी निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त होतं आणि ती घटना नक्की कशी घडली आहे, काय झालंय किंवा अगदी
ती घटना घडली तरी आहे का अशा विचारांच्या चक्रात प्रेक्षक अडकून जातो.
एवढा गोंधळ, वेग, थरार, गडदपणा पाहून दिग्दर्शकाच्या नावाची थोडी शोधाशोध केली आणि मालिका एवढी गडद का आहे याचा साक्षात्कार झाला. या मालिकेचा दिग्दर्शक आहे पुष्कर सुनील महाबळ. म्हणजे तोच ज्याने काही वर्षांपूर्वी 'Welcome Home' अशा साध्या, निरुपद्रवी नावाचा पण प्रत्यक्षातला एक अत्यंत भयानक गडद चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'वेलकम होम' हा चित्रपट सत्यकथेवर आधारित होता. 'ब्लॅक व्हाइट ग्रे' सत्यकथेवर आधारित नसला तरी प्रेक्षकांना तो सत्यकथेवर आधारितच आहे असं वाटावं यासाठीच्या प्रयत्नांमध्ये दिग्दर्शक पूर्णतः यशस्वी ठरला आहे.
इतक्या अप्रतिम प्रयत्नांत अर्थात काही काही घटना अतिशय अशक्य, अतार्किक आणि मुर्खासारख्या आहेतच, पण तेवढं चालतंच. कथा पुढे सरकण्याची काहीतरी सतत घडत असावं लागतं आणि प्रसंगी अशा अविश्वसनीय घटनांचा आधार घ्यावा लागतो. अर्थात त्यातही एक वेगळेपणा आहे. हे सगळं नक्की काय चालू आहे, काय घडलं असावं, कसं घडलं असावं यावर प्रकाश टाकणारा एक अगदी छोटासा खुलासा (hint) शेवटच्या काही क्षणांमध्ये केला जातो आणि आपण हादरून जातो. कदाचित ज्या प्रसंगांना आपण अविश्वसनीय, अतार्किक समजून त्यांच्यावर टीका करत होतो ते घडले तरी आहेत का किंवा आपल्याला जसे दाखवले गेले आहेत तसेच घडले आहेत का याबद्दल प्रेक्षकांच्या मनात भलंमोठं प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं उत्तम काम, हा नकळतपणे करण्यात आलेला खुलासा करून जातो.
ही मालिका सत्यकथेवर आधारित नाही असा निर्मात्यांचा कितीही दावा असला तरी रोजच्या बातम्यांमध्ये सामोरे येणारे हल्ले, हत्या, विश्वासघात, अयशस्वी प्रेमप्रकरणं आणि भ्रष्ट पोलीस पाहता ते खरं वाटत नाही. कथेच्या मांडणीत दिग्दर्शक ज्या प्रकारे आपल्याला वेळोवेळी फसवतो त्याच पद्धतीने ही सत्यघटना नाही असं सांगून, प्रत्यक्षात मात्र लपवण्यात आलेल्या एखाद्या गडद अशा सत्यघटनेचा दाबला गेलेला आवाज प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा त्याचा प्रयत्न तर नाही ना असं हमखास वाटत राहतं आणि हेच, माझ्या मते, दिग्दर्शक पुष्कर महाबळ आणि 'ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे' मालिकेचं सर्वात मोठं यश आहे!
(SonyLIV वर उपलब्ध)
--हेरंब ओक
चांगली ओळख, बघायला जमतंय का बघू..
ReplyDelete