Wednesday, October 9, 2024

सौदी, सीरिया, मालदिव्ज आणि केरळ

मध्यंतरी 'गोट लाईफ (The Goat Life / Aadujeevitham)' हा मल्याळी चित्रपट बघण्याचा योग आला. चित्रपटाबद्दल भरभरून कौतुक वाचलं होतं. तुलनेने चित्रपट बऱ्यापैकी फ्लॅट वाटला. अर्थात चित्रपट चांगलाच आहे. अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण इत्यादी सगळ्याचा दर्जा उच्च आहे. पण प्रत्येक प्रसंगात पुढे काय होणार आहे याचा अंदाज सहज बांधता येतो. सगळं खूप प्रेडिक्टेबल आहे. अजून एक गोष्ट म्हणजे सतत अल्लाविषयी संवाद, अल्ला परीक्षा घेतोय, तोच सर्वशक्तिमान आहे, तो अति दयाळू आहे यांसारखे संवाद आणि वारंवार दाखवले जाणारे नमाजपठणाचे प्रसंग. या सगळ्या गोष्टी इतक्या सातत्याने दाखवण्यात आल्या आहेत की कित्येकदा हा चित्रपट इस्लामचा गुप्त प्रचार करण्यासाठीच बनवला आहे असं वाटत राहतं. 

चित्रपट 'गोट डेज' नावाच्या पुस्तकावर बेतलेला आहे. बेन्यामिन नावाच्या लेखकाने नजीब नावाच्या एका व्यक्तीच्या सौदीमधल्या भयंकर अनुभवांना शब्दरूप देत या पुस्तकाची निर्मिती केली आहे. हा अत्यंत निर्धन आणि अल्पशिक्षित असलेला नजीब, केरळातल्या एका खेड्यात कष्टाची कामं करून स्वतःचं आणि आपल्या गर्भार पत्नीचं पोट भरत असतो. अचानक सौदी अरेबियात जाण्याची संधी मिळाल्याने तो तिथे जाऊन पोचतो. मात्र नंतर त्याच्यावर अक्षरशः दुर्दैवाचे डोंगर कोसळतात. अन्न-वस्त्र-निवारा या तीनही प्राथमिक गरजा तर पुरवल्या जात नाहीतच पण वरून त्याला अनन्वित शारीरिक आणि मानसिक छळालाही सामोरं जावं लागतं. मूळ पुस्तकात असलेले दोन प्रसंग तर इतके भयानक आहेत की वाचतानाही धक्का बसतो. अर्थात ते चित्रपटात दाखवणं शक्यच नसल्याने ते गाळण्यात आले आहेत.  

चित्रपटात वारंवार येणारे अल्ला, प्रेषित, नमाजाचे उल्लेख पुस्तकात तर पानोपानी समोर येतात. त्यामुळे तर हे इस्लामच्या प्रचाराचं साहित्य असल्याची खात्रीच पटते. अर्थात भारतातला मुस्लिम असूनही किंबहुना कदाचित त्यामुळेच नजीबला सौदीतले मूळ मुसलमान नीच दर्जाचा समजत असतात, त्याचा छळ करत असतात. कारण सौदीतल्या मुसलमानांच्या मते केवळ ते लोकच खरे आणि उच्च दर्जाचे मुसलमान असून प्रेषितांचे वंशज आहेत आणि अन्य कुठलेही आणि विशेषतः आशियातले मुसलमान निम्न स्तराचे मुसलमान आहेत किंवा मुसलमानच नाहीत. इस्लामच्या उम्माह, अर्थात मुस्लिम विश्वबंधुत्वाच्या अर्थात जगातील सर्व मुसलमान हे एकमेकांचे बंधू आहेत या वैश्विक संकल्पनेलाच या चित्रपटात धक्का दिला आहे. अर्थात प्रत्यक्षात ज्या घटना, प्रसंग घडले आहेत तेच त्यांनी पुस्तकात आणि चित्रपटात जिवंत करून दाखवलं असल्याने त्यातून योग्य संदेश घेणं हे व्यक्तिसापेक्ष आहे. 

नायकाला दिली जाणारी अमानुष वागणूक पाहता काही वर्षांपूर्वी वाचलेली मुंबईतून आयसिसमध्ये दाखल झालेल्या चार तरुण मुलांची बातमी आठवली. त्या बातमीनुसार जिहादच्या ध्येयाने भारावून जाऊन सिरीयात पोचलेल्या मुंबईतल्या काही तरुणांना अनेक महिने तिथे अक्षरशः शौचकुपं (संडास) स्वच्छ करण्याचं काम करावं लागलं होतं. तो छळ आणि अपमान सहन न होऊन अखेरीस एक मुलगा तिथून पळून भारतात परत आला. त्याने तिथे त्याला मिळालेल्या आणि एकूणच भारतातल्या लोकांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीचं भयानक वर्णन केलं होतं. अर्थात 'डॉट्स कनेक्ट' करू शकणाऱ्या कुठल्याही सुज्ञ व्यक्तीला या सगळ्या गोष्टींचा अर्थ सहजच कळू शकेल. 

'गोट लाईफ' चित्रपट बघितला असेल तर पुस्तक वाचताना कदाचित फार उत्कंठा वाटणार नाही मात्र चित्रपटात वगळण्यात आलेले काही धक्कादायक प्रसंग, भयानक वर्णनं यांचा अनुभव घ्यायचा असेल वाचायला हरकत नाही. 


गेल्या वर्षी इस्लाम/आयसिसशी संबंधित असलेल्या 'फ्रीलान्सर' नावाच्या सिरीजचा पहिला सिझन बघितला होता. ट्रेलर बघताना फ्रीलान्सिंग हिटमॅन/बॉडीगार्डच्या भूमिकेत मोहित रैना अतिशय चपखलपणे शोभत होता. मुंबईतलं एक संपूर्ण कुटुंब आयसीसच्या जिहादमध्ये सामील होण्यासाठी  सिरीयाला जाऊन पोचतं. त्यांच्याबरोबर कुटुंबातल्याच एका नववधूला देखील फसवून सीरियात नेलं जातं. त्या मुलीचा भूतकाळ, तिचे वडील, त्यांचे तिला सोडवण्याचे प्रयत्न, मोहित रैनाचं फ्रीलान्सर म्हणून आगमन, त्याचा काळवंडलेला भूतकाळ अशा अनेक गोष्टींशी प्रेक्षकांची ओळख करून दिली जाते. आणि अचानकच  पहिला सिझन अर्धवट टप्प्यावर संपतो. 

पहिला सिझन बघत असताना ही मालिका A Ticket to Syria: A Story about the ISIS in Maldives या शिरीष थोरात यांच्या कादंबरीवर आधारित आहे हे कळलं. ते मिळवून सुरु करेपर्यंत दुसरा सिझन प्रदर्शित झाला. मात्र दुसरा सिझन इतका हास्यास्पद आहे की तो बघितल्यानंतर पुस्तक वाचण्याचा उत्साह पार मावळूनच गेला. दुसऱ्या सीझनमध्ये सगळं लुटूपुटूचं वाटत राहतं. सिरीजच्या मानाने पुस्तक मात्र अतिशय माहितीपूर्ण झालं आहे हे नक्की.

 

पुस्तकात मालदिव्जचा इतिहास, तिथली राजघराणी, तिथे इस्लामचा झालेला चंचुप्रवेश, राजांची आपापसातली झालेली यादवी युद्धं आणि कारस्थानं अशा सगळ्याची इत्यंभूत माहिती तर मिळतेच परंतु नंतर इस्लामच्या ताब्यात गेलेला देश, आयसिसचं वाढतं वर्चस्व, इराक आणि सीरिया मधली खलिफत आणि तेलाचं राजकारण, आत्मघातकी बॉम्बस्फोट, मालदिव्जमधल्या सामान्य नागरिकांपासून ते पोलिसांपर्यंत सर्वांठायी आढळणारी जिहादी मानसिकता अशा अनेक गोष्टींचे तपशीलवार उल्लेख आहेत. लेखकाने आयसिस, सीरिया, खिलाफत, तिथलं तेलाचं राजकारण इत्यादी सर्व बाबींची अत्यंत अभ्यासपूर्ण वर्णन केली आहेत. 

आपल्याकडे मालिका/चित्रपटात अखेरीस नायकाची 'शेवटची फायटिंग' दाखवणं अनिवार्यच असल्याने अगदी अविश्वसनीय आणि हास्यास्पद वाटत असूनही मालिकेच्या अखेरच्या एपिसोडच्या शेवटी तो विनोदी प्रकार दाखवण्यात आला आहेच. पुस्तकात मात्र नायकावर अखेरीस अचाट आणि वीरतापूर्ण प्रयोग करण्याचं कुठलंही बंधन नसल्याने पुस्तकात नायक स्वतःच्या घरात बसून फोनवरून सगळी सूत्र हलवून हलवतो आणि त्याचे लोक नायिकेची अलगदपणे सुटका करून तिला सुरक्षित स्थळी आणून पोचवतात. 

पुस्तकात मुख्य नायकाला नाव नसून त्याला केवळ 'कॉन्टॅक्ट' एवढ्याच नावाने संबोधलं जातं. त्यामुळे त्याची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी वगैरे दाखवण्याचा संबंधच नसतो आणि आवश्यकताही नसते.  

मालिकेत मात्र मोहित रैनाचा आत्मविश्वासपूर्ण वावर, त्याचं 'कॉन्टॅक्ट' म्हणून एफबीआयच्या स्पेशल एजंट्सना भिडणं, त्याच्या वेगवान हालचाली, महत्वाचे निर्णय वेगाने घेण्याची क्षमता हे सगळं फार विश्वसनीय वाटतं. अर्थात मोहित रैनाच्या 'उरी' चित्रपटातल्या छोट्याशा परंतु अत्यंत प्रभावी भूमिकेतल्या त्याच्या तडाखेबंद प्रतिमेचा त्याला 'कॉन्टॅक्ट' म्हणून पडद्यावर बघताना फायदाच होतो.  

त्यामुळे मोहित रैना साठी फ्रीलान्सर आवर्जून बघायला आणि टीचभर असलेल्या मालदिव्जचा इतिहास, तिथल्या जनतेच्या मनावर असलेला इस्लामचा पगडा, आयसिसचा आणि आंतरराष्ट्रीय तेलाच्या राजकारणाची माहिती (कुबेरी पाल्हाळ लावलेल्या पद्धतीच्या ऐवजी) अगदी थोडक्यात जाणून घ्यायची असेल तर A Ticket to Syria: A Story About the ISIS in Maldives हे पुस्तक आवर्जून वाचायला हवंच.

No comments:

Post a Comment