Thursday, September 24, 2015

विटनेस इट - "मॅड मॅक्स : फ्युरी रोड"

"देअर इज अ हाय ग्राउंड जस्ट बियॉंड 'दॅट थिंग'...."
.
.
"ही मिन्स 'द ट्री' !! "

चित्रपटाच्या साधारण मध्यावर येणारा हा संवाद. इतर वेळी कदाचित ग्लोबल वॉर्मिंगवरचा एखादा चांगला विनोद म्हणून सहज आवडून जाऊ शकेल असा. परंतु या चित्रपटात तो जेव्हा येतो तेव्हा अक्षरशः काटा येतो अंगावर. आणि तेही त्यापूर्वी जवळपास तासभर रखरखीत भूप्रदेश, विस्तीर्ण वाळवंट, शुष्क डोंगर इत्यादी सगळं अगदी जवळून बघितलेलं असूनही. शीर्षकातच सांगितल्याप्रमाणे हा एक रोड मुव्ही आहे. पण आपला नेहमीचा टिपिकल रोड मुव्ही नव्हे. 'फ्युरी' या शब्दाचा खराखुरा अर्थ अगदी जवळून समजावून सांगणारा रोड मुव्ही. एका लांबच लांब खडतर प्रवासाचं दर्शन घडवणारा. हा प्रवास, हा रस्ता अनंत अडचणींनी भरलेला आहे. सतत कोणीतरी कोणाच्या तरी मागावर, पाळतीवर आहे. असंख्य जीवघेणे हल्ले, त्यातून वाचण्यासाठीची धडपड, प्रतिहल्ले, गोंधळ, हलकल्लोळ, आगी, धुळीची वादळं या सगळ्यांनी भरलेला असा हा प्रवास आणि या संपूर्ण प्रवासभर डोळे दिपवणारे आणि वासलेला आ बंदही करण्याची उसंत न देणारे एकापेक्षा एक भयंकर असे अ‍ॅक्शन सीन्स. परंतु या चित्रपटाला निव्वळ अ‍ॅक्शन चित्रपटांच्या गटात टाकणं हा त्याच्यावर मोठा अन्याय ठरेल. पण त्याविषयी नंतर बोलू. 


अत्यंत कुशलतेने आणि जिवंत वाटतील असे चित्रित केलेले मारधाडीचे प्रसंग हा या चित्रपटाचा प्राण आहे. मला वाटतं या पूर्वी कुठल्याही चित्रपटातले मारधाडीचे प्रसंग बघून डोळे दिपलेत किंवा अगदी अविश्वसनीय प्रकार वाटलाय असं फक्त मेट्रीक्सच्या वेळी झालं होतं. (आणि अर्थात
'द रेड रीडीम्प्शन' च्या वेळी. पण 'रेड रीडीम्प्शन' ची जातकुळी अर्थातच वेगळी आहे आणि त्याची  मेट्रीक्स किंवा फ्युरी रोडच्या अ‍ॅक्शन प्रसंगांशी तुलनाच होऊ शकत नाही. रेड त्याच्यातल्या वेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्शनमुळे लक्षात राहिला होता परंतु त्यात ही भव्यदिव्यता नव्हती. असो.) 


चित्रपट नजीकच्या भविष्यात घडतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी उघडीबोडकी झालेली आहे. दूरदूरपर्यंत जिथवर नजर जाईल तिथवर फक्त वाळवंट
, उंचच उंच बोडके डोंगर, तुटलेले कडे असा सगळा रखरखाट पसरलेला आहे. झाडं नाहीत, अतिशय कमी पाणी आणि तेही सहज उपलब्ध नाही अशी परिस्थिती. सगळीकडे यंत्रांचं साम्राज्य. मोठमोठ्या गाड्या, मॉन्स्टर ट्रक्स, ट्रेलर्स, टँकर्स, वेगळ्या प्रकारचे रणगाडे, निरनिराळ्या प्रकारची युद्धाला उपयोगी पडतील अशी वाहनं सगळीकडे दिसतात. पण या यंत्रांमध्ये 'टर्मिनेटर' किंवा 'ट्रान्स्फफॉर्मर्स' प्रमाणे सफाईदारपणा नाही. तर सगळा रखरखीतपणा. सगळं कसं रॉ, अनफिनिश्ड, अनपॉलीश्ड, गंजत चाललेलं, तात्पुरतं अशा स्वरूपाचं. तर या अशा एकापेक्षा एक अजस्र अशा वाहनांनी एकमेकांचा तोंडात बोटं घालायला लावेल अशा रीतीने केलेला पाठलाग, लढाया, हल्ले म्हणजे 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'.

महत्वाचं म्हणजे हे सगळे अ‍ॅक्शन सीन्स, गाड्या, आगी, वाळवंट, मारधाड करणारी माणसं इत्यादी बरंचसं खरंखुरं आहे. पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत १४-१६ तास सतत वाळवंटात चित्रीकरण केलं गेलेलं आहे. या दृष्टीने दिग्दर्शक जॉर्ज मिलरने एका मुलाखतीदरम्यान केलेलं भाष्य पुरेसं बोलकं आहे. 


दिग्दर्शक जॉर्ज मिलर
"
इट वॉज द वर्स्ट पार्ट ऑफ मेकिंग धिस मुव्ही. वुई वेअर डुईंग इट ओल्ड स्कूल. रीअल कार्स, रीअल पीपल, रीअल डेझर्ट अँड १३० डेज   इट वॉज अ बिग स्टंट डे एव्हरी डे. इट वॉज अ मिलिटरी एक्ससाईज."परंतु वर आधीच म्हंटल्याप्रमाणे 'फ्युरी रोड' हा निव्वळ अ‍ॅक्शनपट नव्हे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीकोन आहेत.  आपण अनेक वेळा वाचलंय/ऐकलंय की तिसरं महायुद्ध झालंच तर ते पाण्यासाठी होईल. हे जर का खरं असेल आणि पाण्यावरून खरंच जर युद्धं व्हायला लागली तर ती कशी असतील याचं जिवंत उदाहरण म्हणजे चित्रपटातला पहिला प्रसंग. भांडवलदारी प्रवृत्तीमुळे पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीचंही रॅशनिंग 
आणि तेही एका स्वघोषित देव/अलौकिक-पुरुष/ मसीहा भासवणाऱ्या परंतु प्रत्यक्षातल्या एका हुकुमशाहाच्या मर्जीवर अवलंबून. आणि त्याचा "पाण्याचं व्यसन लागू देऊ नका. ते तुमचा सर्वनाश करेल" असा 'प्रेमळ' हुकुम ऐकल्यावर "पाव मिळत नसेल तर केक खा" म्हणणारी फ्रेंच राणी किंवा "भारतीयांच्या सुसंपन्नतेमुळे जगात अन्नाधान्याचीची टंचाई भासते आहे" असा जावईशोध लावणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 


चित्रपटात जागोजागी इस्लामी दहशतवाद (पण अर्थात चित्रपटात कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही)
, जिहाद, धर्म बुडाल्याच्या खोट्या आरोळ्या, पद्धतशीर वशीकरण, सतत चुकीची माहिती पेरून केलं गेलेलं ब्रेनवॉशिंग, सेक्स स्लेव्स, आपलीच प्रजा वाढवण्यासाठीचे सततचे प्रयत्न, अन्य लोकांकडे केवळ गुलाम किंवा "युनिव्हर्सल ब्लडसोर्स" एवढ्याच संकुचित नजरेने बघणं,  युद्धात मरताना खरोखर लढतानाच मेलाय आणि पाठ दाखवून पळून जाताना नव्हे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जिहादीला मरताना कोणीतरी साक्ष असण्याचं बंधन ("विटनेस मी"),  धर्मयुद्धात (इथे टोळीयुद्धात) मरण पावण्यास एका पायावर तयार असलेले आणि मेल्यावर पवित्र अशा 'वल्हाला' ला (उर्फ जन्नत?) जायला मिळणार या एकाच कल्पनेने पछाडलेले बेभान तरुण अशा अनेकानेक गोष्टी सध्या घडत असलेल्या इसीस आणि तत्सम अतिरेकी गटांची क्षणार्धात आठवण करून देतात. या अतिरेकी गटांना भडकवणारे, मुखवट्यांआड लपून राहून अशा टोळ्यांचं नेतृत्व करणारे टोळीप्रमुखही आहेतच. अर्थात म्हंटलं तर ते जिहादींचं प्रतिनिधित्व करतात किंवा दुसऱ्या अर्थाने अमेरिकेसारख्या भांडवलखोर देशाचं हिडीस रूप सामोरं आणतात. पण समोर घडणाऱ्या वेगवान घटना, प्रचंड वेगाने केले गेलेले जीवघेणे पाठलाग, हल्ले या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काहींना हे सद्यस्थितीचं प्रतीकात्मक दर्शन जाणवणारही नाही. ज्यांना जाणवणार नाही अशांसाठी हा एक सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शनपट आहे आणि उरलेल्यांसाठी एक अप्रतिम सामाजिक अँगल असलेला मारधाडपट आहे. आपल्याला चित्रपटातलं काय आवडलं हे ज्याने त्याने स्वतः ठरवायचं आणि स्वतः "विटनेस" करायचं !

Tuesday, June 23, 2015

लव इज ब्लाईन्ड...... अँड सो इज द रिव्हेंज : "वाईल्ड टेल्स"

सूड !! विविध मानवी स्वभाववैशिष्ठ्यांमधील एक महत्वपूर्ण घटक. सूड घेणाऱ्याच्या दृष्टीकोनातून बघितलं तर अत्यावश्यक भावनाच. किंवा खरं तर एक गरज. आता हे योग्य की अयोग्य हा वादाचा विषय होऊ शकतो परंतु तो आपला आत्ताचा विषय नाही. तर ही सुडाची भावना सुप्तपणे जवळपास प्रत्येकाच्याच मनात नांदत असते. बऱ्याचदा ती मारून टाकली जाते. पण क्वचित काही वेळा ती उफाळून बाहेर येते आणि दोन्ही पक्षांचा सर्वनाश करून टाकते. एवढ्या ताकदीचा विषय जगभरातल्या चित्रकर्त्यांना मोहून न टाकेल तरच नवल. "रिव्हेंज इज अ डिश बेस्ट सर्व्हड कोल्ड" पासून ते "कहके लेंगे" पर्यंतचे अनेकानेक सूडपट हे त्याचंच उदाहरण. तर अशाच सूड भावनेला सर्वस्वीपणे वाहिलेला डेमियन झिफ्रन या अर्जेंटिन लेखक-दिग्दर्शकाचा चित्रपट म्हणजे 'वाईल्ड टेल्स'. मी यापूर्वी काही मोजकेच अर्जेंटिन चित्रपट बघितले आहेत. 'नाईन क्वीन्स', 'द ऑरा', 'क्रॉनिकल ऑफ अॅन एस्केप' हे ठळकपणे आठवणारे. 'नाईन क्वीन्स' वरून आपला 'ब्लफ मास्टर' उचललाय. खरं तर तीन चतुर्थांशच. कारण ब्लफ मास्टरचा शेवट म्हणजे डेव्हिड फिन्चरच्या 'द गेम' ची सहीसही नक्कल. असो. मुद्दा हा की अर्जेंटिन चित्रपट चांगलेच खिळवून ठेवणारे असतात असा माझा पूर्वानुभव आणि त्यामुळे 'वाईल्ड टेल्स' कडून अपेक्षा वाढलेल्या.

'वाईल्ड टेल्स' इतर सुडकथांपेक्षा थोडा वेगळा आहे. हे त्याच्या नावावरून आणि चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या नामनिर्देशावरूनच (क्रेडिट्स) लक्षात येतं. क्रेडिट्समध्ये पार्श्वभूमीला विविध हिंस्र प्राण्यांचे स्टिल्स दाखवलेले आहेत.  त्याचा संदर्भ आपण नंतर पाहू. एकमेकांशी रूढार्थाने काहीही संबंध नसलेल्या परंतु ज्यांचा गाभा फक्त आणि फक्त सूडच आहे अशा सहा वेगवेगळ्या लघुकथांचा संग्रह म्हणजे 'वाईल्ड टेल्स'.  यात सुडाचे विविध प्रकार आपल्या समोर मांडले जातात. सूड, त्यांची प्रक्रिया, गरज, कारणमीमांसा, सूड घेण्याची पध्दत, तीव्रता, प्रतिक्रिया, परिणाम अशा अनेक पैलूंना स्पर्श केला जातो. वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक पार्श्वभूमीच्या लोकांची सुडाची भावना जितकी एकसारख्याच तीव्रतेची असू तितकाच त्यांच्या सूड घेण्याच्या पद्धतीत/प्रक्रियेत किती मोठा फरक असू शकतो हे पाहून थक्क व्हायला होतं. काही सूड अतिशय विचारपूर्वक, पूर्ण नियोजन करून, प्रसंगी अमाप पैसा आणि कैक महिन्यांचा/वर्षांचा कालावधी खर्च करून घेतलेले तर काही अत्यंत उत्स्फूर्त, क्षणार्धात घडणारे, काहीही विचार न करता घेतले गेलेले. काहींमध्ये सुडापायी अनेक लोकांचा जीव एखाद्या छोट्याश्या कृतीने घेतला जातो तर इतर काही प्रसंगी ज्याच्यावर सूड उगवायचा त्याच्याबरोबरच इतरही अनेक निष्पाप जीवांचा नाहक बळी जाईल हे माहीत असूनही त्याचा जराही विचार न करता थंडपणे घेतला जातो. प्रेक्षक म्हणून तटस्थपणे पाहताना काही सूड अतिशय योग्य, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे वाटतात तर काही मात्र टोकाच्या द्वेषातून उद्भवलेले अनाठायी खटाटोप भासतात !!

अजून एक महत्वाचं म्हणजे यापैकी प्रत्येक सूड हा वेगळ्या भावनेतून आलेला.  प्रत्येक सूडाला कुठे ना कुठे थोडाफार मानवी स्वभावातल्या षडरिपुंपैकी एका किंवा अधिक रिपुशी जोडणारा. कथांची संख्या सहा असण्याचं कदाचित ते ही एक कारण असू शकेल !!  यातली प्रत्येक कथा ही अतिशय चटपटीत, कमी वेळात घडणारी आणि कमी वेळात संपणारी आहे.  अनेकदा माणूस असा जनावरासारखा हिंसक वागू शकतो का असा प्रश्न पडतो. परंतु रोजच्या वृत्तपत्रातल्या मोबाईल रिंगटोनवरून खून, पाचशे रुपयांवरून हल्ला, एकतर्फी प्रेमप्रकरणातून हल्ला असल्या शेकडोंनी बातम्या वाचल्या की या वाईल्ड टेल्सच्या सूडकथा विश्वासार्ह वाटून जातात ! अशा जनावरांसारख्या हिंस्र वागणुकीचा संदर्भ म्हणून सुरुवातीला जंगली प्राण्यांचे फोटो पार्श्वभूमीला दाखवले असावेत असं आपल्याला चित्रपट चालू असताना वाटतं आणि अचानक त्यातला विरोधाभासही खाडकन जाणवतो. कारण एक तर जनावरं माणसांएवढी हिंसक होत नाहीत आणि झाली तरी एक तर भूक भागवण्यासाठी किंवा मग स्वसंरक्षणार्थ. त्यांचा हिंसकपणा हा कधीही सुडापोटी आलेला नसतो. कारण त्या बिचाऱ्यांना सूड ही भावना तरी ज्ञात असते का? (अर्थात आपल्या नागराज/नागीणींचे बदले हा त्याला अपवाद :P ) थोडक्यात जगाच्या पाठीवर निव्वळ सुडापोटी हिंसक होणारा मानवप्राणी हा एकमेवच !!!

या सहा कथांमध्ये मला विशेष आवडलेली कथा म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची. रस्त्यावरच्या क्षुल्लक वादावादीमुळे कुठच्याकुठे जाऊन पोचलेली. (सुडाच्या दृष्टीने) सर्वसमावेशक, प्रातिनिधिक आणि तितकीच अविश्वसनीय !! तसंच चौथ्या कथेत रिकार्दो दारीन या अप्रतिम अर्जेंटिन कलाकाराचा परफॉर्मन्स विशेष उल्लेखाण्याजोगा. रिकार्दो दारीन 'नाईन क्वीन्स' आणि 'द ऑरा' मुळे खास लक्षात राहिला होता. तसाच या चौथ्या (पार्किंगच्या) कथेतही एक्स्प्लोझिव्ह एक्स्पर्टच्या छोट्याश्या भूमिकेत तो प्रचंड आवडून जातो आणि दारीनचे अजून चित्रपट शोधून काढून ते बघून टाकण्याची खुणगाठ आपण मनोमन बांधून टाकतो.

यातला प्रत्येक सूड हा जवळपास वेडेपणा आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने तर अगदी अनावश्यक, अनाठायी वगैरे असा आहे. परंतु सूड घेणाऱ्याच्या नजरेतून पाहता तो योग्यच आहे. किंबहुना सुडाने पेटलेल्या व्यक्तीसाठी तो जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. ऑक्सिजनसमान आहे. त्याच्या जगण्याचं एकमेव कारण आहे. थोड्याफार प्रमाणात हेच सगळे नियम प्रेमाला आणि प्रेमवीरांनाही लागू होतात. थोडक्यात काय तर लव इज ब्लाईन्ड...... अँड सो इज द रिव्हेंज !!!

Monday, April 20, 2015

थंड, ढिम्म, निर्जीव, रखरखीत.... कोर्ट !!!!


दुकानदार दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे किंमत वाढवून ठेवून त्यावर ३०-४०-५०% डिस्काउंट देणारे आणि दुसरे म्हणजे वस्तूची किंमत एकदाच सरळ सांगून टाकून भावात कमीजास्त न करणारे. साधारणतः गिऱ्हाईकांचा ओढा स्वाभाविकपणे पहिल्या प्रकारच्या दुकानदारांकडे असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुकानदाराचा माल चांगला असला तरी थेट किंमत सांगून टाकून ती कमी होणार नसल्याने त्याची विक्री कमी होऊ शकते. किंवा बऱ्याचदा लोक दुसऱ्या प्रकारच्या दुकानात जाऊन पहिल्या प्रकारच्या दुकानातल्याप्रमाणे डिस्काऊंटची अपेक्षा ठेवतात आणि अखेरीस अपेक्षाभंग झाल्याने निराश होऊन बाहेर पडतात.  कोर्ट दुसऱ्या प्रकारच्या दुकानदारांसारखा आहे. अर्थात इथे तुलना आहे ती थेट किंमत सांगण्याच्या पद्धतीवर (निराश न होऊन बाहेर पडणं सर्वस्वी गिऱ्हाईकावर अवलंबून आहे). चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट नावातचा सरळ सांगून टाकतो की हा कोर्टाविषयीचा चित्रपट आहे. परंतु त्यात आपण अन्य कोर्टरूम ड्रामांमध्ये पाहिल्याप्रमाणे चकचकीत संवाद, झगमगीत वकील, खणखणीत पार्श्वसंगीत (उर्फ डिस्काउंटस) या सगळ्याचा पूर्णतः अभाव आहे. हा चित्रपट कोर्ट जसं खरं असतं तसं मांडतो. त्याला देवत्व बहाल करत नाही.

चित्रपटात दोन्ही बाजूंचे वकील, आरोपी, न्यायाधीश अशी नेहमीची पात्र आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं पात्र एकच. स्वतः कोर्ट. थंड, ढिम्म, रखरखीत, निर्जीव कोर्ट. त्याला कोणाची तमा नाही. कोर्टाला केंद्रस्थानी ठेवून इतर सगळी पात्र आणि (चिमुटभर जीव असलेली) कथा त्याभोवती फिरते. मुंबईतला एक सफाई कामगार गटार साफ करताना मरण पावतो आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एका ज्येष्ठ बंडखोर लोकशाहीरावर येतो आणि त्याच्यावर खटला भरला जातो अशी एका ओळीत सांगता येईल अशी कथा. पण त्याची मांडणी, सादरीकरणाची पद्धत ही खऱ्या कोर्टाला आणि अर्थात एकूणच न्यायव्यवस्थेला आत्मपरीक्षणास प्रवृत्त करेल अशी आहे ! 'कोर्ट' आपली न्यायव्यवस्था, त्यातले वकील, न्यायाधीश, पोलीस यंत्रणा तसंच या सर्वांची निष्क्रियता, बेफिकिरी आणि वस्तुस्थितीपासून करोडो योजनं दूर आपल्या स्वतःच्याच विश्वात वावरणारी सिस्टम या सगळ्यांवर घणाघाती हल्ले चढवतो. पण महत्वाचं म्हणजे कुठलाही अभिनिवेश न धारण करता. चित्रपटातल्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या फ्रेममधून न्यायव्यवस्थेला उघडं पाडलं जातं परंतु कुठलाही आव न आणता. बघा आम्ही कशी तुम्हाला तुमची जागा दाखवून देतोय असली पोकळ बडबड न करता. कुठलीही चमक धमक न करता. फक्त कोर्टातली सद्य आणि सत्यपरिस्थिती दाखवत !!

यातले वकील "ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन" असं ओरडत नाहीत, न्यायाधीश दणादण हातोडा आपटत "ऑर्डर ऑर्डर" म्हणत नाहीत, डोळ्याला पट्टी बांधून तराजू तोलणारी न्यायदेवता नाही, कोणाला गीता\कुराणाची शपथ घ्यायला लागत नाही, न्यायाधीशांच्या उच्चासानाला लाल पडदे नाहीत, खाडखाड बूट वाजवत येणारे इन्स्पेक्टर्स नाहीत, शेवटच्या क्षणी एखादा रहस्यपूर्ण साक्षीदार उपस्थित होत नाही, सटासट संवादफेक नाही. कर्णकर्कश आणि संवादांनाच गिळून टाकणारं पार्श्वसंगीत नाही, टेबलाखालून किंवा अर्धवट उघड्या दरवाजातून असे चमत्कृतीपूर्ण कॅमेरा अँगल्स नाहीत, उगाचच टायरचे, चिखलाचे, उकळत्या दुधाचे किंवा फोडणी देतानाचे विक्षिप्त क्लोजअप्स नाहीत..... !!! यात आहे ते फक्त कोर्ट. गूढ, खिन्न, काळवंडलेलं, गढूळलेलं, साकळलेलं कोर्ट. शिकार गिळून निवांत पसरलेल्या एखाद्या अजगरासारखं कोर्ट. त्या कोर्टाला आजूबाजूच्या घटनांची, परिस्थितीची ना जाण असते ना भान. आणि जेव्हा जेव्हा हे भान आणून देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ते अजगर डोळे किलकिलं केल्या न केल्यासारखं करून शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या नियम-कायद्यांवर बोट ठेवून पुन्हा निद्रिस्त होऊन जातं. आणि हा निद्रिस्तपणा, ही बेफिकिरी भावना दुखावल्याचे आरोप ठेवून खटला चालवण्यापासून ते अशीलाने घातलेले कपडे कोर्टाच्या नियमांत बसत नाहीत म्हणून त्याच्या, त्याच्या वकिलाच्या वेळेची आणि एकूणच न्यायदानात होणाऱ्या विलंबाची पर्वा न करता अशीलाला परत पाठवण्यापासून ते थेट एखाद्या निरपराध आजारी व्यक्तीला कोर्टाच्या महिनाभर सुट्टीपायी तुरुंगात डांबून ठेवून "पाव मिळत नसेल तर केक खा" असं सांगण्याप्रमाणे "आम्हाला सुट्टी आहे, तुम्ही वरच्या कोर्टात अपील करा" असं निगरगट्टपणे सांगण्यापर्यंत पसरलेली आहे.


या चित्रपटात क्लोजअप्स जवळपास नाहीतच. आहेत ते सगळे लॉंगशॉट्स. फ्रेममध्ये पूर्ण कोर्ट, समोर बसलेले लोक, इतर खटल्यातले आरोपी, पोलीस, प्रवेशद्वार हे सगळं थोड्याफार फरकाने प्रत्येक दृश्यात येतंच. बोलणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा उगाचंच संपूर्ण फ्रेम व्यापत नाही. बाजू मांडणारे वकील पण जवळपास दर वेळी साईडअँगलनेच दिसतात. याची दोन कारणं  असावीत. एक म्हणजे 'कोर्टा' मधून ग्लॅमर हा भाग काढून घेऊन ते जसं आहे तसं नीरस प्रकारे दाखवणं आणि दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे वर म्हंटल्याप्रमाणे यातलं प्रमुख पात्र फक्त आणि फक्त कोर्टच आहे हे अधोरेखित करणं !

ग्लॅमर काढून घेण्याचा अजून एक प्रयत्न म्हणजे वकील, न्यायाधीश सुपरमॅन नाहीत, तुमच्याआमच्यासारखेच मातीचे पाय असलेले सामान्य मानव आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचं थोडंफार कौटुंबिक आयुष्य, अपेक्षा, चर्चा, रोजचं आयुष्य, राहणीमान दाखवलं आहे. थोडक्यात कोर्टाला/न्यायव्यवस्थेला देवत्व बहाल न करता ते सर्वसामान्यांप्रमाणेच असून (किंबहुना) त्यांनी त्यांचं न्यायदानाचं काम पोकळ नियमांआड न लपता विनाविलंब करणं हेच एकमेव लक्ष्य ठेवायला हवं. हे एवढं सगळं 'कोर्ट' सांगतो पण कुठली आवाज न करता. नॉट इन सो मेनी वर्ड्स. रादर नो वर्ड्स !!

दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे
चित्रपटाचा शेवटून दुसरा प्रसंग हा या चित्रपटाला दोन शेवट आहेत असं वाटावं इतका संथ लयीत घडतो आणि हळूहळू संपतो. दोन तास आपण जे बघितलं त्याचा चित्रपटाच्या एकूण प्रवृत्तीला शोभेलशा पद्धतीने कमीत कमी शब्दांत शेवट होतो. त्यानंतर घडणारा अ‍ॅक्च्युअल शेवटचा प्रसंग म्हणजे फलश्रुती म्हणावी असा आहे. निद्रिस्त न्यायव्यवस्था, कायद्यातील पळवाटांचा फायदा घेणारे समाजकंटक आणि नाहक भरडली जाणारी निरपराध सामान्य जनता !! शेवटच्या दीड मिनिटांत संपूर्ण चित्रपटाचा गाभा मांडला जातो आणि धाडकन चित्रपट संपतो. आपल्याला तशाच (नैराश्याने) भारलेल्या अवस्थेत सोडून. ही भारलेली अवस्था अनुभवणं अतिशय आवश्यक आहे. एका अप्रतिम अनुभवासाठी !! मात्र जाताना हे लक्षात ठेवून जायचं की आपण 'दुसऱ्या' दुकानात चाललोय पहिल्या नाही !