Saturday, June 28, 2025

अविश्वसनीय पद्धतीच्या कथाकथनाची निओ न्वार मॉक्युमेंट्री : ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे


लॉकडाऊनकाळापासून OTT वर फारच कचरा जमा व्हायला लागला होता. काहीही दाखवलं तरी 'बिंजवॉच' वाल्यांमुळे ते खपत होतं. पण नियमितपणे चांगले (I know, this is subjective) चित्रपट/सिरीज बघण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांच्या मनात मात्र समोरचा दोन-अडीच तासांचा तमाशा संपल्यानंतर काहीच हाती न लागून वेळ अक्षरशः वाया गेल्याची, फसवले गेल्याची भावना प्रबळ व्हायला लागली. परिणामतः पूर्वी दिवसाला किमान एक चित्रपट किंवा निदान एक एपिसोड तरी बघणारे लोकही चित्रपटांपासून एक तर दूर तरी जायला लागले किंवा चित्रपटांची निवड करताना अत्यंत चोखंदळपण तरी दाखवायला लागले. अशा चोखंदळपणाचा फायदा हा की काहीतरी (त्यातल्या त्यात) चांगलं बघितल्याचं समाधान मिळतं. गेल्या आठवड्यात अशाच एका मालिकेचा डार्क ट्रेलर बघण्यात आला, ट्रीटमेंट थोडी वेगळी वाटली, म्हणून बघायला घेली आणि अक्षरशः हादरलो. 'Black, White & Gray - Love Kills' मध्ये ते Love Kills नसतं तर नाव जरा बरं वाटलं असतं. पण असो.

ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे हा एक अप्रतिम निओ न्वार आहे. सामान्य घरातले तरुण तरुणी परिस्थितीवशात् काय काय कृत्यं करतात, कुठल्या थराला जाऊन पोचतात या साऱ्याचा एक अविश्वसनीय, जीवघेणा प्रवास म्हणजे ही लघुमालिका (miniseries). जर नेहमीच्या पद्धतीने सांगायला गेलं तर अतिशय सरळ साधं कथानक म्हणता येईल असा प्रकार आहे. पण तिथेच दिग्दर्शकाने आपलं कौशल्य दाखवून कथामांडणीचा एक अद्भुत प्रकार दाखवला आहे. ही मालिका काही दृश्यांमध्ये डॉक्युमेंट्री आणि उरलेल्या दृश्यांमध्ये सत्यकथेवर आधारित चित्रपट अशा वेगळ्याच प्रकारात आपल्यासमोर उभी केली जाते. चित्रपटात काम करणारी व्यक्ती आणि समोर बसून बोलणारी व्यक्ती या वेगवेळ्या असण्याचं हे एक मुख्य कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या मांडणीमुळे रंजकता तर वाढतेच पण विश्वासार्हताही निर्माण होते.

पण खरी गंमत मात्र पुढेच आहे. पहिला एपिसोड संपल्यावर ही कुठली केस आहे हे शोधावं म्हणून गुगल करून बघताना लक्षात आलं की डॉक्युमेंट्रीच्या स्वरूपात प्रेक्षकांच्यासमोर उभी करण्यात आलेली ही कथा कुठल्याही सत्यघटनेवर आधारित नाही. अशी कुठली घटनाच घडलेली नाही. It’s pure fiction. थोडक्यात हे मोक्युमेंट्री सदृश काहीतरी आहे हे लक्षात आल्यावर दिग्दर्शकाच्या, कथेच्या चतुर मांडणीच्या कौशल्यासमोर आपण नतमस्तक होतो.

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणेच ही मालिका अतिशय गडद आहे, काही ठिकाणी बीभत्सही आहे. ठराविक काळानंतर एकेक पात्र कथेत प्रकट होत जातं, प्रेक्षकांना त्याची अगदी यथास्थित ओळख होईल याची खात्री पटेपर्यंत त्याची कथा दाखवली जाते. पात्राची ओळख होते ना होते तोवर त्याच पात्राची त्याच घटनेविषयीची एक वेगळीच आवृत्ती (version) समोर येतं आणि प्रेक्षक चक्रावून जातो. राशोमॉन पद्धतीच्या कथाकथनाच्या मांडणीनुसार प्रत्येक पात्र एकाच घटनेविषयी निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त होतं आणि ती घटना नक्की कशी घडली आहे, काय झालंय किंवा अगदी ती घटना घडली तरी आहे का अशा विचारांच्या चक्रात प्रेक्षक अडकून जातो.

एवढा गोंधळ, वेग, थरार, गडदपणा पाहून दिग्दर्शकाच्या नावाची थोडी शोधाशोध केली आणि मालिका एवढी गडद का आहे याचा साक्षात्कार झाला. या मालिकेचा दिग्दर्शक आहे पुष्कर सुनील महाबळ.  म्हणजे तोच ज्याने काही वर्षांपूर्वी 'Welcome Home' अशा साध्या, निरुपद्रवी नावाचा पण प्रत्यक्षातला एक अत्यंत भयानक गडद चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'वेलकम होम' हा चित्रपट सत्यकथेवर आधारित होता. 'ब्लॅक व्हाइट ग्रे' सत्यकथेवर आधारित नसला तरी प्रेक्षकांना तो सत्यकथेवर आधारितच आहे असं वाटावं यासाठीच्या प्रयत्नांमध्ये दिग्दर्शक पूर्णतः यशस्वी ठरला आहे.

इतक्या अप्रतिम प्रयत्नांत अर्थात काही काही घटना अतिशय अशक्य, अतार्किक आणि मुर्खासारख्या आहेतच, पण तेवढं चालतंच. कथा पुढे सरकण्याची काहीतरी सतत घडत असावं लागतं आणि प्रसंगी अशा अविश्वसनीय घटनांचा आधार घ्यावा लागतो. अर्थात त्यातही एक वेगळेपणा आहे. हे सगळं नक्की काय चालू आहे, काय घडलं असावं, कसं घडलं असावं यावर प्रकाश टाकणारा एक अगदी छोटासा खुलासा (hint) शेवटच्या काही क्षणांमध्ये केला जातो आणि आपण हादरून जातो. कदाचित ज्या प्रसंगांना आपण अविश्वसनीय, अतार्किक समजून त्यांच्यावर टीका करत होतो ते घडले तरी आहेत का किंवा आपल्याला जसे दाखवले गेले आहेत तसेच घडले आहेत का याबद्दल प्रेक्षकांच्या मनात भलंमोठं प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं उत्तम काम, हा नकळतपणे करण्यात आलेला खुलासा करून जातो.

ही मालिका सत्यकथेवर आधारित नाही असा निर्मात्यांचा कितीही दावा असला तरी रोजच्या बातम्यांमध्ये सामोरे येणारे हल्ले, हत्या, विश्वासघात, अयशस्वी प्रेमप्रकरणं आणि भ्रष्ट पोलीस पाहता ते खरं वाटत नाही. कथेच्या मांडणीत दिग्दर्शक ज्या प्रकारे आपल्याला वेळोवेळी फसवतो त्याच पद्धतीने ही सत्यघटना नाही असं सांगून, प्रत्यक्षात मात्र लपवण्यात आलेल्या एखाद्या गडद अशा सत्यघटनेचा दाबला गेलेला आवाज प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा त्याचा प्रयत्न तर नाही ना असं हमखास वाटत राहतं आणि हेच, माझ्या मते, दिग्दर्शक पुष्कर महाबळ आणि 'ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे' मालिकेचं सर्वात मोठं यश आहे!

(SonyLIV वर उपलब्ध)

--हेरंब ओक

Tuesday, June 10, 2025

इडली, सॉरी आणि अडीच किलोच्या हाताची दख्खनेने घेतलेली दखल : जाट

मी जाटसारख्या विचित्र नावाचा चित्रपट बघण्याची सुतराम शक्यता नव्हती.  चित्रपटच काय मी तर त्याचा ट्रेलरही बघितला नव्हता. पण एका मित्राच्या आग्रहाखातर त्याने टेलिग्रामवर पाठवलेला जाट एकदाचा डाऊनलोड करून पाहिला..... दोन दिवसांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याच चित्रपटगृहात जाऊन (तिसऱ्यांदा) पाहिला आणि काही दिवसांनी टेलिग्रामवर चांगली प्रिंट आल्याने पुन्हा एकदा (फक्त पूर्वार्धातली फायटिंग) पाहिला.

पहिल्यांदा जेव्हा पाहायला घेतला तेव्हा पहिल्या अर्ध्या तासातच माझा आ वासला गेला होता. मी काही सनीचा डायहार्ड वगैरे फॅन नाही ही पूर्वसूचना आधीच दिलेली बरी. पण घायल, दामिनी या माझ्या आवडत्या सनीपटांच्या खालोखाल मला जाट आवडला. एंट्रीच्या प्रसंगापासूनच सनीने धमाल उडवून दिली आहे. त्याच्या एंट्रीला, मोबाईलवर बघताना फालतू वाटणारं पण चित्रपटगृहात मात्र थक्क करून सोडणारं असं 'जय श्रीराम' हे भगवे ध्वज, भगवे वेष अशा एकूणच भगव्या वातावरणाने भारलेलं अप्रतिम गाणं लागतं आणि वातावरण एकदम चैतन्याने भरून जातं.

शीर्षकावरून तरी चित्रपट भारतातल्या उत्तर भागातल्या एखाद्या खेड्यात किंवा नागरी भागात घडत असेल असं वाटून जातं. मात्र 'जय श्रीराम' गाणं संपल्यावर आपल्याला समोर दक्षिणेतल्या एका अतिशय दुर्गम भागातल्या छोट्याशा खेडेगावाचं दर्शन होतं. तिथे व्हिलन्सच्या उतरंडीमधल्या सर्वात तळातल्या टप्प्यावर असणाऱ्या लोकांची सनीबरोबर हातघाईची हाणामारी होते. पण तत्पूर्वी या अडीच किलोच्या हाताची कमाल उत्तरेने बघितली आहे आणि आता दख्खनेने बघण्याची वेळ आली आहे अशा अर्थाचा एक संवाद टाकून सनी चित्रपटाचा भूगोल स्पष्ट करून टाकतो. आपला उद्देश आणि शैली अधिक सुस्पष्ट करून सांगण्यासाठी "जब मैं मारना शुरु करता हूं तब मैं ना गिनता हूं ना सुनता हूं" असा निर्वाणीचा संदेश द्यायलाही सनी विसरत नाही! थोडक्यात सनीपाजीच्या हाणामारीची पद्धत आणि प्रकृती ही एकंदरपणे दक्षिणेतल्या हाणामारीच्या चित्रपटांशी भलतंच जवळचं नातं सांगणारी आहे हे बॉलिवीड/टॉलिवीडच्या उशिरा (चित्रपटात कुठेही कणभरही वाटत नसला तरी सनी ६७ वर्षांचा आहे) का होईना लक्षात आलं हे नशीबच.

आणि त्यानंतर जवळपास तासभर सुरु होते ती बहुअंगी, बहुरंगी हाणामारीची बहुआयामी मैफल. गाडी, विजेचा खांब, वरवंटा, थाळी, काठी, टेबल, खुर्ची यातली प्रत्येक गोष्ट अस्त्राप्रमाणे वापरली जाऊन क्षणभरातच तिचा चक्काचूर झालेला असतो. यातली हाणामारी किल किंवा जॉन विक किंवा अगदी जेम्समधल्या हाणामारीसारखी सफाईदार नाही किंवा कोरिओग्राफ केलेली नाही. ती सनीसाठी लिहिण्यात आलेली शब्दशः हाणा आणि मारी आहे. दामिनीमधल्या गोविंदच्या ढाई किलोच्या हाताच्या संदर्भाप्रमाणेच गदरमधल्या एका प्रसंगाचाही संवाद न वापरता संदर्भ देण्यात आलेला आहे. गदरमध्ये हॅन्डपंपला अजरामर करणारा सनी इथे जमिनीवर उभ्या असलेल्या उंच खांबाच्या वरच्या टोकाला लावलेला पंखा (एक प्रकारचा सिलिंग फॅन) त्या खांबासकट उखडून टाकून त्यातल्या फॅनला एका व्हिलन्सच्या उतरंडीमध्ये बऱ्यापैकी वरच्या स्थानी असलेल्या एकाला, फॅनच्या वरच्या स्थानी  लटकवतो. जाटचं पोस्टर नीट बघितलंत तर या पंख्याच्या फोटोत तो पंख्याचा गोल सनीच्या छातीवर दाखवून प्रेक्षकांना आयर्न मॅन ची आठवण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

इडली सांडल्याने चिडलेला आणि सुरुवातीला फक्त व्हिलन्सकडून सॉरीऐकण्यासाठी हातपाय चालवणारा सनी हळूहळू डॉट्स कनेक्ट करत उघडपणे न दिसणाऱ्या अनेक गोष्टींची साखळी जुळवून हळूहळू त्या एकूणच प्रकाराच्या तळाशी जायचा निश्चय करतो. आणि महिला पोलिसांच्या साथीने त्यात यशस्वीही होतो. सैयामी खेरने साकारलेली देखणी इन्स्पेक्टर आवर्जून उल्लेख करण्यासारखी!

सुरुवातीच्या एका तासात आवर्जून लक्षात राहणारा आणि खळखळून हसायला लावणारा बॅड मॅन म्हणजे राम सुब्बा रेड्डीचं पात्र साकारणारा अजय घोष. त्याचं अफलातून टायमिंग आणि विनोदी हावभाव सनीच्या चक्रीवादळात काही हास्याचे क्षण फुलवून जातात. सुरुवातीच्या एक दीड तासानंतर चित्रपटाचा वेग किंचित मंदावतो. पण ते आवश्यकही असतं कारण ही सगळी हाणामारी, हत्या, हल्ले चालू आहेत ते नक्की कशासाठी चालू आहेत, या एवढ्याशा टीचभर गावात एवढ्या टोकाला जाऊन, जीवाची बाजी लावून लोक आणि मुख्य व्हिलन का लढतायत याचं पटण्यासारखं काहीतरी स्पष्टीकरण असायला हवं असं वाटतं आणि पुढचा तासभर प्रेक्षकांना अतिशय तपशीलवारपणे ते स्पष्टीकरण एकूण एका बारीकसारीक मुद्द्यांसह पुरवलं जातं.

'खुनी खाना' च्या बिनडोक चित्रपटांप्रमाणे इथे उगाच मनात आलं म्हणून मारलं अशी बिनडोक मारामारी चालू नसून त्या सगळ्यामागे एक महत्वाचं कारण आहे, त्या सगळ्याला एक भयंकर पार्श्वभूमी आहे हे स्पष्ट केलं जातं. आणि त्यामुळे प्रेक्षक त्यातल्या प्रत्येक घटनेशी हळूहळू का होईना कनेक्ट होत जातो.                   

रामूच्या जेम्सच्या चाहत्यांना (कोणी असल्यास.. मी तरी जेम्सचा प्रचंड चाहता आहे आणि जेम्सवरची एक पोस्ट लॉंग पेंडिंग आहेच) जेम्समधली जिममध्ये घडणारी अफलातून मारामारी नक्कीच आठवत असेल. जाटमधेही त्या हाणामारीतल्या एका प्रसंगाच्या अगदी जवळ जाणारा तुरुंगातला एक प्रसंग आहे. त्याचप्रमाणे 'मॅड मॅक्स फ्युरी रोड' मधल्या बाईक्सच्या हल्ल्याच्या प्रसंगाची आठवण यावी असाही एक प्रसंग यात आहे.

मुख्य व्हिलन असलेला राणातुंगा अर्थात रणदीप हुडाच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या रेजिना कॅसॅन्ड्राच्या अभिनयाचा, सौंदर्याचा आणि तिच्या एकूणच वावराचा आवर्जून उल्लेख करायला हवा. शेजारची काकू वाटावी अशी मुलगी प्रसंगी मुख्य व्हिलनला सांभाळते, त्याला काबूत ठेवते तर कित्येकदा त्याच्या बरोबरीने रक्तपात करायलाही मागेपुढेही पाहत नाही.

अत्यंत निष्ठुर आणि क्रूर राणातुंगा रणदीप हुडाने अप्रतिम साकारला आहे. येशू ख्रिस्ताच्या पावित्र्यात उभा असलेला आणि दुसऱ्याच क्षणी निष्ठुरपणे रक्तपात करणारा राणातुंगा काळजात धडकी भरवणारा असा आहे. अर्थात राणातुंगा ख्रिस्ताच्या रूपात उभा असण्याचा प्रसंग काही दिवसांनी ख्रिस्ती संघटनांच्या तक्रारीनंतर चित्रपटगृहात दाखवल्या जाणाऱ्या आवृत्तीतून काढून टाकण्यात आला असला तरी टेलिग्रामवर उपलब्ध असलेल्या आवृत्तीत तो अजूनही आहे. जिज्ञासूंनी शोध घ्यावा.

आवर्जून उल्लेख करावा, म्हणजे अर्थातच सनीपाजींच्या फायटिंगनंतर आवर्जून उल्लेख करावा अशा काही गोष्टीहे वेगळं सांगायला नकोच. ते तसं नसतं तर ही पोस्ट पाडायची गरजच पडली नसती. तर ‘सनीपाजींच्या फायटिंगनंतर आवर्जून उल्लेख करावा अशा काही गोष्टी’ म्हणजे संकलन, संवाद आणि पार्श्वसंगीत. अनेकदा अरेखीय प्रकाराने घडणाऱ्या घटना प्रत्यक्षात बघताना त्यांचा क्रम नक्की कळून त्या मूळ कथेशी एकरूप होण्यासाठी संकलन चांगलं असण्याची अतिशय आवश्यकता होती. ते काम संकलक टीमने अतिशय चोखपणे बजावलं आहे. Action sequences साठी तर एका मोठ्या टीमने काम केलं आहे आणि ते अतिशय प्रभावी झालं आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीच! पार्श्वसंगीतही पडद्यावर घटनांशी प्रेक्षकांना एकरूप व्हायला लावेल इतकं प्रभावी जमलं आहे. अशा प्रकारच्या चित्रपटाला आवश्यक असे तडाखेबाज संवाद आणि राम सुब्बा रेड्डीच्या काही भन्नाट संवादांनी धमाल उडवून दिली आहे.  

आणि अर्थात सर्वात महत्वाचा म्हणजे ६७ वर्षांचा असूनही ६७ वर्षांचाच वाटणारा आणि अनेकदा न वाटणारा सनी. वाटणारा यासाठी की एवढ्या हाणामारीच्या प्रसंगांमध्ये पिळदार शरीर दाखवण्याची संधी असूनही पहिल्या प्रसंगापासून कोपराच्या चार इंच खाली असणारा सनीच्या शर्टाची बाही एक इंचभरही वर सरकलेली नाही. आणि न वाटणारा यासाठी की स्लो मोशनमुळे का होईना त्याच्या चपळ भासणाऱ्या हालचाली आणि अशक्य ताकद, त्याची संवादफेक, हावभाव, प्रेक्षकांना जुन्या सनीशी जोडून घ्यायला लावणारे, स्मरणरंजनात (nostalgia) रमायला लावणारे अनेक संवाद आणि प्रत्यक्ष हाणामारीचे प्रसंग.

मकरंद देशपांडे आणि उपेंद्र लिमये या दोन सशक्त मराठी कलावंतांनी नेहमीप्रमाणे हिंदीत काहीतरी थुकरट भूमिका करताना कणभराचाही विचार का केला नसावा या जाणिवेने हताश व्हायला होतं. मकरंद देशपांडेची भूमिका जरा तरी ठीक आहे मात्र उपेंद्र लिमयेची आधीच हास्यास्पद असलेली भूमिका त्याने चित्रविचित्र हावभाव करत आणि आवाज काढत अक्षरशः अजूनच हास्यास्पद करून ठेवली आहे हे बघून फार वाईट वाटलं. कारण उपेंद्र लिमये हा माझा अतिशय अतिशय आवडता अभिनेता आहे. असो. इलाज नाही.

जॅक रीचरच्या कादंबऱ्यांमध्ये अमेरिकाभर स्वच्छंद भटकंती करणारा, काहीही संबंध नसताना अचानकच एखाद्या खलप्रवृत्तीच्या माणसाशी संबंध आल्याने त्याचा नायनाट करणारा निवृत्त मेजर ली चाईल्डने चितारला आहे. जाटमधला सनी हा अनेक अंगांनी रीचरशी साधर्म्य साधणारा आहे. फिरस्ती करणारा, लोकांच्या मदतीला धावून येणारा आणि हे करत असताना अचानकच एखाद्या राष्ट्रीय सुरक्षा आपत्तीची चाहूल लागल्याने तिथेच राहून सर्वात प्रमुख आणि भयंकर अशा मुख्य खलनायकाचा नायनाट करेपर्यंत त्याच गावात टिच्चून राहणारा आणि काम झाल्यावर हळूच तिथून निघून जाणारा! रीचरचे हे सारे गुणविशेष जाटमध्ये आढळल्याने कदाचित जाट अत्यंत आवडून तो साडे तीनवेळा बघितला गेला असेल.

तुम्हाला सनीपाजी, घायल, जॉन विक, जेम्स, किल, दामिनी, तुफान हाणामारी, रीचर (किंवा अगदी सैयामी किंवा रेजिना) यापैकी काहीही आवडत असल्यास आवर्जून बघायलाच हवा असा जाट. आणि नाही बघितलात तर..... तर मग मात्र "सॉरी" म्हणावंच लागेल!!!

तळटीप : यात सेन्सरबोर्डवाल्यांनी नेहमीप्रमाणे मजामजा केलीच आहे. एका प्रसंगात राणातुंगा तोंडात सिगरेट धरून तलवारीने एका माणसाचं शीर उडवताना दाखवला आहे. मात्र उजव्या टोकाला खाली दिसतं "सिगरेट स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे."

--हेरंब ओक

Tuesday, December 3, 2024

इस्लामी विकृती आणि क्रौर्याचा नंगानाच : We will dance again


दिनांक : ७ ऑक्टोबर २०२३. 

वेळ : सकाळचे ६:०० 

स्थळ : इस्रायल मधला नोवा संगीत महोत्सव.

१७ ते २७ वयोगटातल्या इस्रायली तरुण तरुणींची झुंबड उडालेली असताना अचानक आकाशात रॉकेट्स दिसायला लागतात, फटाक्यांचे आवाज यायला लागतात. सुरुवातीला संगीत महोत्सवाचाच भाग आहे असा लोकांचा समज होतो. हळूहळू प्रकरण काहीतरी गंभीर आहे हे लक्षात आल्याने संगीत समारोह रद्द झाल्याची घोषणा आयोजकांतर्फे केली जाते. जमलेली गर्दी हळूहळू काढता पाय घ्यायला लागते. परंतु एवढ्या गाड्या अचानक रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प होऊन जाते.

हळूहळू गोळ्यांचे आवाज यायला लागतात, लांबवर अतिरेक्यांच्या गाड्या दिसायला लागतात, अल्ला हू अकबर च्या आरोळ्यांनी आसमंत भरून जातो. इस्रायल आणि गाझा मधल्या सीमारेषेचं कुंपण किमान ६० ठिकाणी तोडून हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला केलेला असतो.

पोलिसांना फोन लागत नसतात, लागले तर ते उचलत नसतात. चुकून बोलणं झालं तरी प्रसंगाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही. बरेच जण पळून जाऊन जवळच असलेल्या लष्कराच्या इमारतीत जाऊन लपण्याच्या प्रयत्न करतात. तोवर लक्षात येतं की ती जागा आधीच अतिरेक्यांनी ताब्यात घेतलेली आहे. काही सुदैवी जीव तिथून पळून जातात. अनेक जण झाडामागे, फ्रिजमध्ये, रणगाड्याच्या मागे असं दिसेल तिथे लपून बसतात. अगदी जवळ आलेल्या अतिरेक्यांच्या गप्पा त्यांना ऐकू येत असतात. हमासचे अतिरेकी अक्षरशः खिदळत असतात. "मी दोन उडवले. तू किती ठोकलेस?" च्या चर्चा झडत असतात. 


अनेकजण अंत जवळ आला म्हणून आपल्या नातेवाईकांना, पालकांना, पती/पत्नीला प्रियकर/प्रेयसीलला अखेरचा संदेश म्हणून व्हिडीओ रेकॉर्ड करतात, फोटो, सेल्फी काढतात. काही जण वाचतात, असंख्य जण एक तर मृत्युमुखी पडतात किंवा ओलीस धरून नेले जातात. मेलेले सुटले म्हणावं असे दुर्दैवाचे भोग ओलीसांच्या नशिबी येतात. अनन्वित अत्याचार. शारीरिक, मानसिक, लैंगिक छळाची परिसीमा केली जाते. अनेक दिवसांनी, महिन्यांनी त्यातल्या कित्येकांची प्रेतं अतिशय दुरावस्थेत सापडतात.

७ ऑक्टोबरला सकाळी साडे सहाच्या सुमारास चालू झालेला हमासच्या अतिरेक्यांचा हा नंगानाच सुमारे सहा तास अव्याहतपणे चालू असतो. दुर्घटना स्थळी दुपारी १२:३० पर्यंत पोलीस आणि दुपारी २:३० च्या सुमारास लष्कराचं आगमन होतं. तोवर नोवा संगीत महोत्सवातले सुमारे ३६४ जण आणि इस्रायलच्या अन्य भागांतले मिळून एकूण १२०० जण मृत्युमुखी पडलेले असतात तर हजारो लोक जखमी झालेले असतात. (यातून वाचलेल्या अनेकांनी ताण सहन न झाल्याने नंतर आत्महत्या केल्या.)


हा दुर्दैवी हल्ला पचवूनही मागे जिवंत राहिलेल्या काही सुदैवी नागरिकांना पोलीस हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्यांना जे दिसतं त्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. चोवीस तासांत होत्याचं नव्हतं झालेलं असतं. अनेकांनी आपले मित्र, नवरा, बायको, जीवलग गमावलेले असतात. दृष्टी जाईल तिथवर मृतदेहांचा खच पडलेला असतो. जाळलेल्या, अपघात झालेल्या, फुटलेल्या असंख्य गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असतात. गाड्यांमध्ये, गाड्यांच्या खाली, गाड्यांच्या टपावर असे सर्वत्र मृतदेह पडलेले असतात.

आणि हे सगळं सगळं, नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचलेल्या लोकांनी काढलेल्या सेल्फी, व्हिडीओ आणि खुद्द हमासच्या propaganda व्हिडीओ फुटेजच्या आणि त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओजच्या आधारे 'We will dance again' नावाच्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडलं जातं. अर्थात या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा सूड इस्रायलने हमासच्या सुमारे ४०,००० लोकांना यमसदनी पाठवून घेतला. आणि अर्थातच हे युद्ध अजूनही चालू आहे.


मात्र ही डॉक्युमेंटरी सर्वांसाठी नाही. नाजूक हृदयाच्या, रक्तपात सहन न होणाऱ्या प्रेक्षकांनी यापासून चार हात लांब राहणंच उत्तम. इस्लामच्या लेखी काफरांची किंमत काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर मात्र नक्की बघा.

--हेरंब ओक

(टोरंट वर उपलब्ध)

Thursday, November 28, 2024

आकर्षक स्त्री-शेरलॉक : हाय पोटेन्शियल (High Potential)

नवरा परागंदा झालेला, पदरात तीन मुलं, त्यातलं एक एकदम तान्हं तर सगळ्यात मोठी मुलगी कॉलेजमध्ये जाणारी, आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट, एक तुटकीफुटकी नोकरी जिची खात्री नाही, स्वभावामुळे नोकऱ्या सारख्या जातात, नवीन नाती जुळवताना त्रास होतो, निद्रानाशाची समस्या आहे.....  

अशा वर्णनाची, अशा परिस्थितीतली स्त्री आपल्याकडच्या चित्रपटात किंवा मालिकांमध्ये फारच गरीब, अबला, दुर्बळ वगैरे दाखवली असती. वर दिलेलं वर्णन वाचून तरी नक्कीच असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण ही अमेरिकन मालिका असल्याने प्रत्यक्षात मात्र ही स्त्री आपल्यासमोर अतिशय वेगळ्या स्वरूपात उभी राहते.

नवरा परागंदा झालाय पण त्याचा शोध घेण्याचा मार्ग सापडतोय, तीन मुलं आहेत पण सुदैवाने तिघंही अतिशय समजूतदार, बुद्धिमान, कल्पक आहेत, आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी त्यावरही मार्ग निघतोय, एक नोकरी गेली तरी दुसरी मिळते आहे, नवीन नाती जुळवता येत नसली, निद्रानाशाचा त्रास असला तरी तो चांगल्या कारणासाठी आहे. आणि आपल्यासमोर उभी असलेली स्त्री ही शोषित अबला नसून चाळिशीतली एक अत्यंत आकर्षक (प्रसंगी मादक), अत्यंत बुद्धिमान, देखणी, बडबडी, बिनधास्त, बेधडक कृतीवर विश्वास ठेवणारी अशी धडाकेबाज स्त्री आहे हे पाहून सुरुवातीलाच सुखद धक्का बसतो.


नोकऱ्या टिकत नाहीत ते अतिशय उच्च बुद्ध्यांक (IQ) असल्याने कोणाशी फारसं पटू शकत नसल्या कारणाने, नातेसंबंध टिकत नाहीत तेही साधारण याच कारणामुळे, निद्रानाशाचा त्रास आहे तो एखादी गोष्ट चुकीची दिसली की तिचा मूळापर्यंत जाऊन शोध घेतल्याशिवाय स्वस्थ बसता न येण्याच्या मूलभूत स्वभावामुळे. तर अशी ही स्त्री म्हणजे मॉर्गन गिलरी (केटलीन ओल्सन) जी लॉस अँजलीस पोलीस खात्याच्या कार्यालयातल्या केबिन्स, फर्निचर इत्यादींची साफसफाई करणारी एक अतिसामान्य सफाई कामगार कर्मचारी असते. एका हत्येच्या तपासाच्या कामात ती अपघातानेच जाऊन धडकते आणि आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर त्या प्रकरणातले कच्चे दुवे चुटकीसरशी हेरते. या पहिल्या प्रसंगापासूनच प्रेक्षक मॉर्गनच्या आणि High Potential या मालिकेच्याही प्रेमात पडतो.


शेरलॉक ब्रेनचा नायक, त्याने दुवे जोडणे, धागे जुळवणे, गुंता सोडवणे आणि इतरांना (आणि मुख्यतः प्रेक्षकांना) न दिसलेल्या किंवा दिसूनही लक्षात न आलेल्या तथ्यांच्या आणि दुव्यांच्या आधारे अवघड कोडी चुटकीसरशी सोडवणे हा प्रकार आपण आत्तापर्यंत खुद्द शेरलॉक होम्स, डॉ हाऊस, मॉन्क, मेंटालिस्ट, रीचर पासून ते थेट आपल्या लाडक्या ब्योमकेश बक्षी पर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये बघितला आहे. या मालिकेत मात्र हे सगळे अचाट प्रकार करणारी व्यक्ती एक स्त्री आहे. ती शेरलॉक किंवा डॉ हाऊस सारखी माणूसघाणी नाहीये की रीचरसारखी अफाट ताकदही तिच्याकडे नाहीये. ती सहृदय आहे, सत्याचा शोध घेण्यासाठी कायदा मोडण्याचीही तिची तयारी आहे. आणि याच कारणावरून तिला ज्याच्याबरोबर काम करावं लागत आहे किंवा ज्याला बळजबरीने तिचा पार्टनर बनवण्यात आलं आहे त्या डिटेक्टिव्ह कॅराडेकशी तिचे पहिल्या क्षणापासून खटके उडत असतात. मात्र एकत्र काम करता करता हळूहळू एकमेकांच्या स्वभावांची ओळख झाल्यावर ते एकमेकांचे चांगले मित्रही बनतात.

अर्थात कुठलीही मालिका किंवा चित्रपट कधीच नसतो त्याचप्रमाणे ही मालिकाही परिपूर्ण नाही. यातही अनेक कच्चे दुवे आहेत. काही गुन्हे अगदी चुटकीसरशी सुटल्यासारखे वाटतात, तर काही गोष्टी अविश्वसनीय म्हणाव्या अशाही घडतात. काही पात्रांचं मालिकेतलं नक्की स्थान किंवा त्यांचे संदर्भ कळत नाहीत. परंतु माझ्या मते ते जाणूनबुजून थोडं संदिग्ध ठेवण्यात आलं असावं. कारण एक तर हा पहिलाच सिझन आहे. त्यातही सप्टेंबरमध्ये सुरु झालेल्या सीझनचे आत्तापर्यंत सातच एपिसोड्स प्रसारित झाले असून पुढचे चार एपिसोड्स जानेवारी २०२५ मध्ये प्रसारित होणार आहेत. प्रेक्षकांचा एकूण प्रतिसाद पाहून त्याप्रमाणे मालिकेचा आणि पात्रांचाही पुढचा प्रवास निश्चित होणार असेल.

तरीही या मालिकेची आवर्जून सांगण्यासारखी काही वैशिष्ट्यं म्हणजे मालिकेचा एकूणच अतिशय फ्रेश लूक, केटलीन ओल्सनचा प्रसन्न वावर, चटपटीत संवाद आणि वेळोवेळी दिली गेलेली चुरचुरीत विनोदांची फोडणी. या एवढ्या बाबींमुळे कदाचित ताबडतोब नाही परंतु कालांतराने तरी ही प्रेक्षकांची आवडती मालिका आणि आवडतं स्त्री पात्र होऊ शकेल एवढं High Potential अनुक्रमे या मालिकेत आणि मॉर्गन गिलरीमध्ये नक्कीच आहे.

--हेरंब ओक

तळटीप :

१. मी फारसा रील्स बील्सच्या वाट्याला जाणारा माणूस नसूनही गेल्या आठवड्यात अपघातानेच एक रील समोर आलं आणि तो प्रसंग एवढा आवडला की तडक मालिकेचं नाव शोधून काढून  बघूनही टाकली. हाच तो प्रसंग

२. मालिका hulu किंवा apple tv वर उपलब्ध आहे बहुतेक. माझ्याकडे त्याचं किंवा कुठल्याही OTT चं सभासदत्व नसल्याने नक्की मात्र सांगता येणार नाही.

Wednesday, October 9, 2024

सौदी, सीरिया, मालदिव्ज आणि केरळ

मध्यंतरी 'गोट लाईफ (The Goat Life / Aadujeevitham)' हा मल्याळी चित्रपट बघण्याचा योग आला. चित्रपटाबद्दल भरभरून कौतुक वाचलं होतं. तुलनेने चित्रपट बऱ्यापैकी फ्लॅट वाटला. अर्थात चित्रपट चांगलाच आहे. अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण इत्यादी सगळ्याचा दर्जा उच्च आहे. पण प्रत्येक प्रसंगात पुढे काय होणार आहे याचा अंदाज सहज बांधता येतो. सगळं खूप प्रेडिक्टेबल आहे. अजून एक गोष्ट म्हणजे सतत अल्लाविषयी संवाद, अल्ला परीक्षा घेतोय, तोच सर्वशक्तिमान आहे, तो अति दयाळू आहे यांसारखे संवाद आणि वारंवार दाखवले जाणारे नमाजपठणाचे प्रसंग. या सगळ्या गोष्टी इतक्या सातत्याने दाखवण्यात आल्या आहेत की कित्येकदा हा चित्रपट इस्लामचा गुप्त प्रचार करण्यासाठीच बनवला आहे असं वाटत राहतं. 

चित्रपट 'गोट डेज' नावाच्या पुस्तकावर बेतलेला आहे. बेन्यामिन नावाच्या लेखकाने नजीब नावाच्या एका व्यक्तीच्या सौदीमधल्या भयंकर अनुभवांना शब्दरूप देत या पुस्तकाची निर्मिती केली आहे. हा अत्यंत निर्धन आणि अल्पशिक्षित असलेला नजीब, केरळातल्या एका खेड्यात कष्टाची कामं करून स्वतःचं आणि आपल्या गर्भार पत्नीचं पोट भरत असतो. अचानक सौदी अरेबियात जाण्याची संधी मिळाल्याने तो तिथे जाऊन पोचतो. मात्र नंतर त्याच्यावर अक्षरशः दुर्दैवाचे डोंगर कोसळतात. अन्न-वस्त्र-निवारा या तीनही प्राथमिक गरजा तर पुरवल्या जात नाहीतच पण वरून त्याला अनन्वित शारीरिक आणि मानसिक छळालाही सामोरं जावं लागतं. मूळ पुस्तकात असलेले दोन प्रसंग तर इतके भयानक आहेत की वाचतानाही धक्का बसतो. अर्थात ते चित्रपटात दाखवणं शक्यच नसल्याने ते गाळण्यात आले आहेत.  

चित्रपटात वारंवार येणारे अल्ला, प्रेषित, नमाजाचे उल्लेख पुस्तकात तर पानोपानी समोर येतात. त्यामुळे तर हे इस्लामच्या प्रचाराचं साहित्य असल्याची खात्रीच पटते. अर्थात भारतातला मुस्लिम असूनही किंबहुना कदाचित त्यामुळेच नजीबला सौदीतले मूळ मुसलमान नीच दर्जाचा समजत असतात, त्याचा छळ करत असतात. कारण सौदीतल्या मुसलमानांच्या मते केवळ ते लोकच खरे आणि उच्च दर्जाचे मुसलमान असून प्रेषितांचे वंशज आहेत आणि अन्य कुठलेही आणि विशेषतः आशियातले मुसलमान निम्न स्तराचे मुसलमान आहेत किंवा मुसलमानच नाहीत. इस्लामच्या उम्माह, अर्थात मुस्लिम विश्वबंधुत्वाच्या अर्थात जगातील सर्व मुसलमान हे एकमेकांचे बंधू आहेत या वैश्विक संकल्पनेलाच या चित्रपटात धक्का दिला आहे. अर्थात प्रत्यक्षात ज्या घटना, प्रसंग घडले आहेत तेच त्यांनी पुस्तकात आणि चित्रपटात जिवंत करून दाखवलं असल्याने त्यातून योग्य संदेश घेणं हे व्यक्तिसापेक्ष आहे. 

नायकाला दिली जाणारी अमानुष वागणूक पाहता काही वर्षांपूर्वी वाचलेली मुंबईतून आयसिसमध्ये दाखल झालेल्या चार तरुण मुलांची बातमी आठवली. त्या बातमीनुसार जिहादच्या ध्येयाने भारावून जाऊन सिरीयात पोचलेल्या मुंबईतल्या काही तरुणांना अनेक महिने तिथे अक्षरशः शौचकुपं (संडास) स्वच्छ करण्याचं काम करावं लागलं होतं. तो छळ आणि अपमान सहन न होऊन अखेरीस एक मुलगा तिथून पळून भारतात परत आला. त्याने तिथे त्याला मिळालेल्या आणि एकूणच भारतातल्या लोकांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीचं भयानक वर्णन केलं होतं. अर्थात 'डॉट्स कनेक्ट' करू शकणाऱ्या कुठल्याही सुज्ञ व्यक्तीला या सगळ्या गोष्टींचा अर्थ सहजच कळू शकेल. 

'गोट लाईफ' चित्रपट बघितला असेल तर पुस्तक वाचताना कदाचित फार उत्कंठा वाटणार नाही मात्र चित्रपटात वगळण्यात आलेले काही धक्कादायक प्रसंग, भयानक वर्णनं यांचा अनुभव घ्यायचा असेल वाचायला हरकत नाही. 


गेल्या वर्षी इस्लाम/आयसिसशी संबंधित असलेल्या 'फ्रीलान्सर' नावाच्या सिरीजचा पहिला सिझन बघितला होता. ट्रेलर बघताना फ्रीलान्सिंग हिटमॅन/बॉडीगार्डच्या भूमिकेत मोहित रैना अतिशय चपखलपणे शोभत होता. मुंबईतलं एक संपूर्ण कुटुंब आयसीसच्या जिहादमध्ये सामील होण्यासाठी  सिरीयाला जाऊन पोचतं. त्यांच्याबरोबर कुटुंबातल्याच एका नववधूला देखील फसवून सीरियात नेलं जातं. त्या मुलीचा भूतकाळ, तिचे वडील, त्यांचे तिला सोडवण्याचे प्रयत्न, मोहित रैनाचं फ्रीलान्सर म्हणून आगमन, त्याचा काळवंडलेला भूतकाळ अशा अनेक गोष्टींशी प्रेक्षकांची ओळख करून दिली जाते. आणि अचानकच  पहिला सिझन अर्धवट टप्प्यावर संपतो. 

पहिला सिझन बघत असताना ही मालिका A Ticket to Syria: A Story about the ISIS in Maldives या शिरीष थोरात यांच्या कादंबरीवर आधारित आहे हे कळलं. ते मिळवून सुरु करेपर्यंत दुसरा सिझन प्रदर्शित झाला. मात्र दुसरा सिझन इतका हास्यास्पद आहे की तो बघितल्यानंतर पुस्तक वाचण्याचा उत्साह पार मावळूनच गेला. दुसऱ्या सीझनमध्ये सगळं लुटूपुटूचं वाटत राहतं. सिरीजच्या मानाने पुस्तक मात्र अतिशय माहितीपूर्ण झालं आहे हे नक्की.

 

पुस्तकात मालदिव्जचा इतिहास, तिथली राजघराणी, तिथे इस्लामचा झालेला चंचुप्रवेश, राजांची आपापसातली झालेली यादवी युद्धं आणि कारस्थानं अशा सगळ्याची इत्यंभूत माहिती तर मिळतेच परंतु नंतर इस्लामच्या ताब्यात गेलेला देश, आयसिसचं वाढतं वर्चस्व, इराक आणि सीरिया मधली खलिफत आणि तेलाचं राजकारण, आत्मघातकी बॉम्बस्फोट, मालदिव्जमधल्या सामान्य नागरिकांपासून ते पोलिसांपर्यंत सर्वांठायी आढळणारी जिहादी मानसिकता अशा अनेक गोष्टींचे तपशीलवार उल्लेख आहेत. लेखकाने आयसिस, सीरिया, खिलाफत, तिथलं तेलाचं राजकारण इत्यादी सर्व बाबींची अत्यंत अभ्यासपूर्ण वर्णन केली आहेत. 

आपल्याकडे मालिका/चित्रपटात अखेरीस नायकाची 'शेवटची फायटिंग' दाखवणं अनिवार्यच असल्याने अगदी अविश्वसनीय आणि हास्यास्पद वाटत असूनही मालिकेच्या अखेरच्या एपिसोडच्या शेवटी तो विनोदी प्रकार दाखवण्यात आला आहेच. पुस्तकात मात्र नायकावर अखेरीस अचाट आणि वीरतापूर्ण प्रयोग करण्याचं कुठलंही बंधन नसल्याने पुस्तकात नायक स्वतःच्या घरात बसून फोनवरून सगळी सूत्र हलवून हलवतो आणि त्याचे लोक नायिकेची अलगदपणे सुटका करून तिला सुरक्षित स्थळी आणून पोचवतात. 

पुस्तकात मुख्य नायकाला नाव नसून त्याला केवळ 'कॉन्टॅक्ट' एवढ्याच नावाने संबोधलं जातं. त्यामुळे त्याची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी वगैरे दाखवण्याचा संबंधच नसतो आणि आवश्यकताही नसते.  

मालिकेत मात्र मोहित रैनाचा आत्मविश्वासपूर्ण वावर, त्याचं 'कॉन्टॅक्ट' म्हणून एफबीआयच्या स्पेशल एजंट्सना भिडणं, त्याच्या वेगवान हालचाली, महत्वाचे निर्णय वेगाने घेण्याची क्षमता हे सगळं फार विश्वसनीय वाटतं. अर्थात मोहित रैनाच्या 'उरी' चित्रपटातल्या छोट्याशा परंतु अत्यंत प्रभावी भूमिकेतल्या त्याच्या तडाखेबंद प्रतिमेचा त्याला 'कॉन्टॅक्ट' म्हणून पडद्यावर बघताना फायदाच होतो.  

त्यामुळे मोहित रैना साठी फ्रीलान्सर आवर्जून बघायला आणि टीचभर असलेल्या मालदिव्जचा इतिहास, तिथल्या जनतेच्या मनावर असलेला इस्लामचा पगडा, आयसिसचा आणि आंतरराष्ट्रीय तेलाच्या राजकारणाची माहिती (कुबेरी पाल्हाळ लावलेल्या पद्धतीच्या ऐवजी) अगदी थोडक्यात जाणून घ्यायची असेल तर A Ticket to Syria: A Story About the ISIS in Maldives हे पुस्तक आवर्जून वाचायला हवंच.

Wednesday, July 10, 2024

'अविरत हाणामारी'चा प्रभावी खेळ : किल

काही दिवसांपूवी ‘किल’चा टिझर आणि नंतर ट्रेलर बघताना जेव्हा ट्रेनमधला लांबलचक असा सलग हाणामारीचा प्रसंग पहिल्यांदा बघितला तेव्हा सर्वप्रथम मला जेम्स मधल्या ट्रेनमधल्या हाणामारीच्या प्रसंगाची तीव्रतेने आठवण झाली. अर्थात ट्रेन हा एक सामायिक दुवा सोडल्यास दोन्हींच्या हाणामारीच्या प्रकृतींमध्ये खूपच फरक आहे, अनेक पातळ्यांवर फरक आहे. जेम्समध्ये गुंडांची संख्या, स्लो मोशनमध्ये चालणारी हाणामारी, एका किंवा फार तर दोन ठोश्यांमध्ये लोळवले जाणारे गुंड दिसतात आणि एकूण प्रसंगाचा जीवच जेमतेम दहा एक मिनिटाचा आहे. पण संपूर्ण चित्रपट या एकाच संकल्पनेभोवती फिरत असेल तर बघताना प्रेक्षकांच्या मनावर किती प्रचंड ताण निर्माण होईल कल्पनाही करणं अवघड आहे. आणि त्यात पुन्हा ती हाणामारी कमी म्हणून सोबतीला अतीव रक्तपाताची फोडणी असेल तर प्रकरण अधिकच गंभीर होत जाणार हे नक्की. हा ताण चित्रपटभर भेटीला येणाऱ्या सततच्या थरकाप उडवणाऱ्या दृश्यांच्या माध्यमातून अधिकाधिक चढत्या पातळीवर नेण्यात दिग्दर्शक निखिल नागेश भट कमालीचा यशस्वी झाला आहे.

अशा संपूर्ण वेळ अथक आणि अविरतपणे चालणाऱ्या मारामाऱ्या बघत असताना
Raid आणि Raid : Redemption या दोन इंडोनेशियन चित्रपटांची आठवण होणं स्वाभाविकच. अर्थात किल आणि रेड (१ आणि २) मधला प्रमुख फरक म्हणजे रेड ची निर्मिती ही प्रामुख्याने पारंपरिक इंडोनेशियन मार्शल आर्टस् च्या प्रचार आणि प्रसारासाठीच करण्यात आलेली असल्याने त्यातल्या मारामाऱ्या या क्षणभराचीही उसंत घेत नाहीत आणि अर्थात त्यांमध्ये क्वचित अपवाद वगळता फार रक्तपातही नाही. किल मध्ये मात्र डोकं, हात, पाय, नाक, तोंड फोडण्याचे प्रसंग सातत्याने घडत राहतात. त्यामुळे ते थरारकच नव्हे तर अनेकदा (अर्थात चांगल्या अर्थी) भीतीदायक वाटतात.

सुरुवातीच्या काही मिनिटांतच चित्रपट ज्या परीसरात घडणार आहे त्या क्षेत्राच्या मर्यादा आखल्या जाऊन त्या प्रेक्षकांसमोर स्पष्टपणे मांडून दाखवल्या जातात आणि काही अपवाद वगळता त्या मर्यादांचे नियम दिग्दर्शक शेवटपर्यंत पाळतोही. त्यामुळे कुठल्या भागात काय परिस्थिती आहे, कुठली घटना कुठे घडते आहे, त्याचा इतर घटनांशी आणि तिथल्या व्यक्तींशी काय संबंध आहे हे सगळं प्रेक्षकांना पूर्णवेळ व्यवस्थितपणे कळत राहतं.

चित्रपटाचा नायक हा पूर्णवेळ नायक वाटतो, कुठेही चुकूनही सुपरहिरो वाटत नाही. त्याला लागतं, जखमा होतात, तो बेशुद्धही पडतो पण दरवेळी धडपडत, लंगडत का होईना पुन्हा उभाही राहतो. पण खरं सांगायचं तर 'अविरत हाणामारी' हा या चित्रपटाचा प्रमुख आणि खराखुरा नायक आहे. या चित्रपटात मारामारीचे विविध प्रकार लीलया हाताळण्यात आले आहेत. या चित्रपटातील मारामाऱ्या या प्रामुख्याने अतिशय कमी जागेत, अत्यंत मर्यादित हालचाल शक्य असणाऱ्या ठिकाणी घडतात. त्यामुळे त्या एकसुरी वाटू नयेत यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न दिग्दर्शक आणि दक्षिण कोरियन action choreographer 'Se-yeong Oh' यांनी केलेले आहेत आणि त्यात ते कमालीचे यशस्वीहे झालेले आहेत. हे सर्व करताना त्यासाठी त्यांनी अनेक शक्यतांचा धांडोळा घेतला आहे. यातल्या मारामाऱ्या अंधारात आहेत, लख्ख (कृत्रिम) उजेडात आहेत, धुरात आहेत, धुक्यासम भासणाऱ्या वातावरणातही आहेत. त्याचबरोबर चाकू, सुरा, गुप्ती, बंदूक या पारंपरिक हत्यारांसोबतच अग्निशामक सिलेंडर, काचांचे तुकडे, कुलूप, साखळी, जेवणाचे डबे. हॉकी स्टिक यांसारख्या अपारंपरिक हत्यारांचाही यात सढळ हस्ते वापर करण्यात आला आहे. यात बंदुकांचा वापर अतिशय मर्यादित आहे, कुठेही उगाचच बेछूट असे गोळीबार नाहीयेत. सगळा भर हॅन्ड-टू-हॅन्ड कॉम्बॅटवर देण्यात आला आहे.

संपूर्ण चित्रपटाला एक दक्षिण कोरियन थरारपटाचं स्वरूप प्राप्त झालं आहे ते Se-yeong Oh याच्यामुळे. IMDB वर नायक (लक्ष्य) आणि खलनायक (राघव जुयाल) यांच्या मुलाखती दरम्यान लक्ष्यने Se-yeong Oh चा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. तसंच यातला खलनायक एक विक्षिप्त, क्रूर, चक्रम, अत्यंत बेफिकीर आणि क्रिकेट व चित्रपटांची आवड असणारी आणि अचूक टायमिंगसह संवादफेक करणारी व्यक्ती आहे. खलनायकाचे हे सगळे गुणविशेष पडद्यावर प्रभावीपणे उतरवण्यासाठी राघव जुयालने सातत्याने मोझार्टचं संगीत ऐकत असल्याचा उल्लेख मुलाखतीदरम्यान केला आहे.

चित्रपटात काही निवडक प्रसंगांदरम्यान वेस्टर्न चित्रपटांची आठवण करून देणारे गिटार पिसेस वाजत राहतात, त्याचबोबर ड्रम्सचे तुकडेही कानावर पडत राहतात. त्यामुळे एक निराळ्या प्रकारची वातावरण निर्मिती व्हायला मदत होते. सततच्या या हाणामारीमुळे जॉन वीक ची आठवण होणं अगदीच अपरिहार्य आहे. त्याचबरोबर अग्निशामक सिलेंडरच्या प्रसंगात Irreversible या इटालियन प्रसंगाची तर ट्रेनमध्ये गुंडांना टांगून ठेवून इतर गुंडांना डिवचण्याचा प्रसंगात डाय हार्डमधल्या लिफ्टमधल्या सांताक्लॉजच्या प्रसंगाची नक्कीच आठवण होते.

वर म्हंटल्याप्रमाणे चित्रपटाचा खरा नायक 'अविरत हाणामारी' हा आहे. यात जेमतेम तोंडी लावण्यापुरती असलेली एक प्रेमकथा वगळता हा चित्रपट पूर्णतः नो-नॉन्सेन्स प्रकारचा आहे. यात उगाच कंबरेखालचे बिनडोक विनोद नाहीयेत, विचित्र अंगविक्षेप नाहीयेत, की खानदान की इज्जत वाले मूर्ख प्रकार नाहीयेत. आहे ती प्रेक्षकांवर सातत्याने सढळ हस्ते बरसणारी उच्च दर्जाची अ‍ॅक्शन. त्यामुळे हार्डकोअर अ‍ॅक्शनप्रेमी प्रेक्षकांसाठी ही एक अत्युच्च दर्जाची मेजवानी आहे जी चुकवलीत तर जन्मभर पश्चात्ताप होत राहील !!

--हेरंब ओक