Saturday, October 20, 2018

गहिरा अंधार आणि अमर्याद पाऊस : तुंबाड !


“‘तुंबाड’ हा सर्वोत्कृष्ट भयपट आहे का?” या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे सरकून “‘तुंबाड’ हा भयपट आहे का?” या प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल. किंवा मग “चार-दोन दचकवणारे प्रसंग असलेला चित्रपट म्हणजे भयपट असतो का?” किंवा “भरपूर अंधार असलेला, वेगवान घटना घडणारा आणि अधेमध्ये जरा घाबरवणारा चित्रपट म्हणजे भयपट असतो का?” अशा प्रकारचे प्रतिप्रश्न करावे लागतील. (नारायण धारपांच्या कथांवर आधारित असल्याने कदाचित त्याला सरळ भयपट हे विशेषण लागलं असावं हा अजून एक मुद्दा.) कारण या न्यायाने तुंबाड कदाचित भयपट होऊही शकेल. कारण गूढ गहिरा अंधार आणि सतत कोसळणारा अमर्याद पाऊस हे तुंबाडचे दोन अत्यंत महत्वाचे नायक आहेत. कारण ते अतिशय रूपकात्मक पद्धतीने निर्लज्ज पाप आणि कधीही न संपणारी लालसा/हाव यांचं प्रतिनिधित्व करणारे म्हणून वापरण्यात आले आहेत. जवळपास प्रत्येक प्रसंगात अंधार किंवा पाऊस आहेच आणि  कित्येकदा दोन्हीही आहेत. तसं पाहता तुंबाडमध्ये अनेक रूपकं वापरली आहेत.  गाभा, मूळ, लालसा, वासनांधता, हाव, शाप आणि पराजय या सगळ्या सगळ्यासाठी !!

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या साधारण ३०-३५ वर्षांत ३-४ पिढ्यांमध्ये ही कथा घडते. आर्थिक असमानता, सामाजिक अन्याय, पूर्वजांपासून चालत आलेला शाप, लाचार गरिबी, अंधश्रद्धा, हाव, लोककथा, आद्यकथांमधले संदर्भ ,लालसेपायी शापाला ठोकर मारून आणि अनेकदा कोणत्याही मार्गाचा वापर करून अधिकाधिक श्रीमंत होण्याची धडपड या सगळ्यांना स्पर्श करत आणि सामावून घेत तुंबाडची कथा मार्गक्रमणा करत जाते. वर सांगितलेल्या दोन नायकांएवढाच किंवा त्यापेक्षाही महत्वाचा असणारा तुल्यबळ महानायक म्हणजे तुंबाड ची दृश्यात्मक परिणामकारकता. एकेका दृश्याची चौकट (फ्रेम) अत्यंत मेहनत घेऊन, कथेच्या बाजाला आणि प्रकृतीला न्याय देईल अशा तऱ्हेने मांडण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ उभा करताना तेव्हाची घरं, वाहनं, प्रसंग, लोकांच्या आवडीनिवडी, सवयी अतिशय कल्पकतेने निवडून खऱ्या वाटतील अशा रीतीने उभ्या केल्या आहेत. घर, वाडा, बोळ, अंगण अशा सामान्य स्थळी घडणारे साधे प्रसंग अंधार, पाऊस आणि गूढ वातावरण याने अपेक्षेपेक्षा अधिक भयप्रद होतील अशा रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रत्येक फ्रेममध्ये खास गडद टच देऊन चित्रपटाची गूढ प्रवृत्ती मेन्टेन्ड राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिलं गेलं आहे. यासाठी उच्च दर्जाच्या छायाचित्रणाबद्दल सिनेमॅटोग्राफर पंकज कुमारचं विशेष कौतुक केलं पाहिजे. हे सगळं होत असताना चित्रपटाचा स्वतःचा पहिल्या क्षणापासून असणारा वेग हा शेवटच्या प्रसंगापर्यंत अबाधित राहिल याची कटाक्षाने दक्षता घेण्यात आली आहे.

 वर म्हंटल्याप्रमाणे हा लौकिकार्थाने भयपट न वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे हा चित्रपट तत्सम प्रसंगांमधील सुरुवातीचे काही क्षण वगळता “बंद दारामागच्या खोलीत किंवा तळघरात काय आहे?” याबाबतचा कल्पनाविलास प्रेक्षकांना करू देत नाही. कारण सुरुवातीला काही वेळ भीतीदायक (काही प्रसंगी विनोदीही) आवाज ऐकवून काही क्षणातच तिथल्या प्रत्यक्ष अस्तित्वाचं आपल्याला पूर्ण दर्शन घडवतो. चित्रविचित्र आवाज ऐकवून, अचानक भुताला/आत्म्याला/पिशाच्चाला सामोरं उभं करून प्रेक्षकांना घाबरवून सोडणे हा या चित्रपटाचा उद्देश खचितच नाहीये. याउलट या अनुषंगाने येणाऱ्या मानवी भावभावना अधिकाधिक उच्च आणि गडद चित्रशैली वापरून मांडण्याला दिग्दर्शक अधिक महत्व देतो. लोभ, कुमार्ग, अविवेकीपणा, गैरमार्गाने मिळवलेलं धन, रंगेलपणा आणि या सगळ्यातून उत्पन्न झालेली अजून हाव असं हे एक पूर्णचक्र आहे. स्वतःच्या डोळ्यादेखत घडत असलेल्या चक्रात पुढची पिढी विनासायास न अडकली तरच नवल !

तुंबाड अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळतो किंवा त्यात सुस्पष्टता नाही. पण तो दिग्दर्शनातला ढिसाळपणा नसून मुद्दाम आणलेला धूसरपणा आहे. अशा प्रकारच्या गूढ चित्रपटांमध्ये काही जागा मुद्दाम मोकळ्या सोडून प्रेक्षकांच्या आकलनशक्ती आणि विचारक्षमतेला आव्हान देण्याचे प्रयत्न हुशार/प्रयोगशील दिग्दर्शक करत असतात. हा त्यातला प्रयत्न आहे. एखादा मुद्दा/प्रश्न पडद्यावर मांडला पण त्याचं उत्तर स्वतः दिग्दर्शक/लेखकाकडेचं नाहीये आणि त्यामुळे तो सोडून दिला अशा प्रकारच्या घिसाडघाईतून आलेला हा अर्धवटपणा नाही. तर अपूर्णतेतून निर्माण झालेल्या अनेक शक्यता मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

चित्रपट पाहताना राहून राहून मनात येत राहिलेला मुद्दा म्हणजे हा चित्रपट हिंदी ऐवजी मराठीत का केला गेला नाही? कोकणातल्या ब्राह्मण कुटुंबातली केशवपन केलेली स्त्री स्वतःच्या १०-१२ वर्षांच्या मुलांशी हिंदी बोलताना ऐकून फारच विनोदी वाटतं. किंवा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पुण्यातही पुणेरी पाटी दाखवल्याबद्दल दिग्दर्शकाच्या तपशीलाबद्दल आग्रही असण्याचं आणि विनोदबुद्धीचं कौतुक वाटतंच मात्र त्याच वेळी ती पुणेरी पाटी हिंदीत बघून नक्कीच दाताखाली खडा आल्याचा भासही होतो. अगदी सहजतेने उपशीर्षकं (सबटायटल्स) पुरवता येण्याच्या काळात हे करता येणं सहज शक्य होतं. अर्थात अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी किंवा मराठी चित्रपटांच्या तिकीटाच्या किंमती वगैरे आर्थिक कारणांमुळे हे करता आलं नसेल असं मानायला जागा आहे.

चित्रपटात सुरुवातीला दिसणाऱ्या हस्तरच्या मूर्तीमधून मनात तयार होणारी हस्तरची प्रतिमा आणि कालांतराने दिसणारा हस्तर (आणि त्याची प्रतिरूपं) यात अतिप्रचंड तफावत आहे. तसंच भारतीय वंशाच्या/वळणाच्या पुराणकथेत उल्लेखलेला हस्तर आणि प्रत्यक्षात दिसणारा ममीसदृश अभारतीय हस्तर हा ही पचायला थोडा कठीण जातो हे ही नक्की.

तुंबाड आणि त्याच्या अप्रतिम दिग्दर्शन, छायांकन, वातावरण निर्मिती इ० बद्दल बोलून झाल्यावर संभाषणाची गाडी आपोआपच दिग्दर्शक राही अनिल बर्वेचा संघर्ष यावर येऊन ठेपते. चित्रपट अतिशय अप्रतिम आहेच पण तो खरोखरच त्या दर्जाचा आहे म्हणून. दिग्दर्शकाच्या अविरत आणि लांबलचक संघर्षामुळे तो ग्रेट आहे असं म्हणण्याची आवश्यकता नाही. उलट असं म्हणणं म्हणजे राहीच्या अप्रतिम दिग्दर्शनकौशल्यावर केलेला अन्याय आहे. दुर्दैवाने एखाद्या चित्रपटाच्या नशिबी अन्यांपेक्षा अधिक संघर्ष असतो एवढाच त्याचा अर्थ घेतला जावा. त्यामुळे तुंबाड अगदी आवर्जून आवर्जून बघायलाच हवा पण तो फक्त दिग्दर्शकाने केलेल्या संघर्षाला न्याय देण्यासाठी म्हणून नव्हे तर उत्तम निर्मितीमूल्य, दिग्दर्शन, छायाचित्रण, कथा/पटकथा असलेला हा चित्रपट त्या योग्यतेचा आहे म्हणून !!

7 comments:

  1. हस्तरला कोणीच पाहिलेलं नसतं त्यामुळे त्यांनी कल्पनेनुसार जाड्या बोदल्या हस्तर केला असणारे. प्रत्यक्षात तो ज्या स्पीडने फिरत असतो ते बहुदा मूळ हस्तर नसून त्याचा अंश आहे. जे देवतांनी त्याचे तुकडे केले होते. त्यामुळे शेवटच्या प्रसंगात त्याची व्युप्ती लागते, असे मला वाटले.

    बाकी हिंदी बाबत अगदीच मान्य. मराठीमध्ये अजून मस्त झाला असता पण जास्त लोकांपर्यंत पोचला नसता. असेही भाषा या चित्रपटात फार महत्वाची नाहीच आहे. सगळेच आणि तसे मराठमोळी हिंदी बोलतात.

    ReplyDelete
    Replies
    1. हो. मी हस्तरच्या अंशांविषयीच लिहिलंय. त्यात तो मुकुट घातलेला कवटीसदृश चेहरा बघून 'ममी' ची आठवण होते.

      Delete
  2. भारतीय संस्कृती मध्ये हस्तर चा उल्लेख आहे?

    ReplyDelete
  3. एक आठवडा होऊन गेला चित्रपट पाहून, पण अजून डोक्यातून जात नाहीये, तुंबाडविषयी काय मिळेल ते पाहू, वाचू असं झालंय :)

    ReplyDelete
  4. भारी लिहिलं आहेस...
    असाच विस्ताराने लिहीत जा :)
    वरच्या कॉमेंटमध्यये हस्तरच्या तुकड्यांबद्दल लिहिलेलं निरीक्षण आवडलं. माझ्या लक्षात आलं नव्हतं.
    मी 'अनेक हस्तर' हे रूपकात्मक अर्थाने घेतलं होतं.
    म्हणजे असं की त्या प्रसंगात छोट्या पोराने सगळ्या बाहुल्या आणलेल्या दाखवल्या म्हणजेच त्याची हाव बापापेक्षाही भयंकर आहे.. पण जेवढी हाव मोठी तेवढयाच त्या अनुषंगाने येणारं, लचके तोडणारं प्राक्तन सुद्धा multiply होणार..

    ReplyDelete
  5. जबरदस्त सिनेमा.. आणि तितकंच जबरदस्त अवलोकन... एक ना एक ओळ मान्य... हस्तरच्या रूपाबद्दलचा मुद्दा तर २००००००% मान्य _/\_

    ReplyDelete
  6. मित्रा खूपच सुरेख समीक्षण केले आहेस.... हा चित्रपट म्हणजे भारतीय फिल्म मेकिंग मधला मैलाचा दगड आहे.... सर्वांच्या अभिनयाबद्दल अजून लिहिता आले असते..

    ReplyDelete