Friday, October 5, 2018

डोळसपणे पाहण्याचा अंधाधून


निव्वळ स्वतःच्या नावावर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्याचं कसब सध्याच्या ज्या दिग्दर्शकांमध्ये आहे त्यात जेमतेम चारेक (आणि हा पाचवा) चित्रपट नावावर असणाऱ्या श्रीराम राघवनचं नाव नक्कीच फार वरचं आहे आणि कदाचित एखादा अपवाद वगळता जवळपास एकाही चित्रपटात राघवन प्रेक्षकांना निराश करत नाही. राघवनचा प्रमुख भर असतो तो ट्रीटमेंटवर. त्यात स्टाईल असते, वेग असतो, सफाईदारपणा असतो, गोंधळ असतो. थोडक्यात निओ-न्वारसाठी आवश्यक असलेला प्रत्येक घटक असतो. इतकंच काय तर चित्रपटाच्या शीर्षकात पण एक खुबी असते. ‘एक हसीना थी’ मधला ‘थी’ जेवढा महत्वाचा तेवढाच सूडाला वाहिलेल्या ‘बदलापूर’ मधला ‘बदला’. तेच चातुर्य आताच्या ‘अंधाधून’ या शीर्षकात. आता 'अंदाधुंद' या शब्दानंतर शक्यतो 'गोळीबार' (जो या चित्रपटातही आहे) याच शब्दाची सवय असलेया आपल्या कानांना आणि मेंदूला तोच शब्द एक अंध संगीतकार-गायक नायक असलेल्या चित्रपटाच्या शीर्षकात वापरताना तो फिरवून ‘अंधा-धून’ म्हणून ऐकवण्याचं कौशल्य तितकंच विलक्षण!

राघवनच्या चित्रपटाचा एक बऱ्यापैकी ठरलेला पॅटर्न असतो. प्रचंड वेगाने घडणाऱ्या धक्कादायक घडामोडींनी भरलेला पूर्वार्ध, समाजमान्य नसलेला रोमान्स किंवा विवाहबाह्य संबंध, जुन्या हिंदी चित्रपट/संगीत/कलाकार/गाणी/संवाद यांच्या संदर्भांची ठायी ठायी केलेली दृश्यात्मक पेरणी, प्रत्येक पात्राचं कुठल्या ना कुठल्या अपरिहार्य कारणाने का होईना पण चुकीच्या कृत्यात/गुन्ह्यात अडकणं आणि त्यामुळे त्याला (पात्राला) असणारी एक गडद किनार किंवा ग्रे शेड. ही भट्टी दर वेळी इतकी खमंग जमून येते की पट्टीच्या सुगरणीलाही कॉम्प्लेक्स यावा.

अंधाधून मधली भेळही अशीच नेहमीप्रमाणेच खुसखुशीतपणे जमून आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. सिनियर मोस्ट तब्बू पासून ते थेट दीडफुटी छोटू पर्यंत सगळ्यांनी केलेले भन्नाट अभिनय. तब्बूच्या तोडीस तोड वावरणारे आयुष्मान खुराणा आणि राधिका आपटे आहेत तसेच राघवनचे नेहमीचे यशस्वी अश्विनी कळसेकर आणि झाकीर हुसेनही.

अंध नायक आकाश (खुराणा) संगीत शिकवून आणि पियानो वाजवून उदरनिर्वाह चालवत असतो. परंतु प्रत्यक्षात तो अंध असल्याचा अभिनय करत असतो. आता यात स्पॉयलर अलर्ट देण्यासारखं काहीही नाही. कारण चित्रपट सुरु झाल्यावर जेमतेम अर्ध्या तासाच्या आतच हे तथाकथित रहस्य फुटतं. किंबहुना त्यात रहस्य असंही काहीच नाही कारण ट्रेलर मध्येही ते स्पष्टपणे दाखवलं आहेच. तर हा नायक त्याच्या दुर्दैवाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी पोचतो आणि अनवधानाने काही दुष्कृत्यांचा साक्षीदार बनतो. त्यातून सुटका करण्याच्या खटपटीत पहिलंच पाऊल इतकं चुकीचं पडतं की ते सावरताना गुंता वाढत वाढत जाऊन जीवावर बेतण्याची पाळी येते. अशा असंख्य वेगवान घटना आणि गुंत्यांच्या शिड्या चढत चढत चित्रपट मध्यंतरापर्यंत जबरदस्त लेवलला जाऊन पोचतो. तोच किंबहुना प्रसंगी थोडा अधिक वेगही मध्यंतरानंतर सुरुवातीला जाणवतो. नंतर पात्र, प्रसंग यांची सरमिसळ होऊन अनेक उपकथानकं जोडल्यासारखी वाटतात. या अनेक उपकथानकांच्या अनेकानेक उभ्या आडव्या धाग्यांमधला कुठला धागा महत्वाचा किंवा धरून ठेवण्यासारखा आहे या गोंधळात प्रेक्षक नक्कीच पडतो. पण दुर्दैवाने थोड्याफार अशाच द्वंद्वात खुद्द दिग्दर्शक देखील अडकल्यासारखा वाटतो. थोड्याफार फरकाने प्रत्येक चित्रपटात शेवटाच्या दिशेने प्रवास करताना राघवन याच द्वंद्वात अडकल्यासारखा वाटतो असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. अर्थात सुरुवातीपासून मिळणारा जबरदस्त अनुभव पाहता शेवटचा थोडासा गोंधळ दुर्लक्ष करता येण्याजोगा ठरतो हेही तितकंच खरं. या सगळ्या धावपळीत आणि गडबडगोंधळात कथानकाचा एक भाग म्हणून वेळोवेळी वाजणारी गाणी आणि पियानोचे सुश्राव्य पीसेस यांचा उल्लेख अनिवार्यच.

वरवर पाहता चित्रपट एका तथाकथित पॉझीटीव नोटवर संपतो. पण अगदी शेवटचा क्षण आणि नायकाची बॉडी लँग्वेज पाहता ओपनएन्डेड ठेवल्याचाही आभास निर्माण करतो. अर्थात कुठला शेवट स्वीकारायचा हे राघवन प्रेक्षकांवरच सोडतो. थोडक्यात जबरदस्त वेगाच्या आणि गुंत्याच्या धुंदीत अडकवून टाकणारा ‘अंधाधून’ आवर्जून आवर्जून पाहण्यासारखाच... पण डोळसपणे !!

ता क : जाता जाता आवर्जून नोंदवण्यासारखं निरीक्षण म्हणजे सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या नामनिर्देशनांत (क्रेडिट्स) चित्रहार आणि छायागीतचा आवर्जून उल्लेख करणं हे श्रीराम राघवनचं ७०-८० च्या दशकातल्या हिंदी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसंगीतावरचं प्रेम अधोरेखित करणारं !

6 comments:

  1. जबरदस्त थ्रिलर. उत्तम अभिनय आणि गाणी आणि background music अफलातून. निव्वळ संगीतामुळे सिनेमाला जबसदस्त वेग येतो.
    बाकी तब्बू च काम कडक झालंय.

    आणि महत्त्वाचं राहील ... संवाद एकदम चटपटीत आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच. संवाद, संगीत, पियानो पीसेस सगळंच खासम् खास आहे.

      Delete
  2. बघणार आहे, आता अजून उत्सुकता वाढली, आयुष्मान खुराणाचे चित्रपट आवडतात.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की बघ. आयुष्मान खुराणाचा बेस्टटेस्ट परफॉर्मन्स आहे.

      Delete