Friday, May 8, 2020

घटिका-पळे-तासांचं ओलीसनाट्य : द दाख(ग) - De Dag (The Day)


'इनसाईड मॅन', 'रिफिफी' (फ्रेंच), 'डॉग डे आफ्टरनून', 'द किलिंग' (स्टॅनली क्युब्रिक दिग्दर्शित) आणि सध्या तुफान गाजत असलेली 'मनी हाईस्ट' ही बँकेवरील दरोडा आणि ओघाने येणारं ओलीसनाट्य या विषयावरील चित्रपट/सिरीज मधील काही मातब्बर नावं. परंतु 'द दाख (ग)' किंवा De Dag (The Day) या नावाची बेल्जियन सिरीज या महत्वपूर्ण नावांच्याही एक पाऊल पुढे टाकत बँकदरोडा आणि ओलीसनाट्य संकल्पनेतला एक सर्वस्वी नवीन अनुभव प्रेक्षकांना देते.

दरोडनाट्याला सुरुवात झाल्यापासून पुढे साधारण २४ तासांत घडणाऱ्या घटना असा या सिरीजचा आलेख आहे ज्यात एक दरोडा आणि त्याला संलग्न असलेल्या दोन (किंवा तीन) ओलीस प्रकरणांचा समावेश होतो. सिरीज सुरुवातीपासूनच आपला गंभीर स्वभाव धरून ठेवते. उगाच विनोदी प्रसंग, दरोडेखोरांचं व्यक्तिगत आयुष्य, प्रेमप्रकरणं, घटस्फोट, तुरुंगवाऱ्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी, गरिबी असं विनाकारण पाल्हाळ लावलं जात नाही. त्या त्या संदर्भाला आवश्यक तेवढा स्पर्श करून मालिका वेगाने पुढे सरकते हा एक अतिशय महत्वाचा प्लसपॉईंट जो बऱ्याच अमेरिकन सिरीज मध्ये दुय्यमस्थानी असतो. प्रत्येकी तीन एपिसोड्स असलेली तीन पर्वांची (सिझन्स) ब्रिटिश 'हाऊस ऑफ कार्ड्स' अमेरिकेत रूपांतरित होताना ६ सिझन्सपर्यंत ताणली जाणे किंवा 'द किलिंग' या डॅनिश मर्डर मिस्ट्रीच्या अमेरिकन रूपांतरात मूळच्या एका सिझन साठी दोन सिझन्स खर्ची घातले जाणे ही काही चटकन आठ्वलेली उदाहरणं. तर सुदैवाने 'द दाख' मध्ये हे टाळलं जातं.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक एपिसोडची (शब्दशः) दोन दृष्टिकोनांतून केलेली मांडणी. विषम एपिसोडमध्ये बँकेच्या बाहेरील दृष्यं, पोलीस, नागरिक, मीडिया, स्पेशल युनिट्स, वाटाघाटी किंवा बोलणी करणारी टीम (negotiators) त्यांची तयारी, धावपळ तर सम एपिसोड्स मध्ये त्याच दरम्यान बँकेच्या आत काय परिस्थिती होती, काय घडामोडी घडत होत्या हे दाखवून दोन्हींचा सांधा बसवला जातो. थोडक्यता प्रत्येक दोन एपिसोड नंतर आपल्या मनात साधारण त्या तासा-दोन तासांमध्ये घडलेल्या विविध घटनांचं एक परिपूर्ण चित्र उभं राहतं. मांडणी आणि हाताळणीच्या दृष्टीने हे एक बऱ्यापैकी वेगळं पाऊल आहे. यापूर्वी 'वॅन्टेज पॉईंट' या चित्रपटात अशा प्रकारची मांडणी पाहिल्याचं आठवतंय. फरक इतकाच की त्यात एक महत्वाची घटना घडून जाते आणि ती वेगवेगळ्या अँगलने प्रेक्षकांना दाखवली जाते जेणेकरून प्रत्येक दृश्यातून काही नवीन माहिती मिळते. तर या मालिकेत तसं न होता दर दोन एपिसोड्सनंतर मालिका पुढे सरकत राहते. सुरुवातीला काही एपिसोड्स बघत असताना या मांडणीची सवय व्हायला थोडा वेळ लागू शकतो परंतु एकदा का सगळे साचे एकमेकांत बसायला लागले की आपणही मालिकेत गुंतून जातो. मालिकेतच नाही तर प्रत्येक पात्रात. वर म्हंटल्याप्रमाणे पात्रांची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी एखाद दुसऱ्या प्रसंगात/ओळीत दाखवून मालिका पुढे सरकते. त्यासाठी एपिसोड खर्ची घातला जात नाही. आणि कदाचित त्यामुळेच आपण त्यातल्या इवो, वॉस, अर्ने, रोलॅंड, टॉमी, सुसान आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे फ्रेया अशा सर्वच पात्रांबरोबर भावनिकरीत्या गुंतून जातो.

सुरुवातीला छोट्या छोट्या प्रसंगातून, पात्रांच्या वागणुकीतून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिला जातो. वाटाघाटी करणाऱ्या टीमचा एकमेकांवरचा विश्वास आणि त्याच वेळी कठीण प्रसंगी दाखवावा लागणारा अविश्वास याबद्दलचे दोन-तीन छोटे छोटे प्रसंग फारच छान जमून आलेत. एकेका पात्राची ओळख होत गेल्यावर एपिसोडच्या शेवटी बसणारे धक्के, ट्विस्ट्स यामुळे तर प्रेक्षकांना दर वेळी सगळ्याचा नव्याने विचार करायला भाग पाडलं जातं. दरोडा, ओलीस, हातमिळवण्या, धमक्या, पलायनं अशी एकेक पायरी पार करत करत सिरीज शेवटाकडे निओ न्वार पद्धतीच्या घटनांची आठवण करून देऊन संपते.

आवर्जून उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे विलक्षण ताकदीचं पार्श्वसंगीत. वाढत जाणाऱ्या तणावांच्या प्रसंगांना तेवढ्याच तोलामोलाच्या पार्श्वसंगीताची उत्तम साथ मिळते. ही एक टिपिकल बिंज-वॉच करायची सिरीज आहे. कारण प्रत्येक एपिसोडचा शेवट एवढा विलक्षण गोंधळवून टाकणारा किंवा ट्विस्टेड आहे की पुढचा एपिसोड बघायला सुरुवात केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. त्यामुळे हा हा म्हणता सिरीज संपते आणि आपण लगेच इतर बिंज-वॉच करण्यायोग्य बेल्जियन सिरीज शोधायला लागतो.

3 comments:

  1. लगेच पाहायला सुरूवात करतोय! ��

    ReplyDelete
  2. लगेच पाहायला सुरुवात करतोय !!

    ReplyDelete
  3. अफाट आहे एकदम. मला खात्री आहे तुम्हाला दोघांनाही नक्की आवडेल.

    ReplyDelete