Monday, May 21, 2018

मानापमानाचा ज्वालामुखी : द इन्सल्ट


परभाषिक चित्रपट बघत असताना सबटायटल्स वाचता वाचता चित्रपट पाहण्याची कला एकदा अवगत झाली की त्यासारखं सुख नाही. अर्थात अनेकांना हे असलं सबटायटल्स वाचत चित्रपट पाहायला आवडत नाही. परंतु निव्वळ या कारणामुळे जागतिक चित्रपटांच्या विशाल खजिन्याला मुकणं नक्कीच योग्य नाही. कारण सब्स वाचत वाचत चित्रपट पहायची सवय कालांतराने होतेच. अर्थात ही फक्त पहिली पायरी झाली. दुसरी पायरी किंचित अवघड आहे. म्हणजे ज्यासाठी चित्रपट पाहण्याआधी मुद्दाम परिश्रम घ्यावे लागतील अशी. आपण ज्या देशीचा, ज्या भाषेतला चित्रपट पाहणार आहोत त्या देशातील चालीरीती, सण उत्सव, रीतीरिवाज, लोकसंख्या, धर्म, लोकांच्या आवडीनिवडी, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती करून घेणे ही प्रेक्षक म्हणून एक उत्तम आणि तितकीच आवश्यक सवय आहे. ही माहिती करून घेतलेली असली की, "अरेच्चा हे काय दाखवतायत?" किंवा "छे, असं कधी होतं का कुठे?" सारखे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. अर्थात आपले बॉलीवूडी मस्सालेदार चित्रपट बघतानाही हे प्रश्न क्षणोक्षणी पडतातच परंतु वरच्या यादीतल्या सगळ्या गोष्टींचा आपण कित्तीही अभ्यास केला तरी त्याची समाधानकारक उत्तरं कधीच मिळूच शकत नाहीत.

पण अर्थातच हा नियम आशयघन परभाषिक चित्रपटांना लागू होत नाही. वरील बाबींचा निदान थोडा तरी अभ्यास करून चित्रपट बघायला बसलो तर चित्रपट तुलनेने सहजरीत्या कळायला आपल्याला मदत होते. मग तो पॅन'ज लॅबरीन्थ (स्पॅनिश) असो की अंडर द शॅडो किंवा अ सेपरेशन (दोन्ही इराणी) असो की द ब्रदरहूड ऑफ वॉर किंवा जॉईन्ट सेक्युरिटी एरीया (दोन्ही कोरियन) असो.


लॅबनॉनबद्दल आपल्याला काय माहीत आहे असा प्रश्न आपण स्वतःला विचारला असता तो एक देश आहे यापलीकडे किंवा फार तर बेरूत/बेरूट ही त्याची राजधानी आहे यापलीकडे इतर काही विशेष माहिती असण्याची शक्यता फार थोडी असते. पण एवढ्या तुटपुंज्या माहितीच्या आधारावर आपण २०१७ साली प्रदर्शित झालेला आणि ऑस्कर मध्ये सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट म्हणून नामनिर्देशित झालेला 'द इन्सल्ट' हा लॅबनीज चित्रपट बघायला बसलो तर कदाचित "एवढा का पराचा कावळा करतायत हे लोक?" असा प्रश्न खचितच पडू शकतो. पण लॅबनॉनचे सीरिया, इस्रायल आणि सायप्रस यासारखे शेजारी आहेत, सुमारे साठ लाख लोक असलेल्या या देशाची लोकसंख्या अनेक पंथीय मुस्लिम आणि कित्येक पंथीय ख्रिश्चन लोकांमध्ये विभागली गेलेली असून तिथे काही लाख सीरियन आणि पॅलेस्टीनी निर्वासितही आहेत, अजून अवाक करणारी माहिती म्हणजे धार्मिक अशांतता/अस्थिरतेच्या भीतीने १९३२ पासून तिथे अधिकृत जनगणनाच झालेली नाही किंवा एरिअल शेरॉन कोण आणि पॅलेस्टीनी नागरिकांच्या त्याच्याबद्दल काय भावना आहेत? यांसारखी काही मूलभूत माहिती आपल्याला असली (जी अर्थातच चित्रपट पाहताना मध्ये मध्ये विकीही करता येते) की पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या साध्या सोप्या (भासणाऱ्या) घटनांमागे दडलेले भयावह संदर्भ लक्षात यायला मदत होते. चित्रपटातल्या पात्रांच्या राग/लोभ, मानापमानाशी आपण एकरूप होऊ शकतो. आणि अचानकच चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या गेलेल्या सुचनेचा (डिस्क्लेमर) अर्थ आपल्याला उलगडला गेल्यासारखं वाटायला लागतं. ती सूचना अशी.

“द व्ह्यूज अँड ओपिनियन्स एक्स्प्रेस्ड इन धिस फिल्म आर दोज ऑफ द ऑथर्स अँड द डायरेक्टर अँड डू नॉट रिफ्लेक्ट द ऑफिशियल पॉलिसी ऑर पोझिशन ऑफ द लॅबनीज गव्हर्नमेंट” 


रस्त्यावर अतिशय क्षुल्लक कारणावरून झालेलं भांडण, त्यातून उद्भवलेले मानापमान आणि परिस्थिती भलत्याच दिशेने जात जात शेवटी तिला भयानक हिंसक रूप मिळून ओढवलेला राष्ट्रीय आणीबाणीचा प्रसंग आणि थेट राष्ट्राध्यक्षांना करावा लागलेला हस्तक्षेप असा कथेचा अवाका आहे. अर्थातच हे वाचल्यावर रस्त्यावर झालेल्या भांडणाचं रुपांतर राष्ट्रीय पातळीवरच्या दंगलीत होणं कसं शक्य आहे हा प्रश्न साहजिकच पडू शकतो. परंतु भांडण झालेल्या दोन व्यक्ती, त्यांच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पातळीतील तफावत या सगळ्याची सांगड आपण चित्रपटाआधी संग्रहित केलेल्या माहितीशी घातली की जे पडद्यावर घडतंय ते सहज पटू लागतं किंबहुना ते घडू नये असंही आपल्याला मनोमन वाटायला लागतं. कधी कधी इतका अतिरेक होतो की दोन्ही व्यक्ती झालं गेलं सगळं विसरून जायला तयार होतात किंवा समोरच्याच्या बाजूनेही बोलायला लागतात पण तोवर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली असते की त्यांची अशी तडजोड होणं हे त्यांच्या वकिलांना त्यांच्यातल्या राजकारणामुळे आणि अन्य गुंतागुंतीमुळे मान्य होणं शक्यच नसतं. दोन्ही व्यक्तींच्या अपेक्षा छोट्याच असतात परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. भूतकाळ उकरून काढले जातात, चिखलफेक केली जाते आणि प्रकरण चिघळत ठेवलं जातं. अखेरीस एका टप्प्यावर येऊन चित्रपट संपतो तेव्हा दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जातात. 

चित्रपटातले काही भेदक आणि जागतिक आणि लॅबनीज परिस्थितीवर थेट भाष्य करणारे संवाद ऐकल्यावर चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवला गेलेला डिस्क्लेमर कसा आवश्यक होता हे आपल्याला नक्कीच पटतं.

  • “युअर ऑनर, वुई लिव इन द मिडल इस्ट. द वर्ड "ऑफेन्सीव" वॉज बॉर्न हिअर !!”
  • “नो वन हॅज अ मोनोपॉली ऑन सफरिंग”
  • “देअर इज द युएन, द एनजीओज, द ह्युमॅनीटेरीअन ऑर्गनायझेशन्स, द लेफ्ट्स, द लिबरल्स. दे ऑल रूट फॉर (सपोर्ट) पॅलेस्टॅनियन्स. अँड डोंट फर्गेट, दे हेट अस. इट्स ट्रेंडी टू डिफेंड दोज पीपल.” 

हा चित्रपट पाहताना अनेकदा ‘वाईल्ड टेल्स’ ची आठवण होते. वाईल्ड टेल्स मध्ये परस्परांशी संबंध नसलेल्या परंतु मूळ गाभा एकच असलेल्या सहा लघुकथा आहेत. त्यातलीच एखादी लघुकथा घेऊन, इम्प्रोवाईज करून, फुलवून हा चित्रपट बनवला आहे असंही कधी कधी वाटून जातं. अर्थात वाईल्ड टेल्स मध्ये सगळा भर सुडावर आहे तर इथे तोच भर मानापमानावर आहे.

प्रमुख भूमिकेत असलेल्या अदेल करम आणि कामेल अल बाशा या दोन कलाकारांनी आपापल्या सामाजिक भूमिका आणि धार्मिक श्रद्धा उत्तमरीत्या वठवल्या आहेत. चित्रपट संपत आला तरी कोण चूक आहे आणि कोण बरोबर किंवा या एवढ्या सगळ्या व्यापात मूळ चूक कोणाची होती या प्रश्नाचं अचूक उत्तर कितीही प्रयत्न केला तरी आपण देऊ शकत नाही आणि याचं सगळं श्रेय झिआद दुइरीच्या अप्रतिम दिग्दर्शनाला आहे. हे सगळं का घडलं, कोणी घडवलं, टाळता आलं असतं का, याची जवाबदारी कोणाच्या माथी, हे पुन्हा होणं टाळता येईल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे असलं काही आपल्या देशात असंतोषाने धुमसणाऱ्या संवेदनशील विभागांत/शहरात घडलं तर परिणाम किती भयानक होतील अशा शेकडो प्रश्नाचं मोहोळ आपल्या मनात उठवून चित्रपट संपतो. पण पडद्यावरच. आपल्या डोक्यात तो संपायला काही काळ नक्कीच जायला लागणार असतो !

2 comments:

  1. लवकरच चित्रपट पाहून प्रतिक्रिया देतो.
    बाकी पोस्ट वाचून कधी एकदा हा चित्रपट पाहतोय अस झालंय.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दादू. आवडला का?

      Delete