Thursday, September 24, 2015

विटनेस इट - "मॅड मॅक्स : फ्युरी रोड"

"देअर इज अ हाय ग्राउंड जस्ट बियॉंड 'दॅट थिंग'...."
.
.
"ही मिन्स 'द ट्री' !! "

चित्रपटाच्या साधारण मध्यावर येणारा हा संवाद. इतर वेळी कदाचित ग्लोबल वॉर्मिंगवरचा एखादा चांगला विनोद म्हणून सहज आवडून जाऊ शकेल असा. परंतु या चित्रपटात तो जेव्हा येतो तेव्हा अक्षरशः काटा येतो अंगावर. आणि तेही त्यापूर्वी जवळपास तासभर रखरखीत भूप्रदेश, विस्तीर्ण वाळवंट, शुष्क डोंगर इत्यादी सगळं अगदी जवळून बघितलेलं असूनही. शीर्षकातच सांगितल्याप्रमाणे हा एक रोड मुव्ही आहे. पण आपला नेहमीचा टिपिकल रोड मुव्ही नव्हे. 'फ्युरी' या शब्दाचा खराखुरा अर्थ अगदी जवळून समजावून सांगणारा रोड मुव्ही. एका लांबच लांब खडतर प्रवासाचं दर्शन घडवणारा. हा प्रवास, हा रस्ता अनंत अडचणींनी भरलेला आहे. सतत कोणीतरी कोणाच्या तरी मागावर, पाळतीवर आहे. असंख्य जीवघेणे हल्ले, त्यातून वाचण्यासाठीची धडपड, प्रतिहल्ले, गोंधळ, हलकल्लोळ, आगी, धुळीची वादळं या सगळ्यांनी भरलेला असा हा प्रवास आणि या संपूर्ण प्रवासभर डोळे दिपवणारे आणि वासलेला आ बंदही करण्याची उसंत न देणारे एकापेक्षा एक भयंकर असे अ‍ॅक्शन सीन्स. परंतु या चित्रपटाला निव्वळ अ‍ॅक्शन चित्रपटांच्या गटात टाकणं हा त्याच्यावर मोठा अन्याय ठरेल. पण त्याविषयी नंतर बोलू. 


अत्यंत कुशलतेने आणि जिवंत वाटतील असे चित्रित केलेले मारधाडीचे प्रसंग हा या चित्रपटाचा प्राण आहे. मला वाटतं या पूर्वी कुठल्याही चित्रपटातले मारधाडीचे प्रसंग बघून डोळे दिपलेत किंवा अगदी अविश्वसनीय प्रकार वाटलाय असं फक्त मेट्रीक्सच्या वेळी झालं होतं. (आणि अर्थात
'द रेड रीडीम्प्शन' च्या वेळी. पण 'रेड रीडीम्प्शन' ची जातकुळी अर्थातच वेगळी आहे आणि त्याची  मेट्रीक्स किंवा फ्युरी रोडच्या अ‍ॅक्शन प्रसंगांशी तुलनाच होऊ शकत नाही. रेड त्याच्यातल्या वेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्शनमुळे लक्षात राहिला होता परंतु त्यात ही भव्यदिव्यता नव्हती. असो.) 


चित्रपट नजीकच्या भविष्यात घडतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी उघडीबोडकी झालेली आहे. दूरदूरपर्यंत जिथवर नजर जाईल तिथवर फक्त वाळवंट
, उंचच उंच बोडके डोंगर, तुटलेले कडे असा सगळा रखरखाट पसरलेला आहे. झाडं नाहीत, अतिशय कमी पाणी आणि तेही सहज उपलब्ध नाही अशी परिस्थिती. सगळीकडे यंत्रांचं साम्राज्य. मोठमोठ्या गाड्या, मॉन्स्टर ट्रक्स, ट्रेलर्स, टँकर्स, वेगळ्या प्रकारचे रणगाडे, निरनिराळ्या प्रकारची युद्धाला उपयोगी पडतील अशी वाहनं सगळीकडे दिसतात. पण या यंत्रांमध्ये 'टर्मिनेटर' किंवा 'ट्रान्स्फफॉर्मर्स' प्रमाणे सफाईदारपणा नाही. तर सगळा रखरखीतपणा. सगळं कसं रॉ, अनफिनिश्ड, अनपॉलीश्ड, गंजत चाललेलं, तात्पुरतं अशा स्वरूपाचं. तर या अशा एकापेक्षा एक अजस्र अशा वाहनांनी एकमेकांचा तोंडात बोटं घालायला लावेल अशा रीतीने केलेला पाठलाग, लढाया, हल्ले म्हणजे 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'.

महत्वाचं म्हणजे हे सगळे अ‍ॅक्शन सीन्स, गाड्या, आगी, वाळवंट, मारधाड करणारी माणसं इत्यादी बरंचसं खरंखुरं आहे. पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत १४-१६ तास सतत वाळवंटात चित्रीकरण केलं गेलेलं आहे. या दृष्टीने दिग्दर्शक जॉर्ज मिलरने एका मुलाखतीदरम्यान केलेलं भाष्य पुरेसं बोलकं आहे. 


दिग्दर्शक जॉर्ज मिलर
"
इट वॉज द वर्स्ट पार्ट ऑफ मेकिंग धिस मुव्ही. वुई वेअर डुईंग इट ओल्ड स्कूल. रीअल कार्स, रीअल पीपल, रीअल डेझर्ट अँड १३० डेज   इट वॉज अ बिग स्टंट डे एव्हरी डे. इट वॉज अ मिलिटरी एक्ससाईज."



परंतु वर आधीच म्हंटल्याप्रमाणे 'फ्युरी रोड' हा निव्वळ अ‍ॅक्शनपट नव्हे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीकोन आहेत.  आपण अनेक वेळा वाचलंय/ऐकलंय की तिसरं महायुद्ध झालंच तर ते पाण्यासाठी होईल. हे जर का खरं असेल आणि पाण्यावरून खरंच जर युद्धं व्हायला लागली तर ती कशी असतील याचं जिवंत उदाहरण म्हणजे चित्रपटातला पहिला प्रसंग. भांडवलदारी प्रवृत्तीमुळे पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीचंही रॅशनिंग 
आणि तेही एका स्वघोषित देव/अलौकिक-पुरुष/ मसीहा भासवणाऱ्या परंतु प्रत्यक्षातल्या एका हुकुमशाहाच्या मर्जीवर अवलंबून. आणि त्याचा "पाण्याचं व्यसन लागू देऊ नका. ते तुमचा सर्वनाश करेल" असा 'प्रेमळ' हुकुम ऐकल्यावर "पाव मिळत नसेल तर केक खा" म्हणणारी फ्रेंच राणी किंवा "भारतीयांच्या सुसंपन्नतेमुळे जगात अन्नाधान्याचीची टंचाई भासते आहे" असा जावईशोध लावणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 


चित्रपटात जागोजागी इस्लामी दहशतवाद (पण अर्थात चित्रपटात कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही)
, जिहाद, धर्म बुडाल्याच्या खोट्या आरोळ्या, पद्धतशीर वशीकरण, सतत चुकीची माहिती पेरून केलं गेलेलं ब्रेनवॉशिंग, सेक्स स्लेव्स, आपलीच प्रजा वाढवण्यासाठीचे सततचे प्रयत्न, अन्य लोकांकडे केवळ गुलाम किंवा "युनिव्हर्सल ब्लडसोर्स" एवढ्याच संकुचित नजरेने बघणं,  युद्धात मरताना खरोखर लढतानाच मेलाय आणि पाठ दाखवून पळून जाताना नव्हे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जिहादीला मरताना कोणीतरी साक्ष असण्याचं बंधन ("विटनेस मी"),  धर्मयुद्धात (इथे टोळीयुद्धात) मरण पावण्यास एका पायावर तयार असलेले आणि मेल्यावर पवित्र अशा 'वल्हाला' ला (उर्फ जन्नत?) जायला मिळणार या एकाच कल्पनेने पछाडलेले बेभान तरुण अशा अनेकानेक गोष्टी सध्या घडत असलेल्या इसीस आणि तत्सम अतिरेकी गटांची क्षणार्धात आठवण करून देतात. या अतिरेकी गटांना भडकवणारे, मुखवट्यांआड लपून राहून अशा टोळ्यांचं नेतृत्व करणारे टोळीप्रमुखही आहेतच. अर्थात म्हंटलं तर ते जिहादींचं प्रतिनिधित्व करतात किंवा दुसऱ्या अर्थाने अमेरिकेसारख्या भांडवलखोर देशाचं हिडीस रूप सामोरं आणतात. पण समोर घडणाऱ्या वेगवान घटना, प्रचंड वेगाने केले गेलेले जीवघेणे पाठलाग, हल्ले या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काहींना हे सद्यस्थितीचं प्रतीकात्मक दर्शन जाणवणारही नाही. ज्यांना जाणवणार नाही अशांसाठी हा एक सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शनपट आहे आणि उरलेल्यांसाठी एक अप्रतिम सामाजिक अँगल असलेला मारधाडपट आहे. आपल्याला चित्रपटातलं काय आवडलं हे ज्याने त्याने स्वतः ठरवायचं आणि स्वतः "विटनेस" करायचं !

9 comments:

  1. जबरदस्त .... या सिनेमा सारखाच आपला लेख ही सिनेमा बद्दल वेगवेगळे अँगल दाखवतोय.
    भन्नाट ...

    ReplyDelete
  2. तुझा हा पूर्ण ब्लॉग वाचून तू परीक्षण केलेले चित्रपट पहाण्याची इच्छा झाली आहे. हे म्हणजे कुणी एखादा Out of Syllabus म्हणून बाजूला केलेला धडा इतका छान समजाऊन द्यावा की त्याचा पण अभ्यास करायची इच्छा व्हावी :-)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा. धन्यवाद सिद्धू

      Delete