Sunday, June 3, 2018

श्रोडिंगरच्या मांजराचा थरारक खेळ : कोहरन्स


सायन्स फिक्शन अर्थात साय-फाय हा हॉलीवूडचा निर्विवादपणे अत्यंत लाडका चित्रप्रकार (जॉनर) आहे. त्यात प्रामुख्याने परग्रहावरची जीवसृष्टी, त्यांनी पृथ्वी- त्यातही अमेरिका- त्यात पुन्हा न्यूयॉर्क – आणि त्यात विशेषत्वाने टाईम स्क्वेअरवर केलेले हल्ले आणि अखिल मानवजातीने – अर्थात न्यूयॉर्कवासियांनी शौर्याने आणि धैर्याने त्याला तोंड देऊन (प्रसंगी एखाद्या किंवा डझनभर सुपरहिरोंच्या मदतीने) संपादित केलेले विजय हा नक्कीच त्याचा एक उप-चित्रप्रकार म्हणून गणला जाऊ शकतो. अर्थात या चाकोरीबद्धतेत न अडकणारे वेगळी मांडणी करणारे कॉन्टॅक्ट, सेफ्टी नॉट गॅरंटेड, मून, अरायवल, अनायलेशन सारखे अनेक उत्कृष्ट साय-फाय चित्रपटही निर्माण झाले. एलियन्सच्या खालोखाल दुसरा लाडका प्रकार म्हणजे टाईम-ट्रॅवल ज्याच्यावरच्या चित्रपटांची यादी लिहायला बसलो तर दिवसचे दिवस पुरायचे नाहीत.

पण यासारख्या कुठल्याही घासून गुळगुळीत न झालेल्या वैज्ञानिक संकल्पनांवरही काही निवडक चित्रपट बनले आहेत. अशी एक लाडकी वैज्ञानिक संकल्पना म्हणजे ‘श्रोडिंगर्स कॅट’ आणि ही कल्पना फुलवून, त्याला अजून कल्पनाशक्तीची जोड देऊन, अनेक शक्याताशक्यतांचा विचार करून फुलवत नेलेली कथा आणि प्रसंगी भयावह वाटणारे निष्कर्ष काढणारा चित्रपट म्हणजे ‘कोहरन्स’. ‘श्रोडिंगर्स कॅट’ चे उल्लेख असणारे, संदर्भ देणारे पर्सन ऑफ इंटरेस्ट, बिग बँग थिअरी, द प्रेस्टीज, अ सिरीयस मॅन सारखे अनेक चित्रपट, सिरीज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ‘श्रोडिंगर्स कॅट’ला सर्वस्वी वाहिलेला, ती संकल्पना फुलवून वेगळ्या धाटणीचा प्रयोग मांडणारा कोहरन्स हा एकमेवच.


क्वांटम फिजिक्समधल्या क्वांटम सुपरपोझिशन या संकल्पनेला वैचारिक पातळीवर आव्हान देण्यासाठी एर्विन श्रोडिंगर नावाच्या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने केलेला एक वैचारिक प्रयोग म्हणजे श्रोडिंगरची मांजर अर्थात ‘श्रोडिंगर्स कॅट’. प्रयोग अगदी सोपा करून सांगायचा तर स्टीलच्या एका बंद खोक्यात एक किरणोत्सर्गी पदार्थ, त्या किरणोत्सर्गामुळे (कदाचित) फुटू शकेल अशी विषाने भरलेली कुपी आणि एक मांजर ठेवली आहे. क्वांटम सुपरपोझिशन संकल्पना गृहीत धरली असता ती मांजर एकाच वेळी जिवंत आणि मृत असू शकते !! हा झाला त्या ‘श्रोडिंगर्स कॅट’ संकल्पनेचा गाभा. पण या छोट्याश्या (भासणाऱ्या) कल्पनेशी खेळत, त्यात नवीन पैलू जोडत, वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करत, विविध शक्यता मांडत, या साऱ्याला एक मानवी नात्यांचा दृष्टीकोन देत दिग्दर्शक जेम्स वार्ड बिर्कीटने जो एक अफलातून प्रयोग रचला आहे त्याला खरंच तोड नाही.


मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप गेटटुगेदर पार्टीसाठी त्यांच्यातल्याच एका कुटुंबाच्या घरी जमतो. सुरुवातीला लक्षातही येणार नाही अशा छोट्या छोट्या घडत जातात पण त्यांचे परिणाम दूरगामी होणार असतात हे त्या पात्रांबरोबर आपल्याही लक्षात यायला लागतं. ‘श्रोडिंगर्स कॅट’ हा विचार मध्यवर्ती ठेवून ‘डोअर टू नोव्हेअर’ चा शिताफीने वापर करत ती सगळी पात्र हळूहळू आपल्या डोळ्यासमोरच ‘कॅट’ बनत जातानाचा एक अशक्य खेळ दिग्दर्शकाने खेळला आहे. काहीतरी गडबड आहे हे सगळ्यांनाच जाणवत असतं आणि जो तो आपापल्या परीने त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. निरनिराळ्या रंगांचे लाईट्स, फोटोज, आकडे, पुस्तक अशा समोरच दिसणाऱ्या साध्या गोष्टींचा वापर करत सगळेजण जराशी गडबडगोंधळ झालेली परिस्थिती आवाक्यात आणायचा प्रयत्न करत असतात. पण याच सगळ्या गोष्टींचा, पात्रांचा संथ गतीने गुंता होत होत परिस्थिती हाताबाहेर जायला लागते. या सगळ्या गुंत्यात पुन्हा लोकांची पूर्वायुष्यं, नातेसंबंधातले गैरसमज या पैलूंमुळे अजूनच बिकट अवस्था होत जाते. सुरुवातीला किंचित गुंतलेल्या, विचित्र वाटणाऱ्या घटना शेवटाकडे जाताजाता एवढ्या भयंकर स्वरूप धारण करतात की ‘श्रोडिंगर्स कॅट’ हा वैचारिक प्रयोग जर चुकून खरंच सत्यात उतरवला गेला आणि खरंचं बिनसला तर कुठल्या अवघड परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागेल या कल्पनेनेही आपण थरारतो.

कोहरन्स म्हणजे सुसंगतपणा जी सुरुवातीची काही मिनिटं सोडली तर चुकुनही कुठेच दिसत नाही. त्यामुळे या कल्पकपणे निवडलेल्या विरोधाभासी शीर्षकाबद्दल आपल्याला चित्रनिर्मात्यांचं नक्कीच विशेष कौतुक वाटून जातं. अर्थात त्यामुळे चित्रपटात घडणाऱ्या घटना, संवाद इत्यादींकडे आपल्याला अगदी बारकाईने लक्ष द्यावं लागतं. ज्याप्रमाणे ‘द प्रेस्टीज’ च्या टॅगलाईनमध्ये नोलन आपल्याला विचारतो “आर यु वॉचिंग क्लोजली?” अगदी तसंच. महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक लो बजेट साय-फाय आहे. बरेच कलाकार ओळखीचे नाहीत, काही प्रसंगी संवाद ओवरलॅपिंग आहेत, संवाद म्हणणाऱ्या पात्राकडे कॅमेरा असेलच असं नाही असे बरेच मुद्दे आहेत. पार्टीत जमलेल्या ग्रुपच्या तोंडी गप्पा मारताना अनेक तपशील येऊन जातात. त्यातले किती महत्वाचे, किती कथेला पुढे घेऊन जाणारे, किती उगाचंच आलेले असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो. अर्थात चित्रपटाचं हे स्वरूप जाणूनबुजून अंगिकारलेलं आहे हे निश्चितच.

एलियन्सचे हल्ले, त्याविरुद्ध पृथ्वीवासीयांनी आणि सुपरहिरोंनी दिलेले लढे किंवा परकीय जीवसृष्टी, टाईम-ट्रॅवल या सगळ्याचा कंटाळा आला असेल आणि ‘क्लोजली वॉचिंग’ करण्याची तयारी असेल तर या कोहरन्स रुपी विरोधाभासाचा आस्वाद आवर्जून घ्यायलाच हवा.

2 comments:

  1. खूप वेगळ्या चित्रपटाची ओळख झाली आज.उत्कंठा वाढेल अशी मांडणी केलीस. अजून सविस्तर लेख चालला असता.
    चित्रपट बघायलाच हवा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रसाद. आवर्जून बघ. मुद्दाम कमीत कमी स्पॉयलर्स देऊन लिहिण्याचा प्रयत्न केलाय. :)

      Delete