Sunday, August 12, 2012

टाईमक्राईम्स : (कुठल्याही मार्गाने) अस्तित्व टिकवण्याची धडपड !!


हा टाईम-मशीनचा चित्रपट आहे पण टिपिकल साय-फाय नाही. यात स्पेशल इफेक्ट्स नाहीत, अंतराळयानं नाहीत, उघडझाप करणारे दिवे असलेलं भव्यदिव्य टाईम-मशीन नाही. पात्रंही मोजून चार (किंवा पाच किंवा सहा). किंबहुना टाईममशीनच्या चमकदार करामती दाखवणं, चमत्कार दाखवून प्रेक्षकांचे डोळे दिपवणं हा उद्देशच नाही मुळी. माणसाच्या अस्तित्वाची धडपड दाखवणे हा खरा उद्देश. त्या ही पुढे जाऊन म्हणायचं तर काही क्षणांच्या अंतराने एका सामान्य माणसाचं रुपांतर किती अमानवी पशूत होऊ शकतं, तो किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे दाखवणं. पण कदाचित त्याक्षणी तरी आपल्याला तो करत असतो ते योग्यच वाटतं. कदाचित योग्य असेलही. कारण ती त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. अर्थात हे योग्य आहे की अयोग्य हे थेटपणे मांडणं दिग्दर्शक टाळतो. ते तो प्रेक्षकांवर सोपवतो.



चित्रपटाची कथा अतिशय छोटीशी आहे. पण आहे तेवढीच कथा वेगवेगळया कोनातून मांडणं, एका क्षणी योग्य वाटणारी घटना दुसऱ्याच क्षणी भयंकर वाटायला लावणं ही खरी दिग्दर्शकीय करामत आहे आणि त्यात दिग्दर्शक नाको विगालोंडो प्रचंड यशस्वी ठरतो. एका माणसाला त्याच्या घरासमोर काही अंतरावर काही संशयास्पद दिसतं म्हणून तो तिकडे जायला लागतो, तिकडे पोचून आजुबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करत असतानाच त्याच्यावर हल्ला होतो. हल्ला कोण करतं कळत नाही पण तो माणूस स्वतःचा जीव वाचवून तिकडून पळून जातो. शेजारच्या घरातला एक माणूस त्याला लपायला मदत करतो. तो त्याला एका मोठ्या कंटेनरमध्ये लपवतो. काही वेळाने कंटेनर उघडतो आणि एकेक घटना उलगडत जातात. त्याच्यासमोरचं जग बदललेलं असतं (जे त्याला ताबडतोब कळत नाही). हळूहळू गुंतागुंत उलगडत जाते. किंबहुना उलगडते आहे असं वाटायला लागतं. पण प्रत्यक्षात गुंतागुंत वाढत चाललेली असते.

एकाच व्यक्तीची एकापेक्षा अधिक रूपं (की व्यक्तिमत्वं), त्या प्रत्येकाचं एकमेकांपासून जीव वाचवत पळणं, एका व्यक्तीला काय घडतंय याची काही कल्पना नसणं, दुसऱ्याला पुसटशी असणं, आणि सगळं ठाऊक असल्याने परिस्थिती तिसऱ्याच्या पूर्णतः ताब्यात असणं हे सगळं दिग्दर्शकाने जबरदस्त दाखवलंय. हाती 'माहिती'रूपी शक्ती असल्याने आणि त्यामुळे इतरांना आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडणं किती सहज शक्य असतं हे आणि एखादी शक्ती चुकीच्या किंवा बेजवाबदार हाती पडल्यास कसा विनाश होऊ शकतो, किती जीव धोक्यात येऊ शकतात किंवा प्रत्यक्ष जाऊ शकतात हे दोन महत्वाचे मुद्दे तर मांडले आहेतच पण 'बळी तो कान पिळी' या नात्याने ताकदवान व्यक्ती (किंवा देश) आपलं अस्तित्व जपण्यासाठी इतर निष्पाप जीव (प्रसंगी आपल्या जवळचे) कसे बिनदिक्कतपणे डावावर लावू शकते ही स्वार्थी प्रवृत्तीही अधोरेखित केली आहे.

वर म्हंटल्याप्रमाणे टाईममशीन हे फक्त नावापुरतं आहे मूळ उद्देश माणसाची प्रसंगागणिक बदलणारी मानसिकता दाखवणं आणि खरं-खोटं, चूक-बरोबर, योग्य-अयोग्य यातल्या सीमारेषा किती पुसट असू शकतात हे मांडणं हाच या चित्रपटाचा प्रमुख उद्देश आहे. थोडक्यात काळावर स्वामित्व गाजवणारं टाईम-मशीन हाती येवो की इतर कुठलं सगळी सुखं पुरवणारं मशीन येवो, ते माणसाच्या मन नावाच्या मशीनपुढे सामर्थ्यहीनच !!

# नुकताच या अस्तित्वाच्या धडपडीविषयी आणि अमर्याद शक्ती हाती आल्यावर त्याचा दुरुपयोग करण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करणारा 'मून' ही नुकताच बघितला. त्याविषयीही लवकरच लिहीन.

7 comments:

  1. मायला हेरंब तू डिव्हीडी विकत बिकत घेऊन बघतो पिच्चर! ग्रेट आहेस तू!!

    ReplyDelete
    Replies
    1. आल्हाद, मी पण चकितच झालो ते डिव्हीडीचे टॅग बघून. ;)

      Delete
  2. हे छान, चित्रपटांची समीक्षा असणारा आता तुझाही ब्लॉग आहे म्हटल्यावर पर्वणीच.

    "[...]माणसाची प्रसंगागणिक बदलणारी मानसिकता दाखवणं आणि खरं-खोटं, चूक-बरोबर, योग्य-अयोग्य यातल्या सीमारेषा किती पुसट असू शकतात हे मांडणं[...]" - असेच तर चित्रपट आवडतात बघायला मला.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विशाल. मग तर तू हा चित्रपट नक्कीच बघितला पाहिजेस !

      Delete
  3. जबरदस्त परीक्षण .... लवकर पाहयचा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सचिन. नक्की बघ. नक्की आवडेल तुला.

      Delete