Wednesday, August 29, 2012

न भरलेली शाळा !

हॉलीवुडमध्ये किंवा एकूणच जागतिक चित्रपटसृष्टीत निर्माण होणारे चित्रपट हे सहसा एखाद्या कथा, कादंबरी, लघुकथा, दीर्घकथा, चरित्र/आत्मचरित्रपर पुस्तक वगैरे वगैरे अशा एखाद्या गोष्टीवर आधारित असतात. अगदी नियम असल्याप्रमाणे नेहमीच असं असतं असं नाही पण अनेक (यशस्वी/अयशस्वी दोन्ही) चित्रपटांच्या बाबतीत हे खरं आहे. कदाचित विपुल दर्जेदार साहित्य निर्मिती हे त्यामागचं एक महत्वाचं कारण असेल. पण नुसती दर्जेदार कथा/संकल्पना असून नक्कीच भागत नाही तर त्या कल्पनेला प्रेक्षकांना आवडण्यायोग्य रुपात पडद्यावर सादर करणं हे ही तेवढंच महत्वाचं असतं. नाहीतर चांगल्या संकल्पनेचा विचका होण्याची शक्यता असते. परंतु कल्पक किंवा/आणि अनुभवी दिग्दर्शक आणि पटकथालेखक हे त्या कल्पनेवर अफाट मेहनत घेऊन ती वाया जाणार नाही याची योग्य काळजी घेतात.

हे सगळं यशस्वीपणे जमून येण्यासाठी काही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. पहिला मुद्दा म्हणजे दीर्घकथा/कादंबरीत आढळणारी आणि त्या माध्यमाला आवश्यक असणारी अनेक पात्रं, प्रसंग, प्रसंगांची लांबी, संवाद इत्यादी चित्रपट माध्यमात रुपांतरीत करताना वगळावे लागतात (उदा डॅन ब्राउनचं एंजल्स अँड डेमन्स) तर एखाद्या लघुकथेचं पडदा माध्यमात रुपांतर करताना याच सगळ्या गोष्टी आवश्यक त्या प्रमाणात वाढवाव्या लागतात (उदा 'ममेंटो' ज्यावर आधारित आहे ती जोनाथन नोलन ची लघुकथा) तरच ती लघुकथा चित्रपट माध्यमाला शोभेशी बनू शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कधीकधी कादंबरीचा अवाका इतका मोठा असतो की प्रसंग, पात्रं इ. वगळूनही लांबी खूप अधिक होण्याची शक्यता असते. कधीकधी चित्रपटात कथेच्या दृष्टीने बरेच प्रसंग दाखवणं आवश्यक असतं, किंवा चित्रपटात दाखवल्या गेलेल्या काळाचा अवाका फार विस्तृत असतो आणि त्यामुळे बरेचसे प्रसंग वगळून किंवा त्यात काटछाट करून चालत नाही अशावेळी मग पर्याय म्हणून निवेदकाची मदत घ्यावी लागते (उदा फॉरेस्ट गंप, बिग फिश). बरेच प्रसंग, संवाद, "कोणाला काय वाटलं" किंवा "कुठलं पात्र कोणाला काय म्हणालं" हे तपशीलवार दाखवण्याऐवजी निवेदकाच्या चार ओळीत दाखवून भागतं.



या सगळ्याच्या तुलनेत मराठी (आणि हिंदीतही) तयार होणारे फार कमी चित्रपट हे एखाद्या पुस्तकावर/कथेवर आधारित असतात. उदा. सिंहासन, निशाणी डावा अंगठा, श्वास आणि सगळ्यांत ताजं उदाहरण म्हणजे डॉ. मिलिंद बोकील यांच्या शाळा कादंबरीवर सुजय डहाके दिग्दर्शित त्याच नावाचा चित्रपट. पण दुर्दैवाने इतक्या उत्तम पुस्तकावर आधारित असलेला हा चित्रपट अनेक आघाड्यांवर साफ फसतो. याच्या काही महत्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे पुस्तकात असलेला प्रत्येक प्रसंग, पात्र चित्रपटात जसंच्या तसं दाखवण्याचा दिग्दर्शकाचा अट्टहास !! या नादात बरेच प्रसंग अगदी छोटे छोटे आणि तुटक वाटतात किंवा काही पात्रांचं संपूर्ण चित्रपटभर मिळून जेमतेम दहा मिनिटं दर्शन होतं. कारण दिग्दर्शक निवेदकाची मदत घेत नाही की प्रसंगांची, पात्रांची, संवादांची संख्या आणि लांबीही (आवश्यक तिथे) कमी करत नाही.

चित्रपट फसण्याला कारणीभूत ठरणारा अजूनही एक महत्वाचा मुद्दा आहे. शाळा कादंबरी वरवर पाहता एका पौगंडावस्थेतल्या मुलाचं शाळेतलं प्रेमप्रकरण आणि आणीबाणी या दोनच गोष्टींभोवतो गुंफलेली आहे.त्यामुळे जवळपास प्रत्येक प्रसंगात एकतर प्रेमकथा किंवा मग आणीबाणी या दोन गोष्टींचे उल्लेख अगदी ठसठशीतपणे येतात. पण प्रत्यक्षात मात्र लेखकाने प्रेमकथेच्या आड लपून चुकीच्या सामाजिक रुढी, प्रथा, राजकारण, लिंगभेद, जातीभेद इत्यादींवर केलेले छुपे पण खणखणीत प्रहार पुस्तकाचं आवश्यक ते 'रीडिंग बिटविन द लाईन्स' न केल्याने दिग्दर्शक पडद्यावर दाखवतच नाही. चित्रपटात फक्त प्रेम आणि आणीबाणी हे दोनच मुद्दे ठळकपणे दिसतात पण बाकीच्या समस्यांचा गंधही नसतो याचं कारण म्हणजे तेवढेच दोन मुद्दे कादंबरीतही ठळकपणे येतात. बाकीच्या समस्यांवर लेखक कादंबरीतल्या मुकुंद जोशी या प्रमुख पात्राच्या आत्मकथनातून, स्वगतातून अनेक वेळा भाष्य करतो ज्याकडे दिग्दर्शक आणि पटकथाकार या दोघांचंही अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे पुस्तकात येणारा अथर्वशीर्ष पठणाबद्दलचा आणि त्या अनुषंगाने दैववादी वृत्तीवर आणि छुप्या जातीवादावर केलेला प्रहार त्यांना दिसतच नाही. बेंद्रे बाई आणि मांजरेकर सर यांच्यातल्या वेळोवेळी केलेल्या तुलनेच्या अनुषंगाने समाजाचा स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्याद्वारे लिंगभेदावर ओढलेला कोरडा त्यांना ऐकूच येत नाही. निव्वळ परीक्षार्थी तयार करायला मदत करणाऱ्या आपल्या यांत्रिक शिक्षणपद्धतीवर केलेली टीका त्यांना जाणवतच नाही.

खरं तर या तीन मुद्द्यांत 'शाळा' चित्रपटाचं परीक्षण पूर्ण व्हायला हवं. पण ज्या प्रेमकथेवर चित्रपटाने संपूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यातल्या काही महत्वाच्या प्रसंगांचाही कसा पूर्णपणे बोजवारा उडालेला हे थोडक्यात सांगतो. जोशी प्रेमपत्र लिहुन शिरोडकरला देवळात भेटायला बोलावतो हा प्रसंग बोकीलांनी विलक्षण हळुवारपणे चितारलेला आहे. म्हणजे पहिल्या प्रेमपत्रातली हुरहूर, नायिकेला काय वाटेल, ती काय म्हणेल याची भीती, ती रागावणार तर नाही ना किंवा इतरांना सांगणार तर नाही ना याची काळजी, चिठ्ठी मिळाल्यावर ती काय करेल यातली अनिश्चितता असे पहिल्या प्रेमपत्रातले सगळे कंगोरे त्या प्रसंगात आहेत. आणि जसजसा प्रसंग उलगडत जातो तसंतसं आपलंही टेन्शन वाढत जातं. शेवटी काय होईल काय होईल अशा विचारात असतानाच देवळात लवकर जाऊन लपून बसून शिरोडकरची वाट बघत बसलेल्या मुकुंदाला अचानक देवळात शिरणाऱ्या शिरोडकरचं दर्शन होतं आणि त्याच्याबरोबरच आपलाही जीव भांड्यात पडतो. आपणही सुखावून जातो.

अन्य प्रसंग कादंबरीत दाखवल्याप्रमाणे जसेच्या तसे घेण्याच्या नादात असलेल्या डहाकेने हा एक प्रसंग कादंबरीतल्याप्रमाणे जसाच्या तसा घेतला असता तर काय बहार आली असती. पण नेमका हाच प्रसंग अगदी उलट्या क्रमाने दाखवून दिग्दर्शकाने त्यातली जानच काढून घेतली आहे. म्हणजे शिरोडकरला प्रेमपत्र दिल्यानंतरच्या अगदी लगेचच्या प्रसंगात आपल्याला थेट दिसते ती देवळात प्रवेश करणारी शिरोडकर.. पण मग दरम्यानची हुरहूर, अनिश्चितता, छातीतली धडधड, ओळखीचं कोणी भेटणार तर नाही ना याची भीती, देवळात लवकर जाऊन लपून वाट पाहणं इत्यादी सगळ्याचं काय झालं??? कारण चित्रपटात हे टप्पे दुर्दैवाने येतच नाहीत :(

कादंबरीतले सगळे प्रसंग चित्रपटात दाखवण्याच्या अट्टहासापायी अजून एक महत्वाचं नुकसान होतं ते म्हणजे जोशी, शिरोडकर आणि सुऱ्या ही पात्रं वगळता बाकीची पात्रं धड उभीच राहत नाहीत. कारण त्यांच्या व्यक्तिरेखा दाखवण्याइतका वेळच शिल्लक नसतो. त्यामुळे फावड्याची गरिबी, त्याचं क्रीडानैपुण्य, चित्र्याची हुशारी, घरातल्या भांडणांमुळे आणि इतर विचित्र अनुभवांमुळे त्याचं मुद्दाम घराबाहेर वेळ घालवत राहणं, बेंद्रेबाई आणि मांजरेकर सर यांच्यातली सततची तुलना यातल्या एकाही मुद्द्याला साधा स्पर्शही केला जात नाही.

पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदातलं मुकुंदाचं स्वगत अतिशय रखरखीत आहे. सगळी स्वप्नं उध्वस्त झाली आहेत, मित्र दुरावलेत, आवडणारी मुलगी दुरावली आहे अशा नैराश्याने भरलेल्या वातावरणात ते स्वगत सुरु होतं आणि समोर आ वासून उभ्या असलेल्या दहावीच्या वर्षाच्या उल्लेखाने अतिशय परिणामकारकरीत्या संपतं. याउलट संपूर्ण चित्रपटभर मात्र एकही वाक्य स्वगतात किंवा निवेदकाच्या मदतीने आलेलं नसताना शेवटच्या प्रसंगात अचानक खडकांवर बसलेल्या मुकुंदाला पुस्तकातलं तेच स्वगत सुरु करताना पाहून त्याच्याबद्दल वाईट वाटायच्या ऐवजी उलट तो प्रसंग (दुर्दैवाने) विनोदी वाटतो

आवर्जून उल्लेख करण्याजोग्या गोष्टी म्हणजे सगळ्याच बालकलाकारांचा सहज वावर, त्यांच्या चेहऱ्यांवरचे फ्रेश लुक्स आणि प्रसन्न छायाचित्रण. पण दुर्दैवाने पटकथा आणि दिग्दर्शनातल्या अक्षम्य चुकांमुळे या चांगल्या गोष्टींचा म्हणावा तसा प्रभावच पडत नाही. थोडक्यात पुस्तकातून आपल्या मनात 'भरलेली' शाळा पडद्यावर मात्र भरतच नाही !!!

टीप : सदर परीक्षण 'सकाळ' च्या दिनांक २१ नोव्हेंबरच्या कोल्हापूर पुरवणीत छापून आलं होतं.

29 comments:

  1. एकुणएक ओळ पटली.. पुस्तक वाचल्यावर (अनुभवल्यावर) सिनेमा बेचव वाटतो... तरीही जोशीच्या उत्तम अभिनयामुळे अन शिरोडकरच्या फ्रेश लूक मुळे बर्‍यापैकी प्रेक्षणीय होतो... आपण आधी एकदा बोलल्याप्रमाणे 'डेक्स्टर' प्रमाणे निवेदन असतं तर बहार आली असती.. अर्थात त्याशिवायही योग्य स्क्रीनप्ले (पठकथा?) सह सिनेमा सजवता आला असता....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आनंदा..

      >> 'डेक्स्टर' प्रमाणे निवेदन असतं तर बहार आली असती.

      अगदी.. मलाही तसंच वाटत होतं सतत :)

      Delete
  2. Very well written..
    Movie was more about cinematography than contents.
    So,
    Missing to see all that you described at Shala period 2.

    ReplyDelete
    Replies
    1. Yupp Yogesh. Rightly said.. They have concentrated only and only on cinematography !

      Delete
  3. >>>एकुणएक ओळ पटली.. पुस्तक वाचल्यावर (अनुभवल्यावर) सिनेमा बेचव वाटतो... तरीही जोशीच्या उत्तम अभिनयामुळे अन शिरोडकरच्या फ्रेश लूक मुळे बर्‍यापैकी प्रेक्षणीय होतो...

    +१
    शेवटाबद्दलचं मत तर अगदी पटलं हेरंबा... शेवटी पुस्तक जी एक पोकळी, अवकाश निर्माण करते तसं काहीही सिनेमात होत नाही :(

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर बोललीस. शेवटी येणारी ती अगतिकता, नैराश्य, पोकळी काहीच जाणवत नाही चित्रपटात. एवढा हृदयस्पर्शी प्रसंग विनोदी करून ठेवलाय :(

      Delete
  4. चित्रपट अंशुमन आणि केतकीच्या अभिनयामुळे आवडला. देवळातला प्रसंग नक्कीच जसाच्या तसा दाखवायला हवा होता. ज्यांनी कादंबरी वाचली नाहीये त्यांच्यासाठी चांगला आहे. पण तुकड्या-तुकड्यांचा जोडल्यासारखा वाटला मात्र अगदीच....

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी सहमत. खरं तर मी हे लेखात लिहिणार होतो पण राहून गेलं. चित्रपट एवढा तुकड्यातुकड्यात आहे की निम्म्या गोष्टी कळतच नाहीत. पुस्तक वाचलं असेल त्यांनाच जरा लिंक लागू शकते. पण पुस्तक न वाचलेल्यांना बऱ्यापैकी गोंधळल्यासारखं होईल. अर्थात पुस्तक वाचलं नसल्याने आपण काय आणि किती मिसतोय हे ही त्यांना कळणार नाही ही दुसरी गोष्ट !

      Delete

  5. मी पुस्तक वाचलं आहे आणि चित्रपट पाहिलेला नाही. आणि पुस्तक आवडल्याकारणानेच चित्रपट पहावासा वाटला नव्हता. कारण पुस्तकाने मला माझे कल्पनाशक्तीचे सामर्थ्य मुक्तपणे वापरण्यासाठी वाव दिला होता. मग चित्रपट बघून त्यावर दिग्दर्शकाची भिंत नाही उभी करावीशी वाटली. :)

    ReplyDelete
    Replies
    1. निवांत पहा.. मला फरक पडला नाही दिग्दर्शकाच्या भिंतीचा :-)

      Delete
    2. चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. पण पुस्तकाच्या तुलनेत तो कुठेच नाही हे मनाला बजावून ठेवून मगच बघ !

      Delete
    3. अरे होतं काय की वेळ खूपच कमी लागतो हाताशी. मग अगदी आवर्जून बघावेसे वाटणारेच चित्रपट बघितले जातात. मात्र मराठी चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी मी उलटसुलट करून जात असते...पण तरी सगळेच बघितले नाहीच जात ! 'तुकाराम', देऊळ...हे असे राहून गेलेले चित्रपट ! :(

      Delete
    4. बाकी काही बघितलं नाहीस तरी चालेल पण देऊळ मस्ट मस्ट मस्ट वॉच आहे.. बघच !!!!!!

      Delete
  6. I think the content if the book could've been easily compiled into the 2hr visualisation.But that overall compilation becomes pretty messy when you watch the film.the intensity and soul the Bokil's book have is pretty easily erased leaving you with nothing but a fact to think that you're school life was much better,a perfect contrary to what Bokil's story in which you want to live the character.Another thing I want to mention that when movie is being made from book,there is always a money shot you want see on screen.There was 1-2 such scenes but again as you mentioned the intensity of feeling the emotion is just taken out by director.But still I will accolade Sujay Dahake for his effort, because first film is masterpiece of only legendary directors and he proved to be a just a plain marathi movie director wotherwise this was an opportunity to get placed instantly with great directors in marathi industry

    ReplyDelete
    Replies
    1. I agree with every point you mention except accolading Sujay Dahake. Even if it's his or anybody's first film, they ought to be extremely careful not to 'lose in transition' while converting from print media to screen media. He had screwed up the extra ordinarily great work of Bokil and I don't want to give Dahake even a benefit of doubt ! He should have chose the book wisely !

      Delete
  7. हेरंब अतिशय संतुलित पोस्ट.
    ९० % कास्टिंग सुरेख करूनही हा चित्रपट फ़सलाय हे दुर्दैव. मला काही चित्रपटनिर्मितीतलं फ़ारसं कळत नाही पण एक उगाच किडा चावला की दिग्दर्शक आणि मूळ लेखक यांची बोलणी होत असतील की नाही जिथे हे छुपे वार इ. लेखकाने दिग्दर्शकाला आधीच जाणीव करून द्यायला हवं होतं? असो..
    हा चित्रपट पाहून माझ्या नवर्‍याला कधी नव्हे ते मूळ पुस्तक वाचायला हवं होतं असं वाटलं हेही नसे थोडके (आमच्यासाठी)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अपर्णा. बहुतेक तरी मूळ लेखक आणि दिग्दर्शक यांचं बोलणं झालेलं नसावं. अन्यथा एवढ्या भल्या थोरल्या चुका झाल्याच नसत्या !

      >> हा चित्रपट पाहून माझ्या नवर्‍याला कधी नव्हे ते मूळ पुस्तक वाचायला हवं होतं असं वाटलं हेही नसे थोडके (आमच्यासाठी)

      अरे वा.. इष्टापत्तीच !!!

      Delete
  8. Movie itka effective nahiye for sure... pan to pahun jar loka pustak hatat ghenar astil tar... te sudhha mastach ahe ki :)

    ReplyDelete
    Replies
    1. संतोष, हो नक्कीच.. हा फायदा नक्कीच आहे :)

      Delete
  9. Heramb cha article pan wachala, Shala warcha... tyatlya khacha kocha atta kuthe lakshat alya ;)

    Pan Shala - Movie madhe he sagalech mudde like "Jati Pati" "Bhedbhaw" wishayak barakawe nahiyet... te eka arthane barach nahiye ka???

    Nidaan te new generation kade tari transfer honaar nahit na :)

    Ani Movie ha tya madhyamachya limits madhe uttam ahech ki Rao... Nahi ka???

    ReplyDelete
    Replies
    1. >> Nidaan te new generation kade tari transfer honaar nahit na :)

      असहमत. नवीन पिढीला अशा समस्यांपासून लपवून ठेवून त्या समस्या नाहीशा होणार नाहीयेत. आपण नाही सांगितलं तरी कुठून ना कुठून तरी कळणारच. आणि मुख्य म्हणजे असंच काहीतरी दाखवायचं असेल तर इतर हजारो टुकार पुस्तकं पडलीयेत की. शाळा सारख्या चांगल्या पुस्तकाची वाट का लावावी? सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे सुजयने तुम्ही म्हणताय त्या मुद्द्यासाठी जातपात/भेदभाव दाखवला नाहीये हा मुद्दाच मला पटलेला नाही. सुजयला हे मुद्दे कळलेच नाहीयेत !

      >> Ani Movie ha tya madhyamachya limits madhe uttam ahech ki Rao... Nahi ka???

      अजिबातच नाही. चित्रपट माध्यमाच्या मर्यादा गृहीत धरूनही हा चित्रपट पुस्तकात दाखवलेल्या समस्या मांडायला जाऊ दे त्यांना साधा स्पर्श करायलाही फसलेला आहे !

      Delete
    2. Agadi Sahamat... Attta nakkich ujed padala!!! ;)

      Dhanyawaad :)

      Delete
    3. :) .. धन्यवाद संतोष.

      Delete
  10. अगदी मनातलं बोललास हेरंब.. पुस्तक वाचल्यावर आणि ट्रेलर पाहिल्यावर बर्याच अपेक्षा होत्या.. पण तू लिहिलस तसं निवेदकाची गरज मात्र सबंध चित्रपटात जाणवत राहिली..
    ज्याना काहीच माहिती नाही पुस्तकाबद्दल त्यातल्या बऱ्याच जणांसाठी तर 'लाईन' आणि 'सुममध्ये बघणं ' एवढीच चित्रपटाची आठवण म्हणून राहिल्यासारखं वाटतंय..

    असो तरी या पुस्तकाच्या हिंदी (हमने जीना सिख लिया) आवृत्तीपेक्षा बराच बराच चांगला म्हणायचा मराठी चित्रपट..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सचिन. ज्यांनी पुस्तक वाचलं नाहीये त्यांना अज्ञानातलं सुख नक्कीच आहे पण तरीही बऱ्याच गोष्टींचा नीट संदर्भही लागणार नाही. असो.

      'हमने जीना सिख लिया' तर अपार वाईट आहे असं ऐकलंय मी.

      Delete
  11. पुस्तक आणि त्यावरील चित्रपट यात नेहमीच पुस्तकच उजवे ठरते. शाळाही त्याला अपवाद नाहीच. किंबहुना चित्रपट येतोय हे कळले तेव्हांच हेही माहीत होतेच तरीही चित्रपट पाहणे क्रमप्राप्तच!

    मुळात दिग्दर्शकाने येणार्‍या प्रत्येकाने ’ शाळा ’ वाचलेले असेल हे गृहित धरल्यासारखे वाटते. :)

    हेओ, तुझ्या त्या दोन्ही पोस्ट आणि ही पर्फेक्ट !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रीताई. खरंय. दिग्दर्शकाने प्रेक्षकाला फारच गृहीत धरलंय असं जाणवतं. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकातल्या अनेक खाचाखोचा त्यालाही कळलेल्या नाहीत :(

      Delete