Saturday, August 4, 2012

भांडवलदारी मानसिकतेची गोष्ट ! : "एस इन द होल"

- गुवाहाटीसारख्या राजधानीच्या शहरात एका तरुणीचा हमरस्त्यावर १०-१५ माणसांकडून विनयभंग केला जातो. हे तब्बल अर्धा तास चालू असतं. त्याचं राजरोसपणे शुटींग केलं जातं. एका क्लिकसरशी त्या घटनेच्या क्लिप्स युट्यूबवर पाहायला मिळतात. आणि चार दिवसांनी कळतं हे सगळं ठरवून केलं गेलेलं होतं. एक वाहिनी, काही पत्रकार आणि हल्ला करणारे यांच्या संगनमताने हे घडवण्यात आलं होतं. पण यासाठी जिला डावावर लावलं गेलं त्या मुलीच्या आयुष्याचा, तिला बसलेल्या प्रचंड मानसिक धक्क्याचा कोणी विचारच केलेला नसतो !!

- राष्ट्रध्वजाची अवहेलना केली म्हणून एका मॉडेलची गाडी भररस्त्यात अडवून तिला मारहाण केली जाते. दोन दिवसांनी कळतं या सगळ्या प्रकारात ती मॉडेल स्वतःच सामील असते !

- अशाच प्रकारे फॅशन शो मध्ये एखाद्या मॉडेलचे कपडे भरस्टेजवर गळून पडतात किंवा एखाद्या तथाकथित नेत्याच्या तोंडाला काळं फासलं जातं.

- काय आणि किती प्रसारित करावं याचा विधिनिषेध न बाळगता सरसकट सगळ्या बातम्या टीव्हीवर दिल्याने २६ नोव्हेंबरच्या ताज हल्ल्याच्या दरम्यान अतिरेक्यांना टीव्ही वाहिन्यांची अप्रत्यक्षरित्या भरपूर मदत होते.

"खरं काय, खोटं काय, त्याचे परिणाम काय होतील, दुष्परिणाम असतील तर किती भयानक किंवा किती खोल होतील, ही बातमी देऊन आपण योग्य करतोय का, ही बातमी देण्याची खरोखरच आवश्यकता आहे का?" हे आणि असे तमाम प्रश्न खरं तर कुठलीही ब्रेकिंग किंवा अगदी नॉनब्रेकिंग न्यूज देतानाही प्रत्येक पत्रकाराने, किंवा वाहिनीच्या/वृत्तपत्राच्या संपादकाने स्वतःला विचारून पाहायला हवेत आणि त्याचं समाधानकारक उत्तर आलं तरच बातमी प्रसारित केली जावी. परंतु फार थोडे पत्रकार/संपादक एवढा खोलात जाऊन विचार करत असावेत. त्यांना बातमी विकली जाण्याशी आणि टीआरपी रेटिंग वाढण्याशी मतलब असतो मग भलेही त्याचे कितीही वाईट परिणाम होवोत किंवा भलेही एखाद्याच्या जीवावर बेतो. आणि हे आजच घडतंय असं नाही. फार पूर्वीपासून चालू आहे. आणि हे सगळं अतिशय तपशीलवार आणि अत्यंत चपखल पद्धतीने मांडतो तो ग्रेट बिली वाईल्डरचा 'एस इन द होल' हा चित्रपट !

न्यूयॉर्क, शिकागो सारख्या मोठमोठ्या शहरांत पत्रकार म्हणून काम केलेला परंतु निष्काळजी किंवा बेफिकिरीमुळे तिथून काढून टाकण्यात आलेला आणि त्यापायी अक्षरशः रस्त्यावर आलेला धूर्त चक टेटम (कर्क् डग्लस) फिरत फिरत न्यूमेक्सिकोतल्या आल्ब्कर्की शहरातल्या एका छोट्याशा स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयात येऊन थडकतो. तिथेही नोकरी मागताना नम्रपणाचा लवलेशही वागण्यात न येऊ देता आपण या छोट्याशा पेपरात स्वतःहून नोकरी करायला तयार झाल्याने त्या वृत्तपत्रावर एका प्रकारे किती थोर उपकार करत आहोत असाच आव त्याच्या वागण्यात असतो. तरीही तिथला संपादक टेटमच्या वागण्याबोलण्यातल्या बिनधास्तपणामुळे त्याला नोकरी देतो. सनसनीखेज, ब्रेकिंग न्यूजच्या शोधात असलेल्या आणि त्याद्वारे आपलं करिअर मार्गी लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या चक ला आल्बकर्की सारख्या छोट्या शहरात अर्थातच विशेष काही मिळत नाही. वर्षभर असं अळणी जीवन जगल्यावर एक दिवस चित्र पालटतं. एक छोटीशी स्थानिक स्पर्धा कव्हर करायला निघालेले टेटम आणि त्याचा सहकारी फॅन पेट्रोल भरण्यासाठी म्हणून एस्कडेरो नावाच्या एका खेड्यात थांबतात. तिथे जवळच ४०० वर्षं जुन्या अमेरिकन-इंडियन्सच्या गुहा असतात. थोड्या चौकशीनंतर त्यांना कळतं की त्या गुहांमध्ये त्या पेट्रोलपंपाचा मालक लिओ अडकलेला असतो. टेटमला यात सनसनीखेज बातमीचा वास येतो आणि तो स्थानिक पोलिसाशी भांडून त्या गुहेत उतरायला सज्ज होतो. गुहेत अडकलेल्या लिओपर्यंत तो पोचतो, त्याला धीर देतो आणि त्यानंतर लगेच त्याचे फोटोही काढतो. फोटो आणि बातमी तो आपल्या वृत्तपत्राला पाठवतो. एव्हाना त्याच्या डोक्यात एक कल्पना आकाराला यायला लागलेली असते. तो तिथल्या भ्रष्ट शेरीफशी बोलणी करून निवडणुकीत त्याला पुन्हा निवडून येता येईल एवढी ताकद या बातमीत आहे हे त्याच्या डोक्यात पक्कं ठसवतो आणि अर्थात त्याबदल्यात अन्य कुठल्याही वृत्तपत्राच्या पत्रकाराला त्या परिसरात प्रवेश करायला बंदी घालण्याची मागणी करतो. दरम्यान लिओला तपासायला आलेल्या डॉक्टरांकडून टेटमला हे कळतं की औषधं आणि इंजेक्शनच्या बळावर लिओ निदान एक आठवडा तरी नक्की राहू शकेल. त्याप्रमाणे टेटम त्याचा प्लान अजून विस्तारतो.

स्थानिक कंत्राटदाराच्या मते गुहेत शिरून, तिथले खचलेले दगड, माती वगैरे बाजूला करून १६ तासात अडकलेल्या माणसाला बाहेर काढणं शक्य असतं. अधिक प्रयत्न केले तर कदाचित १२ तासातही. परंतु ही बातमीजेवढी जास्त ताणली जाईल तेवढं संधीसाधू टेटम आणि भ्रष्ट शेरीफ या दोघांच्याही दृष्टीने फायद्याचं असतं. त्यामुळे शेरीफला हाताशी धरून कंत्राटदाराला एक वेळखाऊ उपाय वापरायला भाग पाडायचं ठरतं. तो उपाय म्हणजे टेकडीला वरून मोठं छिद्र पाडून त्यातून लिओपर्यंत पोचायचं. आपल्या सनसनीखेज बातमीच्या हव्यासापायी आणि करिअर घडवण्यासाठी आपण १२ ते १६ तासांत बाहेर काढता शक्य असलेल्या एका निष्पाप जीवाला आठवडाभर जमिनीखाली, त्या दगडामातीत, यातनांमध्ये अडकवून ठेवतोय आणि हे कदाचित त्याच्या प्राणावरही बेतू शकेल याचा विधिनिषेध ना टेटम बाळगतो ना शेरीफ. स्वतःच्या फायद्यासाठी एक जीव डावावर लावला जातो. त्या सततच्या घाव घालण्याच्या आवाजाने लिओला जीव नकोसा होतं. डोकं फुटायची पाळी येते. पण तरीही टेटम त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो आणि उलट त्याचा मित्र असल्याचा आव आणत राहतो.

बघता बघता ती ब्रेकिंग न्यूज प्रमाणाबाहेर मोठी होते. टेटम रातोरात स्टार बनतो. आता बातमीचे सगळे तपशील फक्त आणि फक्त टेटमकडे असतात आणि त्याला शेरीफची पूर्ण साथ असते. शेरीफचे फोटो स्थानिक पेपरात प्रसिद्ध करून तो या सुटकेच्या प्रयासात कशी महत्वाची मदत करत आहे हे तपशीलवारपणे लिहून शेरीफची प्रतिमा उजळ करत राहतो. एकीकडे लिओचे वडील त्याला सर्वतोपरी मदत करतात. त्याला चांगल्या रूममध्ये हलवतात, त्याच्या आणि फॅनच्या जेवण्याखाण्याची, राहण्याची सोय करतात.

दरम्यान त्या परिसराला एखाद्या जत्रेचं स्वरूप आलेलं असतं. जिथे एके काळी कुत्रंही फिरकत नसतं अशा ठिकाणी शकडो गाड्या, हजारो लोक, पाळणे, मेरी गोराउंड, पॉपकॉर्न, फुगे, आईस्क्रीम, हॉटडॉग आणि इतर खाद्यपदार्थ यांची नुसती रेलचेल उडते. लिओच्या नावाने गाणी लिहिली जातात, मोठमोठ्या आवाजात गायली जातात आणि त्या गाण्याच्या कॉपीज विकल्याही जातात !!!!!!!!

टेकडीच्या प्रवेशद्वाराशी असलेला दिवसागणिक बदलत जाणाऱ्या किंमतीचा बोर्ड. अधिकाधिक भावनाशुन्यतेच्या आणि संवेदनाहीनतेच्या दिशेने होणारा प्रवास !!


विकणारा चतुर असला की वस्तू विकली जातेच पण अर्थात त्यामुळे यात सर्वस्वी दोष केवळ विक्रेत्याचा आहे असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. कारण केवळ विक्रेताच नव्हे तर (बातमी) आंधळेपणे विकत घेणाराही (म्हणजे आपण सगळेच) तेवढाच दोषी असतो.

ज्या टेकडीतल्या गुहेमध्ये कित्येक तास लिओ अडकलेला असतो त्याच टेकडीच्या माथ्यावर शेरीफला निवडणुकीत मत देण्याविषयीची जाहिरातबाजी केली जाते. अधिकाधिक भावनाशुन्यतेच्या आणि संवेदनाहीनतेच्या दिशेने होणारा प्रवास. प्रत्येक पाउल विनाशाच्या दिशेने नेणारं. त्याची टेटमला तूर्तास कल्पना नसते इतकंच. अर्थात कल्पना नसली तरी आपण जे करतोय ते खचितच योग्य नव्हे हे त्याला नक्कीच माहीत असतं. परंतु स्वतःच्या करिअर, पैसा, प्रसिद्धी, जुने हिशोब चुकते करणे इत्यादी सगळ्यांच्या पुढे सदसद्विवेकबुद्धी अर्थातच गहाण ठेवली जाते !

एकदा सगळ्या गोष्टी मुठीत आल्यानंतर टेटम स्थानिक वृत्तपत्रातली नोकरी सोडतो. कारण त्याला त्याच्याकडची बातमी शिकागो/न्युयॉर्कमधल्या मोठ्या वृत्तपत्रांना विकायची असते, जुने हिशेब चुकते करायचे असतात, न्युयॉर्कच्या वृत्तपत्रातली जुनी नोकरी परत मिळवायची असते. अजाणतेपणीही तो एवढा खाली घसरत जातो, इतका खाली उतरतो की एका क्षणी होऊ नये तेच होतं !

चित्रपटातल्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी म्हणजे कर्क् डग्लसचा अप्रतिम अभिनय आणि संवादफेक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत धारदार संवाद. काही उदाहरणं देतो.

- Bad news sells best because good news is no news !

- Human Interest !!!You pick up the paper, you read about 84 men or 284 or a million men like in the Chinese famine.... You read it, but it doesn't stay with you... One man's different. You wanna know all about him. That's human interest.

- You know, in the army I was plenty scared, too. Only in the army, it's different. There, everybody's scared !!

चित्रपट पाहताना आपल्याला अक्षरशः अनंत मानसिक यातना होतात. खोल धुळीत खड्ड्यात अडकलेली एक असहाय व्यक्ती, त्याच्या जीवावर स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी चाललेले अश्लाघ्य प्रकार आणि हे सगळं त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना अंधारात ठेवून !! हे सारं पाहताना अक्षरशः प्रचंड घुसमटायला होतं, त्रास होतो, वेदना होतात !! कदाचित लिओ इतक्याच. पण तरीही हे थांबत नाही. बाजारीकरणाचे अजून नवीन नवीन प्रकार चालूच राहतात. आणि हे इतक्या शिगेला पोचतं की आपल्याला वाटतं की कधी संपणार हे माणुसकीवरचे घाव? कधी थांबणार हे वार ?

या चित्रपटाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा कधीच जुना होणार नाही. यात जी मानवी प्रवृत्ती दाखवली आहे ती पन्नाससाठ वर्षांपूर्वी जशी होती तशीच आजही आहे किंबहुना अनेक पटींनी बिघडलीही आहे. थोडक्यात त्यामुळे हा इतका जुना असलेला चित्रपट आजही अगदी आजचाच वाटतो याच्याबद्दल दिग्दर्शक बिली वाईल्डरच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटत राहतं आणि तितकंकच आपल्या घसरत चाललेल्या मनोवृत्तीचं वाईट वाटत राहतं. भविष्यात कधीतरी असा एक दिवस येवो की हा चित्रपट आजचा न वाटता जुना वाटो अशी भाबडी अपेक्षा बाळगत राहणं एवढंच शेवटी आपल्या हाती आहे!

11 comments:

  1. खरच सिनेमा पाहताना अनंत यातना होतात.

    आपल्याकडे पिपली लाईव्ह बनवलाय यावरुन.

    :सपा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सपा.

      आत्ता पोस्ट लिहिताना पुन्हा बघत असताना तर अजिबातच बघवत नव्हता !

      'पिपली लाईव्ह' ची रूपरेषा माहिती आहे साधारण. पण बघितला नाहीये. आता बघतो.

      Delete
  2. छान ओळख करून दिली. या कथेत मोठा तथ्यांश आहे. वाईट आहे एकूण परिस्थिती.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद देविदास. नक्की बघा. वर्णन वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष चित्रपट पाहणं फार भयंकर अनुभव आहे.

      Delete
  3. Replies
    1. धन्यवाद सुहासशेठ :)

      Delete
  4. I have seen Peepli Live. Must be based on this one.

    ReplyDelete
    Replies
    1. Oh ok.. I got to see PL now.

      BTW, you have to watch this. it's a must watch !!

      Delete
  5. 'भविष्यात कधीतरी असा एक दिवस येवो की हा चित्रपट आजचा न वाटता जुना वाटो अशी भाबडी अपेक्षा बाळगत राहणं एवढंच शेवटी आपल्या हाती आहे!'

    असे काही होणे कठीण आहे. आजच्या घटकेला जाहिरातक्षेत्रात काम करताना देखील 'Problem हा Opportunity' मध्ये आम्हीं बदलून घेत असतो. मला वाटतं मानसिकता तिथेही तीच आहे.
    आणि पहिल्यांदाच तू उल्लेख केलेला चित्रपट मी बघितलाय ! 'पिपली लाएव्ह' मी पाहिलाय. :)

    ReplyDelete
    Replies
    1. होय अनघा. सहमत. कठीण आहेच.. प्रचंड कठीण आहे. म्हणून मी भाबडी म्हटलं.

      >> आणि पहिल्यांदाच तू उल्लेख केलेला चित्रपट मी बघितलाय ! 'पिपली लाएव्ह' मी पाहिलाय.

      :))))) आणि मी 'पिपली लाईव्ह' नाही बघितलाय अजून :( .. लवकरच बघतो.

      Delete
    2. परवा बघितला पिपली लाईव्ह. सही आहे. आवडला. कल्पना बऱ्यापैकी Ace in the Hole वरून उचलली आहे हे नक्कीच.

      Delete