Sunday, October 14, 2018

कोरिअन सूडपटाच्या वळणाने जाणारी 'आज्जी'



अनेकदा चित्रपटांची पोस्टर्स फार बोलकी असतात. एका छोट्याश्या चित्रात संपूर्ण चित्रपटाचा पोत मांडणारी, एक वातावरण निर्मिती करणारी किंवा प्रेक्षकाला समोर काय बघायला मिळणार आहे याचं निमिषार्धात वर्णन करणारी. ‘आज्जी’ चित्रपटाचं पोस्टर अगदी असंच आहे. पण अगदी मिनिमलीस्टीक. एक प्लेन काळाकुट्ट चेहरा, भेदक डोळे आणि भडक कुंकू. बास. एवढंच.

ही एक सूडकथा आहे परंतु आपण नेहमी पाहतो तशी नव्हे. थोडी वेगळी. बऱ्यापैकी कोरिअन सुडकथांच्या वळणाने जाणारी. कसंबसं हातातोंडाची गाठ पाडू शकणाऱ्या एका निम्नआर्थिक स्तरातल्या चौकोनी कुटुंबावर एका काळरात्री अचानक एक मोठा आघात होतो. अर्थात सुरुवातीला साधा वाटणारा आघात थोड्याच वेळात मोठं रूप धारण करतो. पटत नसलं तरी गरिबीपायी तोंड बंद ठेवून अन्याय सहन करण्यावाचून कुठलाही पर्याय नसल्याचं कुटुंबाच्या लवकरच लक्षात येतं. मात्र आज्जीला हे मान्य नसतं. थोडेफार प्रयत्न करूनही काहीच हाती लागत नसल्याचं पाहून आज्जी मनोमन काहीतरी ठरवून तिच्या कामाला लागते. थोडीथोडी माहिती गोळा करत, लोकांना भेटत, त्यांचे उपकार शिरावर बाळगत, एकेक पायरी वर चढत ती हळूहळू आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने मार्गक्रमणा करत जाते आणि अंतिमतः सूडाला परिणाम देते आणि मगच विराम घेते. मात्र हे सारं घडतं अतिशय संथपणे. पायरीपायरीने. अत्यंत मर्यादित संवादांच्या माध्यमातून. तसं पाहता कथेचा जीव एखाद्या शॉर्टफिल्म एवढा आहे. परंतु थोडे अधिक (कधी कधी अनावश्यकही) तपशील पुरवत कथेचा जीव वाढवल्याचा भास काही प्रसंगी होतो.

बऱ्यापैकी मंद गतीने पुढे सरकणाऱ्या या चित्रपटातल्या काही प्रसंगांतला बटबटीतपणा, रक्तपात हा प्रचंड धक्कादायक आहे. किमान हिंदीत तरी यापूर्वी कधीच न दाखवला गेलेला असा. काही निवडक प्रसंग खूपच भडक आहेत. म्हणजे दृश्यात्मक रीत्या फारच बोल्ड म्हणता येतील असे, वे टू ग्राफिकल, अंगावर येतील असे. वर कोरिअन सूडपटांचा उल्लेख केला तो निव्वळ याचसाठी. पण असे काही प्रसंग सोडता बाकी अन्य वेळ चित्रपट त्याच्या नॉर्मल संथ गतीत जात राहतो. बोलकं पोस्टर असा उल्लेख आला तो या अनुषंगाने. एक भडक कुंकू वगळता बाकी एकदम प्लेन काळाकुट्ट. चित्रपटाचा अधिकतम भाग हा रात्रीच्या अंधारात घडतो. परंतु यातले प्रसंग रात्रीच्या अंधारात अस्पष्ट घडताहेत असे दाखवलेले नाहीत. उलट काळरात्रीचा आणि पुढल्याही प्रत्येक रात्रीचा भीषण गडदपणा अंगावर येईल, घुसमट जाणवेल अशा सुस्पष्ट, ठसठशीत काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घटना घडत जाते.

आपल्याकडे असणाऱ्या अत्यंत अत्यंत मर्यादित स्रोतांचा (रिसोर्सेस) वापर करत, दुखण्यांवर मात देत आज्जीने शेवटाकडे एका मोठ्या घटनेला परिणाम देणं हे वाखाणण्याजोगं आहे आणि सुषमा देशपांडेंनी ते फारच प्रभावीपणे पार पाडलं आहे. अतिशय कमी संवादांमध्ये देहबोलीचा प्रभावी वापर करत त्यांनी आज्जी अगदी जिवंत केली आहे. विकास कुमारचा लाचार आणि स्वार्थी इन्स्पेक्टर तसंच अभिषेक बॅनर्जीचा विक्षिप्त/विकृत 'धावले' अतिशय परिणामकारक झाले आहेत. पण सर्वात महत्वाचा म्हणजे कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन सबकुछ असलेला देवाशीष मखीजा. भारतीय चित्रपटात इतके हिंस्र किंवा विकृत वाटावेत इतपत भडक प्रसंगांची मांडणी आणि चित्रीकरण करणं हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि ते मखीजाने लीलया पेललं आहे हे निश्चित.

कुठलाही चित्रपट परिपूर्ण नसतो त्याप्रमाणे ‘आज्जी’ ही नाहीच. निम्न आर्थिक आणि सामाजिक स्तरातल्या पात्रांकडून “हेल्प, फील, ऑप्शन” सारख्या सफाईदार इंग्रजी शब्दांची पेरणी खटकणारी आहे. तसंच काही अपवाद वगळता जवळपास प्रत्येक पात्र मराठीत असूनही सगळे संवाद मात्र हिंदीत आहेत. निदान तोंडदेखलंही मराठी वापरण्याची सूचकता दिग्दर्शकाला दाखवता आली नाही हे नक्कीच पटत नाही. परंतु एकूण चित्रपटाच्या तुलनेत हे दोष अगदीच दुर्लक्ष करण्याजोगे आहेत.

हा चित्रपट ‘मस्ट वॉच’ आहे का? तर भडक, बोल्ड मांडणी, रक्तपात यांचं वावडं असणाऱ्यांसाठी नक्कीच नाही. देशोदेशीच्या सूडपटांचे नियमित प्रेक्षक असलेल्यांसाठीही कदाचित नाही. परंतु हिंदीत सूडपटाचा एक नवीन वेगळा प्रयत्न म्हणून ज्यांना एक अनुभव घ्यायची इच्छा आहे त्या सर्वांसाठी मात्र निश्चितच !!

No comments:

Post a Comment