Sunday, July 8, 2018

नॉट सो सेक्रड गेम्स !नुकताच एक फार अर्थपूर्ण शेर वाचनात आला.

छप के बिकते थे जो अखबार..
इन दिनों वो बिक के छपा करते है !

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला वेळोवेळी देशोदेशींच्या राजकारणी, उद्योगपती, माफिया, विरोधी पक्ष, करमणूक जगत इत्यादींनी आपली बटीक म्हणून वापरल्याची असंख्य उदाहरणं आहेत. चौथ्या स्तंभाचा उपयोग करून जनमताचा कल चाचपणे, जनमत बदलणे किंवा हवे त्या दिशेला जनमताचा रेटा वळवणे, खोट्या कथा पसरवणे, असत्य/अर्धसत्य/अल्पसत्य बातम्या पेरणे,  खोटे सर्वे घेऊन त्यांचे निकाल छापणे, विशिष्ठ जात-धर्माबद्दलच्याच बातम्या छापणे किंवा दाबणे, किंवा फक्त मथळे वाचून मते बनवणाऱ्या 'अभिजनां' ना लक्ष्य करून खोडसाळ मथळा छापून, पुढे प्रश्नचिन्ह देऊन प्रत्यक्ष बातमीत मात्र वेगळेच तपशील देणे असे असंख्य प्रकार नियमितपणे होताना आढळतात. कालांतराने लोकांची वर्तमानपत्र वाचण्याची कमी होत चाललेली किंवा मोडलेली सवय लक्षात घेता या खोडसाळ शक्तींनी आपले लक्ष वृत्तपत्र किंवा मिडिया यांपुरतंच मर्यादित न ठेवता अन्य लोकप्रिय माध्यमाच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला देशाच्या दुर्दैवाने प्रमाणाबाहेर यश लाभू लागलं. आणि ते माध्यम म्हणजे, वेल.. नो प्राईजेस फॉर गेसिंग, चित्रपट माध्यम. अर्थात चित्रपट माध्यमाला एक विशिष्ठ अजेंडा डोळ्यासमोर ठेवून किंवा प्रसाराचं (Propaganda) माध्यम म्हणून वापरण्याचा प्रयोग या माध्यमाच्या जन्मापासून चालत आला आहे असं म्हंटलं तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरू नये. परंतु गेल्या काही वर्षांत मात्र याचा वापर फारच वाढल्याचं, चित्रपट/राजकारण/देशांतर्गत परिस्थिती/निवडणुका यांच्याबद्दल नियमित अपडेटेड असणाऱ्या आणि कुठलेही पूर्वग्रह न बाळगता, सारासार विचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या अगदी सहज लक्षात येऊ शकतं. आणि यासाठी कुठली उदाहरणंही द्यावी लागतील असंही मला वाटत नाही.


अर्थात हे सगळं प्रकर्षाने आठवण्याचं आणि एवढं लाउड थिंकिंग करण्याचं कारण म्हणजे नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली विक्रम चंद्र यांच्या २००६ साली प्रकाशित झालेल्या 'सेक्रड गेम्स' या कादंबरीवर आधारित त्याच नावाची सिरीज. सर्वसाधारणपणे प्रॉपगॅंडा चित्रपट/मालिकांमध्ये आढळणारा अलिखित नियम इथेही कटाक्षाने पाळला गेलेला आहे. म्हणजे दर्शनी भागाची मांडणी, कथावस्तू ही एका सामान्य दरिद्री मराठी ब्राह्मण कुटुंबातल्या मुलाचा दरिद्री बालपण ते मुंबईचा अनधिकृत सर्वेसर्वा होण्याचा प्रवास या रुपात आपल्या समोर येते. पण त्याचवेळी पार्श्वभूमीवर हिडन अजेंडा राबवला जात असतो. सुरुवात होते ती प्रत्येक एपिसोडच्या संस्कृत किंवा संस्कृतोद्भव शीर्षकापासून. शीर्षक संस्कृत परंतु घडणारे प्रसंग मात्र अगदी विपरीत किंवा विकृत अर्थाने मांडलेले. सुरुवातीच्या काही मिनिटांतच "भगवानको लं* फर्क पडता है" सारखा प्रक्षोभक संवाद प्रमुख पात्राच्या तोंडी घालून मालिका निर्माते मालिकेची दिशा आणि हेतू स्पष्टपणे मांडण्यात कुठलीही आडकाठी करत नाहीत. पण बॉलीवूड मध्ये 'प्रसिद्ध' असणाऱ्या तथाकथित प्रस्थापितांविरुद्ध लिहिणाऱ्या/बोलणाऱ्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या नामांकित दिग्दर्शकद्वयीची ही मालिका असल्याने आपण त्या घटनेकडे दुर्लक्ष करून मालिका पुढे पाहायला लागतो. पण हळूहळू शीर्षकगीतात दिसणाऱ्या देवीदेवता, प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला येणारी श्रीयंत्र सदृष चिन्हं अशा खुणा आपल्याला उठून दिसू लागतात. त्यामुळे निर्मात्यांच्या हेतूबद्दल नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्या मनात उभं राहतं. त्यानंतर वारंवार दिसत राहतात ते रामायणाचे उल्लेख, रामानंद सागर यांच्या रामायणाचे प्रसंग, रामलीलेचे प्रसंग, किंवा उद्घाटन, लग्न काहीही असो पण ते अट्टहासाने रामायणाच्या प्रसंगांच्याच पार्श्वभूमीवर घडवण्याचा दिग्दर्शकद्वयीचा आग्रह आणि तसं पाहता रूढार्थाने त्याचा कुठेही कनेक्ट नसताना !! किंवा ब्राम्हण बापाची वेश्या/बाहेरख्याली पत्नी, प्रमुख भाग जिथे कथा प्रत्यक्षात उलगडत जाते तो एरिया म्हणजे 'गोपालमठ' (धारावी?), गन्स लपवण्यात आलेल्या विशालकाय गोडाऊनचं नाव 'वेद' असणे हे तपशीलही हेतुपुरस्सरपणे लादल्यासारखे वाटतात. आणि सगळ्यात शेवटी दाखवला जातो तो मुंबईवर होऊ घातलेल्या हल्ल्याचा प्रमुख मास्टरमाईंड हा अन्य कोणी नसून एक तथाकथित मोठा हिंदू संत असणं !! अर्थात हा प्रसंग आणि क्वांटिको, पीके, सिंघम-२, काला इत्यादींमधले प्रसंग यांच्यामधला एक 'समान दुवा' सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे नियमित अपडेटेड असणाऱ्या प्रेक्षकांच्या चटकन लक्षात येतोच.

ही दिग्दर्शकद्वयी सत्यपरिस्थितीचं चित्रण मांडण्याबद्दल आणि रेखीव पटकथेबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. परंतु दुर्दैवाने त्या दोन्ही विभागांतही गोंधळ किंवा तडजोडी आढळतात. आपल्या रखेलीवर आपल्यासमोर पैसे उधळले म्हणून होऊ घातलेल्या हिंदू डॉनवर गोळ्यांचा वर्षाव करणारा आणि दुबईपर्यंत कनेक्शन्स असणारा मुसलमान डॉन त्याच हिंदू डॉनने काही दिवसांतच तिला सरळसरळ पळवून नेल्यावर मात्र काहीही न करता शांत बसून राहतो. बाबरी मशीद पतनाची दृश्यं तपशीलवार दाखवून मात्र त्याचा सूड म्हणून घडवल्या गेलेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा अगदी अगदी नगण्य उल्लेख. किंवा मग गणपतीला खरवसाचा नैवेद्य दाखवण्यासारखा निव्वळ हास्यास्पद प्रसंग. किंवा सुरुवातीला नायकाला मदत करणाऱ्या डॉनने एकाएकी सगळी रहस्य अर्धवट ठेवून कोडी घालून केलेली आत्महत्या हा तर निव्वळ मूर्खपणा वाटतो. त्या मूर्खपणाची तुलना फक्त डॅन ब्राऊनच्या 'ओरिजीन' मध्ये प्रमुख पात्राने आत्महत्या करून शेकडो कोडी घालून ठेवून २४ तास ताणून ठेवलेल्या बिनडोक पळापळीशीच होऊ शकते. किंवा मग गायतोंडे नावाच्या प्रमुख पात्राच्या तोंडी एकही धडका मराठी संवाद नसणे, किंवा परुळेकर (कादंबरीत याचं नाव पारूळकर आहे) नावाच्या प्रमुख पात्राच्या तोंडी आलेलं तोडकंमोडकं मराठी. गंमत म्हणजे काही लोक त्याला परुळेकर म्हणतात, काही पारुलकर तर काही परूलकर !!

खरं पाहायला गेलं तर ही एका साध्या भाईची गँगवॉर टाईप कथा आहे. साधा गरिबीतून वर येणारा गुंड एक एक टप्पे पार करत करत मुंबईच्या काळ्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट बनायची स्वप्नं पाहता पाहता हळूहळू एक दिवस खरंच तिथे पोचतो आणि या प्रवासाचं चित्रण म्हणजे ही कथा. आणि ही चावून चोथा झालेली कथाही आपण अन्य ठिकाणी पाहिलेल्या हजारो कथांप्रमाणेच आहे. पावलोपावली आढळणाऱ्या क्लिशेंनी अक्षरशः भरलेली. गरिबीतलं बालपण, स्थानिक भाईचं बोट धरून एक दिवस त्याच्याच खांद्यावर पाय ठेवून वर चढणारा कथानायक भाई, राजकारणी, पोलीस, बॉलीवूड या सगळयांना हवं तसं वळवणारा भाई, मग एक दिवस त्याचाही वाईट काळ येणे आणि मग विनाशाच्या दिशेने चालू होणारा प्रवास, आणि या सगळ्यात त्याच्या मागे हात धुवून लागलेला अंडर-परफॉर्मिंग इन्स्पेक्टर, त्याचा गडद भूतकाळ, त्याचं सहकारी आणि वरिष्ठांमध्ये नावडतं असणं हे सगळं सगळं आपण पाहिलेलं आहे. पण मग तरीही या वेबसिरीजला मिळणाऱ्या एवढ्या रेटिंगचं कारण काय? एक कारण कदाचित असं असेल की मूळ कादंबरी वाचलेल्यांना त्याची सिरीज मांडणी कशी असेल हे बघण्याची असलेली उत्सुकता (मी कादंबरी वाचलेली नाहीये.) किंवा दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे अशा भाईछापच काय पण अन्य कुठल्याही हिंदी चित्रपट/मालिकेत न दिसलेले सेक्स, वासना, संभोग, नग्नता, विकृतपणा, क्षणोक्षणी येणाऱ्या शिव्या, व्यसनं आणि वेबसिरीज असल्याने सेन्सॉरबोर्ड आपलं 'घनता' वाकडं करू शकत नसल्याचा निर्मात्यांचा उन्माद या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण !!

अर्थात काही गोष्टी वेगळ्या आहेत आणि खरोखर चांगल्याही आहेत. म्हणजे ठराविक काळानंतर येणारे देशाच्या राजकारणातले महत्वाचे प्रसंग, प्रमुख पात्राच्या तोंडून राजकारणी लोकांवर केली गेलेली टीका यांची मांडणी चांगली आहे. उदा थोडं तपशीलवार मांडलेलं शाहबानो प्रकरण आणि राजीव गांधी, रथयात्रा आणि धर्माचा उन्माद वगैरे गोष्टी थेट दाखवल्या आहेत. अप्रतिम दिग्दर्शन आणि छायाचित्रण यांचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे सैफ (लोकल पोलीस) आणि राधिका आपटे (रॉ) यांच्यात शेवटच्या काही मिनिटांत घडणारा हॉटेलमधला प्रसंग. काही कारणांमुळे त्यांच्यात (व्यावसायिक) गैरसमज झालेले असतात. त्यानंतर समेटासाठीची ही बैठक असते. सुरुवातीला दोघेही जरा गुश्श्यात असल्याने लॉंगशॉट घेऊन दोघांच्यामध्ये पिलर दाखवला आहे. सुरुवातीची भडास काढून झाल्यावर दोघेही एकेक पाउल पुढे टाकून समेट करायला तयार होतात आणि अचानक कॅमेरा हॉटेलच्या आतून दाखवला जातो, दोघेही एकाच फ्रेममध्ये असतात आणि आधीचा पिलर दोघांच्या मागे झाकला गेलेला असतो. असे काही भन्नाट प्रसंग आहेत. राधिका आणि सैफ या दोघांनीही सिरीजमधलं आपापलं स्थान ओळखून त्याला न्याय मिळेल अशा प्रकारे केलेला अभिनय ही जमेची बाजू. पण सगळ्यात जबरदस्त वावर आहे तो जितेंद्र जोशीचा. प्रसंगानुरूप बदलणारी संवादफेक, आवाज, हावभाव आणि बिनधास्त वावर या सगळ्यामुळे तो एकदम सच्चा कॉन्स्टेबल वाटतो.

दुर्दैवाने चांगल्या किंवा मला आवडलेल्या/पटलेल्या गोष्टींची यादी आणि खटकलेल्या गोष्टींची यादी यांच्या लांबीची कुठेच तुलना होऊ शकत नाही. अर्थात म्हणून कोणी ही मालिका बघू नये का? किंवा मालिकेवर बंदी आणावी का? तर नाही आणि नाही. तसं अजिबात नाही. मी तर म्हणेन प्रत्येकाने आवर्जून बघावी. पण बघाल ते समजून उमजून बघा. नीट अर्थ समजून घेऊन बघा. बी यॉर ओन जज. तसंच बंदी वगैरेचा तर संबंधही नाही. मी व्यक्तिशः कुठल्याही बंदीच्या विरुद्धच आहे. पण म्हणून असत्य पुढे रेटणं हे कितपत योग्य आहे हे पाहणं आणि शीर्षकातलं 'पावित्र्य' कंटेंटमध्ये कितपत राखलं जातं हेही पाहणं हा शेवटी ज्याच्या त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीचा प्रश्न आहे !!

तळटीप : विक्रमादित्य मोटवानीने या मालिकेवर काम करायला *२०१४* पासून सुरुवात केली हा नक्कीच योगायोग नसावा!!

12 comments:

 1. गेले काही दिवस खूप विचार येत होते. आधी काला मग संजू आणि आता ही वेबसेरीज. यामधेच पाहिलेली बालाजीची हक से ही वेबसेलीज. टायटलमधे ठणठणीतपणानं लिटिल वुमनवर आधारीत असं येतं. पण चार बहिणी आणि दोन नंबरची बहिण लेखिका असणं हे साम्य वगळून काहीही नाही. बॅकड्राॅप कश्मिरचा आहे. सर्व पात्रं मुस्लिम आहेत. अर्थात एकता कपूरची मालिका असल्यानं साधारण उथळपणाच आहे. फकारांती भाषा आणि विवाहबाह्य संबंध. पण ही सेरीज बघताना एक विचार आला की कश्मिरमधून जे पंडीत बाहेर पडले, ज्या परिस्थितीत बाहेर पडले त्यात नाट्य नव्हतं? कोणाला त्यावर सिनेमा, वेबसेरीज बनवून ती बाजू समोर आणावी असं वाटत नाही? एकच बाजू सतत प्रोजेक्ट होतेय आणि दुसरी दडपली जातीय. हे सगळं कुठे न कुठे एखादी विचारधारा संथपणे ठरवून घडवून आणतेय का? असं वाटतंय.

  ReplyDelete
  Replies
  1. जे जे छोट्या आणि मोठ्या पडद्यावर सेन्सॉरच्या भीतीने दाखवता येत नाही ते ते सगळं अतिरेकी प्रमाणात कथेची गरज असो वा नसो पण तरीही कोंबून दाखवणे ही सध्याच्या वेबसिरीजची व्याख्या झालेली आहे. समजून उमजून पारखून बघणे हे शेवटी सुज्ञ प्रेक्षकांच्या हातात !

   Delete
 2. मीसुद्धा पुस्तक वाचलेलं नाही पण पुस्तकात ‘मुंबई’ हे एक महत्वाचं पात्र आहे असं कौतुक लोकांनी केलंय...तसं काही मला वाटलं नाही कारण कथा ‘गोपाळमठ’च्या पलीकडे गेलीच नाही! जितेंद्र जोशी खासच..गिरिश कुलकर्णीने मी disappoint झालो मात्र! खूपच स्टिरिओटाईप रोल होता.
  तुझ्या ‘बी युअर ओवन जज’ या मताशी संपूर्ण सहमत.

  ReplyDelete
  Replies
  1. अगदीच. मुंबई काहीएक महत्वाचं पात्र वगैरे वाटलं नाही. मुंबई महत्वाचं पात्र वाटतं ते म्हणजे 'सत्या' मध्ये. असो. जितु जोशी फारच भारी वाटला मला. गिरीशरावांनी काहीएक नवीन केलं असं वाटलं नाही.

   किती जण स्वतः जज करून मत बनवू शकतात हा मोठा प्रश्नच आहे. म्हणून तर आज फेबुवर याच विषयावर पोल टाकलाय. बघू.

   Delete
 3. भारी परीक्षण.
  पुस्तक काही वाचलं नाही अजून आणि लवकर सिरीयल बघतो.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद दादू. नक्की बघ.

   Delete
 4. पुस्तक वाचावे

  ReplyDelete