Wednesday, October 9, 2024

सौदी, सीरिया, मालदिव्ज आणि केरळ

मध्यंतरी 'गोट लाईफ (The Goat Life / Aadujeevitham)' हा मल्याळी चित्रपट बघण्याचा योग आला. चित्रपटाबद्दल भरभरून कौतुक वाचलं होतं. तुलनेने चित्रपट बऱ्यापैकी फ्लॅट वाटला. अर्थात चित्रपट चांगलाच आहे. अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण इत्यादी सगळ्याचा दर्जा उच्च आहे. पण प्रत्येक प्रसंगात पुढे काय होणार आहे याचा अंदाज सहज बांधता येतो. सगळं खूप प्रेडिक्टेबल आहे. अजून एक गोष्ट म्हणजे सतत अल्लाविषयी संवाद, अल्ला परीक्षा घेतोय, तोच सर्वशक्तिमान आहे, तो अति दयाळू आहे यांसारखे संवाद आणि वारंवार दाखवले जाणारे नमाजपठणाचे प्रसंग. या सगळ्या गोष्टी इतक्या सातत्याने दाखवण्यात आल्या आहेत की कित्येकदा हा चित्रपट इस्लामचा गुप्त प्रचार करण्यासाठीच बनवला आहे असं वाटत राहतं. 

चित्रपट 'गोट डेज' नावाच्या पुस्तकावर बेतलेला आहे. बेन्यामिन नावाच्या लेखकाने नजीब नावाच्या एका व्यक्तीच्या सौदीमधल्या भयंकर अनुभवांना शब्दरूप देत या पुस्तकाची निर्मिती केली आहे. हा अत्यंत निर्धन आणि अल्पशिक्षित असलेला नजीब, केरळातल्या एका खेड्यात कष्टाची कामं करून स्वतःचं आणि आपल्या गर्भार पत्नीचं पोट भरत असतो. अचानक सौदी अरेबियात जाण्याची संधी मिळाल्याने तो तिथे जाऊन पोचतो. मात्र नंतर त्याच्यावर अक्षरशः दुर्दैवाचे डोंगर कोसळतात. अन्न-वस्त्र-निवारा या तीनही प्राथमिक गरजा तर पुरवल्या जात नाहीतच पण वरून त्याला अनन्वित शारीरिक आणि मानसिक छळालाही सामोरं जावं लागतं. मूळ पुस्तकात असलेले दोन प्रसंग तर इतके भयानक आहेत की वाचतानाही धक्का बसतो. अर्थात ते चित्रपटात दाखवणं शक्यच नसल्याने ते गाळण्यात आले आहेत.  

चित्रपटात वारंवार येणारे अल्ला, प्रेषित, नमाजाचे उल्लेख पुस्तकात तर पानोपानी समोर येतात. त्यामुळे तर हे इस्लामच्या प्रचाराचं साहित्य असल्याची खात्रीच पटते. अर्थात भारतातला मुस्लिम असूनही किंबहुना कदाचित त्यामुळेच नजीबला सौदीतले मूळ मुसलमान नीच दर्जाचा समजत असतात, त्याचा छळ करत असतात. कारण सौदीतल्या मुसलमानांच्या मते केवळ ते लोकच खरे आणि उच्च दर्जाचे मुसलमान असून प्रेषितांचे वंशज आहेत आणि अन्य कुठलेही आणि विशेषतः आशियातले मुसलमान निम्न स्तराचे मुसलमान आहेत किंवा मुसलमानच नाहीत. इस्लामच्या उम्माह, अर्थात मुस्लिम विश्वबंधुत्वाच्या अर्थात जगातील सर्व मुसलमान हे एकमेकांचे बंधू आहेत या वैश्विक संकल्पनेलाच या चित्रपटात धक्का दिला आहे. अर्थात प्रत्यक्षात ज्या घटना, प्रसंग घडले आहेत तेच त्यांनी पुस्तकात आणि चित्रपटात जिवंत करून दाखवलं असल्याने त्यातून योग्य संदेश घेणं हे व्यक्तिसापेक्ष आहे. 

नायकाला दिली जाणारी अमानुष वागणूक पाहता काही वर्षांपूर्वी वाचलेली मुंबईतून आयसिसमध्ये दाखल झालेल्या चार तरुण मुलांची बातमी आठवली. त्या बातमीनुसार जिहादच्या ध्येयाने भारावून जाऊन सिरीयात पोचलेल्या मुंबईतल्या काही तरुणांना अनेक महिने तिथे अक्षरशः शौचकुपं (संडास) स्वच्छ करण्याचं काम करावं लागलं होतं. तो छळ आणि अपमान सहन न होऊन अखेरीस एक मुलगा तिथून पळून भारतात परत आला. त्याने तिथे त्याला मिळालेल्या आणि एकूणच भारतातल्या लोकांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीचं भयानक वर्णन केलं होतं. अर्थात 'डॉट्स कनेक्ट' करू शकणाऱ्या कुठल्याही सुज्ञ व्यक्तीला या सगळ्या गोष्टींचा अर्थ सहजच कळू शकेल. 

'गोट लाईफ' चित्रपट बघितला असेल तर पुस्तक वाचताना कदाचित फार उत्कंठा वाटणार नाही मात्र चित्रपटात वगळण्यात आलेले काही धक्कादायक प्रसंग, भयानक वर्णनं यांचा अनुभव घ्यायचा असेल वाचायला हरकत नाही. 


गेल्या वर्षी इस्लाम/आयसिसशी संबंधित असलेल्या 'फ्रीलान्सर' नावाच्या सिरीजचा पहिला सिझन बघितला होता. ट्रेलर बघताना फ्रीलान्सिंग हिटमॅन/बॉडीगार्डच्या भूमिकेत मोहित रैना अतिशय चपखलपणे शोभत होता. मुंबईतलं एक संपूर्ण कुटुंब आयसीसच्या जिहादमध्ये सामील होण्यासाठी  सिरीयाला जाऊन पोचतं. त्यांच्याबरोबर कुटुंबातल्याच एका नववधूला देखील फसवून सीरियात नेलं जातं. त्या मुलीचा भूतकाळ, तिचे वडील, त्यांचे तिला सोडवण्याचे प्रयत्न, मोहित रैनाचं फ्रीलान्सर म्हणून आगमन, त्याचा काळवंडलेला भूतकाळ अशा अनेक गोष्टींशी प्रेक्षकांची ओळख करून दिली जाते. आणि अचानकच  पहिला सिझन अर्धवट टप्प्यावर संपतो. 

पहिला सिझन बघत असताना ही मालिका A Ticket to Syria: A Story about the ISIS in Maldives या शिरीष थोरात यांच्या कादंबरीवर आधारित आहे हे कळलं. ते मिळवून सुरु करेपर्यंत दुसरा सिझन प्रदर्शित झाला. मात्र दुसरा सिझन इतका हास्यास्पद आहे की तो बघितल्यानंतर पुस्तक वाचण्याचा उत्साह पार मावळूनच गेला. दुसऱ्या सीझनमध्ये सगळं लुटूपुटूचं वाटत राहतं. सिरीजच्या मानाने पुस्तक मात्र अतिशय माहितीपूर्ण झालं आहे हे नक्की.

 

पुस्तकात मालदिव्जचा इतिहास, तिथली राजघराणी, तिथे इस्लामचा झालेला चंचुप्रवेश, राजांची आपापसातली झालेली यादवी युद्धं आणि कारस्थानं अशा सगळ्याची इत्यंभूत माहिती तर मिळतेच परंतु नंतर इस्लामच्या ताब्यात गेलेला देश, आयसिसचं वाढतं वर्चस्व, इराक आणि सीरिया मधली खलिफत आणि तेलाचं राजकारण, आत्मघातकी बॉम्बस्फोट, मालदिव्जमधल्या सामान्य नागरिकांपासून ते पोलिसांपर्यंत सर्वांठायी आढळणारी जिहादी मानसिकता अशा अनेक गोष्टींचे तपशीलवार उल्लेख आहेत. लेखकाने आयसिस, सीरिया, खिलाफत, तिथलं तेलाचं राजकारण इत्यादी सर्व बाबींची अत्यंत अभ्यासपूर्ण वर्णन केली आहेत. 

आपल्याकडे मालिका/चित्रपटात अखेरीस नायकाची 'शेवटची फायटिंग' दाखवणं अनिवार्यच असल्याने अगदी अविश्वसनीय आणि हास्यास्पद वाटत असूनही मालिकेच्या अखेरच्या एपिसोडच्या शेवटी तो विनोदी प्रकार दाखवण्यात आला आहेच. पुस्तकात मात्र नायकावर अखेरीस अचाट आणि वीरतापूर्ण प्रयोग करण्याचं कुठलंही बंधन नसल्याने पुस्तकात नायक स्वतःच्या घरात बसून फोनवरून सगळी सूत्र हलवून हलवतो आणि त्याचे लोक नायिकेची अलगदपणे सुटका करून तिला सुरक्षित स्थळी आणून पोचवतात. 

पुस्तकात मुख्य नायकाला नाव नसून त्याला केवळ 'कॉन्टॅक्ट' एवढ्याच नावाने संबोधलं जातं. त्यामुळे त्याची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी वगैरे दाखवण्याचा संबंधच नसतो आणि आवश्यकताही नसते.  

मालिकेत मात्र मोहित रैनाचा आत्मविश्वासपूर्ण वावर, त्याचं 'कॉन्टॅक्ट' म्हणून एफबीआयच्या स्पेशल एजंट्सना भिडणं, त्याच्या वेगवान हालचाली, महत्वाचे निर्णय वेगाने घेण्याची क्षमता हे सगळं फार विश्वसनीय वाटतं. अर्थात मोहित रैनाच्या 'उरी' चित्रपटातल्या छोट्याशा परंतु अत्यंत प्रभावी भूमिकेतल्या त्याच्या तडाखेबंद प्रतिमेचा त्याला 'कॉन्टॅक्ट' म्हणून पडद्यावर बघताना फायदाच होतो.  

त्यामुळे मोहित रैना साठी फ्रीलान्सर आवर्जून बघायला आणि टीचभर असलेल्या मालदिव्जचा इतिहास, तिथल्या जनतेच्या मनावर असलेला इस्लामचा पगडा, आयसिसचा आणि आंतरराष्ट्रीय तेलाच्या राजकारणाची माहिती (कुबेरी पाल्हाळ लावलेल्या पद्धतीच्या ऐवजी) अगदी थोडक्यात जाणून घ्यायची असेल तर A Ticket to Syria: A Story About the ISIS in Maldives हे पुस्तक आवर्जून वाचायला हवंच.

Wednesday, July 10, 2024

'अविरत हाणामारी'चा प्रभावी खेळ : किल

काही दिवसांपूवी ‘किल’चा टिझर आणि नंतर ट्रेलर बघताना जेव्हा ट्रेनमधला लांबलचक असा सलग हाणामारीचा प्रसंग पहिल्यांदा बघितला तेव्हा सर्वप्रथम मला जेम्स मधल्या ट्रेनमधल्या हाणामारीच्या प्रसंगाची तीव्रतेने आठवण झाली. अर्थात ट्रेन हा एक सामायिक दुवा सोडल्यास दोन्हींच्या हाणामारीच्या प्रकृतींमध्ये खूपच फरक आहे, अनेक पातळ्यांवर फरक आहे. जेम्समध्ये गुंडांची संख्या, स्लो मोशनमध्ये चालणारी हाणामारी, एका किंवा फार तर दोन ठोश्यांमध्ये लोळवले जाणारे गुंड दिसतात आणि एकूण प्रसंगाचा जीवच जेमतेम दहा एक मिनिटाचा आहे. पण संपूर्ण चित्रपट या एकाच संकल्पनेभोवती फिरत असेल तर बघताना प्रेक्षकांच्या मनावर किती प्रचंड ताण निर्माण होईल कल्पनाही करणं अवघड आहे. आणि त्यात पुन्हा ती हाणामारी कमी म्हणून सोबतीला अतीव रक्तपाताची फोडणी असेल तर प्रकरण अधिकच गंभीर होत जाणार हे नक्की. हा ताण चित्रपटभर भेटीला येणाऱ्या सततच्या थरकाप उडवणाऱ्या दृश्यांच्या माध्यमातून अधिकाधिक चढत्या पातळीवर नेण्यात दिग्दर्शक निखिल नागेश भट कमालीचा यशस्वी झाला आहे.

अशा संपूर्ण वेळ अथक आणि अविरतपणे चालणाऱ्या मारामाऱ्या बघत असताना
Raid आणि Raid : Redemption या दोन इंडोनेशियन चित्रपटांची आठवण होणं स्वाभाविकच. अर्थात किल आणि रेड (१ आणि २) मधला प्रमुख फरक म्हणजे रेड ची निर्मिती ही प्रामुख्याने पारंपरिक इंडोनेशियन मार्शल आर्टस् च्या प्रचार आणि प्रसारासाठीच करण्यात आलेली असल्याने त्यातल्या मारामाऱ्या या क्षणभराचीही उसंत घेत नाहीत आणि अर्थात त्यांमध्ये क्वचित अपवाद वगळता फार रक्तपातही नाही. किल मध्ये मात्र डोकं, हात, पाय, नाक, तोंड फोडण्याचे प्रसंग सातत्याने घडत राहतात. त्यामुळे ते थरारकच नव्हे तर अनेकदा (अर्थात चांगल्या अर्थी) भीतीदायक वाटतात.

सुरुवातीच्या काही मिनिटांतच चित्रपट ज्या परीसरात घडणार आहे त्या क्षेत्राच्या मर्यादा आखल्या जाऊन त्या प्रेक्षकांसमोर स्पष्टपणे मांडून दाखवल्या जातात आणि काही अपवाद वगळता त्या मर्यादांचे नियम दिग्दर्शक शेवटपर्यंत पाळतोही. त्यामुळे कुठल्या भागात काय परिस्थिती आहे, कुठली घटना कुठे घडते आहे, त्याचा इतर घटनांशी आणि तिथल्या व्यक्तींशी काय संबंध आहे हे सगळं प्रेक्षकांना पूर्णवेळ व्यवस्थितपणे कळत राहतं.

चित्रपटाचा नायक हा पूर्णवेळ नायक वाटतो, कुठेही चुकूनही सुपरहिरो वाटत नाही. त्याला लागतं, जखमा होतात, तो बेशुद्धही पडतो पण दरवेळी धडपडत, लंगडत का होईना पुन्हा उभाही राहतो. पण खरं सांगायचं तर 'अविरत हाणामारी' हा या चित्रपटाचा प्रमुख आणि खराखुरा नायक आहे. या चित्रपटात मारामारीचे विविध प्रकार लीलया हाताळण्यात आले आहेत. या चित्रपटातील मारामाऱ्या या प्रामुख्याने अतिशय कमी जागेत, अत्यंत मर्यादित हालचाल शक्य असणाऱ्या ठिकाणी घडतात. त्यामुळे त्या एकसुरी वाटू नयेत यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न दिग्दर्शक आणि दक्षिण कोरियन action choreographer 'Se-yeong Oh' यांनी केलेले आहेत आणि त्यात ते कमालीचे यशस्वीहे झालेले आहेत. हे सर्व करताना त्यासाठी त्यांनी अनेक शक्यतांचा धांडोळा घेतला आहे. यातल्या मारामाऱ्या अंधारात आहेत, लख्ख (कृत्रिम) उजेडात आहेत, धुरात आहेत, धुक्यासम भासणाऱ्या वातावरणातही आहेत. त्याचबरोबर चाकू, सुरा, गुप्ती, बंदूक या पारंपरिक हत्यारांसोबतच अग्निशामक सिलेंडर, काचांचे तुकडे, कुलूप, साखळी, जेवणाचे डबे. हॉकी स्टिक यांसारख्या अपारंपरिक हत्यारांचाही यात सढळ हस्ते वापर करण्यात आला आहे. यात बंदुकांचा वापर अतिशय मर्यादित आहे, कुठेही उगाचच बेछूट असे गोळीबार नाहीयेत. सगळा भर हॅन्ड-टू-हॅन्ड कॉम्बॅटवर देण्यात आला आहे.

संपूर्ण चित्रपटाला एक दक्षिण कोरियन थरारपटाचं स्वरूप प्राप्त झालं आहे ते Se-yeong Oh याच्यामुळे. IMDB वर नायक (लक्ष्य) आणि खलनायक (राघव जुयाल) यांच्या मुलाखती दरम्यान लक्ष्यने Se-yeong Oh चा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. तसंच यातला खलनायक एक विक्षिप्त, क्रूर, चक्रम, अत्यंत बेफिकीर आणि क्रिकेट व चित्रपटांची आवड असणारी आणि अचूक टायमिंगसह संवादफेक करणारी व्यक्ती आहे. खलनायकाचे हे सगळे गुणविशेष पडद्यावर प्रभावीपणे उतरवण्यासाठी राघव जुयालने सातत्याने मोझार्टचं संगीत ऐकत असल्याचा उल्लेख मुलाखतीदरम्यान केला आहे.

चित्रपटात काही निवडक प्रसंगांदरम्यान वेस्टर्न चित्रपटांची आठवण करून देणारे गिटार पिसेस वाजत राहतात, त्याचबोबर ड्रम्सचे तुकडेही कानावर पडत राहतात. त्यामुळे एक निराळ्या प्रकारची वातावरण निर्मिती व्हायला मदत होते. सततच्या या हाणामारीमुळे जॉन वीक ची आठवण होणं अगदीच अपरिहार्य आहे. त्याचबरोबर अग्निशामक सिलेंडरच्या प्रसंगात Irreversible या इटालियन प्रसंगाची तर ट्रेनमध्ये गुंडांना टांगून ठेवून इतर गुंडांना डिवचण्याचा प्रसंगात डाय हार्डमधल्या लिफ्टमधल्या सांताक्लॉजच्या प्रसंगाची नक्कीच आठवण होते.

वर म्हंटल्याप्रमाणे चित्रपटाचा खरा नायक 'अविरत हाणामारी' हा आहे. यात जेमतेम तोंडी लावण्यापुरती असलेली एक प्रेमकथा वगळता हा चित्रपट पूर्णतः नो-नॉन्सेन्स प्रकारचा आहे. यात उगाच कंबरेखालचे बिनडोक विनोद नाहीयेत, विचित्र अंगविक्षेप नाहीयेत, की खानदान की इज्जत वाले मूर्ख प्रकार नाहीयेत. आहे ती प्रेक्षकांवर सातत्याने सढळ हस्ते बरसणारी उच्च दर्जाची अ‍ॅक्शन. त्यामुळे हार्डकोअर अ‍ॅक्शनप्रेमी प्रेक्षकांसाठी ही एक अत्युच्च दर्जाची मेजवानी आहे जी चुकवलीत तर जन्मभर पश्चात्ताप होत राहील !!

--हेरंब ओक

Saturday, May 11, 2024

अमेरिकन न्यायव्यवस्थेच्या अकार्यक्षमतेच्या कथा : इनोसंट मॅन ते कन्फ्रण्टिंग अ सीरिअल किलर

अमेरिकन न्यायव्यवस्थेच्या अकार्यक्षमतेच्या कथा : इनोसंट मॅन ते कन्फ्रण्टिंग अ सीरिअल किलर

---------------------------------------------------

जॉन ग्रिशम या लीगल थ्रिलर या साहित्यप्रकारात सातत्याने दर्जेदार लेखन करणाऱ्या अमेरिकन लेखकाने २००६ साली 'The Innocent Man: Murder and Injustice in a Small Town' अशा लांबलचक नावाचं एक पुस्तक लिहिलं. नॉनफिक्शन प्रकारातलं त्याचं ते पाहिलंच पुस्तक होतं. वाचकांनी पुस्तकाचं कौतुक केलं परंतु "वाचवत नाही, वाचताना नैराश्य येतं, सहन होत नाही, अमेरिकन न्यायव्यवस्थेची सद्यस्थिती भयावह आहे " या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रियांसह!! या पुस्तकावर २०१८ साली त्याच नावाची एक मालिका देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.

रॉन विल्यमसन या ओक्लाहोमा राज्यातल्या एडा शहरात राहणाऱ्या एका सामान्य तरुणाची कथा यात कथन करण्यात आली आहे. बेसबॉलचं वेड, त्यात यशाने दिलेली हुलकावणी, त्यामुळे व्यसनं, त्यानंतर लग्न, अजून व्यसनं, घटस्फोट, वडिलांचा मृत्यू आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून मनोरुग्ण होण्याच्या दिशेने वाटचाल अशा त्याच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या काही टप्प्यांची वाचकांना ओळख करून दिली जाते.

८ डिसेंबर १९८२ ची सकाळ. डेब्रा स्यू कार्टर या २२ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह तिच्या घरात सापडतो. डेब्रा एका स्थानिक बारमधे वेट्रेस म्हणून काम करत असते. खून होण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झालेला असतो आणि अत्यंत हालहाल करून तिला ठार मारण्यात आलेलं असतं. पोलीस अनेक लोकांना ताब्यात घेतात, अनेकांची चौकशी करतात परंतु बरेच दिवस शोधूनही गुन्हेगार काही त्यांच्या हाती लागत नाही. दरम्यान ग्लेन गोर नावाचा एक तरुण पोलिसांकडे येतो आणि डेब्रा ज्या बारमधे काम करत असते तिथे आदल्या रात्री त्याने तिला रॉनबरोबर बघितलं असल्याचं सांगतो. आधीच्या एकाही साक्षीदाराने रॉनच्या तिथे असण्याचा कुठलाही उल्लेख केलेला नसतो. पण तरीही पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे रॉनला पोलीस स्टेशनमधे बोलावतात. त्याची चौकशी करतात. त्याच्या केसाचे, रक्ताचे नमुने जमा करतात. त्याची पॉलिग्राफ टेस्ट करतात. आणि तो टेस्ट फेल झाला आहे असं सांगतात. थोडक्यात तो खोटं बोलतोय असं सांगून त्याने गुन्ह्याची कबुली द्यावी यासाठी त्याच्यावर दबाव आणला जातो. पण रॉन काही त्या दबावाला बधत नाही. अनेक तासाच्या चौकशीअंती त्याला सोडून देतात.

दरम्यान अजून एक माणूस पोलिसांकडे येऊन साक्ष देतो की डेब्राचा खून झाला त्या रात्री त्याच्या घराजवळ रॉन आणि अजून एक माणूस आरडाओरडा करत होते. ते ऐकून रॉनचा मित्र डेनिस यालाही कुठल्याही पुराव्याशिवाय, निव्वळ रॉनचा चांगला मित्र आहे या एका कारणास्तव पोलीस अटक करतात. तिथे त्याचीही पॉलिग्राफ टेस्ट केली जाते, कसून चौकशी केली जाते. पण तोही दबावाला न बधल्याने त्यालाही सोडून दिलं जातं.

दरम्यान एडामधल्याच एका छोट्या दुकानातून डेनिस हॅरवे या तरुणीचं अपहरण होतं. पण झटापटीच्या कुठल्याही खुणा आढळत नाहीत. अनेक आठवडे प्रचंड शोधाशोध करूनही पोलिसांना गुन्हेगारांचा पत्ता लागत नाही. लागोपाठ घडलेल्या अशा प्रकारच्या दोन घटनांमुळे एडाचे रहिवासी त्रस्त होतात आणि पोलिसांवर प्रचंड दबाव येतो. या दबावापायी पोलीस टॉमी वॉर्ड आणि कार्ल फॉन्टनॉट या दोन सामान्य तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतात आणि काही वेळाने सोडून देतात.

रॉन, डेनिस, टॉमी, कार्ल या सगळ्यांची चौकशी करणारे पोलीस सारखेच असतात आणि अर्थातच चौकशीची पद्धतही अगदी सारखी असते. ती म्हणजे धाकदपटशाने न् केलेला गुन्ह्याची कबुली नोंदवून घेणे. यासाठी त्यांचा प्रचंड मानसिक छळ केला जातो, धमक्या दिल्या जातात.. आरडाओरडा, मारहाणीची धमकी असे अनेक उपाय अवलंबले जातात.

सर्वात कहर म्हणजे टॉमी आणि कार्ल यांनी डेनिस हॅरवेचा स्वप्नात खून केला होता हे त्यांच्या डोक्यात ठसवलं जातं आणि त्या स्वप्नात केलेल्या खुनाचा कबुलीजवाब त्यांना प्रत्यक्षात देण्यास भाग पाडलं जातं. या कबुलीजवाबाचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्यात कुठेही हा स्वप्नात घडलेला गुन्हा आहे असा उल्लेख येणार नाही याची काळजी घेतली जाते. असा कबुलीजवाब मिळवण्यासाठी त्यांचे कुठल्या प्रकारचे हाल केले जातात ते अर्थातच व्हिडीओवर येत नाही.

(या स्वप्नातल्या गुन्ह्यांच्या कबुलीजवाबांच्या हास्यास्पद आणि धक्कादायक पुराव्यांची गोष्ट एक दिवस रॉबर्ट मेयर या न्यूयॉर्क टाईम्सच्या एका पत्रकाराच्या कानी पडते. तो सगळ्या गोष्टींचा, तपशीलांचा, पुराव्यांचा अभ्यास करतो आणि त्या आधारावर 'ड्रीम्स ऑफ एडा ' नावाचं एक पुस्तक प्रकाशित करतो आणि त्यात टॉमी आणि कार्लवर झालेल्या अन्यायाचं विस्तृत विवेचन करतो. पण काहीही फरक पडत नाही. दोघेही या क्षणीही तुरुंगात आहेत. टॉमी वॉर्ड कदाचित पुढेमागे जामिनावर सुटूही शकेल परंतु क्लिष्ट यंत्रणेमुळे आणि काही विक्षिप्त नियमांमुळे कार्ल फॉन्टनॉट कधीच सुटू शकणार नाही. !!!!!!)

टॉमी आणि कार्ल यांच्यावर वापरण्यात आलेल्या 'स्वप्नात केलेल्या गुन्ह्याचा कबुलीजवाब' पद्धतीला लाभलेलं 'अभूतपूर्व यश' पाहून काही महिन्यांनी पोलीस रॉन आणि डेनिसला देखील डेब्रा कार्टरच्या खुनाच्या आरोपात पुन्हा एकदा पुन्हा चौकशीला बोलावून घेतात. त्यांना दबावाखाली आणून त्यांच्याकडून देखील 'स्वप्नात केलेल्या गुन्ह्याचा कबुलीजवाब' घेतला जातो. थोडक्यात खरा गुन्हेगार शोधणं पोलिसांना शक्य नसतं, त्यांची तेवढी लायकी नसते, इच्छा नसते आणि अर्थातच डोक्यावर परिणाम झालेल्या, दारुड्या, प्रसंगी ड्रग्सचं सेवन करणार्‍या, दिवसभर इथेतिथे भटकणार्‍या वेडसर रॉनला टार्गेट करणं त्यांच्या दृष्टीने अतिशय सोपं असतं. जेणेकरून गुन्हेगार पकडल्याबद्दल कौतुकही केलं जातं आणि कुठल्याही प्रकारच्या जनक्षोभाला बळीही पडावं लागत नाही. डेनिसविरुद्ध तर काहीच पुरावा नसतानाही केवळ रॉनचा मित्र त्याला अटक केली जाते.

मिळालेल्या भक्कम (!!!) पुराव्याच्या आधारे रॉन आणि डेनिसविरुद्ध खटला उभा राहतो. डेब्रा कार्टरच्या घराची आणि मृतदेहाची भयानक छायाचित्रं दाखवून ज्युरींचं मन वळवलं जातं आणि त्या रॉनला देहदंडाची आणि डेनिसला जन्मठेपेची शिक्षा होते. पोलीसदल सुखावतं, आपली टिमकी वाजवून घेतं.

यानंतर सुरु होतो तो तुरुंगाताला जीवघेणा प्रवास. प्रचंड त्रास, छळ. विक्षिप्त कैदी, विचित्र जेलर. जेलमध्येही रॉनचा प्रचंड मानसिक छळ होतो. त्यामुळे आणि पुरेशा आणि योग्य औषधोपचार आणि डॉक्टरी मदतीच्या अभावी त्याची मानसिक स्थिती अजूनच ढासळायला लागते. दरम्यान त्याच्या आणि रॉनच्या अपिलाची सुनावणी होते. त्यात जेलमधले अधिकारी आणि पोलीस संगनमताने जेलमधल्या काही कैद्यांच्या रुपाने खोटे साक्षीदार उभे करतात जे सांगतात की रॉनने त्यांच्याकडे डेब्राचा खून केल्याचा कबुलीजवाब दिलाय आणि त्याचा त्याला आता प्रचंड पश्चात्ताप होतोय. त्याच्याबरोबर डेनिसही गुन्ह्यात सामील होता. डेनिस आणि रॉन अर्थातच ते निर्दोष असल्याचं नेहमीप्रमाणेच ठासून सांगतात.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रॉनची केस मांडायला जो वकील सरकार पुरवतं तो अत्यंत हुशार वगैरे असतो पण दुर्दैवाने तो अंध असतो आणि त्याला पुरावे/फोटो/कागदपत्र इत्यादींची तपासणी करण्यासाठी मदतनीसही दिला जात नाही. अर्थातच रॉनची केस लंगडी पडते. त्यांचं अपील फेटाळलं जातं. अशी तीन वेगवेगळया कोर्टात, तीन वेगवेगळया स्तरांवर त्यांची अपिल्स फेटाळली जातात. इतक्या असंख्य वकील, जेलर, पोलीस, न्यायाधीश यापैकी कोणालाही रॉनच्या ढासळलेल्या मानसिक संतुलनाविषयी एक शब्दही काढावासा वाटत नाही. खरं तर रॉनची मानसिक अवस्था एवढी वाईट असते की शिक्षा तर सोडाच त्याच्यावर साधा खटला उभा राहणं हेही बेकायदेशीर आणि अमानुष असतं. पण ही एवढी साधी बाब या एवढ्या मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तींपैकी कोणाच्याही साधी नजरेसही येत नाही.

दरम्यान रॉनच्या आईचं निधन होतं. परंतु तत्पूर्वी खुनाच्या रात्री रॉन घरीच होता हे सिद्ध करणारा अर्थात रॉनचं निर्दोषत्व सिद्ध करणारा असा एक महत्वाचा पुरावा ती पोलिसांकडे सुपूर्द करते, अर्थातच कार्यक्षम पोलिसदल तो पुरावा दाबून टाकतं. आणि एक दिवस रॉनची देहदंडाची शिक्षा अंमलात आणण्याचा दिवस न्यायालयाकडून मुक्रर केला जातो. परंतु सुदैवाने त्याचवेळी त्याच्या वकिलाने केलेल्या एका शेवटच्या अपिलाला यश येतं आणि त्याची शिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली जाते परंतु त्यामुळे त्याचा कैदेतला शारीरिक/मानसिक छळ पुन्हा चालू होतो. पुरेसं जेवण मिळत नाही, मिळतं ते अतिशय निःकृष्ट असतं. थंडीतही पुरेसे कपडे दिले जात नाहीत.

डेनिसचीही अवस्था फार वेगळी नसते. छळाला कंटाळून आणि मुख्य म्हणजे न केलेल्या गुन्ह्याचं बालंट माथ्यावरून पुसून टाकण्यासाठी तो जंग जंग पछाडतो. तुरुंगातच तो कायद्याचा अभ्यास करायला लागतो. तुरुंगातल्या वाचनालयात जाऊन आपलं कायदेविषयक ज्ञान वाढवायला लागतो. कायदेविषयक अनेक पुस्तकं पालथी घालतो. स्वतःच्या आणि रॉनच्या केसचा, आरोपांचा बारकाईने अभ्यास करतो. अनेक टिपणं काढतो. दरम्यान 'इनोसन्स प्रोजेक्ट' या संस्थेचं नाव त्याच्या कानावर पडतो. इनोसन्स प्रोजेक्ट ही चुकीच्या रीतीने देहदंड/जन्मठेप किंवा तत्सम शिक्षा झालेल्या निर्दोष व्यक्तींना कायदेशीर मदत मिळवून देणारी सामाजिक/कायदेविषयक संस्था आहे. (जॉन ग्रिशम हा स्वतः इनोसन्स प्रोजेक्ट या संस्थेच्या संचालक मंडळाचा सदस्य आहे.) डेनिस या संस्थेशी संपर्क साधतो. आपली केस त्यांना समजावून सांगतो. आपली टिपणं त्यांना दाखवतो. ही केस किती अन्यायकारक पद्धतीने हाताळण्यात आलेली आहे हे इनोसन्स प्रोजेक्टच्या वकिलांच्याही लक्षात येतं. इनोसन्स प्रोजेक्ट आणि रॉनच्या केसवर काम करणारे अन्य वकील या केसमधल्या छोट्या छोट्या चुका शोधतात. कसा अन्याय घडलाय त्याचं पूर्ण विवेचन कोर्टाला सादर करतात. दरम्यान जवळपास अकरा वर्षांचा काळ निघून गेलेला असतो. न केलेल्या चुकीसाठी त्यांनी अकरा वर्षं कैद्याचं भीषण आयुष्य जगलेलं असतं.

त्याच दरम्यान बलात्कार किंवा तत्सम गुन्हे शोधण्यासाठी नुकत्याच विकसित झालेल्या डीएनएच्या तंत्राचा आधार घ्यायला न्यायालय मान्यता देतं. या डीएनएच्या तंत्राच्या आधारे डेब्राच्या प्रेतावर मिळालेल्या रक्त आणि वीर्याच्या नमुन्यांचा अभ्यास केला जातो आणि अखेर........ अखेर बारा वर्षांच्या अमानुष छळाचा, पोलिसी विक्षिप्तपणाचा अंत होतो. डेनिस आणि इनोसन्स प्रोजेक्टच्या अव्याहत परिश्रमाला यश येतं आणि रॉन आणि डेनिस निर्दोष असल्याचं सिद्ध होतं आणि त्यांची निर्दोष सुटका होते !!! पण तोवर त्यांच्या आयुष्यातली ऐन उमेदीच्या काळातली सोन्यासारखी १२ वर्षं मातीमोल झालेली असतात. !!

'द इनोसंट मॅन' प्रकाशित होण्याच्या काही काळ आधी जॉन ग्रिशम ला एका मुलाखतीत (अमेरिकन) न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न आणि त्याने दिलेलं उत्तर खाली देतोय.

Q : Is the criminal-justice system broken?
A : It is a mess. More than 100 people have been sent to death row who were later exonerated because they weren’t guilty or fairly tried. Most criminal defendants do not get adequate representation because there are not enough public defenders to represent them. There is a lot that is wrong.

मोर दॅन १००? शंभरपेक्षा अधिक ?? अर्थात त्याने १०० माणसं किती काळात बळी गेली हे सांगितलं नसलं तरीही १०० हा आकडा कितीही कालावधीसाठी खूप मोठा आहे!!

इनोसंट मॅन वाचताना आणि मालिका बघताना नेटफ्लिक्स वरच्याच 'मेकिंग अ मर्डरर' या अजून एका मालिकेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यातदेखील स्थानिक पोलिसांद्वारे स्टीव्हन अ‍ॅव्हरी नावाच्या एका निर्दोष व्यक्तीला केवळ जुन्या वैयक्तिक हेवेदाव्यांपायी खुनाचा आरोप लावून कसं तुरुंगात डांबलं जातं आणि त्याचा कसा शारीरिक, मानसिक छळ केला जातो याचं तपशीलवार चित्रण केलं आहे.

८ ऑक्टोबर २०२४ ला जॉन ग्रिशमचं 'Framed: Astonishing True Stories of Wrongful Convictions' नावाचं एक नवीन पुस्तक प्रकाशित होणार आहे ज्यात चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलेल्या १० निर्दोष व्यक्तींच्या कथा मांडण्यात येणार आहेत. त्यात तर अजून काय काय वाचायला लागणार आहे या कल्पनेनेही अंगावर काटा येतो.

---------------------

सप्टेंबर २०१२ मध्ये केन्टकी राज्यातले पोलीस सॅम्युअल लिट्ल नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीला अंमली पदार्थांच्या सेवन आणि विक्रीच्या गुन्ह्यासंदर्भात अटक करतात. तिथून त्याला कॅलिफोर्निया राज्यात नेलं जातं. तिथे त्याची डीएनए चाचणी करण्यात येते. डीएनए चाचणीचे निष्कर्ष पाहून पोलीसदल हादरून जातं. १९८७ ते १९८९ दरम्यान लॉस एंजलस शहरात घडलेल्या तीन खुनांच्या जागी आढळलेल्या संशयित खुन्याच्या डीएनएचं सॅम्युअल लिट्लच्या डीएनएशी कमालीचं साम्य असतं. त्या तीन खुनांसाठी त्याला अटक करण्यात येते. दरम्यान १९८२, ८४ साली झालेल्या अन्य दोन हत्यांमधला प्रमुख संशयित म्हणून लिट्लवर अजून आरोप लावण्यात येतात. कसून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान १९८० पासून विविध राज्यात झालेल्या जवळपास चाळीस हत्यांशी लिट्लचा संबंध आहे हे पोलिसांच्या लक्षात येतं आणि पोलिसदलात आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडते.

दरम्यान जिलिअन लॉरेन ही स्त्री पत्रकार तुरुंगात जाऊन लिट्लची मुलाखत घेण्याचं ठरवते. या मुलाखतीदरम्यान लॉरेनला अनेकदा लिट्लला भेटण्याची संधी मिळते, त्यांच्यात दीर्घ चर्चा होतात, अनेक तपशील मिळतात. लॉरेनच्या या सगळ्या प्रवासाचं चित्रण म्हणजे Confronting A Serial Killer ही मिनीसिरीज. प्रत्येक भेटीत लिट्ल लॉरेनशी अधिकाधिक मोकळेपणी बोलायला लागतो. आणि त्या मुलाखतीतून, चर्चेतून बाहेर पडणारे तपशील पाहून प्रत्येक एपिसोडगणिक प्रेक्षकाला नवनवीन धक्के बसत जातात. सॅम्युएल लिट्ल हा अमेरिकेतला सर्वाधिक हत्या केलेला खुनी आहे. १९७० ते २००५ या पस्तीस वर्षांत त्याने किमान ९३ स्त्रियांवर बलात्कार करून त्यांच्या हत्या केल्या आहेत. त्यातल्या ६० हत्यांचे पुरावे उपलब्ध आहेत. उरलेल्या हत्यांपैकी काही व्यक्ती, त्यांची नावं, ठिकाणं, साल यातल्या अनेक गोष्टी त्याला आठवतही नसल्याने त्याने त्या प्रेतांची कुठे आणि कशी विल्हेवाट लावली आहे या गोष्टींचा उलगडा आता कधीच होणार नसतो!! स्त्रिया या अत्याचार करून मारून टाकण्याच्या लायकीच्याच असतात असं त्याचं स्पष्ट मत असतं!!

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या सॅम्युअल लिट्लला चोरी, मारामारी, फसवणूक, बलात्काराचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांसाठी अमेरिकेतल्या अकरा राज्यांच्या पोलिसांद्वारे किमान पंचवीस वेळा अटक करण्यात आली होती. परंतु दर वेळी तो काही काळ शिक्षा भोगून, जामिनावर किंवा पुराव्याअभावी सुटून जात असे. तुरुंगातून सुटल्यावर तातडीने तो ते राज्य आणि शहर बदलून दुसऱ्या एखाद्या राज्यात आश्रयास जात असे. एकदा तर पोलिसांनी त्याला एका टॅक्सीमध्ये प्रत्यक्ष बलात्काराचा प्रयत्न करत असतानाही पकडलं. परंतु त्याच्या सुदैवाने भक्कम पुराव्याअभावी आणि आयत्या वेळी त्याच्या बाजूने देण्यात आलेल्या खोट्या साक्षीमुळे त्याची त्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

लॉरेनशी बोलताना त्याने त्याने केलेले सगळे गुन्हे, त्यांची वर्णनं, अन्य तपशील, स्त्रिया या केवळ उपभोग्य वस्तू असल्याचं त्याचं 'मौलिक' मत अशा सगळ्या गोष्टी एकेक करत सांगून टाकल्या. इतकंच नव्हे तर लॉरेन आपल्याला आवडत असल्याचंही त्याने तिला सांगून टाकलं. या सगळ्याचा भयंकर मानसिक त्रास लॉरेनला भोगावा लागला. नैराश्य, चिडचिड, कौटुंबिक पातळीवर वादविवाद असे अनेक धक्के तिला पचवावे लागले. त्यानंतर तिने लिट्लची मुलाखत घेताना तिला आलेल्या अनुभवांवर आधारित 'Behold the Monster' नावाचं एक पुस्तक लिहिलं. Confronting A Serial Killer ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांतच हे पुस्तकही प्रकाशित झालं.

हत्याच काय तर कुठल्याही छोट्यामोठ्या गुन्ह्याशीही दूरवर संबंध नसूनही केवळ संशयापायी किंवा व्यक्तिगत सूडापायी अडकवण्यात येऊन स्वप्नात खून केला असा खोटा कबुलीजबाब द्यायला लावण्यात आलेले रॉन, डेनिस, टॉमी, कार्ल आणि स्टीव्हन अ‍ॅव्हरी

आणि

अकरा राज्यांत, पस्तीस वर्षांत, ९३ स्त्रियांवर अत्याचार करून, त्यांच्या हत्या करून, किमान पंचवीस वेळा अटक होऊनही छोटी शिक्षा होऊन किंवा निरपराध सिद्ध होऊन सुटणारा सॅम्युअल लिट्ल हा अमेरिकन पोलीस, तपासयंत्रणा, न्यायव्यवस्था यांच्या अकार्यक्षमतेच्या दोन भिन्न ध्रुवांमधलं दर्शन देणारा कमालीचा विरोधाभास!!

विकसित देश, श्रीमंत पोलीस खाती, आधुनिक आणि अद्ययावत सुविधा आणि यंत्रणा हाताशी असूनही ती चालवणारे लोक कदाचित पुरेसे सक्षम नसल्याने अडकणारे साधेसुधे निरपराध लोक आणि त्याच वेळी कायद्याच्या पंजातून सुटून जाणारे अट्टल गुन्हेगार पाहून कमालीचं हतबल व्हायला होतं. आपल्याला या गोष्टी सध्या वाचवत नाहीत की स्क्रीनवर बघवतही नाहीत. ज्या लोकांनी हे सगळे हाल भोगले आहेत त्यांच्या अवस्थेचा विचार करून अत्यंत अगतिकता जाणवत राहते. अर्थात या सगळ्याची चीड येणं, नैराश्य दाटून येणं याशिवाय आपल्या हातात काहीच नसतं हेही तितकंच खरं. असो. त्यामुळे या सर्व सिरीज मन खंबीर करून स्वतःच्या जबाबदारीवर बघाव्यात ही विनंती.

--हेरंब ओक



















Monday, May 6, 2024

लापता बेगम्स


साधारण तीनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळी चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली होती. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि संवाद या प्रमुख बाजू भक्कम असलेल्या चित्रपटांमध्ये साधारणतः खोट काढण्यासारखं काहीही उरत नाही आणि त्याची आवश्यकताही नसते. किचन मध्ये या तिन्ही प्रमुख गोष्टी फार सशक्त आहेत आणि त्यामुळेच मलाही तो चित्रपट आवडला होता. मात्र माझा एक प्रमुख आक्षेप हा त्या चित्रपटाच्या शीर्षकावर होता. त्या चित्रपटाने विनाकारण आणलेला वैश्विक प्रतिनिधित्वाचा आव मला चांगलाच खटकला होता. तो चित्रपट म्हणजे कुठल्याही अंगाने समस्त भारतीय स्वयंपाकघरांचं (आणि कुटुंबव्यवस्था, पती-पत्नी नातेसंबंध इत्यादींचं) प्रतिनिधित्व करणारा खचितच नव्हता. माझ्या मते ती केरळमधल्या एका अतिसामान्य खेडेगावातल्या एका बौद्धिक आणि वैचारिक दृष्ट्या अत्यंत बुरसटलेल्या कुटुंबाची कथा होती. शीर्षकात वापरण्यात आलेलं 'ग्रेट' हा शब्द उपरोधाने आलेला आहे हे माहिती होतं आणि मान्यही होतं. त्यामुळे माझ्या मते त्या चित्रपटाचं योग्य शीर्षक फार तर 'The great Kerala village kitchen' असं काहीतरी असायला हवं होतं.

तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या, आवडलेल्या एका मल्याळी चित्रपटासाठी एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला आणि चर्चेत आलेला 'लापता लेडीज'. लापता देखील तांत्रिक दृष्ट्या अतिशय सशक्त आहे. वर उल्लेखलेल्या कथा, दिग्दर्शन आणि संवाद यांच्या बरोबरीनेच छायाचित्रण, संगीत या आणि अशा इतरही अनेक बारीकसारीक घटकांवर काम केलं आहे हे जाणवतं. पण किचन निदान नुसताच शीर्षकात फसलेला होता परंतु लेडीज तर संकल्पनेतच फसलेला आहे. बुरखा/नकाब/हिजाब हे प्रकार ज्या धर्माच्या प्राथमिक बाबींपैकी एक अतिशय महत्वाची ओळख आहे, त्या धर्माला केंद्रस्थानी न ठेवता (बुरख्याचा धाकटा भाऊ असलेला) घुंघट हा प्रकार ज्या धर्मात, समाजात अनिवार्य नाहीये त्याला केंद्रस्थानी ठेवण्याची ही चित्रकर्त्यांची अपरिहार्यता आहे की खोडसाळपणा की दोन्ही हे लक्षात न आल्याने लिहायला बसलो. ज्या धर्मात बुरख्याच्या समस्येसोबतच समाजातलं स्थान, शिक्षण, कुटुंबव्यवस्था या सर्वच बाबीत स्त्रियांना अधिकृत धर्माज्ञेनुसारच दुय्य्म स्थान आहे त्या धर्माला उघडपणे आरोपीच्या चौकटीत उभं करून प्रश्न विचारण्याचं धाडस चित्रकर्त्यांना का होत नसेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक असलं तरी ते उत्तर बरोबर नाही हे ही तितकंच खरं.

 चित्रपट आवडला असूनही चित्रपटाचा मूळ गाभा, संकल्पना न पटल्याने आणि त्यामागे चित्रकर्त्यांचा उद्देश प्रामाणिक नसल्याची खात्री असल्याने  (आणि ही खात्री त्यांच्या पूर्वेतिहासामुळे आहे.) थोडं तिरकस प्रकारे लिहून या खटकलेल्या गोष्टीचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट मला आवडला आहे हे पुन्हा एकदा यासाठी सांगतोय की तो कसा चांगला आहे आणि मला कसा कळला नाहीये अशा प्रतिक्रिया न आल्यास शक्यतो उत्तम. पण आल्या तरी मी प्रतिवाद करणार नाही हे ही तितकंच खरं.

------------------------------
लापता बेगम्स
------------------------------

सरत्या दिवसानिशी घुंघटधारी सनातन समाजाचा जगभरात वाढत चाललेला दहशतवाद, सनातन धर्माच्या पाईकांकडून धर्मांध अट्टहासापायी वेळोवेळी घडवण्यात येणाऱ्या दंगली, सनातन धर्माद्वारे केले जाणारे अत्याचार, हत्याकांडं, सनातन धर्मात असणारं स्त्रीचं दुय्यम स्थान, दिले जाणारे तोंडी घटस्फोट, घरगुती हिंसा, देवाब्राह्मणांच्या आणि अग्नीच्या साक्षीने पुरुषाला चार पत्नी करण्याची देण्यात आलेली अधिकृत मुभा या आणि अशा असंख्य अन्यायकारक चालीरीतींविरुद्ध आवाज उठवणं ही काळाची गरज आहे हे कुठलाही सजग नागरिक मान्य करेल. परंतु हाच आवाज उठवत असताना सनातन धर्माज्ञांना विरोध दर्शवला म्हणून, आकाशातून आलेल्या सनातन ग्रंथाच्या आणि एकमेव सनातन देवाच्या विरुद्ध विधानं केली म्हणून सनातन धार्मिक ग्रंथाच्या आधारे दिल्या जाणाऱ्या शिरच्छेदाच्या शिक्षेचीही तितकीच भीती चित्रपट निर्मात्याला वाटत असणे यातही काहीच चूक नाही.

सनातन धर्मात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा तर द्यायचा आहे परंतु जीवही प्यारा आहे अशा घालमेलीत सापडलेले असताना एका एकमेव अशा शांतीप्रिय धर्माचा आधार घेऊन, त्या मूळच्या अत्यंत शांतीप्रिय धर्मावर सगळे दोषारोप करून चित्रनिर्मिती करणे हे सर्वात सुरक्षित, उमदं आणि तितकंच चतुर आणि चाणाक्ष असं पाऊल आहे याबद्दलही दुमत नसावं. कारण शांतीप्रिय धर्माचे पाईक कधीच कुठल्याही गोष्टीच्या विरोधात मोर्चा नेत नाहीत, संप करत नाहीत की साधा निषेधही नोंदवत नाहीत. हे सगळे प्रकार हे फक्त आणि फक्त सनातनी धर्माच्या अखत्यारीतले आहेत. आणि हेच योग्य प्रकारे ओळखून, सनातन धर्मातल्या अनिष्ट चालीरीतींचा विरोध करण्यासाठी शांतीप्रिय धर्माला लक्ष्य करून त्याच्या पाईकांवर टीका करणं हे सगळ्यात साधंसोपं हत्यार आहे. आणि याच हत्याराचा अचूक वापर करत अतिशय हुशार चित्रकर्त्यांनी 'बनवलेला' तितकाच हुशार चित्रपट अर्थात 'लापता बेगम' प्रेक्षकांच्या भेटीस येतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच एकसारखे तंबू परिधान केलेल्या स्त्रिया आणि एकसारखे लांब सदरे आणि तोकड्या विजारी घातलेले पुरुष अशा तीन-चार नवविवाहित जोडप्यांचं दर्शन प्रेक्षकांना घडतं. पण थोड्याच वेळात त्यातलीच एक बंडखोर बेगम आपल्या भेटीस येते. स्त्री म्हणजे अपत्य जन्माला घालणारी शेती अशी धर्ममान्यता असलेल्या सनातन धर्मातल्या एका बंडखोर स्त्रीला चक्क बोलताना, स्वतःचं मत व्यक्त करताना, इतरांच्या चुकीच्या मतांना विरोध करताना, आणि शेवटी तर स्वतःच्याच खुद्द खाविंदांचं नाव उच्चारताना बघून पडद्यावरचे धर्ममार्तंड जेवढे हादरतात तेवढेच समोर बसलेले शांतिप्रय प्रेक्षकही.

हिणकस, निद्रिस्त, मागासलेल्या, अन्यायकारक, स्त्रीद्वेष्ट्या, पोथीवादी, पुराणमतवादी, दहशतवादी अशा सनातन धर्माच्या दहशतीपायी त्या धर्मातल्या अन्यायकारक रूढींवर जीवाच्या भीतीने टीका करता येत नसल्याने सर्व प्रकारची टीका करण्यासाठी सर्वसमावेशक, सेक्युलर, उदारमतवादी, मुक्त विचारांच्या, आधुनिक अशा एकेश्वर पंथाची निवड करून चित्रकर्त्यांनी एकूणच अन्यायकारी परिस्थितीवर अतिशय अप्रतिम भाष्य केलं आहे.

एका प्रसंगात सनातनी सम्राटांच्या अतिरेकी धर्मांध प्रेमापोटी त्यांनी वाळवंटी शांतीप्रिय एकेश्वरवादी पंथाकडून बळाने जिंकलेल्या शहरांची मूळ प्राचीन नावं बदलून त्यांना सनातनी धर्माशी सुसंगत अशी नावं देण्याच्या अट्टहासावरही चांगलेच कोरडे ओढले आहेत तर अन्य एका प्रसंगात स्त्रियांना शिकू न देण्याच्या, त्यांना नोकरी व्यवसाय करण्यास मनाई करण्याच्या, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला स्थापत्य इत्यादी गोष्टींना निषिद्ध मानणाऱ्या सनातन धर्मातील तालिबामणी प्रथेवरही अचूक कोरडे ओढले आहेत.

अर्थात ही सारी टीका शांतीप्रिय समाजाबद्दल दाखवली गेली असली तरी मूळ रोख सनातन धर्मावर आहे हे सुजाण प्रेक्षक सहजच ओळखतो. परंतु सनातन धर्माच्या अतिरेकी, धर्मांध दहशतवादाच्या भीतीने ते प्रत्यक्षात दाखवता आलं नाही तरी अशा subtle पद्धतीने दाखवल्याबद्दल चित्रनिर्मात्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. पावलोपावली अन्याय होत असूनही त्याविरुद्ध लढा देणं तर सोडाच पण निषेधाचा साधा शब्दही उच्चारता येत नसलेल्या एका शांतीप्रिय समाजाचा दबका आवाज प्रेक्षकांसमोर अतिशय मार्मिक पद्धतीने आणल्याबद्दल हा समाज चतुर आणि चाणाक्ष असे चित्रकर्ते अमीर कुलकर्णी आणि किरण देशपांडे यांच्याप्रती आजन्म उपकृत राहील याची आम्हास खात्री आहे.

--हेरंब ओक

Friday, October 27, 2023

अमर्याद अंतराळात अस्तित्व टिकवण्याची एकांड्या शिलेदारांची धडपड : Martian आणि Hail Mary

काही वर्षांपूर्वी The Martian नावाच्या चित्रपटाचं ट्रेलर बघितलं होतं आणि तेव्हाच ते ट्रेलर, ती संकल्पना हे सगळंच फार आवडलं होतं. पृथ्वीवरचा एखादा अंतराळवीर चुकून मंगळावर अडकून पडणं आणि तिथे जिवंत राहण्याची, तिथून सुटण्याची धडपड करणं हा प्रकार नुसता ऐकतानाही अंगावर काटा आणणारा आहे. त्यानंतर तो चित्रपट अँडी विअर नावाच्या लेखकाच्या त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे असं कळल्याने ते पुस्तक मिळवून वाचायला सुरुवात केली. परंतु ते जेमतेम १५-२०% होईपर्यंत चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यात तो बघितल्याने पुस्तक बाजूला पडलं. गेल्यावर्षी पुन्हा एकदा ठरवून The Martian वाचायला घेतलं. आणि आधी अर्धवट सोडल्याचा प्रचंड पश्चात्ताप झाला.

संशोधनासाठी मंगळावर गेलेली नासाचा एक गट मंगळाच्या भूमीवर उतरून मातीचे नमुने वगैरे गोळा करत असताना अचानक धुळीचं एक प्रलयंकारी वादळ येतं. आपल्या कादंबरीचा नायक वगळता सगळे अंतराळवीर सुदैवाने एकत्र असतात आणि ते यशस्वीरीत्या पुन्हा एकदा यानात प्रवेशही करतात. धूळ, अंधार, वादळीवारा या सगळ्यांमध्ये नायक मागे राहिलाय हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो. हा आपल्या कादंबरीचा नायक असला तरी त्या चमूचा तो एक सामान्य सदस्य असतो. अर्थातच त्याच्याकडे संसाधनं, तंत्रज्ञान, उपाय हे सगळं मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतं. आणि मग सुरु होते ती या अमर्याद अंतराळात आपलं अस्तित्व टिकवून जिवंत राहण्यासाठी एकांड्या शिलेदाराने सुमारे दोन वर्ष दिलेल्या चित्तथरारक धडपडीची आणि झगड्याची एक रोमहर्षक कहाणी.

कादंबरी तीन स्थळांवर आकाराला येते. यात मंगळावर अडकलेला आपला कथानायक मार्क वॉटनी (Mark Watney) याची मंगळावर जिवंत राहण्याची, नासाशी संपर्क करण्याचे अनेकविध प्रयत्न करण्याची, जिवंत राहण्यासाठी अभिनव कल्पना वापरून मंगळावर धान्य पिकवण्याची धडपड, धावपळ याचं इत्यंभूत वर्णन तर येतंच परंतु त्याचबरोबर दरम्यान सतत येणारं अपयश, त्यातून चिकाटीने मार्ग काढणारा जिद्दी मार्क या सगळ्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटण्यासारखी कारणं देऊन मंगळवारच्या कथाभागाची मांडणी केली जाते.

दुसरा कथाभाग घडतो तो अमेरीकेतल्या नासाच्या महत्वाच्या शहरांमधल्या विविध कार्यलयांमध्ये. नासाचे हजारो वैज्ञानिक, कर्मचारी वॉटनीला परत आणण्यासाठी काय काय धडपडी करतात, क्लृप्त्या योजतात, प्रसंगी आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या आपल्या शत्रूंचंही मन वळवून कशी त्यांची मदत घेतात हे सगळं फार सुरेख पद्धतीने चितारलं आहे. 

वॉटनीला (अपघातानेच) एकट्याला टाकून पृथ्वीच्या दिशेने परतत असलेल्या यानातल्या वॉटनीच्या सहकाऱ्यांचं चित्रण तिसऱ्या कथाभागात आहे. वॉटनीला मंगळावर सोडून आल्याने पश्चात्तापदग्ध झालेला त्याचा चमू, त्यातून काय मार्ग काढता येईल यासाठी चालू असलेले त्यांचे प्रयत्न आणि अखेरीस मिळणारी एक जबरदस्त धक्कादायक कलाटणी हे सगळं वाचणं हा प्रचंड उत्कंठावर्धक अनुभव आहे. या तिन्ही प्रतलांवर कथा हळूहळू पुढे सरकत असते. प्रत्येक भागानंतर एक नवीन धक्का, एक नवीन धोका वाचकाच्या स्वागतासाठी तयार असतो आणि वॉटनी त्याचं तांत्रिक, विज्ञानविषयक ज्ञान आणि प्रसंगावधान वापरून त्या त्या संकटांचा सामना करत राहतो आणि अखेरीस यशस्वी होतो!

एखाद्या लेखकाचं पुस्तक आवडलं की त्याची इतर पुस्तकं शोधून वाचून काढायच्या माझ्या नेहमीच्या वाचन-सवयीप्रमाणे किंवा शिरस्त्याप्रमाणे शोधाशोध केली असता अँडी विअरची अजून दोन पुस्तकं असल्याचं दिसलं. एक अर्टेमिस (Artemis) आणि दुसरं म्हणजे प्रोजेक्ट हेल मेरी (Project Hail Mary). अर्टेमिसचं रेटिंग फारसं खास नसल्याने आणि प्रोजेक्ट हेल मेरीची तोंडओळख वाचत असतानाच तो विषय प्रचंड आवडल्याने लगेच प्रोजेक्ट हेल मेरी सुरु केलं.

सूर्याचं तेज लोपत चाललेलं असून आणखीन काही अब्ज वर्षांत तो एक थंड गोळा बनून जाणार आहे असं आपण नेहमीच वाचत असतो. फक्त प्रोजेक्ट हेल मेरी मध्ये हा प्रकार काही अब्ज वर्षांऐवजी पुढच्या जेमतेम आठ-दहा वर्षांत होणार असतो. आणि त्याचं कारण असतं सूर्याचं तेज, उष्णता शोषून घेणारे अंतराळातले काही जीव. अर्थात हा सगळं प्रकार हळू हळू लक्षात येत जातो. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 'विशेष जैविक स्थिती असणाऱ्या' काही ठराविक अंतराळवीरांचा एक गट सूर्याच्या दिशेने पाठवला जातो.

ही कादंबरीदेखील सर्वस्वी दोन भिन्न स्थळ आणि काळांच्या प्रतलावर घडते. कथानायकाला स्वयंचलित आणि यंत्रमानवांद्वारे चालवण्यात येणाऱ्या एका इस्पितळात जाग येते या घटनेने कादंबरीची सुरुवात होते. त्यानंतर एका भल्या मोठ्या धक्क्यासहित पहिलं प्रकरण संपतं. सुरुवातीची कित्येक प्रकरणं आपल्यालाच काय तर खुद्द नायकालाही तो कुठे आहे, इथे कशासाठी आहे, काय करतोय या गोष्टी तर राहूद्याच पण साधं त्याचं स्वतःचं नावही माहीत/आठवत नसतं. त्यानंतर नाना खटपटी करत नायक त्याला (आणि आपल्यालाही) पडलेल्या अनेक प्राथमिक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे काही यशस्वी आणि बरेच अयशस्वी प्रयत्न करतो.

याला समांतर कथाभाग सुरु होतो तो अमेरिकेतल्या एका प्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकाच्या दिवसाच्या सुरुवातीच्या प्रसंगाने. एक विज्ञान शिक्षक, त्याचे विद्यार्थी, त्याचे सहकारी, मैत्रीण अशी सगळी पात्रं हळूहळू कथेत प्रवेश करायला लागतात. आधीच्या कथाभागात स्वयंचलित इस्पितळात अडकलेला नायक कोण असावा याची एक अंधुकशी ओळख झाल्याचा एक आभास निर्माण करत या कथाभागातलं पहिलं प्रकरण संपतं.

दोन्ही कथाभाग हळूहळू पुढे सरकत राहतात आणि आपल्याला हे दोन नायक, पृथीवर आलेलं संकट, त्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र येऊन लढा देण्याची तयारी करणे आणि त्याचबरोबर आधीच्या कथाभागातला नायक, त्याला आपल्या 'भौगोलिक' स्थानाची झालेली जाणीव, त्याला एलियन सदृश सजीव भेटणे, कथानायकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे, स्वरलहरींच्या माध्यमातून संवाद साधणे अशा अनेकानेक धक्कादायक आणि तितक्याच उत्कंठावर्धक व मनोरंजक घटनांनी हा संपूर्ण प्रवास भरलेला आहे.

 


दोन्ही पुस्तकं वाचत असताना आवर्जून लक्षात येणार एक मुद्दा म्हणजे अँडी विअर हा अतिशय निष्णात स्टोरीटेलर आहे. कथेची मांडणी कशी करावी, तिचा वेग काय असावा, तिने कुठली वळणं कुठे घ्यावीत, किती वेगाने घ्यावीत, त्यात तांत्रिक बाबी किती असाव्यात, विनोद किती असावा, संवाद कसे चटपटीत असावेत या सर्व महत्वाच्या बाबींवर त्याचं कमालीचं प्रभुत्व आहे आणि त्या सगळ्यासगळ्यावर त्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे हे दोन्ही कादंबऱ्यांच्या ओळीओळीतून दिसून येते. सायफाय प्रकारच्या कादंबऱ्या असल्याने दोन्ही कादंबऱ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, तांत्रिक बाबी यांचे असंख्य उल्लेख आहेत. Martian मध्ये कमी आणि सुसह्य असले तरी हेल मेरी मध्ये तर कधीकधी खूपच जास्त आणि अतिशय जड वाटणाऱ्या वैज्ञानिक संकल्पनांची उकल करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यातल्या काही गोष्टी कळतात काही काही डोक्यावरून गेल्यासारख्याही वाटतात. परंतु कथेचा प्रवास अतिशय प्रवाहीपणे मांडण्याचा अँडी विअरचा हातखंडा असल्याने दोन्ही कादंबऱ्या किंचितही कंटाळवाण्या होत नाहीत. उदाहरणार्थ हेल मेरी मध्ये प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या यानाच्या इंधनाचा शोध असो किंवा अंतराळात यानात शिरलेल्या विषाणूंवर मात करण्यासाठी योजलेला अभिनव उपाय असो. या सर्व बाबी तांत्रिकदृष्ट्या अतिशय गहन असल्या तरी अँडी विअर त्या आपल्याला जास्तीत जास्त सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न करतो हे जाणवत राहतं.

यातल्या हेल मेरीचा शेवट मात्र अतिशय धक्कादायक असा आहे आणि Martian च्या शेवटापेक्षा तो मला फारच जास्त आवडला. मात्र पुस्तक म्हणून Martian हे केव्हाही उजवं आहे हे माझं वैयक्तिक मतं. दोन्ही पुस्तकं आवर्जून वाचावीत अशीच आहेत हे मात्र नक्की. (वेळ मिळाला की अर्टेमिसही वाचून बघायचा विचार आहे. बघू कसं जमतंय.)  The Martian हा चित्रपट अतिशय सुरेख आहे याचा वर उल्लेख आलाच. पण हेल मेरीवरच्या चित्रपटाचीही तयारी चालू असून त्यात रायन गॉसलींग प्रमुख भूमिकेत असून तो ही लवकरच प्रदर्शित होणार आहे असं वाचलं आहे.   

सायफाय म्हंटलं की एलियन्स पृथ्वीवर, त्यातही अमेरिकेवर आणि त्यातही नवीनयार्क किंवा एलेवर हल्ला करणार आणि मग काही असामान्य सुपरहिरोंच्या मदतीने एलियन्सवर विजय मिळवणार या आताशा घासून गुळगुळीत झालेल्या आणि तद्दन हास्यापद वाटायला लागणाऱ्या कथाप्रकारांचा कंटाळा आला असेल तर अंतराळात अडकलेल्या एकांड्या शिलेदारांना केंद्रस्थानी ठेवून सशक्त अशा सायफाय कादंबऱ्यांची निर्मिती करणाऱ्या अँडी विअर या एकांड्या सायफाय कादंबरीकार/शिलेदाराच्या या दोन कादंबऱ्या आवर्जून वाचणं अनिवार्य आहे.

--हेरंब ओक