Friday, October 27, 2023

अमर्याद अंतराळात अस्तित्व टिकवण्याची एकांड्या शिलेदारांची धडपड : Martian आणि Hail Mary

काही वर्षांपूर्वी The Martian नावाच्या चित्रपटाचं ट्रेलर बघितलं होतं आणि तेव्हाच ते ट्रेलर, ती संकल्पना हे सगळंच फार आवडलं होतं. पृथ्वीवरचा एखादा अंतराळवीर चुकून मंगळावर अडकून पडणं आणि तिथे जिवंत राहण्याची, तिथून सुटण्याची धडपड करणं हा प्रकार नुसता ऐकतानाही अंगावर काटा आणणारा आहे. त्यानंतर तो चित्रपट अँडी विअर नावाच्या लेखकाच्या त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे असं कळल्याने ते पुस्तक मिळवून वाचायला सुरुवात केली. परंतु ते जेमतेम १५-२०% होईपर्यंत चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यात तो बघितल्याने पुस्तक बाजूला पडलं. गेल्यावर्षी पुन्हा एकदा ठरवून The Martian वाचायला घेतलं. आणि आधी अर्धवट सोडल्याचा प्रचंड पश्चात्ताप झाला.

संशोधनासाठी मंगळावर गेलेली नासाचा एक गट मंगळाच्या भूमीवर उतरून मातीचे नमुने वगैरे गोळा करत असताना अचानक धुळीचं एक प्रलयंकारी वादळ येतं. आपल्या कादंबरीचा नायक वगळता सगळे अंतराळवीर सुदैवाने एकत्र असतात आणि ते यशस्वीरीत्या पुन्हा एकदा यानात प्रवेशही करतात. धूळ, अंधार, वादळीवारा या सगळ्यांमध्ये नायक मागे राहिलाय हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो. हा आपल्या कादंबरीचा नायक असला तरी त्या चमूचा तो एक सामान्य सदस्य असतो. अर्थातच त्याच्याकडे संसाधनं, तंत्रज्ञान, उपाय हे सगळं मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतं. आणि मग सुरु होते ती या अमर्याद अंतराळात आपलं अस्तित्व टिकवून जिवंत राहण्यासाठी एकांड्या शिलेदाराने सुमारे दोन वर्ष दिलेल्या चित्तथरारक धडपडीची आणि झगड्याची एक रोमहर्षक कहाणी.

कादंबरी तीन स्थळांवर आकाराला येते. यात मंगळावर अडकलेला आपला कथानायक मार्क वॉटनी (Mark Watney) याची मंगळावर जिवंत राहण्याची, नासाशी संपर्क करण्याचे अनेकविध प्रयत्न करण्याची, जिवंत राहण्यासाठी अभिनव कल्पना वापरून मंगळावर धान्य पिकवण्याची धडपड, धावपळ याचं इत्यंभूत वर्णन तर येतंच परंतु त्याचबरोबर दरम्यान सतत येणारं अपयश, त्यातून चिकाटीने मार्ग काढणारा जिद्दी मार्क या सगळ्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटण्यासारखी कारणं देऊन मंगळवारच्या कथाभागाची मांडणी केली जाते.

दुसरा कथाभाग घडतो तो अमेरीकेतल्या नासाच्या महत्वाच्या शहरांमधल्या विविध कार्यलयांमध्ये. नासाचे हजारो वैज्ञानिक, कर्मचारी वॉटनीला परत आणण्यासाठी काय काय धडपडी करतात, क्लृप्त्या योजतात, प्रसंगी आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या आपल्या शत्रूंचंही मन वळवून कशी त्यांची मदत घेतात हे सगळं फार सुरेख पद्धतीने चितारलं आहे. 

वॉटनीला (अपघातानेच) एकट्याला टाकून पृथ्वीच्या दिशेने परतत असलेल्या यानातल्या वॉटनीच्या सहकाऱ्यांचं चित्रण तिसऱ्या कथाभागात आहे. वॉटनीला मंगळावर सोडून आल्याने पश्चात्तापदग्ध झालेला त्याचा चमू, त्यातून काय मार्ग काढता येईल यासाठी चालू असलेले त्यांचे प्रयत्न आणि अखेरीस मिळणारी एक जबरदस्त धक्कादायक कलाटणी हे सगळं वाचणं हा प्रचंड उत्कंठावर्धक अनुभव आहे. या तिन्ही प्रतलांवर कथा हळूहळू पुढे सरकत असते. प्रत्येक भागानंतर एक नवीन धक्का, एक नवीन धोका वाचकाच्या स्वागतासाठी तयार असतो आणि वॉटनी त्याचं तांत्रिक, विज्ञानविषयक ज्ञान आणि प्रसंगावधान वापरून त्या त्या संकटांचा सामना करत राहतो आणि अखेरीस यशस्वी होतो!

एखाद्या लेखकाचं पुस्तक आवडलं की त्याची इतर पुस्तकं शोधून वाचून काढायच्या माझ्या नेहमीच्या वाचन-सवयीप्रमाणे किंवा शिरस्त्याप्रमाणे शोधाशोध केली असता अँडी विअरची अजून दोन पुस्तकं असल्याचं दिसलं. एक अर्टेमिस (Artemis) आणि दुसरं म्हणजे प्रोजेक्ट हेल मेरी (Project Hail Mary). अर्टेमिसचं रेटिंग फारसं खास नसल्याने आणि प्रोजेक्ट हेल मेरीची तोंडओळख वाचत असतानाच तो विषय प्रचंड आवडल्याने लगेच प्रोजेक्ट हेल मेरी सुरु केलं.

सूर्याचं तेज लोपत चाललेलं असून आणखीन काही अब्ज वर्षांत तो एक थंड गोळा बनून जाणार आहे असं आपण नेहमीच वाचत असतो. फक्त प्रोजेक्ट हेल मेरी मध्ये हा प्रकार काही अब्ज वर्षांऐवजी पुढच्या जेमतेम आठ-दहा वर्षांत होणार असतो. आणि त्याचं कारण असतं सूर्याचं तेज, उष्णता शोषून घेणारे अंतराळातले काही जीव. अर्थात हा सगळं प्रकार हळू हळू लक्षात येत जातो. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 'विशेष जैविक स्थिती असणाऱ्या' काही ठराविक अंतराळवीरांचा एक गट सूर्याच्या दिशेने पाठवला जातो.

ही कादंबरीदेखील सर्वस्वी दोन भिन्न स्थळ आणि काळांच्या प्रतलावर घडते. कथानायकाला स्वयंचलित आणि यंत्रमानवांद्वारे चालवण्यात येणाऱ्या एका इस्पितळात जाग येते या घटनेने कादंबरीची सुरुवात होते. त्यानंतर एका भल्या मोठ्या धक्क्यासहित पहिलं प्रकरण संपतं. सुरुवातीची कित्येक प्रकरणं आपल्यालाच काय तर खुद्द नायकालाही तो कुठे आहे, इथे कशासाठी आहे, काय करतोय या गोष्टी तर राहूद्याच पण साधं त्याचं स्वतःचं नावही माहीत/आठवत नसतं. त्यानंतर नाना खटपटी करत नायक त्याला (आणि आपल्यालाही) पडलेल्या अनेक प्राथमिक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे काही यशस्वी आणि बरेच अयशस्वी प्रयत्न करतो.

याला समांतर कथाभाग सुरु होतो तो अमेरिकेतल्या एका प्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकाच्या दिवसाच्या सुरुवातीच्या प्रसंगाने. एक विज्ञान शिक्षक, त्याचे विद्यार्थी, त्याचे सहकारी, मैत्रीण अशी सगळी पात्रं हळूहळू कथेत प्रवेश करायला लागतात. आधीच्या कथाभागात स्वयंचलित इस्पितळात अडकलेला नायक कोण असावा याची एक अंधुकशी ओळख झाल्याचा एक आभास निर्माण करत या कथाभागातलं पहिलं प्रकरण संपतं.

दोन्ही कथाभाग हळूहळू पुढे सरकत राहतात आणि आपल्याला हे दोन नायक, पृथीवर आलेलं संकट, त्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र येऊन लढा देण्याची तयारी करणे आणि त्याचबरोबर आधीच्या कथाभागातला नायक, त्याला आपल्या 'भौगोलिक' स्थानाची झालेली जाणीव, त्याला एलियन सदृश सजीव भेटणे, कथानायकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे, स्वरलहरींच्या माध्यमातून संवाद साधणे अशा अनेकानेक धक्कादायक आणि तितक्याच उत्कंठावर्धक व मनोरंजक घटनांनी हा संपूर्ण प्रवास भरलेला आहे.

 


दोन्ही पुस्तकं वाचत असताना आवर्जून लक्षात येणार एक मुद्दा म्हणजे अँडी विअर हा अतिशय निष्णात स्टोरीटेलर आहे. कथेची मांडणी कशी करावी, तिचा वेग काय असावा, तिने कुठली वळणं कुठे घ्यावीत, किती वेगाने घ्यावीत, त्यात तांत्रिक बाबी किती असाव्यात, विनोद किती असावा, संवाद कसे चटपटीत असावेत या सर्व महत्वाच्या बाबींवर त्याचं कमालीचं प्रभुत्व आहे आणि त्या सगळ्यासगळ्यावर त्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे हे दोन्ही कादंबऱ्यांच्या ओळीओळीतून दिसून येते. सायफाय प्रकारच्या कादंबऱ्या असल्याने दोन्ही कादंबऱ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, तांत्रिक बाबी यांचे असंख्य उल्लेख आहेत. Martian मध्ये कमी आणि सुसह्य असले तरी हेल मेरी मध्ये तर कधीकधी खूपच जास्त आणि अतिशय जड वाटणाऱ्या वैज्ञानिक संकल्पनांची उकल करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यातल्या काही गोष्टी कळतात काही काही डोक्यावरून गेल्यासारख्याही वाटतात. परंतु कथेचा प्रवास अतिशय प्रवाहीपणे मांडण्याचा अँडी विअरचा हातखंडा असल्याने दोन्ही कादंबऱ्या किंचितही कंटाळवाण्या होत नाहीत. उदाहरणार्थ हेल मेरी मध्ये प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या यानाच्या इंधनाचा शोध असो किंवा अंतराळात यानात शिरलेल्या विषाणूंवर मात करण्यासाठी योजलेला अभिनव उपाय असो. या सर्व बाबी तांत्रिकदृष्ट्या अतिशय गहन असल्या तरी अँडी विअर त्या आपल्याला जास्तीत जास्त सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न करतो हे जाणवत राहतं.

यातल्या हेल मेरीचा शेवट मात्र अतिशय धक्कादायक असा आहे आणि Martian च्या शेवटापेक्षा तो मला फारच जास्त आवडला. मात्र पुस्तक म्हणून Martian हे केव्हाही उजवं आहे हे माझं वैयक्तिक मतं. दोन्ही पुस्तकं आवर्जून वाचावीत अशीच आहेत हे मात्र नक्की. (वेळ मिळाला की अर्टेमिसही वाचून बघायचा विचार आहे. बघू कसं जमतंय.)  The Martian हा चित्रपट अतिशय सुरेख आहे याचा वर उल्लेख आलाच. पण हेल मेरीवरच्या चित्रपटाचीही तयारी चालू असून त्यात रायन गॉसलींग प्रमुख भूमिकेत असून तो ही लवकरच प्रदर्शित होणार आहे असं वाचलं आहे.   

सायफाय म्हंटलं की एलियन्स पृथ्वीवर, त्यातही अमेरिकेवर आणि त्यातही नवीनयार्क किंवा एलेवर हल्ला करणार आणि मग काही असामान्य सुपरहिरोंच्या मदतीने एलियन्सवर विजय मिळवणार या आताशा घासून गुळगुळीत झालेल्या आणि तद्दन हास्यापद वाटायला लागणाऱ्या कथाप्रकारांचा कंटाळा आला असेल तर अंतराळात अडकलेल्या एकांड्या शिलेदारांना केंद्रस्थानी ठेवून सशक्त अशा सायफाय कादंबऱ्यांची निर्मिती करणाऱ्या अँडी विअर या एकांड्या सायफाय कादंबरीकार/शिलेदाराच्या या दोन कादंबऱ्या आवर्जून वाचणं अनिवार्य आहे.

--हेरंब ओक

 

No comments:

Post a Comment