एवढं कौतुक करण्यासारखं विशेष असं त्या चित्रपटात आहे तरी काय? आणि प्रेक्षकांच्या एवढ्या कौतुकाला आणि प्रेमाला तो खरंच पात्र आहे का? आणि असला तर का? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक आहे. 'केरला स्टोरी' आणि 'काश्मीर फाईल्स' या दोन्ही प्रचंड यशस्वी ठरलेल्या चित्रपटांमध्ये काही साम्यस्थळं नक्की आहेत. पहिली गोष्ट म्हणजे केरला स्टोरी हा ही काश्मीर फाईल्स प्रमाणे तीन कालरेषां (टाईमलाईन्स) वर घडतो आणि अरेखीय (नॉन-लिनिअर) पद्धतीने आपल्यापुढे सादर केला जातो. सद्यकाळ, काही महिन्यांपूर्वीचा काळ आणि दोन वर्षांपूर्वीचा काळ अशा तीन काळांत घडणाऱ्या या चित्रपटात पडद्यावर दाखवला जाणारा काळ कुठला आहे हे फक्त सुरुवातीला एकदा सांगितल्यावर त्यानंतर पुढे एकदाही सांगायची गरज पडत नाही इतक्या हुशारीने आणि खुबीने आपल्यासमोर सुस्पष्ट (self explanatory) प्रसंगांची मालिका दाखवण्यात दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि संकलक संजय शर्मा हे कमालीचे यशस्वी झाले आहेत.
दिग्दर्शक सुदिप्तो सेनने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे 'लव जिहाद' ही संज्ञा केरळमधील एका चर्चच्या आर्चबिशप यांनी १९९८ साली सर्वप्रथम वापरली. अन्य धर्मांतील लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्मपरावर्तित करण्याचं ख्रिस्ती धर्माचं ‘महत्त्वाचं’ कार्य करत असताना त्यांच्या अचानक लक्षात आलं की ख्रिस्ती धर्मातील युवती या छळाबळाने किंवा धाकदपटशा वापरून मोठ्या प्रमाणात धर्मांतरित केल्या जात आहेत. आणि त्यानंतर या प्रकारच्या घटनांना दबकत दबकत का होईना वाचा फुटली. या घटना कशा घडतात, सुशिक्षित आणि सुसंस्कारित घरातल्या मुली इतक्या सहजपणे धर्मपरिवर्तनाला कशा तयार होतात, धर्मपरिवर्तनाची नक्की प्रक्रिया काय, त्यातले टप्पे कुठले, कुठल्या टप्प्यांवर नक्की काय काय घडतं, धर्मपरिवर्तना झाल्यानंतर त्या मुलींचा प्रवास नक्की कुठल्या दिशेने होतो, त्यांच्या कुटुंबियांचं पुढे काय होतं, या सगळ्याच्या मागे कुप्रसिद्ध जागतिक दहशतवादी संघटना आयसिस ही कशी आहे, आयसिसचा पसारा नक्की कुठल्या देशांत आणि कुठवर पसरला आहे आणि आयसिस संघटना एवढे सगळे देश, धर्म आणि मानवतेच्या विरुद्ध असलेले क्रूर प्रकार इतक्या सहजी कशी घडवून आणते आहे अशा असंख्य प्रश्नांची वस्तुनिष्ठ आणि डोळसपणे दिलेली उत्तरं म्हणजे केरला स्टोरी हा चित्रपट.
संपूर्ण जगावर फक्त शरिया/शरियत चाच कायदा लागू झाला पाहिजे असं आयसिस चं स्पष्ट मत असून इराक आणि सीरियाच्या ज्या काही ठराविक प्रदेशांवर त्यांचं राज्य होतं त्या भूमीवर (म्हणजेच दार-उल-इस्लाम अर्थात इस्लामच्या भूमीवर) आयसिसने शरियतचा कायदा अंमलात आणला. या कायद्यानुसार छोट्या छोट्या गुन्ह्यांना भयंकर शिक्षा आहेत आणि या सर्व प्रकारांवर हा चित्रपट सचित्र भाष्य करतो. स्त्रीने मेकअप केल्याबद्दल हात तोडणे आणि पुरुषाने आपल्या पत्नीला तो करू दिल्याबद्दल त्याच्या डोक्यात गोळी घालणे, स्त्रियांना मोबाईल वापरास संमती नसणे आणि तो वापरल्यास देहांताची शिक्षा मिळणे, युद्धात बंदी बनवलेल्या स्त्रियांना लैंगिक गुलाम (सेक्स स्लेव्ह) म्हणून वापरणे, त्यांना उपाशी ठेवणे, कोंडून ठेवणे, मारपीट करणे, बंदिवान स्त्रियांचा बाजारातल्या एखाद्या वस्तूप्रमाणे लिलाव करणे, विवाहबाह्य संबंध असलेल्या स्त्रीपुरुषाला दगडांनी ठेचून मारणे या आणि अशा प्रकारच्या अनेक शिक्षांचं भयंकर दर्शन चित्रपटात घडतं. व्यभिचारी स्त्रीला कंबरेपर्यंत जमिनीत गाडून ठेवून त्यानंतर ती मरेपर्यंत तिच्यावर (अर्थात फक्त पुरुषांनीच) यथेच्छ अशी दगडफेक करण्याच्या कैक घटना आयसिसचा अंमल असलेल्या प्रदेशात घडलेल्या आहेत. अशा एका सोराया मानुचेरी नावाच्या इराणी स्त्रीच्या बाबतीत घडलेल्या सत्यघटनेवर आधारित असलेल्या 'द स्टोनिंग ऑफ सोराया एम' नावाच्या पुस्तकावर आधारित त्याच नावाचा एक चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. त्या पुस्तक आणि चित्रपटातल्या 'स्टोनिंग' च्या प्रसंगाशी तंतोतंत जुळणारा एक प्रसंग चित्रपटाच्या सुरुवातीलाच नायिकेला अपघातानेच दिसतो आणि तिच्याबरोबर प्रेक्षकही हादरून जातात.
केरळातील कासरगोड या हिंदुबहुल जिल्ह्यातील एका नर्सिंग कॉलेजच्या भिंतींवर काश्मीरच्या मुक्ततेची मागणी करणाऱ्या घोषणा बघून नायिका तर थबकतेच पण प्रेक्षकांनाही काश्मीर फाईल्सची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मुलींच्या वसतिगृहातल्या खोलीत निरनिराळ्या धर्मांच्या विद्यार्थिनींमध्ये एका ट्रोजन हॉर्स अर्थात चांगुलपणाचा मुखवटा धारण केलेल्या परंतु मूळची आयसिसची छुपी हस्तक असलेल्या मुलीचा प्रवेश होतो आणि पहिल्या दिवसापासूनच चित्र पालटायला सुरुवात होते.
स्वपंथाचा/धर्माचा अतिरेकी प्रचार, अन्य धर्म, धर्मश्रद्धा, त्यांचे देव यांचा सतत पाणउतारा करून त्यांना हिणवणे हे प्रकार ठरवून केले जातात आणि बघताबघता वाढत जातात. सुरुवातीला विरोध करणाऱ्या नायिकेचा आणि तिच्या मैत्रिणीचा हळूहळू नाईलाजाने का होईना या गोष्टींवर विश्वास बसत जातो. त्याच वेळी त्या मुलींना प्रेमात पडायला भाग पाडून, भुलवून, लैंगिक संबंध प्रस्थापित करून, त्यांच्या स्वधर्माच्या श्रद्धांचा त्याग करण्यास भाग पाडून अखेरीस त्यांचं धर्मांतर करण्याची संपूर्ण प्रक्रिया एखाद्या SOP अर्थात स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे अवलंबिली जाते. (एकाच) धर्मा/पंथावर श्रद्धा असणाऱ्यांनी अर्थात श्रद्धावानांनी श्रद्धाहीनांवर एक तर दगड मारावेत किंवा त्यांच्यावर थुंकावं पण त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणं निषिद्ध आहे मात्र त्याच वेळी श्रद्धाहीनांची संपत्ती लुबाडण्याचा मात्र त्यांना संपूर्ण अधिकार आहे अशा प्रकारची अतिरेकी, एकांगी आणि तितकीच अमानुष आणि क्रूर अशी शिकवण देणाऱ्या पंथाचं भयानक चित्रण चित्रपटात दाखवलं आहे. स्वतःचा धर्म, आपले धर्मसंस्कार, धर्मशिक्षण यांचा मुलांमुलींच्या बालपणीपासूनच्या जडणघडणीतच कसा अभाव आहे हे दिग्दर्शकाने अतिशय प्रत्ययकारीपणे दाखवलं आहे. अशा प्रकारे धर्म न मानणाऱ्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांच्या आणि पक्षांच्या हातात वर्षानुवर्षं केरळची सत्ता असल्याने देव, धर्म, श्रद्धा या अत्यंत मूलभूत संकल्पनांनाच चूड लावली गेलेली बघताना सावरकरांच्या "धर्मांतर हेच देशांतर" या उक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
या प्रवासात शारीरिक संबंध प्रस्थापित करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी असून ती करताना मुलगा आणि मुलगी यांची मान्यता (कुबुलनामा) असल्यावर इतरांच्या संमतीची आवश्यकताच काय (अर्थात मियाँ बीवी राजी...) किंवा प्रेम केलंय तर प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी हवी, सर्वधर्मसमभाव महत्त्वाचा, प्रेम हे धर्म बघून करता येत नाही, सर्व धर्म सारखेच असून सर्वच धर्म शांतीचा संदेश देतात वगैरे वगैरे हिंदी चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षं गारुड केलेल्या चुकीच्या प्रचारकी संदेशांचा यथेच्छ वापर करून, पद्धतशीरपणे ब्रेनवॉशिंगची एकेक पायरी साध्य करत, धर्मांतराच्या दिशेने एकेक पाऊल यशस्वीपणे कसं पुढे पुढे टाकलं जातं याचं चीड आणणारं पण सत्यचित्रण बघताना आजवर बघितलेले सर्वधर्मसमभाववाले हजारो फसवे चित्रपट आणि त्यांतले तितकेच फसवे प्रसंग आणि संवाद प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्याशिवाय राहत नाहीत.
हे महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार पाडल्यानंतर अखेरच्या आणि सर्वात महत्त्वाचा असलेल्या टप्प्याच्या दिशेने नायिकेची वाटचाल सुरु होते
आणि तो टप्पा म्हणजे आयसिसच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देशांत नायिका आणि अशाच
प्रकारे फसलेल्या अन्य असहाय्य आणि हतबल तरुणींना घेऊन जाऊन तिथे आयसिसच्या
सैन्यात असलेल्या पुरुषांची शारीरिक भूक भागवण्याच्या कामासाठी त्यांचा यंत्रवत
वापर करून घेऊन त्यानंतर त्यांचा मानवी बॉम्ब म्हणून वापर करून त्यांचं जीवन संपवणं.
इतक्या भयंकर अशा प्रसंगांची मालिका असणारे प्रसंग दाखवताना वाहवत जाणं, प्रत्येक प्रसंग अत्यंत भडक व बटबटीत करून दाखवणं ही अगदीच सहज घडू शकणारी गोष्ट दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी अतिशय संयमपूर्वक टाळली आहे ज्याबद्दल त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अनेक भडक प्रसंग त्यांनी अत्यंत संतुलित आणि संयमित पद्धतीने दाखवले आहेत. सामूहिक बलात्कारांच्या घटनांचं चित्रीकरण छायाप्रकाशाच्या साहाय्याने करणं, लेनिन-स्टालिन-मार्क्सच्या पोस्टर्समधून योग्य तो संदेश पोचवणं, औरंगजेब आणि आयसिस या विचारांतील साम्य दर्शवणं, दिवसाढवळ्या माणुसकीची सरळसरळ हत्या होत असलेल्या पाकिस्तानच्या सीमाप्रदेशात 'बलोच ह्युमन राइट्स' चे फलक दाखवणं, सततच्या ब्रेन वॉशिंगने पूर्णतः बदललेल्या नायिका एका वठलेल्या झाडाच्या पार्श्वभूमीवर दाखवणं, लव जिहादच्या घटनांनावर संशोधन आणि अभ्यास करून त्याचे पुरावे आणि संदर्भ मांडणाऱ्या सहनायिकेच्या मागे 'मुख्तार माई' चं पोस्टर दाखवून मुख्तार माई ही हा एकाकी लढा देणाऱ्या सहनायिकेच्या जणू पाठीशीच उभी आहे असं दाखवणं या सगळ्यासगळ्यांतून दिग्दर्शकाचा दिग्दर्शन, छायाचित्रण याबरोबरच सामाजिक आणि राजकीय संदर्भांचा अभ्यास स्पष्टपणे दिसतो.
मुख्तार बीवी किंवा मुख्तार माई ही नक्की कोण होती हे वाचलं की दिग्दर्शकाच्या या एकूणच समस्येच्या अभ्यासाबद्दल कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. २००२ साली मुख्तार माई या पाकिस्तानी स्त्रीला तिच्या भावाने केलेल्या गैरकृत्याबद्दल क्षमा मागण्याच्या बहाण्याने तिच्या टोळीच्या न्यायालयासमोर बोलावण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिची नग्न धिंड काढण्यात आली. मात्र घाबरून किंवा खचून न जाता मुख्तार माईने आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि झगडून न्याय मिळवला. या घटनेला जगभर प्रसिद्धी मिळाली. 'इन द नेम ऑफ ऑनर' या पुस्तकात मुख्तार माईच्या या लढ्याविषयीची कहाणी वाचायला मिळते.
सहनायिकेच्या अभ्यासातून सामोरी येणारी सत्यं तर अतिशय भयंकर आहेत. केरळचं रूपांतर कधीही स्फोट होऊ शकेल अशा एका टाईमबॉम्ब मध्ये झालेलं आहे, कासारगोड जिल्ह्याच्या काही गावांत ऑलरेडी शरिया कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे, केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका विधानानुसार येत्या वीस वर्षांत केरळचं रूपांतर एका इस्लामी राज्यात होण्याची चिन्हं आहेत!!! आपल्याच देशातल्या एका छोट्या पण तितक्याच निसर्गरम्य आणि सुंदर राज्याविषयीची ही वस्तुस्थिती वाचताना अतिशय त्रास तर होतोच पण ही एवढी सगळी देशद्रोही कृत्यं घडत असताना जनतेने ज्यांना विश्वासाने निवडून दिलं ती नेतेमंडळी नक्की काय करत होती हा प्रश्नही मनात आल्यावाचून राहत नाही!
काश्मीर फाईल्सशी साधर्म्य सांगणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्श्वभूमीवर वाजत राहणारी अत्यंत सुंदर गाणी. कधी त्यातून 'ना जमी मिली' सारखा वेदनेचा राग आळवला जातो तर कधी केरळच्या देवभूमीचं मल्ल्याळी भाषेत वर्णनं केलं जातं. ना जमी मिली, तू मिला ही गाणी खरोखरच अत्यंत श्रवणीय झाली आहेत.
आपला देश काश्मीर पासून ते केरळपर्यंत एक आहे असं नेहमी जेव्हा म्हंटलं जातं तेव्हा त्यामागे भारताच्या भौगोलिक सीमांपेक्षाही या दोन प्रदेशांना वेढून टाकणारी आणि त्यांनी भोगलेली आणि अजूनही भोगत असलेली एक सामायिक वेदना अध्याहृत असावी असं वाटतं. हे दोन्ही प्रदेश सतत त्यांच्या या वेदना, त्यांच्या यातना, त्यांची हतबलता हे सारं अगदी उच्चरवाने ओरडत, कण्हत, भेकत मांडतायत. पण या दोन भुगोलांच्या मध्ये असलेला सारा देश दुर्दैवाने या साऱ्या अन्याय्य प्रकाराकडे ढिम्मपणे दुर्लक्ष करतोय. या वेदनेच्या साखळदंडांत आपल्याच देशाचे अजून प्रदेश आणि अर्थातच तिथले निष्पाप जीव कैद होऊ नयेत यासाठी आपण काही कृती करणार आहोत की अजून काही स्टोरी, काही फाईल्स उघडण्याची वाट बघत बसणार आहोत याचा निर्णय सर्वस्वी आपल्यालाच घ्यायचा आहे!!
--हेरंब ओक
अतिशय सुंदर लेख.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान लेख. ::अस्मिता फडके.
Deleteबहुत ही अच्छा लेख।
ReplyDelete