Monday, July 30, 2012

ताण..... असह्य ताण !!!!!!! : "वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट"


टीप : भरपूर चित्रपट बघायचे आणि त्यातल्या आवडत्यांवर नियमितपणे लिहायचं या उद्देशाने सुरु केलेल्या या ब्लॉगचे जवळपास बारा वाजले आहेत. परंतु ते होऊ न देता मरगळलेला ब्लॉग पुनरुज्जीवित करण्याचा हा छोटासा प्रयत्न. यापुढे आवडत्या चित्रपटांविषयी नियमित परंतु अगदी मर्यादित शब्दांत लिहीत राहण्याचा प्रयत्न करेन :)

अरिझोनातली एक शांत, संथ, रखरखीत संध्याकाळ. तीन काऊबॉईज स्टेशनमास्तरच्या ऑफिसमध्ये येतात. दादागिरी करून त्याला एका खोलीत कोंडून ठेवतात आणि ट्रेनची वाट बघत राहतात. काही वेळाने ट्रेन येते...... आणि जाते. समोरच्या फलाटावर एक काऊबॉय दिसतो (बहुतेक तो ट्रेनमधूनच उतरला असावा). त्या चौघांमध्ये काही संवाद होतात, गोळ्या झाडल्या जातात. प्रसंग संपतो. हा असा लहान, बिनमहत्वाचा वगैरे वाटणारा प्रसंग एखादा दिग्दर्शक किती म्हणजे किती उत्कंठावर्धक बनवू शकतो याची कितीही अत्युच्च कल्पना केली तरी ती तोकडी पडेल आणि कुठल्याही कल्पनेला लाजवेल अशा जबरदस्त ताकदीने 'वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट' चित्रपटातला पहिला प्रसंग चित्रित केला गेलाय !

लांबच लांब रुळांवर फोकस केलेला कॅमेरा अँगल, छतावरून हॅटवर थेंब थेंब करत पडत राहणारं पाणी, पवनचक्कीचा एका लयीत येत राहणारा आवाज, टेलीग्राम मशीनची टकटक, एका पात्राच्या चेहऱ्याभोवती घोंघावणाऱ्या माशीचा अजून एका भिन्न लयीतला आवाज, त्या तीन काऊबॉईजचं शांतपणे ट्रेनची वाट बघत निवांत बसून राहणं, त्या दिखाऊ भासणाऱ्या निवांतपणापायी संपूर्ण वातावरणात भरून राहिलेला एक प्रचंड ताण सगळं सगळं अजब आहे. आणि एका क्षणी हा ताण इतका इतका शिगेला पोचतो की तो आपल्याला असह्य होऊन जातो, मणामणाचं ओझं आपल्या डोक्यावर लटकतंय आणि ते कधीही आपल्या डोक्यावर पडू शकेल पण ते कधी पडेल हे सांगता येणार नाही, पडेलच की नाही हे ही सांगता येणार नाही आणि समोरचे चेहरे नक्की काय घडणार आहे याची अजिबात कल्पना लागू देत नाहीयेत अशा विचित्र परिस्थितीत आपण अडकतो आणि कधी एकदाचा हा प्रसंग आणि हा ताण संपतोय असं आपल्याला होऊन जातं. घोंघावणाऱ्या माशीला बंदुकीच्या नळीत अडकवल्यावर गुदमरलेल्या माशीच्या अखेरच्या तडफडाटाला हसणारा तो काऊबॉय अगदी अशाच प्रकारे तडफडणाऱ्या प्रेक्षकांना हसत असतो असं काहीसं वाटून जातं ! आणि...... आणि तो ताण एकदाचा संपतो कारण लांबून येणाऱ्या ट्रेनचा भोंगा ऐकू येतो.

हा प्रसंग पाहूनच आपल्याला काहीतरी जबरदस्त बघायला मिळणार आहे याची आपण मनोमन खुणगाठ बांधायला लागतो आणि चित्रपट संपेपर्यंत समोर दिसणारा हरएक प्रसंग (काही अपवाद वगळता) त्याची साक्ष देतो. त्यानंतर घडणारा प्रसंग हा आपल्या शोलेमधल्या ठाकूरच्या कुटुंबाच्या हत्याकांडाचा प्रसंग दाखवताना जसाच्या तसा उचललाय. अगदी गोळी झाडण्याची पद्धत, मारण्याची पद्धत, मरण्याची पद्धत आणि शेवटची गोळी झाडल्याचा आवाज ट्रेनच्या इंजिनाच्या आवाजात मिसळून जाण्याची क्लृप्तीही जशीच्या तशी उचलली आहे.



चित्रपटातलं अजून एक महत्वाचं पात्र म्हणजे ट्रेन. ट्रेन, फलाट, इंजिन, रूळ, भोंगा, केबिन यापैकी किमान एक तरी गोष्ट चित्रपटातल्या प्रत्यक प्रसंगात किंबहुना प्रत्येक फ्रेममध्ये हजर आहे आणि या सगळ्याची उपस्थिती आपल्याला सतत जाणवत राहील याचीही खबरदारी  (शक्यतो जाणतेपणीच) घेतली गेलेली आहे.

समोर घडणारा प्रत्येक प्रसंग का घडतोय हे निदान त्यावेळी तरी आपल्याला कळत नाही. कळू दिलं जात नाही. जवळपास प्रत्येक प्रसंगाची कारणमिमांसा ही काही काळाने कळते. त्या त्या प्रसंगात त्या त्या पात्राची विशिष्ट वागणूक असण्याचं कारण हे असं होतं हे बऱ्याच वेळाने आपल्याला दाखवलं जातं. त्यामुळे अखेरीस सगळ्या प्रसंगांची सांगड घालून एक कॅलीडोस्कोपसदृश चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ! अशी ही गुंतागुंत, गोंधळ आणि त्यात भर म्हणून चित्रपटाला दिलेला रखरखीत, संथ, रॉ परिणाम या सगळ्याची एक विलक्षण भट्टी जमते. चित्रपटात त्या मानाने कमी संवाद आहेत पण जे आहेत ते अत्यंत धारदार आणि मुदेसूद आहेत आणि जिथे संवाद नाहीत त्या प्रसंगांत कॅमेरा धाडधाड बोलत राहतो.

अत्युच्च सिनेमॅटोग्राफी, साउंड इफेक्ट्स, विलक्षण धारदार संवाद आणि धीरगंभीर, संथ लयीतलं पार्श्वसंगीत या सगळ्या गोष्टी चित्रपटाला तांत्रिकदृष्ट्या अत्यंत उच्चदर्जाला नेऊन ठेवतात पण त्यामुळे इतर बाबतीत चित्रपट कमी आहे असं मानण्याचं अजिबात कारण नाही. निगेटिव्ह भूमिकेतला हेन्री फोंडा, मादक क्लॉडीया कार्डीनल आणि डॅशिंग चार्ल्स ब्रॉन्सन यांच्यामुळे आणि एकेक छोट्यातला छोटा प्रसंग अत्यंत तपशीलवार आणि टिपिकल संथ, घनगंभीर लयीत चित्रित करण्याच्या सर्जीओ लिओनच्या दिग्दर्शकीय कौशल्यामुळे हा चित्रपट अभिनय व दिग्दर्शन या बाबतीतही तेवढ्याच उंचीवर जाऊन पोचतो.

थोडक्यात कमीत कमी लिहावा/वाचावा/बोलावा आणि लवकरात लवकर आणि आवर्जून पाहावा असा हा 'वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट' !!

14 comments:

  1. जबरी परीक्षण ...
    आजच पाह्यला घेतो.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सचिन. नक्की बघ.

      Delete
  2. लई लई भारी... नक्की बघतो :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार्स सुहास. कसा वाटला ते सांग.

      Delete
  3. अच्छा म्हणजे (हा) ब्लॉग सुरू आहे तर.. :P

    सध्या फ़क्त नावात वेस्ट असल्यामुळे आवडण्यात आलं आहे....मग नंतर वाचीन आणि पाहीन किंवा पाहून वाचीन....(जमलं तर लक्षात....) वगैरा वगैरा......:)

    पुलेशु....

    ReplyDelete
    Replies
    1. धक्का स्टार्ट आहे. पण आता नियमित सुरु राहील :)

      जमलं तर बघ नाहीतर राहू दे.. I understand ;)

      Delete
  4. बारीक निरीक्षण...प्रत्येक शॉटचं. :)
    मी कधी बघणार कोण जाणे ! :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनघा..

      >> मी कधी बघणार

      ताबडतोब बघ ! :)

      Delete
  5. हिरमुसल्यावर किंवा कुठे अपयशी झाल्यासारखं वाटलं तेव्हा मी या चित्रपटातले सगळे साउंडट्रॅक्स ऐकतो; सारं काही संपलेलं असूनसुद्धा नवीन काहीतरी करण्याचा हुरूप येतो ऐकतांना...

    - ही मी ऐकत असलेल्या गाण्यांच्या टॉप आर्टिस्ट्सची लिंक.(Ennio Morricone १० नंबरला आहे.)
    - Farewell To Cheyenne हा मला सगळ्यांत जास्त आवडणारा साउंडट्रॅक, जो पूर्ण चित्रपटभर वापरलेला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय. साउंड ट्रॅक पण भन्नाट आहे या सिनेमाचा !

      Delete
  6. सर्जी लिओन ह्या मानसाच कामच लई जबर असत भो ! त्याचाच the good bad ugly पायला का नी तुमी माहित नी. नव्वे नव्वे क्यामेरा यंगल त्याय्नीच त काढले न शोधून.

    अमेरिकन सिनेमातोग्राफर नावाच्या मासिकात एका तारांतीनो का काय ( किल बिल ) त्यायची मुलाखत आल्ती. त म्हणे मी माह्या क्यामेरावाल्ल्ययले सांगेलच होत कामाव यायच्या आधी याचे पिच्चर बघुन्संनी कामावर ये.

    ReplyDelete
    Replies
    1. खेड्यान येडं, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. good, bad and ugly पण भारीच आहे. पण कॅमेरा अँगल मला 'वन्स अपॉन' मधले जास्त आवडले. या चित्रपटाला दिलेली एकूणच ट्रिटमेंट फार फार भारी आहे !

      Delete