Sunday, October 23, 2011

रक्तपुरुष !!Tonight's the night. And it's going to happen again.... and again. It has to happen.एखाद्या रहस्यप्रधान नसणार्‍या मालिकेच्या दृष्टीकोनातून पाहता मालिकेच्या पहिल्या सिझनच्या पहिल्या भागाची सुरुवात करून देणारं हे वाक्य म्हणजे चांगलंच रहस्यमय म्हंटलं पाहिजे. जेफ लिंडसेच्या 'डार्कली ड्रिमिंग डेक्स्टर' या कादंबरीवर आधारित डेक्स्टर मालिकेतलं हे पाहिलं दृष्य. आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करत कारमधून जात असताना एक माणूस हे वाक्य स्वगत उच्चारतो. तेव्हा आपल्याला क्षणभर कळत नाही की आता नक्की काय होणार आहे? एवढं काय भयानक, रहस्यमय आहे आजच्या रात्रीत? आजचीच रात्र का? वगैरे वगैरे प्रश्नांत आपण घुटमळत असतानाच अचानक मयामीचं प्रसन्न हवामान, जिव्हेला डोलायला लावेल अशा खाद्यजीवनाचं वर्णन वगैरे वगैरेने संभाषणाचा ट्रॅक एकदम बदलला जातो. आणि आपण या नव्या मार्गावर स्थिरस्थावर होतोय न होतोय तोच त्या धीरगंभीर आवाजात रहस्यमय स्वगतं म्हणणारा नायक अर्थात डेक्स्टर त्या रात्री काय करणार असतो त्याची एक छोटी चुणुक दाखवतो. आपण डोळे फाडफाडून पहात कधी खुर्चीच्या टोकाला येतो हे आपलं आपल्यालाही कळत नाहीत. प्रामाणिकपणे सांगायचं तर असे रक्तदाब वाढवणारे, हृदयाचे ठोके जलद करणारे, 'एज ऑफ द सीट' ला यायला लावणारे क्षण, प्रसंग डेक्स्टरमधे त्यामानाने कमीआहेत. किंबहुना जवळपास प्रत्येक प्रसंग तसा करता आला असता तरीही !!


अर्थात आपण जे (छोट्या) पडद्यावर बघतो, बघत असतो आणि बघणार असतो त्या नेहमीच्या सवयीच्या पोलीसकथा, सिरीयल किलर्सच्या कथा, अतिरेकी हल्ले, पाठलाग वगैरेंपेक्षा हा प्रकार खूप वेगळा आहे. ही कथा आहे ती मयामी मेट्रोच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधल्या ब्लड पॅटर्न अ‍ॅनालिस्टची. नाही. मी मुद्दामच काही स्पॉयलर अ‍ॅलर्ट वगैरे दिलेला नाहीये. कारण यात काहीच रहस्यभेद नाहीये. मालिकेच्या दुसर्‍या प्रसंगापासून हे सत्य आपल्यासमोर येतंच.

कसंए की उगाच दिसेल त्या चित्रपट/पुस्तक वगैरेवर कोणी लिहायला जात नाही. तो चित्रपट/पुस्तक किंवा या प्रसंगात ही मालिका ही तिच्या इतर खंडीभर स्पर्धकांपेक्षा निदान कांकणभर तरी सरस असावी लागते. तर डेक्स्टर हे व्यक्तिमत्व किंवा एकूणच या मालिकेचं कथानक, मांडणी वगैरे इतरांपेक्षा कांकणभर सरस (वाचा वेगळं) कसं आहे ते बघू.

- अंडरप्ले : माझ्या मते तरी सगळ्यात जास्त गुण 'डेक्स्टर' या पात्राने साकारलेल्या 'अंडरप्ले'ला द्यावे लागतील. अत्यंत शांत, संथ, संयमी आवाजात, कुठेही आक्रस्ताळेपणा न करणारं हे पात्र विलक्षण उभं केलं गेलं आहे. हा माणूस कधीच जोरकस, सॉलिड असा वागत नाही.  एकदम शांत, निवांत असतो. कधी आरडओरडा नाही की जोरकस प्रतिक्रिया नाही. कोणी काही बोललं, अपमान केला, दुरुत्तरं केली, प्रसंगी त्याच्या कामावर संशय घेतला तरीही हा माणूस मान खाली घालून सगळं ऐकून घेतो पण उलटून बोलत नाही किंवा काही बोललाच तरी किंचित मिश्कील असं... आणि ते ही स्वतः सिरीयल किलर असूनही (हे सगळ्यात महत्वाचं)...  संशयी बॉस, विचित्र किंवा दुटप्पी सहकारी आजूबाजूला असूनही कलियुगातला संत असल्यागत या माणसाच्या तोंडातून एकही उणा शब्द जात नाही. सहसा पोलिसी टाईपच्या सिरीज मधे नायक हा अतिशय डॅशिंग, फाडफाड संवाद फेकणारा, दणादण गोळ्या झाडून गुन्हेगारांना शासन करणारा,  वेगाने निर्णय घेऊन कृती करणारा अशा प्रकारचा असतो. याउलट आपला डेक्स्टर यातलं काहीही करत नाही. करत नाही म्हणजे तसं करताना समोरच्या पात्रांना दिसत नाही. उगाच ढँटॅढँड गोळ्या झाडून, लांबलचक संवाद फेकून समोरच्या व्यक्तीला (पात्राला... प्रेक्षकाला नव्हे) इम्प्रेस करणारं पात्र उभं करणं हा त्याच्या निर्मात्यांचा मुळीच हेतू नाही. अर्थात तोही हे सगळं करतोच पण जरा वेगळ्या पद्धतीने. तोही अगदी डॅशिंग आहे पण फक्त रात्री त्याचा किलिंग-गिअर अंगावर चढवला की. तोही गुन्हेगारांना शासन करतोच पण त्याच्या अनोख्या पद्धतीने, वेगाने निर्णय घेऊन त्याच्या दुप्पट वेगाने तोही कृती करतो पण ती कृती घडत असताना इतरांना दिसत नाही. थोडक्यात हा त्याचा अंडरप्लेच जबरदस्त भाव खाऊन जातो. विशेष काहीही न करता किंवा जवळपास निष्क्रीय राहून तो प्रतिस्पर्ध्याचे डाव त्यांच्यावरच कसे उलटवतो हे पाहणं प्रचंड मनोरंजक ठरतं.

 - मायकल सी. हॉल : खरं तर वरच्या मुद्यातलं पाहिलं वाक्य "माझ्या मते तरी सगळ्यात जास्त गुण 'डेक्स्टर' या पात्राने साकारलेल्या 'अंडरप्ले'ला द्यावे लागतील." च्या ऐवजी "माझ्या मते तरी सगळ्यात जास्त गुण 'डेक्स्टर' चं पात्र रंगवणार्‍या *मायकल सी. हॉलने* साकारलेल्या 'अंडरप्ले'ला द्यावे लागतील."  असं हवं. पण तसं केलं असतं तर एकाच मुद्यात दोन मुद्दे उरकल्यासारखं वाटलं असतं आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मायकल सी. हॉलच्या अभिनयकर्तृत्वाला (अर्थात या लेखातच) योग्य न्याय न दिल्यासारखं झालं असतं. त्यामुळे वरच्या मुद्यातले सगळे गुण आता या नावाला जोडून पुन्हा ते वाक्य वाचा. खरंच हॉल म्हणजेच डेक्स्टर आणि डेक्स्टर म्हणजेच हॉल असावा इतकं तो ते पात्र जगलाय. दिवसा शांत असणारा, बॉससमोर, गर्लफ्रेंडसमोर, बहिणीसमोर प्रचंड शांत आणि मिश्कील असणारा हा माणूस रात्र झाली की ते शांत सुस्वभावी रूप बदलून हिंस्त्र, रक्ताला चटावलेल्या श्वापदाचं रूप एवढं हुबेहूब वाठवतो की ते पाहून अक्षरशः "मगाशी पाहिलेला डेक्स्टर तो हाच का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

खरं तर कांकणभर सरस असणार्‍या मुद्द्यांच्या यादीतले दोन अतिशय महत्वाचे मुद्दे सांगून झाले आहेत आणि त्यामुळे ही मालिका अन्य मालिकांपेक्षा कांकणभरच नव्हे तर मणभर तरी सरस आणि वेगळी आहे हे कळतंच.. पण तरीही अन्य मुद्देही जवळपास तेवढेच महत्वाचे आहेत.

- समांतर विचार-प्रवाह (पॅरलल थॉट-प्रोसेस) : हा एक खरोखर अफलातून प्रकार आहे. म्हणजे चंगोच्या त्या

"माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका
जरी असलो मी तुमच्यात तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका"

 वाल्या चारोळीसारखा प्रकार आहे हा. आपला डेक्स हा कायम एका समांतर विश्वात जगत असणारा माणूस. "पुढचा खून कसा करायचा, कधी करायचा, कुठे करायचा, नवीन सावज मिळतंय का, आधीच्या खुनाचा चुकून कुठे काही पुरावा तर राहिला नाही ना, मी कोण आहे, मी असा का आहे, मी कायम असाच असेन का?" हे आणि अशा प्रकारचे विचार सतत डोक्यात चाललेले असतात. भरीस भर म्हणून त्याला स्वतःचा, त्याच्या आईचा, वडिलांचा असे काही पूर्वेतिहास अपघातानेच समजतात. त्यामुळे तो सतत स्वतःची ओळख शोधण्याच्या धडपडीत असतो. त्यामुळे या एवढ्या सगळ्या विचारांची गर्दी आणि पुन्हा आपण सिरीयल किलर आहोत याची पुसटशीही जाणीव आजुबाजूच्या लोकांना होऊ नये यासाठी करावी लागणारी अविरत धडपड या सगळ्या एकत्रित मिश्रणामुळे त्याने अगदी जाणीवपूर्वक आणि कितीही मनापासून प्रयत्न केला तरी त्याचं आपल्या आजूबाजूला काय चाललंय, कोण काय म्हणतंय/विचारतंय याकडे फारसं लक्षच नसतं.. त्यामुळे वेळोवेळी गर्लफ्रेंड, मित्र, बॉस, बहिण काय म्हणतायत हे निम्म्या वेळा त्याच्यापर्यंत पोचतच नाही आणि जेव्हा पोचतं तेव्हाही तो आपल्या मनातले विचार थेटपणे बोलता नुसतं मंद स्मित देतो किंवा मग असंच काहीसं होकारार्थी वगैरे हुंकारतो. पण मनात मात्र समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचं खरं उत्तर (जे प्रत्यक्षात दिल्यास भूकंप होऊ शकेल) देऊन टाकतो. आणि या सगळ्यामुळे तो म्हणजे एक अगदी निर्जीव भावनारहित व्यक्ती(?) आहे असा त्याचा आणि आपलाही समज झालेला असतो जो अर्थात पुढच्या काही सिझन्समधे हळूहळू दूर होऊ लागतो. अर्थात ही अशा प्रकारची समांतर विचार-प्रवाहाची आणि मनातल्या मनात खरं उत्तर देण्याची शैली अगदी नवीन आहे अशातला भाग नाही. आधी काही चित्रपट/पुस्तकं यात आपण ती बघितलेली आहेच. उदाहरणच द्यायचं झालं तर डॅन ब्राऊनच्या जवळपास प्रत्येक पुस्तकात हा असा प्रकार आढळतो. पण तरीही डेक्स्टरमध्ये हा प्रकार जास्त आवडतो कारण त्याचा वारंवार आणि अत्यंत योग्य रीतीने आणि अचूक ठिकाणी केलेला वापर यामुळे. थोडक्यात हे समांतर विचार प्रवाह किंवा/आणि वारंवार येणारी चपखल स्वगतं यांमुळे ही मालिका अधिकच चटकदार बनते. अर्थात यात अजूनही एक छुपा मुद्दा आहे. हे डिस्कनेक्ट होणं किंवा समोरचा (विशेषतः बायको/गर्लफ्रेंड/बॉस) काय बोलतोय याची काही टोटल न लागणं वगैरे प्रकार पुरुषांना अधिक जवळचे वाटतात. कारण ते या प्रकारातून गेलेले असतात, जात असतात. ;)

- संवाद/कोट्स : प्रत्येक मुद्याबद्दल मी तेचतेच लिहितोय असा आरोप होण्याची शक्यता आहे आणि अर्थात ते मी नाकारणारही नाही [निदान समोरासमोर तरी. मनातल्या मनात नाकारून त्याला वेगळं काही उत्तरही देईन कदाचित ;)]. या मालिकेत वेळोवेळी पेरलेले जे उत्कृष्ट, आशयघन, दुसरी बाजू दाखवणारे, खेळकर, खोडकर, व्रात्य, टोकदार, प्रामाणिक  असे संवाद आहेत त्यांचं स्थान वर उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्याएवढंच महत्वाचं आहे. किंबहुना या मुद्द्याबद्दल अधिक काही बोलण्यापेक्षा काही महत्वाचे कोट्सच सरळ बघू. हे कोट्स वाचून झाले की मला हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी इतर काही करण्याची आवश्यकताच पडणार नाही.


* There are no secrets in life, just hidden truths, that lie beneath the surface

* Blood Never Lies.

* Sometimes it's reassuring knowing I'm not the only one pretending to be normal.

* Blood. Sometimes it sets my teeth on edge. Other times it helps me control the chaos.

* People fake a lot of human interactions, but I feel like I fake them all, and I fake them very well.

* In the land of predators, a lion never fears the jackal.

* You can't play on my feelings, I don't have any.

* Fear is a powerful motivator.

* Human bonds always lead to messy complications. Commitment. Sharing. Driving people to the airport.

* I love Halloween. The one time of year when everyone wears a mask … not just me. People think it's fun to pretend you're a monster. Me, I spend my life pretending I'm not.

या अशा जबरदस्त अर्थपूर्ण संवादांची या मालिकेत जागोजागी गाठभेट होते. खरंच या मुद्यावर आता काही अजून लिहायची गरज नाही. नाही का?

- पार्श्वसंगीत आणि शीर्षकगीत : सिरीयल किलरची मालिका असली तरी यातलं पार्श्वसंगीत काही अपवाद वगळता अजिबात थरारक, भीतीदायक, कानठळ्या बसवणारं वगैरे नाहीये. उलट एकदम मस्त हलकंफुलकं, डोलायला लावणारं, पावलं थिरकवायला लावणारं असं लॅटिन अमेरिकन/स्पॅनिश प्रकारचं आहे. त्यामुळे एखादा भन्नाट भयानक वेगवान वगैरे प्रसंग घडला तरी दुसऱ्याच क्षणी हे असं मस्त संगीत मागे वाजायला लागतं आणि वातावरणातला ताण एकदम हलका होऊन जातो. आणि सगळ्यात कहर म्हणजे याचं शीर्षकगीत.. खरं तर यात गीत असं काही नाहीयेच. त्यामुळे शीर्षकसंगीत हा शब्द जास्त योग्य. हे शीर्षकसंगीत म्हणजे एका सर्वोत्तम शीर्षकसंगीताचं उत्तम उदाहरण आहे. त्यात दाखवलेल्या एकूण एका फ्रेमला, प्रसंगाला वेगळा अर्थ आहे. मिनिटभराच्या या दृष्यशृंखलेत आपल्याला डेक्स्टरची एकदम व्यवस्थित ओळख होऊन जाते. पुढे काय आणि कशा प्रकारचे प्रसंग बघायला मिळणार आहेत याची एक छोटीशी चुणूकच आहे हे शीर्षकसंगीत म्हणजे. त्याला २००७ चं सर्वोत्कृष्ट शीर्षकदृश्याचं पारितोषिकही मिळालेलं आहे.
- अन्य पात्र : सहसा मुख्य पात्राच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने अन्य पात्रांकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा त्यांना केवळ तोंडी लावण्यापुरतंच महत्व देण्याचा प्रघात आहे. परंतु डेक्स्टरमध्ये हा प्रघात पर मोडून काढलेला दिसतो. डेक्स्टरमध्ये डेक्सएवढंच त्याची बहिण, गर्लफ्रेंड, त्याची बॉस, सहकारी विन्स मसुका आणि बटीस्टा ही सगळी सगळी पात्र उल्लेखनीयरित्या रंगवली आहेत आणि त्यांनाही अनेकदा डेक्सएवढंच किंवा काही प्रसंगात डेक्सपेक्षाही अधिक महत्व आहे.

ज्यांनी डेक्स्टर अजून बघितलं नाहीये अशांनी अजूनही हा लेख वाचायचं सोडून देऊन डेक्स्टर बघायला
सुरुवात केली नसेल-- हे वाक्य हा लेख कस्सल्ला भारी आहे वगैरे मिजाशीतून आलेलं नसून डेक्स्टर मालिका कसली उत्कृष्ट आहे या विश्वासातून आलेलं आहे-- तर ज्यांनी अजूनही सुरुवात केली नसेल त्यांनी ती सुरु करण्यासाठी अजून एक महत्वाचं कारण देतो. या एका सर्वस्वी वेगळ्या कारणामुळे मात्र तुम्ही डेक्स्टर
बघायला नक्कीच उद्युक्त व्हाल. डेक्स्टर अर्थात मायकल सी हॉलला पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग झाला होता. अर्थात तो बरा होण्याच्या स्वरूपाचा होता. परंतु डेक्स्टरचे सुरुवातीचे सिझन्स हॉलने कॅन्सरशी झगडत असताना केलेले आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घेता आपला त्या सिरीजकडे आणि एकूणच मायकल सी हॉल या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलतो. आणि तशात त्याने २०१० सालचा सर्वोत्कृष्ट कलाकाराचा गोल्डन ग्लोब पुरस्कारही पटकावला.

अर्थात हा पूर्ण लेख वाचताना हा माणूस (पक्षि मी) एका सिरीयल किलरची बाजू का घेतोय, असल्या सिरीजचा उदोउदो का करतोय, काही झालं तरी सिरीयल किलर तो सिरीयल किलरच अशा स्वरूपाचे विचार नक्की मनात येऊ शकतात. किंबहुना सुरुवातीला सिरीयल बघताना माझ्याही डोक्यात अगदी असेच विचार आले होते. पण डेक्स्टरच्या निर्मात्यांनी तो सिरीयल किलर बनण्यामागचं कारण जे दाखवलं आहे ना ते एकदम अफलातून आणि तेवढंच पटण्याजोगं असं दाखवलंय. आणि ते एवढं प्रभावी आहे की सिरीयल किलरचा राग/भीती वाटण्याऐवजी उलट त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते. त्याची खुनांची स्वतःची अशी खास नियमावली आहे आणि तीही अगदी पूर्णपणे पटणारी अशीच आहे.

अर्थात कुठलीही गोष्ट परिपूर्ण नसतेच त्याप्रमाणेच डेक्स्टरमध्येही काही गोष्टी अजिबात न पटण्यासारख्या आहेत. उदा पहिल्या सिझनमधल्या विचित्र खुनांचे प्रसंग आणि त्यांची आवश्यकता, दुसऱ्या सिझनमधला डेक्स्टरच्या गर्लफ्रेण्डने त्याच्या एका शत्रूचा काटा काढण्याचा प्रसंग किंवा मग तिसऱ्या सिझनमध्ये उच्च पदावरची एक व्यक्ती डेक्स्टरकडे एवढी आकृष्ट का होते आणि त्यांची एवढी चांगली मैत्री कशामुळे होते, किंवा चौथ्या सिझनमध्ये डेक्स्टरने नेहमीच्या सवयीप्रमाणे काटा काढण्याऐवजी एका गुन्हेगाराला उगाचंच जिवंत ठेवणे वगैरे अनेक प्रसंगांची रेलचेल आहेच. परंतु या मालिकेच्या एकंदर दर्जा आणि कर्तृत्वापुढे या सगळ्या गोष्टी तुलनेने दुय्यम आहेत. अर्थात अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की पाचव्या सिझनला मी अजिबात नावं ठेवलेली नाहीत.... त्याचं एकमेव कारण म्हणजे पाचवा सिझन माझा सर्वात आवडता सिझन आहे. प्रचंड धक्क्यांनी, पाठलागांनी, अनेक चढउतारांनी, रक्तदाब बऱ्यापैकी चढा-उतरायला लावणाऱ्या प्रसंगांनी पाचवा सिझन अगदी ओतप्रोत भरलेला आहे. आणि त्यामुळेच सहावा सिझन बघण्याची उत्सुकता शिगेला पोचवणारा असाही आहे. तुम्ही हा लेख वाचेपर्यंत सहाव्या सिझनचे पहिले दोन-तीन भाग झालेले असतील. २ ऑक्टोबरला गांधीजयंतीच्या दिवशी सगळ्यात हिंसक आणि रक्तपाताने भरलेल्या सिरीजचा पुढचा सिझन सुरु होणे हा एक विचित्र योगायोगच म्हटला पाहिजे.

थोडक्यात सास-बहु, कृत्रिम प्रेमप्रकरणं, तथाकथित रियालिटी शोज, इनोदी पोलीस चातुर्य (!!!!!) कथा या नेहमीच्या रटाळ प्रकारांनी वैतागला असाल तर मग डेक्स्टरला पर्याय नाही. अर्थात या सगळ्याला वैतागला नसलात तरीही डेक्स्टरला पर्याय नाहीच !!! कारण हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

It's going to happen again.... and again. It has to happen !!!

* 'मोगरा फुलला २०११' च्या इ-दीपावली अंकात पूर्वप्रकाशित 

29 comments:

 1. diwali bumper offer !!! suswagatam..
  motthi comment lavkarach dili jaail !! sadhya anandatirekaane behosh zaaloy.. shuddhivar yeu det mala aadhi..

  ReplyDelete
 2. स्वागतम हेरंबशेठ... डेक्स्टर डाऊनलोड झालंय, त्याला कारण आपणचं ;-)

  नक्की बघतो, ही पोस्ट वाचून रहावत नाही आहे... तुरुंग फोडायचा आहे, BBT आहे... अरे खूप काम पडली आहेत, आयुष्य कमी पडणार नाही नं :) :)

  तुझ्या ह्या नवीन उपक्रमाला शुभेच्छा. तसंही बझ्झ बंद होतोय, ती कसर इथे भरून काढू. :) :)

  ReplyDelete
 3. शॉल्लेट लेख रे......
  सालं तू आणि त्या बाबाने व्यसनच लावून ठेवलय या डेक्स्टरचं ;)

  ReplyDelete
 4. मी आत्तच कुठे पहिला तुरंग फोडलाय ! लवकरच सगळे तुरुंग फोडून डेक्सला पण भेटतो !
  रच्याक! तुझा डिरेक्टर पोझ मधला फोटू बघून माझ्या पुढच्या शिनेमासाठी तुला साईन करतोय !
  हे हे हे !

  Nice Blog, keep it up mate ! :)

  ReplyDelete
 5. कालच दुसरा सीझन एपि. ३ पर्यंत संपवलेत. मी आधी डेक्स्टरला भेटणार मग तुरूंग फोडणार. दुपारी तोंडी लावणं म्हणून द मेंटलिस्ट सुरू आहेच. मला आता उत्सुकता आहे ती डेक्स्टर "टूनाईट इज द नाईटला" प्रत्येक वेळेस त्या प्रत्येकाचीच स्टाईल वापरणार की स्वत:ची स्टाईल वापरणार? आता हे सिझन संपत नाहीत तोपर्यंत पाचवा सिझन पहाता पण येत नाही. उगाच कशाला उत्सुकता ताणायची? ... आणि सास-बहू सिरियल्ससोबत डेक्स्टरची तुलना प्रचंड अशक्य आहे रे बाबा.

  उगाच मनात विचार येऊन गेला - "सॉ"चा निदान एक भाग तरी पहावा का?

  सुहास म्हणतोय, बझ्झ बंद होतोय ती कसर इथे भरून काढू. काही हरकत आहे काय? तुझ्या ब्लॉगचं नाव हरकत नाय असं आहे ;-) नवीन ब्लॉगची सुरूवात मस्त झाली आहे. येऊ देत.

  ReplyDelete
 6. क्या बात है हेरंब..परवाची शिकवणी कामी आली म्हणायची..सही दिसतोय ब्लॉग...खुप खुप्प शुभेच्छा नव्या ब्लॉगकरता.

  ReplyDelete
 7. मस्त लिहिले आहेस, पण वेगळ्या ब्लॉग ची गरज काय होती? त्याच ब्लॉग मधे एक वेगळा विभाग उघडायचा.. एकच ब्लॉग मेंटेन करण्ं सोपं पडतं.
  डेक्स्टर म्हणजे एक अप्रतीम सिरियल.. पुढच्या भागाची वाट पहातोय..

  ReplyDelete
 8. पोस्ट आधी वाचून प्रतिक्रिया दिलीय म्हणून हा ब्लॉग नुसता पाहत होते...कसलं मस्त template बनवलास यार...१०० टक्के मार्क...(कदाचित अनुजाला...) मला वाटत Universal Studio वाल्यांनी कधी कल्पना केली नसेल की त्यांच्या entrance चा इतका सुंदर वापर होऊ शकतो...:)

  शुभेच्छा ....

  ReplyDelete
 9. माझी कमेंट कुठे गेली ?! :(
  बरं..पण खूप खूप शुभेच्छा! :) आणि ब्लॉग छान दिसतोय...एकदम नावाला साजेसा. फिल्मी ! :)

  ReplyDelete
 10. मोजकेच चित्रपट पहाणाऱ्यापैकी मी एक, पण "प्रिझन ब्रेक" मालिकेने नुसताच "सांस-बहु"ने 'मालिका' या विषयाबद्दल निर्माण झालेला तिरस्कारच दूर केला नाही तर त्याचबरोबर एकाच जागी बूड टेकून बसल्याची थोडीफार सिद्धी अंगी बाणवली. सहा महिन्यांहून अधिक दिवस चालढकल केल्यावर एकाच विकांतात तब्बल १६-१७ तासात तुरुंग फोडल्याचा माज अजून उतरला नाही तोवर तू अश्या प्रलोभनांचा ब्लॉगच सुरु केलास? आत्ता आधी नेटचे कनेक्शन 'अनलिमिटेड डालो' या विभागात वळवून टोरंटला डेस्कटॉप शॉर्टकटला टाकतो.

  बाकी 'आकर्षक' टेंम्प्लेटचो दुकान टाकूकं हरकत नाय, माका पण गजालवाडीत लावक् येक टेंम्प्लेट हवा असा... बघ जमलो तर...

  ReplyDelete
 11. डालो चालू आहे .... :)
  रच्याक ब्लॉगच पोस्टर एकदम शॉल्लीड आहे ... :)

  ReplyDelete
 12. हाहाहाहा.. धन्यवाद स्वामी. आलास का शुद्धीवर? ;)

  दिवाळीच्या शुभेच्छा !!

  ReplyDelete
 13. हाहा सुहासशेठ.. डालो झालंय ना? आता लगेच बघून टाका.. तुरुंग, BBT आणि डेक्स मस्ट आहेत रे !

  >> आयुष्य कमी पडणार नाही नं :) :)

  डेफिनेटली कमी पडणार रे.. आपल्याला सगळ्यांनाच... :( कोई शक ?

  धन्यवाद रे.. प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छांबद्दलही !

  ReplyDelete
 14. आभार आभार विशालभौ.. सुरुवात केलीस की नाही डेक्स्टर बघायला?

  ReplyDelete
 15. धन्स दीपक.. तुरुंग पण सहीच आहे !!

  >> तुझा डिरेक्टर पोझ मधला फोटू बघून माझ्या पुढच्या शिनेमासाठी तुला साईन करतोय !

  याचसाठी केला होता अट्टाहास ;) हेहे..

  आभार्स..

  ReplyDelete
 16. कांचन,

  डेक्स आणि तुरुंगानंतर BBT हायली रेकमेंडेड आहे. अक्षरशः फ्रेंड्सची आठवण येते !!

  डेक्सचा पाचवा सिझन प्रचंड आवडला मला. बाकीच्या चार सिझन्सपेक्षा बराच वेगळा आणि खूप जास्त वेगवान आहे.

  सॉ प्रचंड किळसवाणं आहे. डेक्स्टरमधे अशी किळस येत नाही. हा महत्वाचा फरक..

  हो.. आणि नवीन ब्लॉगचं युआरएल harakatkay आहे :)) त्यामुळे काहीच हरकत नाय ;)

  ReplyDelete
 17. धन्स धन्स माऊ.. हो परवाच्या शिकवणीचा चांगला फायदा झाला ;)

  ReplyDelete
 18. हो काका.. एक ब्लॉग सांभाळतानाच एवढी कसरत करावी लागते. हा दुसरा कसा जमणार अशी शंका माझ्याही मनात होतीच (आणि अजूनही आहे.).. पण तरीही बऱ्याचदा असं झालं की चांगले चांगले चित्रपट बघूनही ब्लॉगवर लिहिणं झालं नाही. सारखं चित्रपटांवर लिहिल्यासारखं होतं म्हणून. आणि अजून एक फायदा म्हणजे एकाच विषयाला वाहिलेला ब्लॉग असला की अजून बरं पडतं म्हणूनही.

  डेक्स्टर खरंच खुपच अप्रतिम आहे. आता BBT ही बघायला घ्या लगेच. तुफ्फान हास्यकल्लोळ आहे !

  ReplyDelete
 19. हेहे. धन्यवाद अपर्णा.. हो.. १००% मार्क अनुजालाच :))

  >> मला वाटत Universal Studio वाल्यांनी कधी कल्पना केली नसेल की त्यांच्या entrance चा इतका सुंदर वापर होऊ शकतो...:)

  कसचं कसचं ;)

  ReplyDelete
 20. आधी आलीच नव्हती ग कमेंट.. ब्लॉगरने काहीतरी गडबड केली असेल !

  शुभेच्छांबद्दल धन्यवाद.. हो जरा फूल्टू फिल्मीच टेम्प्लेट केलंय ;)

  ReplyDelete
 21. खरंच यार.. आपले चित्रपट जर यांच्या ५० वर्षं मागे असतील तर सिरीज तर १०० वर्षं मागे आहेत असं म्हणेन मी. सिरीजमधेही हे लोकं किती वेगवेगळे अगदी कल्पनाही न करता येण्याजोगे विषय हाताळतात. आणि आपल्या इथे मात्र तेच तेच तेच .. असो.

  ते 'अनलिमिटेड डालो' आणि टोरंटचा शॉर्टकट डेस्कटॉपला हे दोन्ही करून टाकच.. खूप गोष्टी आहेत बघण्यासारख्या !

  टेम्प्लेटस तर भरपूर आहेत रे.. तुला लिंक्स पाठवतो थांब.

  ReplyDelete
 22. अरे वा. सहीच देवेन.. डालो झाल्या झाल्या बघून टाका लगेच. :)

  आभार्स रे.. जरा कसरतच झाली ते पोस्टर करताना :)

  ReplyDelete
 23. तर...

  पहिला मुद्दा नवा ब्लॉग आणि फोटू भारी एकदम!!

  दुसरा मुद्दा ह्या सिरियला मी कधी डालो करेन/ करेन की नाही खरच कल्पना नाही रे.... तुम्ही सगळे इतकं सांगताहात तर पहायला हरकत नाही असं वाटतय.. जमेल तितक्या लवकर हा प्रयत्न नक्की!!
  तिसरा मुद्दा, महेंद्रजींचा मुद्दा मला पटतोय तसा :)

  आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा माझा नवरा हे सगळे सिरियलाज बघतो हे मला जाम माहित नव्हते... तुझी ही पोस्ट मी वाचत असताना पठ्ठा चटकन म्हणाला की डेक्स्टरबद्दल कोणी लिहीलेय ?? तुमचं ते तुरूंग बिरूंग समदं त्याला माहितीये हे मला माहिती नव्हतं :)

  बाकि महाराज इथे तरी पट-पट लिहा :)

  ReplyDelete
 24. हाहाहा तन्वे.. तुझे चारी मुद्दे वाचले, आवडले, पटले. तिसऱ्याला मी वरच उत्तर दिलंय पण अजून एक सांगायचं राहून गेलं ते म्हणजे आधीच्या ब्लॉगवरचं चित्रपटांशी संबंधित लेखन तिथून हलवून या ब्लॉगवर आणायचाही विचार आहे. बघू. कसं जमतंय.

  अरे वा.. अमितशेठपण डेक्स फॅन आहेत तर. गुड :) तू ही नक्की बघ डेक्स्टर.. जमलं तर :)

  ReplyDelete
 25. हेरंबा, ते सारखं सारखं रक्त, खून, बॉड्या....मला कंटाळा आला हा ! :p एकच एक 'भयरस' ना ! म्हणून ! :) :D

  ReplyDelete
 26. हाहाहा.. अग म्हणून तर त्यांनी नुसता भयरस असणार नाही याची काळजी घेत जरा विनोदी/कौटुंबिक प्रकार पण घेतलेत :)

  ReplyDelete
 27. प्रचंड प्रचंड आणि प्रचंड भारी आहे.. सिझन दुसरा संपवलाय.. वेड लावलंय नुसतं ... धन्स भावा!!!

  ReplyDelete
 28. भेल्कम भेल्कम.. कालच सहावा संपवला.. भारी आहे एकदम.

  ReplyDelete
 29. हेरंब,
  लेख खतरनाक जमलाय. मालिकेची सर्व वैशिष्ट्ये उधृत केलीयेत. मस्त!

  ReplyDelete