Saturday, June 28, 2025

अविश्वसनीय पद्धतीच्या कथाकथनाची निओ न्वार मॉक्युमेंट्री : ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे


There are three types of truths. Your truth, my truth and The TRUTH!

-A Chinese proverb


लॉकडाऊनकाळापासून OTT वर फारच कचरा जमा व्हायला लागला होता. काहीही दाखवलं तरी 'बिंजवॉच' वाल्यांमुळे ते खपत होतं. पण नियमितपणे चांगले (I know, this is subjective) चित्रपट/सिरीज बघण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांच्या मनात मात्र समोरचा दोन-अडीच तासांचा तमाशा संपल्यानंतर काहीच हाती न लागून वेळ अक्षरशः वाया गेल्याची, फसवले गेल्याची भावना प्रबळ व्हायला लागली. परिणामतः पूर्वी दिवसाला किमान एक चित्रपट किंवा निदान एक एपिसोड तरी बघणारे लोकही चित्रपटांपासून एक तर दूर तरी जायला लागले किंवा चित्रपटांची निवड करताना अत्यंत चोखंदळपण तरी दाखवायला लागले. अशा चोखंदळपणाचा फायदा हा की काहीतरी (त्यातल्या त्यात) चांगलं बघितल्याचं समाधान मिळतं. गेल्या आठवड्यात अशाच एका मालिकेचा डार्क ट्रेलर बघण्यात आला, ट्रीटमेंट थोडी वेगळी वाटली, म्हणून बघायला घेली आणि अक्षरशः हादरलो. 'Black, White & Gray - Love Kills' मध्ये ते Love Kills नसतं तर नाव जरा बरं वाटलं असतं. पण असो.

ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे हा एक अप्रतिम निओ न्वार आहे. सामान्य घरातले तरुण तरुणी परिस्थितीवशात् काय काय कृत्यं करतात, कुठल्या थराला जाऊन पोचतात या साऱ्याचा एक अविश्वसनीय, जीवघेणा प्रवास म्हणजे ही लघुमालिका (miniseries). जर नेहमीच्या पद्धतीने सांगायला गेलं तर अतिशय सरळ साधं कथानक म्हणता येईल असा प्रकार आहे. पण तिथेच दिग्दर्शकाने आपलं कौशल्य दाखवून कथामांडणीचा एक अद्भुत प्रकार दाखवला आहे. ही मालिका काही दृश्यांमध्ये डॉक्युमेंट्री आणि उरलेल्या दृश्यांमध्ये सत्यकथेवर आधारित चित्रपट अशा वेगळ्याच प्रकारात आपल्यासमोर उभी केली जाते. चित्रपटात काम करणारी व्यक्ती आणि समोर बसून बोलणारी व्यक्ती या वेगवेळ्या असण्याचं हे एक मुख्य कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या मांडणीमुळे रंजकता तर वाढतेच पण विश्वासार्हताही निर्माण होते.

पण खरी गंमत मात्र पुढेच आहे. पहिला एपिसोड संपल्यावर ही कुठली केस आहे हे शोधावं म्हणून गुगल करून बघताना लक्षात आलं की डॉक्युमेंट्रीच्या स्वरूपात प्रेक्षकांच्यासमोर उभी करण्यात आलेली ही कथा कुठल्याही सत्यघटनेवर आधारित नाही. अशी कुठली घटनाच घडलेली नाही. It’s pure fiction. थोडक्यात हे मोक्युमेंट्री सदृश काहीतरी आहे हे लक्षात आल्यावर दिग्दर्शकाच्या, कथेच्या चतुर मांडणीच्या कौशल्यासमोर आपण नतमस्तक होतो.

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणेच ही मालिका अतिशय गडद आहे, काही ठिकाणी बीभत्सही आहे. ठराविक काळानंतर एकेक पात्र कथेत प्रकट होत जातं, प्रेक्षकांना त्याची अगदी यथास्थित ओळख होईल याची खात्री पटेपर्यंत त्याची कथा दाखवली जाते. पात्राची ओळख होते ना होते तोवर त्याच पात्राची त्याच घटनेविषयीची एक वेगळीच आवृत्ती (version) समोर येतं आणि प्रेक्षक चक्रावून जातो. राशोमॉन पद्धतीच्या कथाकथनाच्या मांडणीनुसार प्रत्येक पात्र एकाच घटनेविषयी निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त होतं आणि ती घटना नक्की कशी घडली आहे, काय झालंय किंवा अगदी ती घटना घडली तरी आहे का अशा विचारांच्या चक्रात प्रेक्षक अडकून जातो.

एवढा गोंधळ, वेग, थरार, गडदपणा पाहून दिग्दर्शकाच्या नावाची थोडी शोधाशोध केली आणि मालिका एवढी गडद का आहे याचा साक्षात्कार झाला. या मालिकेचा दिग्दर्शक आहे पुष्कर सुनील महाबळ.  म्हणजे तोच ज्याने काही वर्षांपूर्वी 'Welcome Home' अशा साध्या, निरुपद्रवी नावाचा पण प्रत्यक्षातला एक अत्यंत भयानक गडद चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'वेलकम होम' हा चित्रपट सत्यकथेवर आधारित होता. 'ब्लॅक व्हाइट ग्रे' सत्यकथेवर आधारित नसला तरी प्रेक्षकांना तो सत्यकथेवर आधारितच आहे असं वाटावं यासाठीच्या प्रयत्नांमध्ये दिग्दर्शक पूर्णतः यशस्वी ठरला आहे.

इतक्या अप्रतिम प्रयत्नांत अर्थात काही काही घटना अतिशय अशक्य, अतार्किक आणि मुर्खासारख्या आहेतच, पण तेवढं चालतंच. कथा पुढे सरकण्याची काहीतरी सतत घडत असावं लागतं आणि प्रसंगी अशा अविश्वसनीय घटनांचा आधार घ्यावा लागतो. अर्थात त्यातही एक वेगळेपणा आहे. हे सगळं नक्की काय चालू आहे, काय घडलं असावं, कसं घडलं असावं यावर प्रकाश टाकणारा एक अगदी छोटासा खुलासा (hint) शेवटच्या काही क्षणांमध्ये केला जातो आणि आपण हादरून जातो. कदाचित ज्या प्रसंगांना आपण अविश्वसनीय, अतार्किक समजून त्यांच्यावर टीका करत होतो ते घडले तरी आहेत का किंवा आपल्याला जसे दाखवले गेले आहेत तसेच घडले आहेत का याबद्दल प्रेक्षकांच्या मनात भलंमोठं प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं उत्तम काम, हा नकळतपणे करण्यात आलेला खुलासा करून जातो.

ही मालिका सत्यकथेवर आधारित नाही असा निर्मात्यांचा कितीही दावा असला तरी रोजच्या बातम्यांमध्ये सामोरे येणारे हल्ले, हत्या, विश्वासघात, अयशस्वी प्रेमप्रकरणं आणि भ्रष्ट पोलीस पाहता ते खरं वाटत नाही. कथेच्या मांडणीत दिग्दर्शक ज्या प्रकारे आपल्याला वेळोवेळी फसवतो त्याच पद्धतीने ही सत्यघटना नाही असं सांगून, प्रत्यक्षात मात्र लपवण्यात आलेल्या एखाद्या गडद अशा सत्यघटनेचा दाबला गेलेला आवाज प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा त्याचा प्रयत्न तर नाही ना असं हमखास वाटत राहतं आणि हेच, माझ्या मते, दिग्दर्शक पुष्कर महाबळ आणि 'ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे' मालिकेचं सर्वात मोठं यश आहे!

(SonyLIV वर उपलब्ध)

--हेरंब ओक

Tuesday, June 10, 2025

इडली, सॉरी आणि अडीच किलोच्या हाताची दख्खनेने घेतलेली दखल : जाट

मी जाटसारख्या विचित्र नावाचा चित्रपट बघण्याची सुतराम शक्यता नव्हती.  चित्रपटच काय मी तर त्याचा ट्रेलरही बघितला नव्हता. पण एका मित्राच्या आग्रहाखातर त्याने टेलिग्रामवर पाठवलेला जाट एकदाचा डाऊनलोड करून पाहिला..... दोन दिवसांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याच चित्रपटगृहात जाऊन (तिसऱ्यांदा) पाहिला आणि काही दिवसांनी टेलिग्रामवर चांगली प्रिंट आल्याने पुन्हा एकदा (फक्त पूर्वार्धातली फायटिंग) पाहिला.

पहिल्यांदा जेव्हा पाहायला घेतला तेव्हा पहिल्या अर्ध्या तासातच माझा आ वासला गेला होता. मी काही सनीचा डायहार्ड वगैरे फॅन नाही ही पूर्वसूचना आधीच दिलेली बरी. पण घायल, दामिनी या माझ्या आवडत्या सनीपटांच्या खालोखाल मला जाट आवडला. एंट्रीच्या प्रसंगापासूनच सनीने धमाल उडवून दिली आहे. त्याच्या एंट्रीला, मोबाईलवर बघताना फालतू वाटणारं पण चित्रपटगृहात मात्र थक्क करून सोडणारं असं 'जय श्रीराम' हे भगवे ध्वज, भगवे वेष अशा एकूणच भगव्या वातावरणाने भारलेलं अप्रतिम गाणं लागतं आणि वातावरण एकदम चैतन्याने भरून जातं.

शीर्षकावरून तरी चित्रपट भारतातल्या उत्तर भागातल्या एखाद्या खेड्यात किंवा नागरी भागात घडत असेल असं वाटून जातं. मात्र 'जय श्रीराम' गाणं संपल्यावर आपल्याला समोर दक्षिणेतल्या एका अतिशय दुर्गम भागातल्या छोट्याशा खेडेगावाचं दर्शन होतं. तिथे व्हिलन्सच्या उतरंडीमधल्या सर्वात तळातल्या टप्प्यावर असणाऱ्या लोकांची सनीबरोबर हातघाईची हाणामारी होते. पण तत्पूर्वी या अडीच किलोच्या हाताची कमाल उत्तरेने बघितली आहे आणि आता दख्खनेने बघण्याची वेळ आली आहे अशा अर्थाचा एक संवाद टाकून सनी चित्रपटाचा भूगोल स्पष्ट करून टाकतो. आपला उद्देश आणि शैली अधिक सुस्पष्ट करून सांगण्यासाठी "जब मैं मारना शुरु करता हूं तब मैं ना गिनता हूं ना सुनता हूं" असा निर्वाणीचा संदेश द्यायलाही सनी विसरत नाही! थोडक्यात सनीपाजीच्या हाणामारीची पद्धत आणि प्रकृती ही एकंदरपणे दक्षिणेतल्या हाणामारीच्या चित्रपटांशी भलतंच जवळचं नातं सांगणारी आहे हे बॉलिवीड/टॉलिवीडच्या उशिरा (चित्रपटात कुठेही कणभरही वाटत नसला तरी सनी ६७ वर्षांचा आहे) का होईना लक्षात आलं हे नशीबच.

आणि त्यानंतर जवळपास तासभर सुरु होते ती बहुअंगी, बहुरंगी हाणामारीची बहुआयामी मैफल. गाडी, विजेचा खांब, वरवंटा, थाळी, काठी, टेबल, खुर्ची यातली प्रत्येक गोष्ट अस्त्राप्रमाणे वापरली जाऊन क्षणभरातच तिचा चक्काचूर झालेला असतो. यातली हाणामारी किल किंवा जॉन विक किंवा अगदी जेम्समधल्या हाणामारीसारखी सफाईदार नाही किंवा कोरिओग्राफ केलेली नाही. ती सनीसाठी लिहिण्यात आलेली शब्दशः हाणा आणि मारी आहे. दामिनीमधल्या गोविंदच्या ढाई किलोच्या हाताच्या संदर्भाप्रमाणेच गदरमधल्या एका प्रसंगाचाही संवाद न वापरता संदर्भ देण्यात आलेला आहे. गदरमध्ये हॅन्डपंपला अजरामर करणारा सनी इथे जमिनीवर उभ्या असलेल्या उंच खांबाच्या वरच्या टोकाला लावलेला पंखा (एक प्रकारचा सिलिंग फॅन) त्या खांबासकट उखडून टाकून त्यातल्या फॅनला एका व्हिलन्सच्या उतरंडीमध्ये बऱ्यापैकी वरच्या स्थानी असलेल्या एकाला, फॅनच्या वरच्या स्थानी  लटकवतो. जाटचं पोस्टर नीट बघितलंत तर या पंख्याच्या फोटोत तो पंख्याचा गोल सनीच्या छातीवर दाखवून प्रेक्षकांना आयर्न मॅन ची आठवण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

इडली सांडल्याने चिडलेला आणि सुरुवातीला फक्त व्हिलन्सकडून सॉरीऐकण्यासाठी हातपाय चालवणारा सनी हळूहळू डॉट्स कनेक्ट करत उघडपणे न दिसणाऱ्या अनेक गोष्टींची साखळी जुळवून हळूहळू त्या एकूणच प्रकाराच्या तळाशी जायचा निश्चय करतो. आणि महिला पोलिसांच्या साथीने त्यात यशस्वीही होतो. सैयामी खेरने साकारलेली देखणी इन्स्पेक्टर आवर्जून उल्लेख करण्यासारखी!

सुरुवातीच्या एका तासात आवर्जून लक्षात राहणारा आणि खळखळून हसायला लावणारा बॅड मॅन म्हणजे राम सुब्बा रेड्डीचं पात्र साकारणारा अजय घोष. त्याचं अफलातून टायमिंग आणि विनोदी हावभाव सनीच्या चक्रीवादळात काही हास्याचे क्षण फुलवून जातात. सुरुवातीच्या एक दीड तासानंतर चित्रपटाचा वेग किंचित मंदावतो. पण ते आवश्यकही असतं कारण ही सगळी हाणामारी, हत्या, हल्ले चालू आहेत ते नक्की कशासाठी चालू आहेत, या एवढ्याशा टीचभर गावात एवढ्या टोकाला जाऊन, जीवाची बाजी लावून लोक आणि मुख्य व्हिलन का लढतायत याचं पटण्यासारखं काहीतरी स्पष्टीकरण असायला हवं असं वाटतं आणि पुढचा तासभर प्रेक्षकांना अतिशय तपशीलवारपणे ते स्पष्टीकरण एकूण एका बारीकसारीक मुद्द्यांसह पुरवलं जातं.

'खुनी खाना' च्या बिनडोक चित्रपटांप्रमाणे इथे उगाच मनात आलं म्हणून मारलं अशी बिनडोक मारामारी चालू नसून त्या सगळ्यामागे एक महत्वाचं कारण आहे, त्या सगळ्याला एक भयंकर पार्श्वभूमी आहे हे स्पष्ट केलं जातं. आणि त्यामुळे प्रेक्षक त्यातल्या प्रत्येक घटनेशी हळूहळू का होईना कनेक्ट होत जातो.                   

रामूच्या जेम्सच्या चाहत्यांना (कोणी असल्यास.. मी तरी जेम्सचा प्रचंड चाहता आहे आणि जेम्सवरची एक पोस्ट लॉंग पेंडिंग आहेच) जेम्समधली जिममध्ये घडणारी अफलातून मारामारी नक्कीच आठवत असेल. जाटमधेही त्या हाणामारीतल्या एका प्रसंगाच्या अगदी जवळ जाणारा तुरुंगातला एक प्रसंग आहे. त्याचप्रमाणे 'मॅड मॅक्स फ्युरी रोड' मधल्या बाईक्सच्या हल्ल्याच्या प्रसंगाची आठवण यावी असाही एक प्रसंग यात आहे.

मुख्य व्हिलन असलेला राणातुंगा अर्थात रणदीप हुडाच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या रेजिना कॅसॅन्ड्राच्या अभिनयाचा, सौंदर्याचा आणि तिच्या एकूणच वावराचा आवर्जून उल्लेख करायला हवा. शेजारची काकू वाटावी अशी मुलगी प्रसंगी मुख्य व्हिलनला सांभाळते, त्याला काबूत ठेवते तर कित्येकदा त्याच्या बरोबरीने रक्तपात करायलाही मागेपुढेही पाहत नाही.

अत्यंत निष्ठुर आणि क्रूर राणातुंगा रणदीप हुडाने अप्रतिम साकारला आहे. येशू ख्रिस्ताच्या पावित्र्यात उभा असलेला आणि दुसऱ्याच क्षणी निष्ठुरपणे रक्तपात करणारा राणातुंगा काळजात धडकी भरवणारा असा आहे. अर्थात राणातुंगा ख्रिस्ताच्या रूपात उभा असण्याचा प्रसंग काही दिवसांनी ख्रिस्ती संघटनांच्या तक्रारीनंतर चित्रपटगृहात दाखवल्या जाणाऱ्या आवृत्तीतून काढून टाकण्यात आला असला तरी टेलिग्रामवर उपलब्ध असलेल्या आवृत्तीत तो अजूनही आहे. जिज्ञासूंनी शोध घ्यावा.

आवर्जून उल्लेख करावा, म्हणजे अर्थातच सनीपाजींच्या फायटिंगनंतर आवर्जून उल्लेख करावा अशा काही गोष्टीहे वेगळं सांगायला नकोच. ते तसं नसतं तर ही पोस्ट पाडायची गरजच पडली नसती. तर ‘सनीपाजींच्या फायटिंगनंतर आवर्जून उल्लेख करावा अशा काही गोष्टी’ म्हणजे संकलन, संवाद आणि पार्श्वसंगीत. अनेकदा अरेखीय प्रकाराने घडणाऱ्या घटना प्रत्यक्षात बघताना त्यांचा क्रम नक्की कळून त्या मूळ कथेशी एकरूप होण्यासाठी संकलन चांगलं असण्याची अतिशय आवश्यकता होती. ते काम संकलक टीमने अतिशय चोखपणे बजावलं आहे. Action sequences साठी तर एका मोठ्या टीमने काम केलं आहे आणि ते अतिशय प्रभावी झालं आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीच! पार्श्वसंगीतही पडद्यावर घटनांशी प्रेक्षकांना एकरूप व्हायला लावेल इतकं प्रभावी जमलं आहे. अशा प्रकारच्या चित्रपटाला आवश्यक असे तडाखेबाज संवाद आणि राम सुब्बा रेड्डीच्या काही भन्नाट संवादांनी धमाल उडवून दिली आहे.  

आणि अर्थात सर्वात महत्वाचा म्हणजे ६७ वर्षांचा असूनही ६७ वर्षांचाच वाटणारा आणि अनेकदा न वाटणारा सनी. वाटणारा यासाठी की एवढ्या हाणामारीच्या प्रसंगांमध्ये पिळदार शरीर दाखवण्याची संधी असूनही पहिल्या प्रसंगापासून कोपराच्या चार इंच खाली असणारा सनीच्या शर्टाची बाही एक इंचभरही वर सरकलेली नाही. आणि न वाटणारा यासाठी की स्लो मोशनमुळे का होईना त्याच्या चपळ भासणाऱ्या हालचाली आणि अशक्य ताकद, त्याची संवादफेक, हावभाव, प्रेक्षकांना जुन्या सनीशी जोडून घ्यायला लावणारे, स्मरणरंजनात (nostalgia) रमायला लावणारे अनेक संवाद आणि प्रत्यक्ष हाणामारीचे प्रसंग.

मकरंद देशपांडे आणि उपेंद्र लिमये या दोन सशक्त मराठी कलावंतांनी नेहमीप्रमाणे हिंदीत काहीतरी थुकरट भूमिका करताना कणभराचाही विचार का केला नसावा या जाणिवेने हताश व्हायला होतं. मकरंद देशपांडेची भूमिका जरा तरी ठीक आहे मात्र उपेंद्र लिमयेची आधीच हास्यास्पद असलेली भूमिका त्याने चित्रविचित्र हावभाव करत आणि आवाज काढत अक्षरशः अजूनच हास्यास्पद करून ठेवली आहे हे बघून फार वाईट वाटलं. कारण उपेंद्र लिमये हा माझा अतिशय अतिशय आवडता अभिनेता आहे. असो. इलाज नाही.

जॅक रीचरच्या कादंबऱ्यांमध्ये अमेरिकाभर स्वच्छंद भटकंती करणारा, काहीही संबंध नसताना अचानकच एखाद्या खलप्रवृत्तीच्या माणसाशी संबंध आल्याने त्याचा नायनाट करणारा निवृत्त मेजर ली चाईल्डने चितारला आहे. जाटमधला सनी हा अनेक अंगांनी रीचरशी साधर्म्य साधणारा आहे. फिरस्ती करणारा, लोकांच्या मदतीला धावून येणारा आणि हे करत असताना अचानकच एखाद्या राष्ट्रीय सुरक्षा आपत्तीची चाहूल लागल्याने तिथेच राहून सर्वात प्रमुख आणि भयंकर अशा मुख्य खलनायकाचा नायनाट करेपर्यंत त्याच गावात टिच्चून राहणारा आणि काम झाल्यावर हळूच तिथून निघून जाणारा! रीचरचे हे सारे गुणविशेष जाटमध्ये आढळल्याने कदाचित जाट अत्यंत आवडून तो साडे तीनवेळा बघितला गेला असेल.

तुम्हाला सनीपाजी, घायल, जॉन विक, जेम्स, किल, दामिनी, तुफान हाणामारी, रीचर (किंवा अगदी सैयामी किंवा रेजिना) यापैकी काहीही आवडत असल्यास आवर्जून बघायलाच हवा असा जाट. आणि नाही बघितलात तर..... तर मग मात्र "सॉरी" म्हणावंच लागेल!!!

तळटीप : यात सेन्सरबोर्डवाल्यांनी नेहमीप्रमाणे मजामजा केलीच आहे. एका प्रसंगात राणातुंगा तोंडात सिगरेट धरून तलवारीने एका माणसाचं शीर उडवताना दाखवला आहे. मात्र उजव्या टोकाला खाली दिसतं "सिगरेट स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे."

--हेरंब ओक