अमेरिकन न्यायव्यवस्थेच्या अकार्यक्षमतेच्या कथा : इनोसंट मॅन ते कन्फ्रण्टिंग अ सीरिअल किलर
---------------------------------------------------
जॉन ग्रिशम या लीगल थ्रिलर या साहित्यप्रकारात सातत्याने दर्जेदार लेखन करणाऱ्या अमेरिकन लेखकाने २००६ साली 'The Innocent Man: Murder and Injustice in a Small Town' अशा लांबलचक नावाचं एक पुस्तक लिहिलं. नॉनफिक्शन प्रकारातलं त्याचं ते पाहिलंच पुस्तक होतं. वाचकांनी पुस्तकाचं कौतुक केलं परंतु "वाचवत नाही, वाचताना नैराश्य येतं, सहन होत नाही, अमेरिकन न्यायव्यवस्थेची सद्यस्थिती भयावह आहे " या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रियांसह!! या पुस्तकावर २०१८ साली त्याच नावाची एक मालिका देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.
रॉन विल्यमसन या ओक्लाहोमा राज्यातल्या एडा शहरात राहणाऱ्या एका सामान्य तरुणाची कथा यात कथन करण्यात आली आहे. बेसबॉलचं वेड, त्यात यशाने दिलेली हुलकावणी, त्यामुळे व्यसनं, त्यानंतर लग्न, अजून व्यसनं, घटस्फोट, वडिलांचा मृत्यू आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून मनोरुग्ण होण्याच्या दिशेने वाटचाल अशा त्याच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या काही टप्प्यांची वाचकांना ओळख करून दिली जाते.
८ डिसेंबर १९८२ ची सकाळ. डेब्रा स्यू कार्टर या २२ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह तिच्या घरात सापडतो. डेब्रा एका स्थानिक बारमधे वेट्रेस म्हणून काम करत असते. खून होण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झालेला असतो आणि अत्यंत हालहाल करून तिला ठार मारण्यात आलेलं असतं. पोलीस अनेक लोकांना ताब्यात घेतात, अनेकांची चौकशी करतात परंतु बरेच दिवस शोधूनही गुन्हेगार काही त्यांच्या हाती लागत नाही. दरम्यान ग्लेन गोर नावाचा एक तरुण पोलिसांकडे येतो आणि डेब्रा ज्या बारमधे काम करत असते तिथे आदल्या रात्री त्याने तिला रॉनबरोबर बघितलं असल्याचं सांगतो. आधीच्या एकाही साक्षीदाराने रॉनच्या तिथे असण्याचा कुठलाही उल्लेख केलेला नसतो. पण तरीही पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे रॉनला पोलीस स्टेशनमधे बोलावतात. त्याची चौकशी करतात. त्याच्या केसाचे, रक्ताचे नमुने जमा करतात. त्याची पॉलिग्राफ टेस्ट करतात. आणि तो टेस्ट फेल झाला आहे असं सांगतात. थोडक्यात तो खोटं बोलतोय असं सांगून त्याने गुन्ह्याची कबुली द्यावी यासाठी त्याच्यावर दबाव आणला जातो. पण रॉन काही त्या दबावाला बधत नाही. अनेक तासाच्या चौकशीअंती त्याला सोडून देतात.
दरम्यान अजून एक माणूस पोलिसांकडे येऊन साक्ष देतो की डेब्राचा खून झाला त्या रात्री त्याच्या घराजवळ रॉन आणि अजून एक माणूस आरडाओरडा करत होते. ते ऐकून रॉनचा मित्र डेनिस यालाही कुठल्याही पुराव्याशिवाय, निव्वळ रॉनचा चांगला मित्र आहे या एका कारणास्तव पोलीस अटक करतात. तिथे त्याचीही पॉलिग्राफ टेस्ट केली जाते, कसून चौकशी केली जाते. पण तोही दबावाला न बधल्याने त्यालाही सोडून दिलं जातं.
दरम्यान एडामधल्याच एका छोट्या दुकानातून डेनिस हॅरवे या तरुणीचं अपहरण होतं. पण झटापटीच्या कुठल्याही खुणा आढळत नाहीत. अनेक आठवडे प्रचंड शोधाशोध करूनही पोलिसांना गुन्हेगारांचा पत्ता लागत नाही. लागोपाठ घडलेल्या अशा प्रकारच्या दोन घटनांमुळे एडाचे रहिवासी त्रस्त होतात आणि पोलिसांवर प्रचंड दबाव येतो. या दबावापायी पोलीस टॉमी वॉर्ड आणि कार्ल फॉन्टनॉट या दोन सामान्य तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतात आणि काही वेळाने सोडून देतात.
रॉन, डेनिस, टॉमी, कार्ल या सगळ्यांची चौकशी करणारे पोलीस सारखेच असतात आणि अर्थातच चौकशीची पद्धतही अगदी सारखी असते. ती म्हणजे धाकदपटशाने न् केलेला गुन्ह्याची कबुली नोंदवून घेणे. यासाठी त्यांचा प्रचंड मानसिक छळ केला जातो, धमक्या दिल्या जातात.. आरडाओरडा, मारहाणीची धमकी असे अनेक उपाय अवलंबले जातात.
सर्वात कहर म्हणजे टॉमी आणि कार्ल यांनी डेनिस हॅरवेचा स्वप्नात खून केला होता हे त्यांच्या डोक्यात ठसवलं जातं आणि त्या स्वप्नात केलेल्या खुनाचा कबुलीजवाब त्यांना प्रत्यक्षात देण्यास भाग पाडलं जातं. या कबुलीजवाबाचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्यात कुठेही हा स्वप्नात घडलेला गुन्हा आहे असा उल्लेख येणार नाही याची काळजी घेतली जाते. असा कबुलीजवाब मिळवण्यासाठी त्यांचे कुठल्या प्रकारचे हाल केले जातात ते अर्थातच व्हिडीओवर येत नाही.
(या स्वप्नातल्या गुन्ह्यांच्या कबुलीजवाबांच्या हास्यास्पद आणि धक्कादायक पुराव्यांची गोष्ट एक दिवस रॉबर्ट मेयर या न्यूयॉर्क टाईम्सच्या एका पत्रकाराच्या कानी पडते. तो सगळ्या गोष्टींचा, तपशीलांचा, पुराव्यांचा अभ्यास करतो आणि त्या आधारावर 'ड्रीम्स ऑफ एडा ' नावाचं एक पुस्तक प्रकाशित करतो आणि त्यात टॉमी आणि कार्लवर झालेल्या अन्यायाचं विस्तृत विवेचन करतो. पण काहीही फरक पडत नाही. दोघेही या क्षणीही तुरुंगात आहेत. टॉमी वॉर्ड कदाचित पुढेमागे जामिनावर सुटूही शकेल परंतु क्लिष्ट यंत्रणेमुळे आणि काही विक्षिप्त नियमांमुळे कार्ल फॉन्टनॉट कधीच सुटू शकणार नाही. !!!!!!)
टॉमी आणि कार्ल यांच्यावर वापरण्यात आलेल्या 'स्वप्नात केलेल्या गुन्ह्याचा कबुलीजवाब' पद्धतीला लाभलेलं 'अभूतपूर्व यश' पाहून काही महिन्यांनी पोलीस रॉन आणि डेनिसला देखील डेब्रा कार्टरच्या खुनाच्या आरोपात पुन्हा एकदा पुन्हा चौकशीला बोलावून घेतात. त्यांना दबावाखाली आणून त्यांच्याकडून देखील 'स्वप्नात केलेल्या गुन्ह्याचा कबुलीजवाब' घेतला जातो. थोडक्यात खरा गुन्हेगार शोधणं पोलिसांना शक्य नसतं, त्यांची तेवढी लायकी नसते, इच्छा नसते आणि अर्थातच डोक्यावर परिणाम झालेल्या, दारुड्या, प्रसंगी ड्रग्सचं सेवन करणार्या, दिवसभर इथेतिथे भटकणार्या वेडसर रॉनला टार्गेट करणं त्यांच्या दृष्टीने अतिशय सोपं असतं. जेणेकरून गुन्हेगार पकडल्याबद्दल कौतुकही केलं जातं आणि कुठल्याही प्रकारच्या जनक्षोभाला बळीही पडावं लागत नाही. डेनिसविरुद्ध तर काहीच पुरावा नसतानाही केवळ रॉनचा मित्र त्याला अटक केली जाते.
मिळालेल्या भक्कम (!!!) पुराव्याच्या आधारे रॉन आणि डेनिसविरुद्ध खटला उभा राहतो. डेब्रा कार्टरच्या घराची आणि मृतदेहाची भयानक छायाचित्रं दाखवून ज्युरींचं मन वळवलं जातं आणि त्या रॉनला देहदंडाची आणि डेनिसला जन्मठेपेची शिक्षा होते. पोलीसदल सुखावतं, आपली टिमकी वाजवून घेतं.
यानंतर सुरु होतो तो तुरुंगाताला जीवघेणा प्रवास. प्रचंड त्रास, छळ. विक्षिप्त कैदी, विचित्र जेलर. जेलमध्येही रॉनचा प्रचंड मानसिक छळ होतो. त्यामुळे आणि पुरेशा आणि योग्य औषधोपचार आणि डॉक्टरी मदतीच्या अभावी त्याची मानसिक स्थिती अजूनच ढासळायला लागते. दरम्यान त्याच्या आणि रॉनच्या अपिलाची सुनावणी होते. त्यात जेलमधले अधिकारी आणि पोलीस संगनमताने जेलमधल्या काही कैद्यांच्या रुपाने खोटे साक्षीदार उभे करतात जे सांगतात की रॉनने त्यांच्याकडे डेब्राचा खून केल्याचा कबुलीजवाब दिलाय आणि त्याचा त्याला आता प्रचंड पश्चात्ताप होतोय. त्याच्याबरोबर डेनिसही गुन्ह्यात सामील होता. डेनिस आणि रॉन अर्थातच ते निर्दोष असल्याचं नेहमीप्रमाणेच ठासून सांगतात.
सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रॉनची केस मांडायला जो वकील सरकार पुरवतं तो अत्यंत हुशार वगैरे असतो पण दुर्दैवाने तो अंध असतो आणि त्याला पुरावे/फोटो/कागदपत्र इत्यादींची तपासणी करण्यासाठी मदतनीसही दिला जात नाही. अर्थातच रॉनची केस लंगडी पडते. त्यांचं अपील फेटाळलं जातं. अशी तीन वेगवेगळया कोर्टात, तीन वेगवेगळया स्तरांवर त्यांची अपिल्स फेटाळली जातात. इतक्या असंख्य वकील, जेलर, पोलीस, न्यायाधीश यापैकी कोणालाही रॉनच्या ढासळलेल्या मानसिक संतुलनाविषयी एक शब्दही काढावासा वाटत नाही. खरं तर रॉनची मानसिक अवस्था एवढी वाईट असते की शिक्षा तर सोडाच त्याच्यावर साधा खटला उभा राहणं हेही बेकायदेशीर आणि अमानुष असतं. पण ही एवढी साधी बाब या एवढ्या मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तींपैकी कोणाच्याही साधी नजरेसही येत नाही.
दरम्यान रॉनच्या आईचं निधन होतं. परंतु तत्पूर्वी खुनाच्या रात्री रॉन घरीच होता हे सिद्ध करणारा अर्थात रॉनचं निर्दोषत्व सिद्ध करणारा असा एक महत्वाचा पुरावा ती पोलिसांकडे सुपूर्द करते, अर्थातच कार्यक्षम पोलिसदल तो पुरावा दाबून टाकतं. आणि एक दिवस रॉनची देहदंडाची शिक्षा अंमलात आणण्याचा दिवस न्यायालयाकडून मुक्रर केला जातो. परंतु सुदैवाने त्याचवेळी त्याच्या वकिलाने केलेल्या एका शेवटच्या अपिलाला यश येतं आणि त्याची शिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली जाते परंतु त्यामुळे त्याचा कैदेतला शारीरिक/मानसिक छळ पुन्हा चालू होतो. पुरेसं जेवण मिळत नाही, मिळतं ते अतिशय निःकृष्ट असतं. थंडीतही पुरेसे कपडे दिले जात नाहीत.
डेनिसचीही अवस्था फार वेगळी नसते. छळाला कंटाळून आणि मुख्य म्हणजे न केलेल्या गुन्ह्याचं बालंट माथ्यावरून पुसून टाकण्यासाठी तो जंग जंग पछाडतो. तुरुंगातच तो कायद्याचा अभ्यास करायला लागतो. तुरुंगातल्या वाचनालयात जाऊन आपलं कायदेविषयक ज्ञान वाढवायला लागतो. कायदेविषयक अनेक पुस्तकं पालथी घालतो. स्वतःच्या आणि रॉनच्या केसचा, आरोपांचा बारकाईने अभ्यास करतो. अनेक टिपणं काढतो. दरम्यान 'इनोसन्स प्रोजेक्ट' या संस्थेचं नाव त्याच्या कानावर पडतो. इनोसन्स प्रोजेक्ट ही चुकीच्या रीतीने देहदंड/जन्मठेप किंवा तत्सम शिक्षा झालेल्या निर्दोष व्यक्तींना कायदेशीर मदत मिळवून देणारी सामाजिक/कायदेविषयक संस्था आहे. (जॉन ग्रिशम हा स्वतः इनोसन्स प्रोजेक्ट या संस्थेच्या संचालक मंडळाचा सदस्य आहे.) डेनिस या संस्थेशी संपर्क साधतो. आपली केस त्यांना समजावून सांगतो. आपली टिपणं त्यांना दाखवतो. ही केस किती अन्यायकारक पद्धतीने हाताळण्यात आलेली आहे हे इनोसन्स प्रोजेक्टच्या वकिलांच्याही लक्षात येतं. इनोसन्स प्रोजेक्ट आणि रॉनच्या केसवर काम करणारे अन्य वकील या केसमधल्या छोट्या छोट्या चुका शोधतात. कसा अन्याय घडलाय त्याचं पूर्ण विवेचन कोर्टाला सादर करतात. दरम्यान जवळपास अकरा वर्षांचा काळ निघून गेलेला असतो. न केलेल्या चुकीसाठी त्यांनी अकरा वर्षं कैद्याचं भीषण आयुष्य जगलेलं असतं.
त्याच दरम्यान बलात्कार किंवा तत्सम गुन्हे शोधण्यासाठी नुकत्याच विकसित झालेल्या डीएनएच्या तंत्राचा आधार घ्यायला न्यायालय मान्यता देतं. या डीएनएच्या तंत्राच्या आधारे डेब्राच्या प्रेतावर मिळालेल्या रक्त आणि वीर्याच्या नमुन्यांचा अभ्यास केला जातो आणि अखेर........ अखेर बारा वर्षांच्या अमानुष छळाचा, पोलिसी विक्षिप्तपणाचा अंत होतो. डेनिस आणि इनोसन्स प्रोजेक्टच्या अव्याहत परिश्रमाला यश येतं आणि रॉन आणि डेनिस निर्दोष असल्याचं सिद्ध होतं आणि त्यांची निर्दोष सुटका होते !!! पण तोवर त्यांच्या आयुष्यातली ऐन उमेदीच्या काळातली सोन्यासारखी १२ वर्षं मातीमोल झालेली असतात. !!
'द इनोसंट मॅन' प्रकाशित होण्याच्या काही काळ आधी जॉन ग्रिशम ला एका मुलाखतीत (अमेरिकन) न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न आणि त्याने दिलेलं उत्तर खाली देतोय.
Q : Is the criminal-justice system broken?
A : It is a mess. More than 100 people have been sent to death row who were later exonerated because they weren’t guilty or fairly tried. Most criminal defendants do not get adequate representation because there are not enough public defenders to represent them. There is a lot that is wrong.
मोर दॅन १००? शंभरपेक्षा अधिक ?? अर्थात त्याने १०० माणसं किती काळात बळी गेली हे सांगितलं नसलं तरीही १०० हा आकडा कितीही कालावधीसाठी खूप मोठा आहे!!
इनोसंट मॅन वाचताना आणि मालिका बघताना नेटफ्लिक्स वरच्याच 'मेकिंग अ मर्डरर' या अजून एका मालिकेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यातदेखील स्थानिक पोलिसांद्वारे स्टीव्हन अॅव्हरी नावाच्या एका निर्दोष व्यक्तीला केवळ जुन्या वैयक्तिक हेवेदाव्यांपायी खुनाचा आरोप लावून कसं तुरुंगात डांबलं जातं आणि त्याचा कसा शारीरिक, मानसिक छळ केला जातो याचं तपशीलवार चित्रण केलं आहे.
८ ऑक्टोबर २०२४ ला जॉन ग्रिशमचं 'Framed: Astonishing True Stories of Wrongful Convictions' नावाचं एक नवीन पुस्तक प्रकाशित होणार आहे ज्यात चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलेल्या १० निर्दोष व्यक्तींच्या कथा मांडण्यात येणार आहेत. त्यात तर अजून काय काय वाचायला लागणार आहे या कल्पनेनेही अंगावर काटा येतो.
---------------------
सप्टेंबर २०१२ मध्ये केन्टकी राज्यातले पोलीस सॅम्युअल लिट्ल नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीला अंमली पदार्थांच्या सेवन आणि विक्रीच्या गुन्ह्यासंदर्भात अटक करतात. तिथून त्याला कॅलिफोर्निया राज्यात नेलं जातं. तिथे त्याची डीएनए चाचणी करण्यात येते. डीएनए चाचणीचे निष्कर्ष पाहून पोलीसदल हादरून जातं. १९८७ ते १९८९ दरम्यान लॉस एंजलस शहरात घडलेल्या तीन खुनांच्या जागी आढळलेल्या संशयित खुन्याच्या डीएनएचं सॅम्युअल लिट्लच्या डीएनएशी कमालीचं साम्य असतं. त्या तीन खुनांसाठी त्याला अटक करण्यात येते. दरम्यान १९८२, ८४ साली झालेल्या अन्य दोन हत्यांमधला प्रमुख संशयित म्हणून लिट्लवर अजून आरोप लावण्यात येतात. कसून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान १९८० पासून विविध राज्यात झालेल्या जवळपास चाळीस हत्यांशी लिट्लचा संबंध आहे हे पोलिसांच्या लक्षात येतं आणि पोलिसदलात आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडते.
दरम्यान जिलिअन लॉरेन ही स्त्री पत्रकार तुरुंगात जाऊन लिट्लची मुलाखत घेण्याचं ठरवते. या मुलाखतीदरम्यान लॉरेनला अनेकदा लिट्लला भेटण्याची संधी मिळते, त्यांच्यात दीर्घ चर्चा होतात, अनेक तपशील मिळतात. लॉरेनच्या या सगळ्या प्रवासाचं चित्रण म्हणजे Confronting A Serial Killer ही मिनीसिरीज. प्रत्येक भेटीत लिट्ल लॉरेनशी अधिकाधिक मोकळेपणी बोलायला लागतो. आणि त्या मुलाखतीतून, चर्चेतून बाहेर पडणारे तपशील पाहून प्रत्येक एपिसोडगणिक प्रेक्षकाला नवनवीन धक्के बसत जातात. सॅम्युएल लिट्ल हा अमेरिकेतला सर्वाधिक हत्या केलेला खुनी आहे. १९७० ते २००५ या पस्तीस वर्षांत त्याने किमान ९३ स्त्रियांवर बलात्कार करून त्यांच्या हत्या केल्या आहेत. त्यातल्या ६० हत्यांचे पुरावे उपलब्ध आहेत. उरलेल्या हत्यांपैकी काही व्यक्ती, त्यांची नावं, ठिकाणं, साल यातल्या अनेक गोष्टी त्याला आठवतही नसल्याने त्याने त्या प्रेतांची कुठे आणि कशी विल्हेवाट लावली आहे या गोष्टींचा उलगडा आता कधीच होणार नसतो!! स्त्रिया या अत्याचार करून मारून टाकण्याच्या लायकीच्याच असतात असं त्याचं स्पष्ट मत असतं!!
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या सॅम्युअल लिट्लला चोरी, मारामारी, फसवणूक, बलात्काराचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांसाठी अमेरिकेतल्या अकरा राज्यांच्या पोलिसांद्वारे किमान पंचवीस वेळा अटक करण्यात आली होती. परंतु दर वेळी तो काही काळ शिक्षा भोगून, जामिनावर किंवा पुराव्याअभावी सुटून जात असे. तुरुंगातून सुटल्यावर तातडीने तो ते राज्य आणि शहर बदलून दुसऱ्या एखाद्या राज्यात आश्रयास जात असे. एकदा तर पोलिसांनी त्याला एका टॅक्सीमध्ये प्रत्यक्ष बलात्काराचा प्रयत्न करत असतानाही पकडलं. परंतु त्याच्या सुदैवाने भक्कम पुराव्याअभावी आणि आयत्या वेळी त्याच्या बाजूने देण्यात आलेल्या खोट्या साक्षीमुळे त्याची त्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
लॉरेनशी बोलताना त्याने त्याने केलेले सगळे गुन्हे, त्यांची वर्णनं, अन्य तपशील, स्त्रिया या केवळ उपभोग्य वस्तू असल्याचं त्याचं 'मौलिक' मत अशा सगळ्या गोष्टी एकेक करत सांगून टाकल्या. इतकंच नव्हे तर लॉरेन आपल्याला आवडत असल्याचंही त्याने तिला सांगून टाकलं. या सगळ्याचा भयंकर मानसिक त्रास लॉरेनला भोगावा लागला. नैराश्य, चिडचिड, कौटुंबिक पातळीवर वादविवाद असे अनेक धक्के तिला पचवावे लागले. त्यानंतर तिने लिट्लची मुलाखत घेताना तिला आलेल्या अनुभवांवर आधारित 'Behold the Monster' नावाचं एक पुस्तक लिहिलं. Confronting A Serial Killer ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांतच हे पुस्तकही प्रकाशित झालं.
हत्याच काय तर कुठल्याही छोट्यामोठ्या गुन्ह्याशीही दूरवर संबंध नसूनही केवळ संशयापायी किंवा व्यक्तिगत सूडापायी अडकवण्यात येऊन स्वप्नात खून केला असा खोटा कबुलीजबाब द्यायला लावण्यात आलेले रॉन, डेनिस, टॉमी, कार्ल आणि स्टीव्हन अॅव्हरी
आणि
अकरा राज्यांत, पस्तीस वर्षांत, ९३ स्त्रियांवर अत्याचार करून, त्यांच्या हत्या करून, किमान पंचवीस वेळा अटक होऊनही छोटी शिक्षा होऊन किंवा निरपराध सिद्ध होऊन सुटणारा सॅम्युअल लिट्ल हा अमेरिकन पोलीस, तपासयंत्रणा, न्यायव्यवस्था यांच्या अकार्यक्षमतेच्या दोन भिन्न ध्रुवांमधलं दर्शन देणारा कमालीचा विरोधाभास!!
विकसित देश, श्रीमंत पोलीस खाती, आधुनिक आणि अद्ययावत सुविधा आणि यंत्रणा हाताशी असूनही ती चालवणारे लोक कदाचित पुरेसे सक्षम नसल्याने अडकणारे साधेसुधे निरपराध लोक आणि त्याच वेळी कायद्याच्या पंजातून सुटून जाणारे अट्टल गुन्हेगार पाहून कमालीचं हतबल व्हायला होतं. आपल्याला या गोष्टी सध्या वाचवत नाहीत की स्क्रीनवर बघवतही नाहीत. ज्या लोकांनी हे सगळे हाल भोगले आहेत त्यांच्या अवस्थेचा विचार करून अत्यंत अगतिकता जाणवत राहते. अर्थात या सगळ्याची चीड येणं, नैराश्य दाटून येणं याशिवाय आपल्या हातात काहीच नसतं हेही तितकंच खरं. असो. त्यामुळे या सर्व सिरीज मन खंबीर करून स्वतःच्या जबाबदारीवर बघाव्यात ही विनंती.
--हेरंब ओक
Saturday, May 11, 2024
अमेरिकन न्यायव्यवस्थेच्या अकार्यक्षमतेच्या कथा : इनोसंट मॅन ते कन्फ्रण्टिंग अ सीरिअल किलर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment