Tuesday, August 16, 2022

Gained* in Translation

सहसा चित्रपट हा तो ज्या पुस्तक/कादंबरीवर आधारित आहे त्याच्या मानाने डावा (वैचारिक नव्हे गुणात्मक रित्या) असतो हा एक सर्वमान्य प्रघात आहे. आणि तो सिद्ध करण्यासाठी खंडीने देता येतील इतके पुरावेही उपलब्ध आहेत. या विषयावर अनेकदा लेखन झालेलं आहे किंवा पुस्तकावर आधारित कुठलाही (काही सन्माननीय अपवाद वगळता) चित्रपट आपण पुराव्यादाखल घेऊ शकतो.

या प्रवादाला छेद देणारा किंवा नियम सिद्ध करणारे असे काही अपवाद नुकतेच नजरेस आल्याने हा लेखप्रपंच. अर्थात हे चित्रपट खूप जुने आहेत आणि ते ज्या पुस्तकांवर आधारित आहेत ते तरअर्थातचत्याहूनही जुने आहेत. ते चित्रपट मी फार पूर्वीच बघितले होते. मात्र पुस्तकं वाचण्याचा योग अलीकडेच आल्यानेजगन्मान्य प्रवादाला छेद देणारं उदाहरण वाटलं म्हणून इथे मांडतोय इतकंच. अर्थात अनेकांना हा अपवाद न वाटता नियमच वाटेलअर्थात पुस्तकच चित्रपटापेक्षा अधिक दर्जेदार आहे असं वाटू शकतंच आणि तेही अमान्य असण्याचं काहीच कारण नाही.

सध्या चुकीच्या कारणांसाठी प्रसिद्ध झालेला 'फोरेस्ट गम्प१९९४ साली प्रदर्शित झाला आणि Shawshank Redemption (याच्या बद्दलही नंतर बोलूच) सारख्या भल्याभल्या तगड्या चित्रपटांना आस्मान दाखवून त्याने ढिगाने ऑस्करच्या बाहुल्याही जमा केल्या. किमान चड्ढा मुळे का होईना पण गम्प बघितलेल्यांची संख्या अमाप आहे त्यामुळे त्याबद्दल विशेष काही लिहायची आवश्यकता नाहीच. पण तरीही अत्यंत कमी बुद्ध्यांक असलेल्याअमेरिकेच्या गेल्या ५०-६० वर्षांच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असणारा (प्रसंगी त्या घडायला कारणीभूत ठरणारा. उदा. वॉटरगेट प्रकरण) अत्यंत सुदैवी आणि वैयक्तिक आयुष्यात तितकाच दुर्दैवी असणाऱ्या एका सर्वसामान्य अमेरिकन तरुणाची कथा असं याचं वर्णन करता येईल. हा चित्रपट Winston Groom या अमेरिकन लेखकाच्या Forrest Gump याच नावाच्या १९८६ साली प्रकाशित झालेल्या आणि अल्पावधीतच वाचकांनी प्रचंड डोक्यावर घेतलेल्या पुस्तकावर आधारित होता. Winston Groom चं हे पुस्तक नुकतंच वाचलं. गम्पचा निरागसपणाबावळटपणासुदैवी असणं हे चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच आहे. सुरुवातीचे काही प्रसंगफोरेस्ट आणि त्याची मैत्रीण जेनीचे संबंध हे सगळे पूर्वार्धात आहेत. त्यानंतर फोरेस्टची चीनची सफर आणि त्यात चीनचा सर्वेसर्वा माओ यांगत्से नदीत पोहत असताना बुडायला लागतो आणि फोरेस्ट जीवावर उदार होऊन त्याला वाचवतोत्यामुळे चीनी जनता त्याच्यावर प्रचंड प्रक्षुब्ध होते असा एक अतिशय खुसखुशीत प्रसंग त्यात आहे. चित्रपटाने आपला परीघ अमेरिकन राजकारण आणि समाजजीवन एवढ्यापुरताच मर्यादित ठेवलेला असल्याने कदाचित चित्रपटात हा प्रसंग नसावा. परंतु त्याची भरपाई म्हणून अमेरिकन राजकारणातले अनेक प्रसंग मजेशीररित्या मांडण्यात आले आहेत हे ही खरंच. पण त्यानंतर पुस्तकात आश्चर्यकारकरित्या फोरेस्टची निवड अंतराळवीर म्हणून होतेतो सू नावाच्या एका चिम्पाझीबरोबर अंतराळात जातोतिथे अनेक विचित्र प्रसंग घडतातप्रत्यक्षात चुकीची चिम्पाझी नेली जाते असे बरेच विचित्र प्रकार घडतात. आणि कदाचित हा सगळा प्रकार कुठे संपवावा हे लक्षात न आल्याने shrimp business भरभराटीला आल्याचं दाखवून पुस्तक विराम घेतं. वर म्हंटल्याप्रमाणे अमेरिकन इतिहास आणि समाजजीवन हा परीघ डोळ्यासमोर ठेवल्याने चित्रपट अधिक बांधीवरेखीव वाटतो मात्र पुस्तकाच्या बाबतीत हे घडत नाही. अर्थात हे पुस्तकही त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं हेही तितकंच खरं.

दुसरं उदाहरण म्हणजे David Morrell च्या १९७२ साली प्रकाशित झालेल्या 'First Blood' या कादंबरीवर आधारित असलेला सिल्व्हेस्टर स्टॅलनचा १९८२ साली प्रदर्शित झालेला सुप्रसिद्ध आणि अमाप लोकप्रियता मिळवलेला त्याच नावाचा चित्रपट. "They drew the First Blood"  हा स्टॅलनचा तुफान गाजलेला संवाद माहित नसेल असा चित्ररसिक विरळाच. व्हिएतनाम युद्धातून परतून आलेल्यादेशाच्या नेतृत्वाने आपल्याला फसवलं अशी भावना असलेल्या अत्यंत निराश आणि आतल्या आत धुमसणाऱ्या एका निवृत्त सैनिकाची एका छोट्या शहराच्या पोलीस प्रमुखाशी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची होते आणि त्या ego clash मुळे पुढे घडणारा भयंकर संहार आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतो. चित्रपट अतिशय प्रवाही आहेवेगवान आहे. उत्कृष्ट संवाद आणि छायाचित्रण यांची जोरदार साथ दिग्दर्शक Ted Kotcheff ला लाभली आहे. रॅम्बो आणि पोलीसप्रमुख यांची पहिली भेटत्याची अटकपलायन हा सर्व भाग पुस्तकात अतिशय वेगाने घडतो आणि त्यामुळेच पुढे काय घडणार आहे हे माहित असूनही अतिशय उत्कंठाही निर्माण करतो. परंतु रॅम्बो जंगलात पळून गेल्यानंतरची वर्णनंपोलिसप्रमुखाचे संवादत्याची पार्श्वभूमीत्यांचं एकमेकांसमोर येणं हे एवढं संथ गतीने घडतं की चित्रपटातला वेग पुस्तकात कुठेच दिसत नाही. दरम्यानची वर्णनंघटनाही बऱ्यापैकी क्लिष्ट भाषेत (कदाचित त्याकाळच्या साहित्यिक मूल्यांना आणि नियमांना अनुसरून) असल्याने पुस्तक बऱ्यापैकी निराश करतं. निदान माझी तरी निराशा झाली. Morrell चं हे पुस्तक प्रचंड गाजलंअनेक विद्यापीठांमध्ये ते अभ्यासक्रमात लावण्यात आलं होतं हे पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या Morrell च्या मनोगतातून कळतं. पण तरीही पुस्तक काही मनाचा ठाव घेत नाही हे नक्की.


हे सगळं आठवण्याचं मुख्य कारण म्हणजे नुकताच बघितलेला The Black Phone हा चित्रपट. उत्तर डेनवर मधल्या एकदा छोट्या शहरातून १०-१२ या वयोगटातली मुलं गायब व्हायला लागतात. दरम्यान चित्रपटाचा नायक फिनी याच्यावरही दुर्दैवाने तीच वेळ येते. त्याला एका घराच्या तळघरात कोंडून ठेवलं जातं. तळघरात असलेल्या जुनाट फोनच्या (black phone च्या) मदतीने फिनी कशी सुटकेची धडपड करतो हे चित्रपटात पाहायला मिळतं. चित्रपट अतिशय गडद आहे. म्हणजे शाब्दिक आणि लाक्षणिक अशा दोन्ही प्रकारांनी. कारण निम्म्याहून अधिक चित्रपट अंधारात घडतो हे एक कारण झालंच. परंतु चित्रपटात वेळोवेळी भेटीस येणारे गडदकाळी छटा असणारे प्रसंगही चित्रपटाच्या भयप्रद वातावरणाला अजूनच काळोखी किनार बहाल करतात. कथानायकाच्या बहिणीला वेळोवेळी पडणारी गूढ स्वप्नंविकृत बापशाळेत दिला जाणारा त्रास या सर्व प्रसंगांमुळे तर चित्रपट अधिकच भयप्रद होतो.

हा चित्रपट Joe Hill या अमेरिकन लेखकाच्या त्याच नावाच्या एका लघुकथेवर आधारित आहे. चित्रपट बघून झाल्यावर फार उत्सुकतेने लघुकथा वाचली आणि फारच निराश झालो. चित्रपटाच्या मानाने ही लघुच नाही तर लघुत्तम कथा आहे. चित्रपटात दिसणारं गडदडार्क वातावरणवेगवेगळ्या गूढ प्रसंगांची पखरण पुस्तकात कुठेच दिसत नाही आणि असले तरी जेमतेम तोंडी लावण्यापुरतेच हे प्रसंग दिसतात. अंतिम संघर्षही चित्रपटात फारच तीव्र स्वरूपात मांडला आहे जो पुस्तकात मात्र अगदीच किरकोळी काढल्यासारखा वाटतो. त्यामुळे दिग्दर्शक Scott Derrickson बद्दलचा आदर अजूनच वाढतो.

या लघुकथेच्या निमित्ताने यापूर्वीही वाचनात आलेल्या लघुकथा आणि त्यांच्यावर आधारित अप्रतिम चित्रपट यांची आठवण झाली आणि या सर्वात एक साम्य लक्षात आलं की सुरुवातीला सांगितलेला नियम लघुकथांना लागू पडत नाही. कादंबऱ्या या नेहमीच त्यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटांपेक्षा उजव्या ठरत असतीलही (फोरेस्ट गम्प आणि फर्स्ट ब्लड हे निदान मला तरी जाणवलेले अपवाद वगळता)परंतु लघुकथांच्या बाबतीत मात्र हा नियम सपशेल उताणा पडतो. आपण ब्लॅक फोन व्यतिरिक्त अन्य काही लघुकथांचीही उदाहरणं पाहू.


२०१६ साली प्रदर्शित झालेला Arrival हा चित्रपट. Amy Adams आणि Jeremy Renner च्या अप्रतिम अभिनयाने नटलेला हा सायफाय/एलिअन्स प्रकारातला परंतु विचारगर्भ असा नो-नॉन्सेन्स चित्रपट. एलिअन्स प्रकारच्या चित्रपटांत नेहमी आढळणाऱ्या झगमगाटी प्रकाराला पूर्णतः फाटा दिलेला असल्यानेच कदाचित तो फार यश संपादन करू शकला नसावा परंतु परग्रहांवरील जीवांशी संवाद साधणे, भाषा, तंत्र विकसित करणे याबरोबरच चित्रपटात संपूर्ण वेळ प्रेक्षकांच्या सोबत वावरणारं परंतु स्वाभाविक कारणांमुळेच दिसू न शकणारं आणि अखेरच्या काही क्षणांत उघड होणारं रहस्य पाहून प्रेक्षकाला प्रचंड धक्का बसतो.

हा चित्रपट Ted Chiang च्या 'Story of Your Life and Others' या नावाच्या कथासंग्रहातल्या त्याच नावाच्या लघुकथेवर आधारित आहे. पुस्तकातही वर उल्लेखलेले प्रसंगघटनापरग्रहवासीत्यांना भाषा शिकवण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची खटपट करणारे भाषातज्ज्ञ आणि या साऱ्याबरोबर समांतर चालणारं आणि अखेरीस उघड होणारं रहस्य हे सगळं सगळं आहेच. परंतु तरीही चित्रपट जेवढा अवाक करतोमनाची पकड घेतो तितका परिणाम काही लघुकथा संपल्यावर वाटत  नाही. हे कदाचित दृश्य माध्यमाचं यश असावं असंही म्हणता येईल.

पुढची दोन उदाहरणं कदाचित धक्कादायक वाटण्याचा संभव आहे आणि त्यामुळे हे ही सांगायला हवं की या दोन उदाहरणांमध्ये उल्लेख होणारेच नव्हे तर या लेखात उल्लेख झालेले सगळे चित्रपट मी आधी बघितले आणि त्यानंतर ते ज्यावर आधारित आहेत ती पुस्तकं/लघुकथा/लघुकादंबऱ्या (novella) वाचल्या आणि त्यामुळे चित्रपटाने उभं केलेलं चित्र अधिक प्रभावी वाटून तुलनेने पुस्तकांचा प्रभाव पडला नसेल असं होण्याचीही शक्यता मला पूर्णपणे मान्यच आहे.

अत्यंत अभ्यासू आणि फिल्ममेकिंगचे विविध प्रयोग यशस्वीरीत्या करणाऱ्या दिग्दर्शक Christopher Nolan याचा Memento हा चित्रपट त्याचा भाऊ Jonathan Nolan याने लिहिलेल्या Memento Mori या लघुकथेवर आधारित आहे. अर्थात चित्रपटात बरेच बदल केलेले आहेत तसेच दोन निरनिराळ्या कालरेषांवर घडणारे प्रवास हे प्रत्यक्षात समोर घडताना पाहणं आणि तशी कल्पना करून वाचन करणं यात दृश्य माध्यमाला मिळणाऱ्या स्वाभाविक फायद्यामुळे चित्रपट हा लघुकथेपेक्षा अधिक उजवा आणि प्रेक्षणीय ठरतो हे नक्की.


पुढचं उदाहरणही असंच कदाचित न पटणारं आहे. पण अर्थात हे ही आहे की हा चित्रपट आणि तो ज्या

लघु-कादंबरी (novella) वर आधारित आहे ते दोन्ही त्याच तोलामोलाचे आहेत असं म्हंटल तर वावगं ठरू नये. ते म्हणजे अनेक दशकं लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर असणारा Shawshank Redemption हा चित्रपट आणि Stephen King या अमाप लोकप्रिय अशा अमेरिकन भयकथाकाराची Rita Hayworth and Shawshank Redemption ही लघु-कादंबरी. चित्रपट आणि कादंबरी हे जवळपास तोलामोलाचे असले तरी चित्रपटात सुरुवातीस येणारे काही करुण प्रसंगनिवेदक रेड आणि त्याच्या संबंधातले काही प्रसंग यामुळे चित्रपट कादंबरीपेक्षा किंचित उजवा वाटू शकतो.

अर्थात ही झाली मी वाचलेल्या आणि पाहिलेल्या कलाकृतींची उदाहरणं. अशी अजूनही अनेक उदाहरणं असतीलच किंवा ती वर मांडलेल्या मुद्द्याच्या विरुद्ध जाणारी किंवा थोडक्यात "पुस्तक हे चित्रपटापेक्षा श्रेष्ठ असतं" या सर्वमान्य नियमाचं पालन करणारीही असतील आणि त्यामुळेच त्यांचा या आपल्या आजच्या लेखात समावेश झाला नाही हे उघड आहे. आणि अर्थातच पुस्तक किंवा मूळ कलाकृती ही त्याच्या रूपांतरित आवृत्तीपेक्षा (चित्रपट/सिरीज) पेक्षा श्रेष्ठ असते हे सिद्ध करणारी बोकीलांच्या 'शाळापासून ते जॉन ग्रिशमडॅन ब्राऊनली चाईल्डमायकल कॉनली यांच्या पुस्तकांपर्यंतची 'Lost in Translation' ची असंख्य उदाहरणं आपणा सर्वांना माहित असतातच आणि त्यावर वेळोवेळी लेखन आणि चर्चा झालेल्या असल्याने या नियमाच्या विरुद्ध असणारी 'Gained in Translation' ची काही निवडक उदाहरणं नजरेस पडली म्हणूनच हा लेखनप्रपंच!

3 comments:

  1. काय भारी लिहीले आहेस !!
    डॅा. अस्मिता फडके (

    ReplyDelete
  2. असाच प्रकार एका मराठी नाटकाबद्दल झाला आहे. ( अर्थात हे माझे मत). दोन स्पेशल हे ते नाटक. जितेंद्र जोशी व गिरीजा ओक यांच्या मुख्य भूमिका असलेले . नाटकाचा संहिता क्षितिज पटवर्धनची आहे. नाटक फार आवडले म्हणून ह. मो. मराठे यांची मूळ कथा वाचली पण तिने पूर्ण निराशा केली.
    डॅा अस्मिता फडके

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. बघायचंय हे नाटक.

      Delete