'द स्टोनिंग ऑफ सोराया एम' हे चित्रपटाचं नाव. त्यातलं 'स्टोनिंग' हे आत्ता इथे लिहितानाही माझे हात थरथरत होते. म्हणून शीर्षकात लिहिताना तेवढं वगळून लिहिलं. आपली लिहिता वाचतानाही ही अवस्था होते त्या बिचाऱ्या सोरायाने कसं भोगलं असेल !!
“Don't act like the hypocrite, who thinks he can conceal his wiles while loudly quoting the Koran.”
--Hafez, 14th Century Iranian Poet
अशा झणझणीत अंजनाने चित्रपटाची सुरुवात होते. पुढे काय बघायला लागणार आहे याची खरं तर चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच थोडीफार कल्पना असते. आणि इतक्या उघडपणे शीर्षकात ते मांडल्याने ते तसं लपवून ठेवण्याचा किंवा चित्रपटाच्या शेवटी रहस्यभेद करण्याचा चित्रकर्त्यांचा हेतू नक्कीच नाही. तर ते कशा पद्धतीने घडलं, कायदे कसे वाकवले, वळवले गेले, शरिया कायद्याचा दुरुपयोग, इराणमध्ये महिलांच्या रोजच्या जगण्याची दुर्दशा, इस्लाम आणि न्यायाच्या नावाखाली त्यांच्यावर केले जाणारे अन्याय, अत्याचार आणि कवडीमोल आयुष्याची फरपट हे सगळं दाखवणं हा मुख्य उद्देश आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीला एका फ्रेंच-इराणी पत्रकाराची गाडी इराणमधल्या एका गावात बंद पडते आणि योगायोगाने त्याची भेट एका स्त्रीशी होते. तिच्याकडून त्याला तिच्या भाचीवर झालेल्या अत्याचाराची आणि स्टोनिंगची अर्थात दगडांनी ठेचून मारलं गेल्याविषयीची माहिती मिळते अशी चित्रपटाची रूपरेषा. वर म्हंटल्याप्रमाणे यात काहीही रहस्य नाही. पण ते कसं घडतं किंबहुना घडवलं जातं ते पाहणं हा एक अत्यंत क्लेशदायक, भयकारी अनुभव आहे !
चित्रपटात फ्लॅशबॅक, गाणी, निसर्गदृश्य (एक-दोन अपवाद वगळता) वगैरे नेटके प्रकार काहीही नाहीत. सरळमार्गी एका लयीत कथा उलगडत जाते आणि प्रसंगागणिक आपल्या छातीवरचं दडपण वाढत जातं ! काही प्रसंग फार फार अप्रतिम दाखवले आहेत. सोराया आणि तिच्या दोन मुलींचा हिरवळीवरचा एक प्रसंग आहे ज्यात त्यांचं नातं, निरागसपणा फार छान उलगडून दाखवला आहे. आणि तेवढाच भयानक असा दुसरा एक प्रसंग आहे. तो म्हणजे प्रत्यक्ष स्टोनिंगपूर्वी लहान लहान मुलं छोटे दगड गोळा करून ते एकावर एक वाजवून त्यांचा आवाज करतात तो प्रसंग ! तो आवाज सहन होत नाही. त्या मुलांकडे बघवत नाही. चित्रपट बंद करावासा वातो. पळून जावसं वाटतं !
बाहेरख्याली नवऱ्याच्या थेरांना दाद दिली नाही म्हणून एका निष्पाप जीवाचा, दोन मुलं आणि दोन मुलींच्या आईचा अत्यंत अमानुषपणे जीव घेतला जातो. गावचा सरपंच (मेयर) आणि प्रमुख मौलवी नवऱ्याला सामील ! खोट्या साक्षी देऊन निकाल दिला जातो. सोरायाला व्यभिचारी ठरवलं जातं. व्यभिचारासाठी इराणमध्ये शिक्षा एकच... स्टोनिंग !!!!! आणि तीही फक्त स्त्रीला.. स्त्रीबरोबर तथाकथित व्यभिचार करणारा पुरुष हा स्वतः स्टोनिंग मध्ये सहभागी होऊ शकतो ! स्टोनिंगमध्ये तिच्या व आणि हे सगळं का तर सोरायाच्या नवऱ्याला दुसऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलीशी लग्न करता यावं आणि घटस्फोट दिल्यावर पोटगी द्यावी लागू नये म्हणून !!! मुलीची मावशी मावशी हा सगळा प्रकार टाळण्यासाठी जंग जंग पछाडते पण तिला कोणीच दाद देत नाही. आणि कळस म्हणून की काय तर तिची दोन मुलं आणि स्वतः वडीलही स्टोनिंग मध्ये सहभागी होतात. प्रत्यक्ष स्टोनिंगचा प्रसंग तर अत्यंत अत्यंत अत्यंत हृदयद्रावक आहे. "'मरणाची' भीती वाटत नाही पण 'मरण्याची' भीती वाटते.... अशा प्रकारे मरण्याची, यातनांची भीती वाटते" म्हणणारी, "मी रडणार नाही" असं म्हणणारी परंतु शेवटी वेदना असह्य झाल्याने स्वतःला आवरू न शकणारी सोराया डोळ्यापुढून हलत नाही. आणि यातला प्रत्येक प्रसंग (अर्थात काही प्रसंग वगळता) प्रत्यक्षात घडलेला आहे ही जाणीव शेवटपर्यंत आपला पाठ सोडत नाही. चित्रपट संपल्यावरही !!
फ्रेडन साहेबजम (Freidoune Sahebjam) या फ्रेंच-इराणी पत्रकाराच्या सत्यघटनेवर आधारित असलेल्या त्याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला हा चित्रपट. त्याने या पुस्तकाखेरीजही इराणमध्ये होणारी मानवी हक्कांची पायमल्ली, स्त्रियांना मिळणारी नीचतम वागणुक, तिथले अमानुष कायदे इत्यादींविरुद्ध बराच आवाज उठवला. या पुस्तकाच्या निमित्ताने इराणमधला अमानुषपणा पाश्चिमात्य जगासमोर आला. अर्थात समोर येणाऱ्या अशा एखाद्या प्रसंगागणिक कित्येक कधीच सामोरे न येणारे, दडपले जाणारे प्रसंग असतील !
मला कल्पना आहे हा लेख जरा विस्कळीत झाला आहे परंतु इतका भीषण अनुभव घेतल्यावर काही सुचणं तसंही अशक्य आहे ! आणि अशा कित्येक सोराया आजही असलं भयानक जीवन जगत असतील या कल्पेनेने तर... !!
>>>आणि अशा कित्येक सोराया आजही असलं भयानक जीवन जगत असतील या कल्पेनेने तर... !!
ReplyDelete:( :(
:((
Deleteबापरे! मला वाचतानाही भयंकर असह्य वाटत होतं... पाहताना काय होईल... तिला हे सगळं भोगताना... अशक्य आहे हे सारं. जग किती क्रूर आहे. :( :(
ReplyDeleteआजही हे सगळं सुरू असेलच... :((
हो. फार भयंकर चित्रपट आहे.. बघवत नाही !
Deleteआपण कुठे आणि कोणाच्या पोटी जन्माला येतो हे फार महत्त्वाचं आहे. आपलं नशीब, आपण भारतात आणि आपल्या आईवडीलांच्या पोटी जन्माला आलो. ही झाली नशिबाची बाब. पण त्यापुढे जाऊन, मी निदान एक तरी चांगले काम करून शकले तर जन्माला येऊन पृथ्वीची ५ फुट ३ इंच जागा अडवून काहीतरी बरं काम केलं असं म्हणून मरायला मी मोकळी होईन.
ReplyDeleteखरंच आपण फार फार फार सुदैवी आहोत !!
Deleteअगदी खरं....
Deleteभयानक...अस्वस्थ....भारतात...महाराष्ट्रात...प्रगतीशिल विचार असणार्या घरात....समाजात....जन्माला आलो म्हणून सुदैवी वाटून घ्यायचं का जगाच्या पाठीवर धर्माच्या...अंधश्रध्दांचा ...तथाकथित श्रध्दा, समजुती, कायदे यांच्या नावाखाली हे जे काही अमानवी होतं त्याबद्दल दुद्रैवी वाटून घ्यायचं....वाचतानाही अस्वस्थ झालं...बघणं झेपणं अशक्य आहे...तरिही मस्ट वॉच यादीत आलाच आहे....
ReplyDeleteबाय दे वे...हा नवा ब्लॉग कधी? मी आत्ता पाहिला....खूप छान....