नवरा परागंदा झालेला, पदरात तीन मुलं, त्यातलं एक एकदम तान्हं तर सगळ्यात मोठी मुलगी कॉलेजमध्ये जाणारी, आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट, एक तुटकीफुटकी नोकरी जिची खात्री नाही, स्वभावामुळे नोकऱ्या सारख्या जातात, नवीन नाती जुळवताना त्रास होतो, निद्रानाशाची समस्या आहे.....
अशा वर्णनाची, अशा परिस्थितीतली स्त्री आपल्याकडच्या चित्रपटात किंवा मालिकांमध्ये फारच गरीब, अबला, दुर्बळ वगैरे दाखवली असती. वर दिलेलं वर्णन वाचून तरी नक्कीच असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण ही अमेरिकन मालिका असल्याने प्रत्यक्षात मात्र ही स्त्री आपल्यासमोर अतिशय वेगळ्या स्वरूपात उभी राहते.
नवरा परागंदा झालाय पण
त्याचा शोध घेण्याचा मार्ग सापडतोय, तीन मुलं आहेत पण सुदैवाने तिघंही अतिशय समजूतदार, बुद्धिमान, कल्पक आहेत, आर्थिक परिस्थिती बिकट
असली तरी त्यावरही मार्ग निघतोय, एक नोकरी गेली तरी दुसरी मिळते आहे, नवीन नाती जुळवता येत नसली, निद्रानाशाचा त्रास असला तरी तो चांगल्या कारणासाठी आहे. आणि आपल्यासमोर उभी
असलेली स्त्री ही शोषित अबला नसून चाळिशीतली एक अत्यंत आकर्षक (प्रसंगी मादक), अत्यंत बुद्धिमान, देखणी, बडबडी, बिनधास्त, बेधडक कृतीवर विश्वास
ठेवणारी अशी धडाकेबाज स्त्री आहे हे पाहून सुरुवातीलाच सुखद धक्का बसतो.
नोकऱ्या टिकत नाहीत ते अतिशय उच्च बुद्ध्यांक (IQ) असल्याने कोणाशी फारसं पटू शकत नसल्या कारणाने, नातेसंबंध टिकत नाहीत तेही साधारण याच कारणामुळे, निद्रानाशाचा त्रास आहे तो एखादी गोष्ट चुकीची दिसली की तिचा मूळापर्यंत जाऊन शोध घेतल्याशिवाय स्वस्थ बसता न येण्याच्या मूलभूत स्वभावामुळे. तर अशी ही स्त्री म्हणजे मॉर्गन गिलरी (केटलीन ओल्सन) जी लॉस अँजलीस पोलीस खात्याच्या कार्यालयातल्या केबिन्स, फर्निचर इत्यादींची साफसफाई करणारी एक अतिसामान्य सफाई कामगार कर्मचारी असते. एका हत्येच्या तपासाच्या कामात ती अपघातानेच जाऊन धडकते आणि आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर त्या प्रकरणातले कच्चे दुवे चुटकीसरशी हेरते. या पहिल्या प्रसंगापासूनच प्रेक्षक मॉर्गनच्या आणि High Potential या मालिकेच्याही प्रेमात पडतो.
शेरलॉक ब्रेनचा नायक, त्याने दुवे जोडणे, धागे जुळवणे, गुंता सोडवणे आणि इतरांना (आणि मुख्यतः प्रेक्षकांना) न दिसलेल्या किंवा दिसूनही लक्षात न आलेल्या तथ्यांच्या आणि दुव्यांच्या आधारे अवघड कोडी चुटकीसरशी सोडवणे हा प्रकार आपण आत्तापर्यंत खुद्द शेरलॉक होम्स, डॉ हाऊस, मॉन्क, मेंटालिस्ट, रीचर पासून ते थेट आपल्या लाडक्या ब्योमकेश बक्षी पर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये बघितला आहे. या मालिकेत मात्र हे सगळे अचाट प्रकार करणारी व्यक्ती एक स्त्री आहे. ती शेरलॉक किंवा डॉ हाऊस सारखी माणूसघाणी नाहीये की रीचरसारखी अफाट ताकदही तिच्याकडे नाहीये. ती सहृदय आहे, सत्याचा शोध घेण्यासाठी कायदा मोडण्याचीही तिची तयारी आहे. आणि याच कारणावरून तिला ज्याच्याबरोबर काम करावं लागत आहे किंवा ज्याला बळजबरीने तिचा पार्टनर बनवण्यात आलं आहे त्या डिटेक्टिव्ह कॅराडेकशी तिचे पहिल्या क्षणापासून खटके उडत असतात. मात्र एकत्र काम करता करता हळूहळू एकमेकांच्या स्वभावांची ओळख झाल्यावर ते एकमेकांचे चांगले मित्रही बनतात.
अर्थात कुठलीही मालिका किंवा चित्रपट कधीच नसतो त्याचप्रमाणे ही मालिकाही परिपूर्ण नाही. यातही अनेक कच्चे दुवे आहेत. काही गुन्हे अगदी चुटकीसरशी सुटल्यासारखे वाटतात, तर काही गोष्टी अविश्वसनीय म्हणाव्या अशाही घडतात. काही पात्रांचं मालिकेतलं नक्की स्थान किंवा त्यांचे संदर्भ कळत नाहीत. परंतु माझ्या मते ते जाणूनबुजून थोडं संदिग्ध ठेवण्यात आलं असावं. कारण एक तर हा पहिलाच सिझन आहे. त्यातही सप्टेंबरमध्ये सुरु झालेल्या सीझनचे आत्तापर्यंत सातच एपिसोड्स प्रसारित झाले असून पुढचे चार एपिसोड्स जानेवारी २०२५ मध्ये प्रसारित होणार आहेत. प्रेक्षकांचा एकूण प्रतिसाद पाहून त्याप्रमाणे मालिकेचा आणि पात्रांचाही पुढचा प्रवास निश्चित होणार असेल.
तरीही या मालिकेची आवर्जून सांगण्यासारखी काही वैशिष्ट्यं म्हणजे मालिकेचा एकूणच अतिशय फ्रेश लूक, केटलीन ओल्सनचा
प्रसन्न वावर, चटपटीत संवाद आणि
वेळोवेळी दिली गेलेली चुरचुरीत विनोदांची फोडणी. या एवढ्या बाबींमुळे कदाचित
ताबडतोब नाही परंतु कालांतराने तरी ही प्रेक्षकांची आवडती मालिका आणि आवडतं स्त्री
पात्र होऊ शकेल एवढं High Potential अनुक्रमे या मालिकेत आणि मॉर्गन गिलरीमध्ये नक्कीच आहे.
--हेरंब ओक
तळटीप :
१. मी फारसा रील्स बील्सच्या वाट्याला जाणारा माणूस नसूनही गेल्या आठवड्यात अपघातानेच एक रील समोर आलं आणि तो प्रसंग एवढा आवडला की तडक मालिकेचं नाव शोधून काढून बघूनही टाकली. हाच तो प्रसंग
२. मालिका hulu किंवा apple tv वर उपलब्ध आहे बहुतेक.
माझ्याकडे त्याचं किंवा कुठल्याही OTT चं सभासदत्व नसल्याने नक्की मात्र सांगता येणार नाही.