Wednesday, July 10, 2024

'अविरत हाणामारी'चा प्रभावी खेळ : किल

काही दिवसांपूवी ‘किल’चा टिझर आणि नंतर ट्रेलर बघताना जेव्हा ट्रेनमधला लांबलचक असा सलग हाणामारीचा प्रसंग पहिल्यांदा बघितला तेव्हा सर्वप्रथम मला जेम्स मधल्या ट्रेनमधल्या हाणामारीच्या प्रसंगाची तीव्रतेने आठवण झाली. अर्थात ट्रेन हा एक सामायिक दुवा सोडल्यास दोन्हींच्या हाणामारीच्या प्रकृतींमध्ये खूपच फरक आहे, अनेक पातळ्यांवर फरक आहे. जेम्समध्ये गुंडांची संख्या, स्लो मोशनमध्ये चालणारी हाणामारी, एका किंवा फार तर दोन ठोश्यांमध्ये लोळवले जाणारे गुंड दिसतात आणि एकूण प्रसंगाचा जीवच जेमतेम दहा एक मिनिटाचा आहे. पण संपूर्ण चित्रपट या एकाच संकल्पनेभोवती फिरत असेल तर बघताना प्रेक्षकांच्या मनावर किती प्रचंड ताण निर्माण होईल कल्पनाही करणं अवघड आहे. आणि त्यात पुन्हा ती हाणामारी कमी म्हणून सोबतीला अतीव रक्तपाताची फोडणी असेल तर प्रकरण अधिकच गंभीर होत जाणार हे नक्की. हा ताण चित्रपटभर भेटीला येणाऱ्या सततच्या थरकाप उडवणाऱ्या दृश्यांच्या माध्यमातून अधिकाधिक चढत्या पातळीवर नेण्यात दिग्दर्शक निखिल नागेश भट कमालीचा यशस्वी झाला आहे.

अशा संपूर्ण वेळ अथक आणि अविरतपणे चालणाऱ्या मारामाऱ्या बघत असताना
Raid आणि Raid : Redemption या दोन इंडोनेशियन चित्रपटांची आठवण होणं स्वाभाविकच. अर्थात किल आणि रेड (१ आणि २) मधला प्रमुख फरक म्हणजे रेड ची निर्मिती ही प्रामुख्याने पारंपरिक इंडोनेशियन मार्शल आर्टस् च्या प्रचार आणि प्रसारासाठीच करण्यात आलेली असल्याने त्यातल्या मारामाऱ्या या क्षणभराचीही उसंत घेत नाहीत आणि अर्थात त्यांमध्ये क्वचित अपवाद वगळता फार रक्तपातही नाही. किल मध्ये मात्र डोकं, हात, पाय, नाक, तोंड फोडण्याचे प्रसंग सातत्याने घडत राहतात. त्यामुळे ते थरारकच नव्हे तर अनेकदा (अर्थात चांगल्या अर्थी) भीतीदायक वाटतात.

सुरुवातीच्या काही मिनिटांतच चित्रपट ज्या परीसरात घडणार आहे त्या क्षेत्राच्या मर्यादा आखल्या जाऊन त्या प्रेक्षकांसमोर स्पष्टपणे मांडून दाखवल्या जातात आणि काही अपवाद वगळता त्या मर्यादांचे नियम दिग्दर्शक शेवटपर्यंत पाळतोही. त्यामुळे कुठल्या भागात काय परिस्थिती आहे, कुठली घटना कुठे घडते आहे, त्याचा इतर घटनांशी आणि तिथल्या व्यक्तींशी काय संबंध आहे हे सगळं प्रेक्षकांना पूर्णवेळ व्यवस्थितपणे कळत राहतं.

चित्रपटाचा नायक हा पूर्णवेळ नायक वाटतो, कुठेही चुकूनही सुपरहिरो वाटत नाही. त्याला लागतं, जखमा होतात, तो बेशुद्धही पडतो पण दरवेळी धडपडत, लंगडत का होईना पुन्हा उभाही राहतो. पण खरं सांगायचं तर 'अविरत हाणामारी' हा या चित्रपटाचा प्रमुख आणि खराखुरा नायक आहे. या चित्रपटात मारामारीचे विविध प्रकार लीलया हाताळण्यात आले आहेत. या चित्रपटातील मारामाऱ्या या प्रामुख्याने अतिशय कमी जागेत, अत्यंत मर्यादित हालचाल शक्य असणाऱ्या ठिकाणी घडतात. त्यामुळे त्या एकसुरी वाटू नयेत यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न दिग्दर्शक आणि दक्षिण कोरियन action choreographer 'Se-yeong Oh' यांनी केलेले आहेत आणि त्यात ते कमालीचे यशस्वीहे झालेले आहेत. हे सर्व करताना त्यासाठी त्यांनी अनेक शक्यतांचा धांडोळा घेतला आहे. यातल्या मारामाऱ्या अंधारात आहेत, लख्ख (कृत्रिम) उजेडात आहेत, धुरात आहेत, धुक्यासम भासणाऱ्या वातावरणातही आहेत. त्याचबरोबर चाकू, सुरा, गुप्ती, बंदूक या पारंपरिक हत्यारांसोबतच अग्निशामक सिलेंडर, काचांचे तुकडे, कुलूप, साखळी, जेवणाचे डबे. हॉकी स्टिक यांसारख्या अपारंपरिक हत्यारांचाही यात सढळ हस्ते वापर करण्यात आला आहे. यात बंदुकांचा वापर अतिशय मर्यादित आहे, कुठेही उगाचच बेछूट असे गोळीबार नाहीयेत. सगळा भर हॅन्ड-टू-हॅन्ड कॉम्बॅटवर देण्यात आला आहे.

संपूर्ण चित्रपटाला एक दक्षिण कोरियन थरारपटाचं स्वरूप प्राप्त झालं आहे ते Se-yeong Oh याच्यामुळे. IMDB वर नायक (लक्ष्य) आणि खलनायक (राघव जुयाल) यांच्या मुलाखती दरम्यान लक्ष्यने Se-yeong Oh चा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. तसंच यातला खलनायक एक विक्षिप्त, क्रूर, चक्रम, अत्यंत बेफिकीर आणि क्रिकेट व चित्रपटांची आवड असणारी आणि अचूक टायमिंगसह संवादफेक करणारी व्यक्ती आहे. खलनायकाचे हे सगळे गुणविशेष पडद्यावर प्रभावीपणे उतरवण्यासाठी राघव जुयालने सातत्याने मोझार्टचं संगीत ऐकत असल्याचा उल्लेख मुलाखतीदरम्यान केला आहे.

चित्रपटात काही निवडक प्रसंगांदरम्यान वेस्टर्न चित्रपटांची आठवण करून देणारे गिटार पिसेस वाजत राहतात, त्याचबोबर ड्रम्सचे तुकडेही कानावर पडत राहतात. त्यामुळे एक निराळ्या प्रकारची वातावरण निर्मिती व्हायला मदत होते. सततच्या या हाणामारीमुळे जॉन वीक ची आठवण होणं अगदीच अपरिहार्य आहे. त्याचबरोबर अग्निशामक सिलेंडरच्या प्रसंगात Irreversible या इटालियन प्रसंगाची तर ट्रेनमध्ये गुंडांना टांगून ठेवून इतर गुंडांना डिवचण्याचा प्रसंगात डाय हार्डमधल्या लिफ्टमधल्या सांताक्लॉजच्या प्रसंगाची नक्कीच आठवण होते.

वर म्हंटल्याप्रमाणे चित्रपटाचा खरा नायक 'अविरत हाणामारी' हा आहे. यात जेमतेम तोंडी लावण्यापुरती असलेली एक प्रेमकथा वगळता हा चित्रपट पूर्णतः नो-नॉन्सेन्स प्रकारचा आहे. यात उगाच कंबरेखालचे बिनडोक विनोद नाहीयेत, विचित्र अंगविक्षेप नाहीयेत, की खानदान की इज्जत वाले मूर्ख प्रकार नाहीयेत. आहे ती प्रेक्षकांवर सातत्याने सढळ हस्ते बरसणारी उच्च दर्जाची अ‍ॅक्शन. त्यामुळे हार्डकोअर अ‍ॅक्शनप्रेमी प्रेक्षकांसाठी ही एक अत्युच्च दर्जाची मेजवानी आहे जी चुकवलीत तर जन्मभर पश्चात्ताप होत राहील !!

--हेरंब ओक